‘हजारां’वरील हिंसाचाराचा पाकी हिंस्रपणा

10 Feb 2021 20:44:18

hazara _1  H x


 
 
२०१२ ते २०१७ पर्यंत ५०० पेक्षा अधिक ‘हजारा’ बलुचिस्तानची राजधानी क्वेटामध्येच दहशतवादी हल्ल्यांमध्ये मारले गेले आणि क्वेटा प्रत्यक्षात हजारांच्या ‘घेट्टो’मध्ये परिवर्तित झाल्याचे दिसते. इतके होऊनही ‘हजारा’ समुदायावरील हल्ल्यांविरोधात पाकिस्तानी लष्कराची भूमिका कायम उपेक्षेचीच राहिली.

 
बलुचिस्तानमधील खाणींच्या प्रदेशातून तिथे काम करणार्‍या मजुरांचे पलायन सुरू असल्याचे गेल्या काळातील घडामोडींवरून दिसून येते. त्यासंबंधी मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, बलुचिस्तानमधील हजारो खनिकर्मचार्‍यांनी आपल्या रोजगाराला ‘अलविदा’ म्हटले आहे, तर गेल्या महिन्यात एका कोळशाच्या खाणींमधील दहा ‘हजारा’ (पाकिस्तानातील मुस्लीम धर्मीयांतील हजारा समुदाय) समुदायातील कामगारांना ठार मारल्यानंतर हजारो खनिकर्मचार्‍यांनी पलायन केले आहे.
 
 
 
 
उल्लेखनीय म्हणजे, ‘हजारा’ समुदायातीलच खनिकर्मचार्‍यांना जानेवारीच्या सुरुवातीला बंदुकधार्‍यांकडून माच नामक पर्वतीय प्रदेशातून अपहरण करत त्यांची हत्या करण्यात आली होती. ‘रॉयटर्स’ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ‘इस्लामिक स्टेट’ म्हणजेच ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेने आपल्या ‘अमाक’ नामक वृत्तसंस्थेच्या माध्यमातून या हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. त्याचा तत्कालिक परिणाम म्हणून बलुचिस्तानमधील प्रमुख आर्थिक गतिविधी अर्थात खाणकाम पूर्णपणे ठप्प झाल्याचे समोर आले. कामगार संघटना आणि पाकिस्तानच्या सरकारी अधिकार्‍यांच्या मते, या हत्याकांडानंतर जवळपास १५ हजार कामगारांनी कामावर जायला नकार दिला व परिणामी, २०० पेक्षा अधिक खाणी बंद पडल्या आणि उत्पादनात मोठी घसरण झाली.
 
 
 
एकोणिसाव्या शतकात ‘हजारा’ समुदायातील लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर बलुचिस्तानमध्ये राहत असे आणि दशकानुदशकांच्या प्रतीक्षेनंतर त्यांना इथल्या स्थायी नागरिकांच्या रूपात स्वीकारले गेले. बलुचिस्तानमध्ये वसल्यानंतर ‘हजारा’ समुदायाचा पहिला पेशा ब्रिटिश भारतीय लष्करात सेवा करणे हा होता. त्याला सर्वोच्च मान्यता अयूब खान यांनी केलेल्या सत्तापालटानंतर जनरल मुहम्मद मुसा खान यांना पाकिस्तानी लष्कराच्या प्रमुखासारखे प्रभावशाली दायित्व सोपवल्यानंतर मिळाली. तथापि, पाकिस्तानच्या स्थापनेनंतर लष्करावर पंजाबी वर्चस्वाच्या स्थापनेनंतर ‘हजारा’ समुदाय व्यापार आणि उद्योगक्षेत्रातही पुढे गेला आणि त्यांनी बलुचिस्तान प्रदेशात मोठ्या प्रमाणावर आपल्या मालकीच्या खाणी खरेदी केल्या. तसेच मोठ्या व्यावसायिक उपक्रमांची स्थापनाही केली. आज सीमांत ‘हजारा’ समुदायामुळे बलुचिस्तानच्या आर्थिक कार्यशक्तीत एक मोठा वाटा तयार होताना दिसतो.
 
 
 
 
दरम्यान, २००३ साली खालिद हुसैनी यांची ‘द काईट रनर’ ही कादंबरी प्रकाशित झाली व यात ‘हजारा’ समुदायातील विषम परिस्थिती, त्यांच्यावर होणार्‍या अत्याचारांचे जीवंत चित्रण करण्यात आले, जे वास्तवाहून अजिबात भिन्न नव्हते. ‘हजारा’ समुदायातील लोकांच्या जीवाची व वित्ताची सुरक्षा पाकिस्तान सरकारच्या दृष्टीने कधीही प्राधान्याचा मुद्दा राहिला नाही. शिया पंथाच्या मताला प्रमाण मानणार्‍या ‘हजारा’ समुदायाला सातत्याने कट्टरपंथी इस्लामी दहशतवादी गटांद्वारे प्रताडित केले गेले. १९७७ साली झिया-उल-हक सत्तेत आल्याने व त्यानंतरच्या अफगाणिस्तानातील मुजाहिद्दीन युद्धानंतर तर ‘हजारा’ समुदायाच्या प्रताडनेला आणखी वेग आला.
 
 
 
अमेरिकेतील ११ सप्टेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर क्वेटातील पुडगली चौकात झालेल्या हत्याकांडातून बलुचिस्तानमधील ‘हजारा’ समुदायाच्या विनाशाचे आणखी एक युग सुरू झाले. ‘हजारा’ समुदायाच्या या संहाराला ‘तालिबान’, ‘सिपाह-ए-सहाबा’, ‘लष्कर-ए-झांगवी’ यांसारख्या कट्टरपंथी इस्लामी संघटनांनी सातत्याने प्रत्यक्षात आणले. परवेझ मुशर्रफ यांच्या लष्करी सत्ताकाळात जिहादी संघटनांच्या खात्म्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव टाकण्यात आला व काही दहशतवादी संघटनांनी स्वतःला ‘अहल-ए-सुन्नत-वल-जमात’ आणि तुलनात्मकरीत्या नवगठीत ‘पाकिस्तान राह-हक पार्टी’ यांसारख्या राजकीय आघाड्यांच्या माध्यमातून स्वतःला संघटित केले.
 
 
 
नंतरच्या दशकात पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर शिया पंथीयांविरोधात हिंसाचाराच्या घटना घडल्या. २०१३च्या सुरुवातीला क्वेटामधील लागोपाठच्या बॉम्बस्फोटांद्वारे ‘हजारा’ समुदायातील जवळपास १६५ लोकांची हत्या करण्यात आली. २००४ पासून आतापर्यंत दोन हजारांपेक्षाही अधिकांचा जीव घेण्यात आला. २०१२ ते २०१७ पर्यंत ५०० पेक्षा अधिक ‘हजारा’ बलुचिस्तानची राजधानी क्वेटामध्येच दहशतवादी हल्ल्यांमध्ये मारले गेले आणि क्वेटा प्रत्यक्षात हजारांच्या ‘घेट्टो’मध्ये परिवर्तित झाल्याचे दिसते.
 
 
 
इतके होऊनही ‘हजारा’ समुदायावरील हल्ल्यांविरोधात पाकिस्तानी लष्कराची भूमिका कायम उपेक्षेचीच राहिली. एप्रिल २०१८मध्ये स्थानिक ‘हजारा’ समुदायाला लक्ष्य करून केल्या गेलेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या विरोधात या समुदायाच्या सदस्यांनी उपोषण केले होते. त्यावेळी लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनी ‘हजारा’ समुदायाचे रक्षण करू, असे आश्वासन दिले व ते उपोषण संपलेही. पण, त्या आश्वासनाला एक वर्ष होत नाही, तोच त्याच्या आधीच क्वेटाच्या हजारागंजी भागात झालेल्या एका बॉम्बस्फोटात पुन्हा एकदा ‘हजारा’ समुदायाला लक्ष्य करण्यात आले. त्यात ‘हजारा’ समुदायातील किमान २० जणांचा बळी गेला आणि ४८ जण जखमी झाले.
 
 
 
‘हजारा’ समुदायावरील हा हल्ला केवळ सुरक्षेतील त्रुटी नव्हती, तर खोलवर विचार करता इथल्या दहशतवादी संघटना बलुचिस्तानमधील राष्ट्रवाद्यांना त्रास देण्यात पाकिस्तानी लष्कराच्या प्रमुख सहकार्‍याची भूमिका निभावत असल्याचे दिसून येते आणि त्यांच्याविरोधात पाकिस्तानी लष्कर कारवाई करेल, असे मानने बेइमानी ठरेल. या प्रदेशातील कट्टरपंथी दहशतवादी संघटना नियमितपणे कोळसा खाण मालकांकडून आणि कामगार अपहरण तथा खंडणी वसुलीद्वारे मोठ्या प्रमाणावर पैसा गोळा करतात आणि यात अपयश आल्यास त्याच्या परिणामस्वरूप या समुदायाविरोधात जीवघेणा हिंसाचार केला जातो.
 
 
 
म्हणजे एका बाजूला खाणीत काम करण्यासाठी गेलो तर दहशतवाद्यांकडून जीवाची भीती आहे, तर विद्यमान स्थिती स्थानिक समुदायासाठी गंभीर समस्या निर्माण करत आहे. कोळसा खाणी बंद झाल्याने खनिकर्मचारी, सुरक्षा कर्मचार्‍यांसह वाहनचालक, मदतनसीसारख्या अन्य कर्मचार्‍यांसाठी आता रोजगाराचे कोणतेही साधन उरलेले नाही. इथली सध्याची परिस्थिती इतकी वाईट आहे की, या लोकांकडे दैनंदिन गरजांच्या पूर्ततेसाठीदेखील हातात एक छदामही नाही. एका वेळच्या जेवणालाही ते महाग झाले आहेत. तथापि, असे असूनही पाकिस्तान सरकारवर त्याचा कसलाही परिणाम होताना दिसत नाही.



(अनुवाद : महेश पुराणिक)
Powered By Sangraha 9.0