दिव्यांगांना सर्वच स्तरावर समर्थ साथ देऊन त्यांना स्वावलंबी बनवण्याचे कार्य ‘स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान’ करते. शैक्षणिक, आरोग्य आणि सामाजिक या सर्वच आयामातून दिव्यांगांनी आपले अस्तित्व समर्थपणे उभे करावे यासाठी प्रतिष्ठानचे काम चालते. प्रतिष्ठानच्या कार्याबद्दल या लेखात माहिती दिली आहे.
अपंग’, ’दिव्यांग’..हे शब्द कानावर पडले की, मनात भावना निर्माण होते ती सहानुभूतीची. आपण प्रत्येक जण अरेरे... चक-चक एवढं म्हणण्याइतपत नक्कीच संवेदनशील असतो. पण केवळ इतकी संवेदनशीलता दाखवून भागणार नाही आणि हे समजण्याची आता वेळ आली आहे. हा विषय किती खोलवर आहे हे समजण्यासाठी तुम्हाला एक उदाहरण सांगते. शौचाला जाणं ही किती महत्त्वाची गोष्ट आहे, हे मनुष्य प्राण्याला सांगण्याची गरज नाही. आपल्याकडे असंख्य लोक हे चाळींमध्ये, झोपडपट्ट्यांमध्ये राहतात, जिथे हातात टमरेल घेऊन बरीच पावले चालत, वस्त्यांमधून वाट काढत शौचालयापर्यंत जावं लागतं. शौचालयांच्या आतली व्यवस्था हा अजून एक भयंकर विषय आहे. पण फक्त विचार करा या परिस्थितीत जर एखाद्या अपंग व्यक्तीला शौचाला जायचं असेल, तर त्याचा स्ट्रगल काय असेल आणि तो फक्त शारीरिक असेल का? तर नाही. शारीरिक संघर्ष हा फार स्वाभाविकपणे मानसिक संघर्षसुद्धा घेऊन येतो आणि म्हणूनच बर्याचदा खूप काम करायला लागल्यानंतर आपलीसुद्धा चीडचीड होते. या उदाहरणावरून मला एवढेच सांगायचे आहे की, एका अपंग व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्यात अशा अनेक गोष्टी आहेत की, ज्या करताना त्या व्यक्तींसाठी तो एका पद्धतीचा लढाच असतो.
गोष्ट छोटीशी पण ती करण्यासाठी खूप मोठा संघर्ष! आणि आपल्यासारख्या सामान्य माणसांचं जगणं सध्या इतकं कठीण आहे की, आपण आपलं सोडून या सगळ्या गोष्टींचा कुठे विचार करत बसणार. पण कोणीतरी तो केलाच पाहिजे. नाही का? अन्यथा असे अनेक दिव्यांग व्यक्ती की, जे अत्यंत हुशार आणि कार्यक्षम आहेत, ज्यांना जर समर्थ साथ मिळाली तर ते एका धडधाकट व्यक्तीपेक्षासुद्धा जास्त या समाजात योगदान करू शकतात. पण योग्य ती साथ मिळाली नाही तर त्या सर्व सामाजिक व राष्ट्रीय संपत्ती असलेल्या व्यक्तींना आपण गमावून बसू आणि म्हणूनच आम्ही काही समविचारी मंडळींनी एकत्र येऊन स्थापन केलं आहे, ’स्नेहज्योत दिव्यांग सेवा प्रतिष्ठान’.
मी गेले ३५ वर्ष दिव्यांग पुनर्वसन प्रक्रियेत ज्येष्ठ समाजसेवक दादा (विष्णू) पटवर्धन यांच्या मार्गदर्शनाखाली सेवाभावी वृत्तीने काम करत आहे. त्यामुळे दिव्यांगांच्या अडचणी, त्यांचे मानसिक व शारीरिक प्रश्न यांची मला पूर्ण कल्पना आहे. शिवाय माझ्यासोबत जे कार्यकर्ते जोडले गेले आहेत ते सर्व गेली दहाहून जास्त वर्षं माझ्यासोबत दिव्यांग पुनर्वसन प्रक्रियेत सक्रिय सहभागी आहेत. कोणतीही अपेक्षा न बाळगता. आम्हाला विश्वास आहे की, आम्ही आमच्या प्रयत्नांमधून आपल्या समाजात दिव्यांग व्यक्तींबाबत फक्त हळहळ व्यक्त करण्यापलीकडची मानसिकता वृद्धिंगत करण्यात यशस्वी होऊ आणि त्याच माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना समाजात सक्षमपणे उभे राहण्याची ताकद देऊ.
समाजातल्या दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनासाठी जे जे आवश्यक आहे ते ते समाजाच्याच मदतीने साध्य करण्याचा मूळ उद्देश ठेवून आम्ही काम करतो. कौशल्य प्रशिक्षण कोरोनाच्या काळात आपण पाहिलं की, भल्याभल्या लोकांच्या नोकरीवर आणि व्यवसायावर गदा आली. लोक अक्षरशः देशोधडीला लागलेले आपण पाहिले. अशा परिस्थितीत फक्त कल्पना करा की, असं कुटुंब ज्यामधील कर्ती व्यक्ती ही जर दिव्यांग असेल, तर त्यांची काय अवस्था झाली असेल. या सर्व परिस्थितीचा विचार करता एक लक्षात आलं आहे की, आपल्याला जीवनावश्यक वस्तू निर्माण व विक्री करणारे छोटे छोटे उद्योजक तयार करणे गरजेचं आहे. ज्यातून समाजाची तर गरज भागेलच पण त्यासोबतच ती गरज भागवणारी दिव्यांग व्यक्तीसुद्धा स्वतःचाउदरनिर्वाह करू शकेल. आम्ही कौशल्य आणि व्यवसाय प्रशिक्षण देऊन, असे क्षमता असलेले स्मार्ट दिव्यांग उद्योजक निर्माण करतो.
आजपर्यंत संस्थेने अनेक सेवाभावी उपक्रम राबवले आहेत. दिव्यांग व्यक्तीने सक्षम व्हावे यासाठी सर्वच स्तरावर संस्था प्रयत्न करत आहे.शैक्षणिक साहाय्य :- आम्हाला एक लक्षात आलं आहे की, अनेक दिव्यांग विद्यार्थी किंवा त्यांचे पाल्य हे शिक्षणात अत्यंत हुशार असतात पण केवळ सपोर्ट सिस्टीम नसल्या कारणाने शैक्षणिक प्रगतीत अडचण निर्माण होते. त्यामुळे अशा दिव्यांग विद्यार्थी किंवा दिव्यांग आई-वडिलांच्या पाल्यांना हेरून त्या विद्यार्थ्यांना शिक्षणात जे सहकार्य लागेल ते करण्यासाठी आम्ही एक प्रकल्प हाती घेतला आहे आणि त्यातूनच वेगवेगळ्या स्पर्धात्मक परीक्षा युपीएससी-एमपीएससी यासाठी त्यांना तयार करता येईल का, विविध प्रशासकीय पदांसाठी त्यांची तयारी करून घेता येईल का, यासंदर्भातसुद्धा आमचे प्रयत्न सुरु झाले आहेत.
लॉकडाऊन काळात अन्नधान्य सहकार्य:- जेव्हा संपूर्ण समाज कोरोनाच्या विळख्यात अडकला होता, लॉकडाऊनमध्ये अनेक दिव्यांग व्यक्ती व त्यांचे कुटुंब यांची दोन वेळच्या जेवणाचीसुद्धा भ्रांत निर्माण झाली होती. अशा वेळेला जेव्हा आपल्या जीवाला घाबरून कोणीही व्यक्ती घराच्या बाहेर पडायला तयार नव्हता, तेव्हा संस्थेने आजूबाजूच्या जवळ जवळ १०० दिव्यांग व्यक्तींच्या गरजू कुटुंबांना महिनाभराचा किराणा द्यायला सुरुवात केली. जवळजवळ दीड वर्ष सातत्याने दर महिना समाजातल्या काही दात्यांच्या मदतीने, हे समाजकार्य चालू होते. या कार्यामुळे अनेक दिव्यांग व्यक्ती आणि त्यांचे कुटुंब कोरोनाकाळात उदरनिर्वाह करू शकले.दिवाळी फराळ वाटप - या उपक्रमाअंतर्गत यंदा दिवाळीत जवळ जवळ ६० दिव्यांग व्यक्तींच्या कुटुंबांना ‘दिवाळी फराळ’ भेट म्हणून देण्यात आला. त्यांच्या समवेत ‘दिवाळी पहाट’ साजरी करण्यात आली.
दिव्यांगांसाठी काही क्रीडा स्पर्धा - दि. ३ डिसेंबर हा जागतिक ‘अपंग दिन’. त्यानिमित्ताने रविवार दि. ५ डिसेंबर रोजी ‘स्नेहज्योत संस्थे’तर्फे फक्त दिव्यांगांसाठी काही क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या गेल्या. स्पर्धा जिंकणे-हरणे यापेक्षा आपणही मैदानी खेळ खेळू शकतो आणि खेळातून आनंद आणि आत्मविश्वास मिळू शकतो, ही भावना या आयोजनामागचा मुख्य उद्देश आहे. सोबतच भविष्यात पॅरा ऑलिंपिकसाठी आपणाला काही खेळाडू तयार करता येतील का, हासुद्धा शोध चालू आहे. आमच्या या कार्यक्रमाला जवळजवळ १०० दिव्यांग व्यक्तींनी नावं नोंदवली आहेत.दिव्यांगांसाठी लसीकरण कॅम्प - कोरोना काळामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी लसीचे बुकिंग करणे आणि ती प्रत्यक्ष घेण्यासाठी ‘कोविड सेंटर’पर्यंत जाणे, हे सर्व अडचणीचे ठरत होते. हे लक्षात आल्यावर संस्थेने खास दिव्यांग व्यक्तींसाठी दोन लसीकरण कॅम्प आयोजित केले. ज्यामध्ये जवळजवळ ५० दिव्यांग व्यक्तींनी कोविडची लस घेतली.
जागतिक ‘योग दिवस’ :- भारतीय संस्कृतीमध्ये योगाभ्यासाचे महत्त्व फार प्राचीन काळापासून आहे. असे म्हणतात की, शरीर आणि मन यांची सांगड घालायची असेल, तर ’योगसाधने’सारखे दुसरे साधन नाही आणि म्हणूनच ’स्नेहज्योत’ने जागतिक ‘योग दिन’ एका विशेष पद्धतीने साजरा केला. दिव्यांग व्यक्तींना योगाचे प्रशिक्षण दिले. काही उणीव आहे, पण योगामुळे काही सकारात्मक बदल नक्कीच करता येतील, या विश्वासाने योगसाधनेच्या माध्यमातून दिव्यांग व्यक्तींचे शारीरिक आणि मानसिक सक्षमीकरण करता येईल का, याचा शोध आम्ही सुरू केला. शिवाय अजून अशा दोन सामाजिक समस्या आहेत की, ज्यांच्याबद्दल आम्ही पावलं उचलली आहेत. त्यातली पहिली समस्या म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि दुसरी समस्या म्हणजे गरजू महिलांना मार्गदर्शन व सहकार्य.
दिव्यांग व्यक्तींसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र, आरोग्य मार्गदर्शन शिबिर, व्यक्तिमत्व विकास शिबिर, व्यक्तिगत मार्गदर्शन केंद्र, फिजिओथेरपी उपचार केंद्र तसेच गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन केंद्र, महिलांसाठी सक्षमीकरण केंद्र असे अनेक उपक्रम आम्हाला राबवायचे आहेत. हे सर्व करण्यासाठी आम्हाला स्वत:चे प्रशिक्षण केंद्र आणि त्यासाठी जागा हवी आहे. सध्या आम्ही कार्यकर्त्यांच्या घरांमधून काम करत आहोत. आलटून पालटून प्रत्येकाच्या घरी बैठका घेतो, विचारविनिमय करतो व काही उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करतो. काही दिव्यांग विद्यार्थ्यांना ओळखीच्या ठिकाणी बोलावून तात्पुरत्या जागेची व्यवस्था करून आम्ही त्यांना काही कौशल्यांचे प्रशिक्षण द्यायला सुरुवातसुद्धा केली आहे. पण जर आम्हाला एक कायमस्वरूपी शाश्वत जागा मिळाली, तर आमच्या उद्देशाला भक्कम आधार मिळेल. या प्रशिक्षण केंद्रासाठी आम्हाला बोरीवली विभागाच्या आसपास कमीत कमी दोन हजार चौरस फुटांची जागा गरजेची आहे.
प्रतिष्ठानची सचिव म्हणून मला विश्वास आहे की, आम्ही आमच्या प्रयत्नांमधून आपल्या समाजात दिव्यांग व्यक्तींबाबत फक्त हळहळ व्यक्त करण्यापलीकडची मानसिकता वृद्धिंगत करण्यात यशस्वी होऊ आणि त्याच माध्यमातून दिव्यांग व्यक्तींना समाजात सक्षमपणे उभे राहण्याची ताकद देऊ.