6
मुंबई : मागील काही दिवसांपासून मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत होत असलेली वाढ मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईकरांना चिंतेत टाकणारी बातमी समोर आली आहे. मुंबई महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार गुरुवार, दि. ३० डिसेंबर रोजी शहरात तब्बल ३ हजार ६७१ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईत पुन्हा एकदा कडक निर्बंध लागू केले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शहरात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिका प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार मुंबईत गुरुवारी ३ हजार ६७१ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर सुदैवाने एकाही मृत्यूची नोंद मात्र झालेली नाही. याशिवाय, सुमारे ३७१ रुग्णांनी गुरुवारी कोरोनावर मात केली. ज्यामुळे मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांची संख्या ७ लाख ४९ हजार १५९ वर पोहचलीय. दरम्यान, कोरोनावर मात केलेल्या रुग्णांचा दर ९६ टक्क्यांवर गेलाय. मुंबईत सध्या ११ हजार ३६० रुग्ण सक्रीय आहेत. शहरातील रुग्ण दुप्पटीचा दर ५०५ दिवसांवर पोहचला आहे.