बॅडमिंटनचा ‘चिराग’

04 Dec 2021 14:59:36

Chirag Shetty_1 &nbs
 
 
भारतीय बॅडमिंटनमध्ये गेली काही वर्ष उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चिराग शेट्टीच्या आयुष्याची प्रेरणादायी माहिती जाणून घेऊया...
 
 
गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय खेळाडू प्रत्येक खेळांमध्ये आपले कर्तृत्व गाजवत आहेत. क्रिकेट, हॉकीसारख्या खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी अटकेपार झेंडे रोवले आहेत. यातील अनेक खेळाडूंनी खेड्यापाड्यातून येऊन, मेहनतीने स्वतःच्या जिद्दीवर सातासमुद्रापार आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. असाच एक खेळ म्हणजे बॅडमिंटन. भारतीय बॅडमिंटनपटूंनी गेली काही वर्ष उत्तम कामगिरी करत जगभरात भारताची मान उंचावली आहे. अनेक खेळाडूंनी एकेरी तसेच सांघिक कामगिरी करत जागतिक बॅडमिंटन विश्वात भारताचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. या खेळाडूंपैकीच एक नाव म्हणजे चिराग शेट्टी. मुंबईमध्ये जन्मलेल्या चिराग शेट्टीने सात्त्विक साईराज रंकीरेड्डीसोबत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जाणून घेऊया चिराग शेट्टीच्या आयुष्याची थोडक्यात माहिती...
 
 
चिराग शेट्टी याचा जन्म दि. ४ जुलै, १९९७ रोजी मुंबईमध्ये झाला. सुजाता शेट्टी आणि चंद्रशेखर शेट्टी यांच्या सामान्य कुटुंबात जन्मलेल्या चिरागचे क्रीडा प्रकाराकडे लहानपणापासून आकर्षण होते. इतर पालकांप्रमाणे चिरागचे पालक ’आपल्या मुलांनीही इतरांसारखे डॉक्टर, इंजीनियर व्हावे’ अशा विचारांचे नव्हते. याउलट त्यांनी नेहमी मुलांना खेळामध्ये काहीतरी करून दाखवण्यासाठी प्रोत्साहित केले. चिरागची बहिण आर्या शेट्टी हीदेखील एक बॅडमिंटनपटू आहे. ती सध्या ‘उदय पवार अकादमी’मध्ये प्रशिक्षण घेत असून दुहेरीत आपले करिअर घडवण्यासाठी सज्ज आहे. चिरागने वयाच्या सातव्या वर्षांपासून बॅडमिंटन खेळण्यास सुरुवात केली. हळूहळू या खेळात त्याचा रस वाढत गेला. गोरेगाव ‘स्पोर्टस् क्लब’मधील मनीष हडकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने व्यावसायिकरीत्या या खेळामध्ये सराव करण्यास सुरुवात केली. दहावीनंतर १६ वर्षांच्या चिरागने व्यावसायिक बॅडमिंटनपटू होण्याचा ध्यास मनात घेतला. तसेच चिराग अभ्यासात अत्यंत हुशार होता आणि त्याला विज्ञान विषयाची चांगलीच गोडी लागली होती मात्र, दहावीनंतर विज्ञान शाखा निवडल्यास बॅडमिंटनच्या सरावामुळे अभ्यासाला वेळ देता येणार नाही म्हणून त्याने वाणिज्य शाखेत प्रवेश घेतला. शालेय जीवनात अभ्यासाची सांगड घालत त्याने विविध क्लब आणि राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धांमध्ये भाग घेतला. त्याचे वडील चंद्रशेखर यांना नेहमी आपल्या मुलाने वैयक्तिकरित्या या खेळत उतरावे, असे वाटत होते. कारण, सांघिक खेळामध्ये राजकारणासह बऱ्याच अनैतिक घटकांचा समावेश असतो, असा त्यांचा समज होता. पण, कालांतराने सांघिकरित्या उत्कृष्ट कामगिरी करत त्याने आपल्या वडिलांचा समज खोटा ठरवला. आपल्या मुलांनी खेळामध्ये प्राविण्य मिळवावे यासाठी ते सहकार्य करत होते. चिरागचे आई-वडील कधीतरी त्याला प्रोत्साहन देण्यासाठी सामानेदेखील पाहायला जात असत.
 
 
त्यानंतर चिरागने हैद्राबादमधील ‘पुल्लेला गोपीचंद अकादमी’मध्ये प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. तिथे त्याला भारतीय संघाचे मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांचे उत्तम मार्गदर्शन लाभले. याच अकादमीमध्ये त्याचा सहखेळाडू सात्त्विक साईराज रंकीरेड्डी यानेदेखील प्रशिक्षण घेतले. २०१६मध्ये हैदराबाद येथे झालेल्या आशियाई संघ चॅम्पियनशिपमध्ये सांघिक कामगिरी बजावत त्याने कांस्य पदकाची कमाई केली. अनेक राष्ट्रीय स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर त्याची निवड गोल्ड कोस्ट येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्स २०१८ या स्पर्धेसाठी झाली. मात्र, सरावादरम्यान त्याच्या पाठीला गंभीर दुखापत झाली होती. असे, असतानादेखील त्याने दुहेरी प्रकारात रौप्यपदक, तर मिश्र प्रकारात सुवर्ण पदक पटकावले. याचवेळी संपूर्ण जगाने त्याचे कौशल्य पाहिले. त्यानंतर चिरागने बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनची वर्ल्ड चॅम्पियनशिप आणि इतर अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला, तर आतापर्यंत त्याने पाच आंतरराष्ट्रीय विजेतेपदांची कमाई केली. सात्त्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग या जोडीने २०१६ पासून पदकांचा चांगलाच धडाका लावला. २०१६मध्येच त्यांनी पुरुष दुहेरी प्रकारात मॉरिशस इंटरनॅशनल, भारत आंतरराष्ट्रीय मालिका, टाटा ओपन, बांगलादेश आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण पदकांची कमाई केली. पुढे २०१७मध्ये व्हीएतनाम येथे झालेल्या स्पर्धेत आणि २०१९ मध्ये ब्राझिल येथे झालेल्या स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई केली. पुढे २०२१मध्ये चांगली कामगिरी करत चिरागने रंकीरेड्डीच्या साथीने वर्ल्ड टूरच्या अंतिम टप्प्यात प्रवेश मिळवला. जागतिक पुरुष दुहेरी क्रमवारीत अव्वल दहामध्ये प्रवेश मिळवला होता. क्रमवारीत सातवा क्रमांक पटकावत अशी कामगिरी करणारी ही पहिलीच जोडी ठरली. पहिले आंतरराष्ट्रीय यश मिळवल्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. भारतीय बॅडमिंटन विश्वातील त्याचे योगदान उल्लेखनीय आहे. येत्या काळात कर्तृत्ववान कामगिरीने अनेक शिखरे पार करावी, यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून चिरागला हार्दिक शुभेच्छा...!
 
 
Powered By Sangraha 9.0