कोस्टल रोड प्रकल्पातील २ किलोमीटर बोगद्याचे काम पूर्ण

30 Dec 2021 22:01:32

costal tunnel 
 
 
 
मुंबई : मुंबई महापालिका आणि सत्ताधारी शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या 'कोस्टल रोड' प्रकल्पाचे काम मोठ्या कालावधीपासून सुरु आहे. कधी विरोध तर कधी समर्थन अशा प्रकारे वाद विवादांच्या भोवऱ्यात अडकलेल्या या प्रकल्पाची राज्यभरात मोठी चर्चा आहे. याच प्रकल्पाच्या संदर्भात एक सकारात्मक बाब समोर आली आहे. महापालिका प्रशासनाच्या अधिपत्याखाली बांधकाम सुरु असलेल्या कोस्टल रोड प्रकल्पातील २ किलोमीटर बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे. तसेच यातील उर्वरित राहिलेल्या कामाला देखील येत्या ८ ते १० दिवसांत पूर्णत्व प्राप्त होईल, अशी माहितीची महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.
 
 
कोस्टल रोड प्रकल्प बांधकामातील प्रियदर्शिनी पार्क ते छोटा चौपाटी दरम्यान बांधण्यात येणाऱ्या २.०७ किलोमीटर अंतराच्या बोगद्याचे बांधकाम दोन्ही बाजूंनी करण्यात येत आहे. यातील बोगद्याचा पहिला २ किलोमीटरचा टप्पा पूर्ण झाला असून उर्वरित ०७ किलोमीटर लांबीच्या बोगद्याचे काम येत्या ८ ते १० पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 
 
पॅकेज ४ मध्ये २ बोगद्यांच्या बांधकामाचा समावेश
मुंबई कोस्टल रोड प्रकल्पातील पॅकेज ४ अंतर्गत मुख्यत्वे दोन्ही बाजूंनी वाहतुक करण्यासाठी एकूण २ बोगद्यांचे काम करण्यात येणार आहे. हे बोगदे प्रियदर्शिनी पार्क ते नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राईव्ह) येथे असणाऱ्या ‘छोटा चौपाटी’पर्यंत बांधले जात आहेत. तसेच ते ‘मलबार हिल’च्या खालून जाणार आहेत. या दोन्ही बोगद्यांसाठीचे खोदकाम हे जमिनीखाली १० मीटर ते ७० मीटर एवढ्या खोलीवर करण्यात येत आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0