मुंबई : मुंबईत लवकरच ट्री वॉक हा एक नवा उपक्रम राबविला जाणार आहे. या ट्री वॉक अर्थात गर्द झाडींतून निघणाऱ्या वाटेवर चालण्याचा एका वेगळा अनुभव नागरिकांना देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे. प्रदूषणाचे दररोजचे वाढते निर्देशांक, उंच भिंतींमुळे दुर्लभ झालेले आकाशाचे दर्शन आणि मुंबईची धावती जीवन पद्धती या सर्व बाबींमुळे मुंबईकरांना निसर्गाच्या छायेपासून वंचित राहावे लागते. त्या पार्श्वभूमीवर ट्री वॉक या प्रकल्पाद्वारे शहरवासियांना गर्द झाडीमधून चालण्याचा नैसर्गिक अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
काय आहे ट्री वॉक प्रकल्प?
मुंबई महापालिकेतर्फे मलबार हिल परिसरात ट्री वॉक उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, 'मलबार टेकड्यांमधील कमला नेहरू उद्यानाजवळ हा प्रकल्प असेल. पुढील वर्षभरात म्हणजेच वर्ष २०२२ मध्ये हा प्रकल्प उभारण्यात जाईल. या ट्री वॉकमध्ये पारदर्शक काचेचा वापर केला जाणार आहे, ज्यामुळे नागरिकांना झाडांवर चालण्याचा भास होईल. या मार्गावर सुरक्षेकरिता ठिकठिकाणी सीसीटीव्ही लावले जातील,' असे पालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
प्रकल्पासाठी १२ कोटींचा खर्च
गिरगाव चौपाटीवरून मलबार हिलवर जाण्यासाठी लोकांना रस्त्यासह पायऱ्यांचाही वापर करावा लागतो. मात्र, पर्यटक मुख्यत्वे पायर्यांचा अधिक वापर करतात. नेमक्या याच ठिकाणी हा 'ट्री वॉक' प्रशासन उभारणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे १२ कोटी ६६ लक्ष रुपयांचा खर्च होण्याचा अंदाज आहे, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.