निद्रा - भाग:८

28 Dec 2021 14:27:47

Importance of sleep_1
 
 
 
 
मागील सात लेखांमधून निद्रेविषयीचे विविध पैलू आपण जाणून घेतले. निद्रेला आहार व व्यायामाइतकेच स्वास्थ्य टिकविण्याच्या दृष्टीने आयुर्वेदशास्त्रात महत्त्व दिले आहे. ‘न अति न कमी’ हा नियम निद्रेच्या बाबतीत पाळणे अत्यंत गरजेचे आहे. त्याविषयी सविस्तर...
 
 
 
कोविड-१९’मुळे झालेले दैनंदिन जीवनातील बदल, कमी प्रवास, अधिक विश्रांती, बैठी कामे करण्याचे वाढलेले प्रमाण, मानसिक ताण, चिंता, दैनंदिन वेळापत्रकाचे उल्लंघन, व्यायामाचा अभाव अशा विविध गोष्टींबद्दल अधिक विचार व भय इत्यादी गोष्टी अतिप्रमाणात वाढलेल्या आहेत.
 
 
 
लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांनाच कुठली ना कुठली भीती आहे. उदा. थोडा सर्दी-ताप आला, तर ‘कोविड’चा तर नाही ना, ही शंका मनात आल्याशिवाय राहत नाही. सार्वजनिक ठिकाणी जर कोणी शिंकले किंवा खोकले, तर आसपासच्या व्यक्ती अशा नजरेने बघतात, ती त्या व्यक्तीने जणू काही गुन्हाच केला आहे.
 
 
 
काही चुकीच्या माहितीमुळे, काही अनुभवांमुळे किंवा अन्य काही कारणास्तव सद्यस्थितीत अनेक जण गोंधळून गेले आहेत, धास्तावलेले आहेत. रोजची उठायची वेळ विस्कळीत झाली आहे. जेवण्याची- न्याहारीची वेळ रोज बदलते. (ऑफिसमधल्या मीटिंगच्या वेळापत्रकानुसार उठणे-खाणे होते) कुठलीच नियमितता राहिलेली नाही. शाळा-महाविद्यालय-ऑफिसच्या वेळापत्रकानुसार उठणे- प्रात:विधी- न्याहारी-झोप इ.केले जाते. या सगळ्याचा परिणाम आरोग्यावर व स्वास्थ्यावर होताना आज प्रकर्षाने जाणवतो.
 
 
 
शरीराचे स्वत:चे एक घड्याळ आहे. ते दिवस-रात्र अव्याहतपणे सुरु असते. सूर्योदयालाउठणे, रोज व्यायाम करणे, वेळेत आवरणे-खाणे-झोपणे इ. केल्यास शरीर सुदृढ, मन प्रसन्न, विचार स्पष्ट व बुद्धी तल्लख राहते. पण, या घड्याळाचे कार्य जर बिघडले, तर कधी काय केले जाते, हे कळतच नाही. त्याचा शरीरावर, मनावर, बुद्धीवर अनिष्ट परिणाम होते. उदा. अति झोपल्याने सकाळ-पहाटेची वेळ निघून जाते. मग, व्यायाम न करताच कामाला जुंपावे लागते.
 
 
 
सकाळची कामे दुपारपर्यंत आवरत नाही. जेवण्याच्या वेळा उशिरा होतात. मग शारीरिक दुखणे सुरू होते. डोकेदुखी, सर्दी-पडसं, मलबद्धता, कंबरदुखी इ. चुकीच्या सवयींमुळे जर तक्रारी उत्पन्न होत असतील, तर केवळ औषधोपचार केल्याने संपूर्ण फायदा होत नाही. लाक्षणिक उपाय मिळतो, पण, पुन्हा काही दिवसांनी तक्रारी सुरू होतात.
 
 
 
तरुण वर्ग व प्रौढ वर्गाला सहा ते आठ तास झोप पुरेशी होते. एखादा दिवस रात्री जागरण झाल्याने सकाळी थोडं उशिरा उठणे किंवा दुपारी जेवणापूर्वी थोडी डुलकी काढणे, हे चालेल. पण, नऊ तास व त्यापेक्षा अधिक झोपण्याची जर सवय लागली, तर शरीरावर व मानसिक स्वास्थ्यावर त्याचा विपरीत परिणाम दिसतो.
 
 
 
विविध प्रकारच्या तक्रारी (डोकेदुखी, झापड राहणे इ.) सुरू होतात. स्थौल्य वृद्धी होते. घोरणे, सर्दी-पडसं, अंगाला सूज येणे, कंबरदुखी-पाठदुखी इत्यादीचा त्रासही उद्भवू शकतो. काही ‘लाईफस्टाईल डिसॉर्डर’ होण्याची शक्यता वाढते. जसे मधुमेह, हृदयरोग, स्थौल्य इ.
 
 
 
बरेचदा उशिरा झोपताना मद्यपान, धुम्रपानही केले जाते. याचे व्यसनांवर अवलंबन चटकन येते आणि अतिनिद्रा व व्यसनाधीनता जर दोन्ही असले, तर जे रोग जडतात, त्यांची तीक्ष्णता, प्रखरता अधिक असण्याची शक्यता वाढते. बरेचदा अति झोपल्यामुळे उठल्यावर ताजेतवाने वाटत नाही. या उलट मरगळ जाणवते. काहीच करू नये, अशी इच्छा होते व हे दुष्टचक्र असे सुरू राहते.
नैराश्य (डिप्रेशन) असते वेळी अति झोपणे, वास्तविक परिस्थितीपासून दूर पळण्याचे एक साधन असते. अति खाणे व अति झोपणे यामुळे बुद्धीवर एक तामसिक आवरण येते आणि त्यामुळे बुद्धीची तीक्ष्णता कमी होते. आकलन शक्ती, स्मृती (धारणशक्ती) कमी होते. आपल्या कार्यातील सक्षमता कमी होतो.
 
 
 
तसेच कमी झोपल्यानेही शरीर-मन व बुद्धी प्रभावित होतात. केवळ अतिरेकी झोपेनेच अपाय होतो असे नाही, तर झोपेचा अभाव, कमतरता असल्यानेही विविध त्रास ओढवतात. पित्ताचा त्रास, डोकेदुखी, मायग्रेन, हाडाची दुखणी इत्यादीचे प्रमाण कमी झोपल्यास वाढते.
 
 
 
शारीरिक लक्षणे उत्पन्न झाल्यामुळे तो शारीरिक रोग आहे, असे भासते. पण, केवळ त्या लक्षणांची चिकित्सा करून भागत नाही. त्याचे मूळ कारण शोधून ते दूर करणे (यालाच आयुर्वेदात‘निदान परिवर्तन’ म्हणतात.) हे महत्त्वाचे आहे. रोग समूळ काढण्यासाठी त्याच्या मुळापर्यंत हेतूपर्यंत जाणे गरजेचे आहे.
 
 
 
असे लक्षात येते की, जीवनशैली बिघडल्याने होणारे आजार खूप वाढत आहेत. शरीराचा व मनाचा एकमेकांवर खूप परिणाम होतो. राग-क्रोध आल्यास चेहरा लालभडक होतो. अंग तापते, पित्त खवळते, क्वचित चक्कर येते. भीती वाटत असल्यास घसा कोरडा पडतो, भूक मंदावते, चेहरा पांढराफटक पडतो. ताण असल्यास झोप तुटक लागते.
 
 
 
डोळ्याभोवती काळी वर्तुळे येतात, रक्तदाब वाढतो, साखर वाढते इ. दिसते तसेच आपल्याला आजार झाला आहे, हे कळताच पाय लटपटणे, गळून जाणे, काही न सुचणे, समजणे होते. म्हणजेच आपण शरीर-मन-बुद्धी यांना वेगवेगळे समजून त्यांची चिकित्सा करू शकत नाही. एकाचा परिणाम दुसर्‍यावर अवश्य होतो.
 
 
 
त्यामुळे बहुतांशी गोष्टी आपल्या सवयीशीच जोडलेल्या आहेत. त्या सवयींना बंधन म्हणून बघून धुडकावले, तर आपल्याच आरोग्याची दशा होण्यास वेळ लागत नाही. वेळ आणि पैसा दोन्ही जातोच व मानसिक शांतीही गमावली जाते.
 
 
 
नवीन वर्षे अगदी जवळ आले आहे. अशा वेळेस ‘आपले आरोग्य आपल्या हाती’ हा निर्धार करून, चुकलेली घडी पुन्हा नीट बसवून, नवीन वर्षात पदार्पण करताना आपल्या शरीरात मनावर आलेले नकारात्मक आवरण काढून टाकूया. नियमित लवकर उठणे, व्यायाम करणे, पोषक आहार प्रमाणात खाणे, इतर दिनचर्येचे पालन करणे, अतिरिक ताण-तणावापासून दूर राहणे इ. करण्याचा पण, नवीन वर्षाचे संकल्प स्वत:साठी करूया.
 
 
 
‘सिर सलामत तो पगडी पचास’ ही म्हण आहेच. आपण नीट असू, आपले शारीरिक-मानसिक स्वास्थ्य उत्तम असले, तरच आपण इतरांना, समाजाला मदत करू शकतो. सामाजिक स्वास्थ्य नीट राखण्यासाठी प्रत्येकाने स्वत:ला आरोग्यपूर्ण व समाधानी ठेवणे महत्त्वाचे आहे. तुम्हा सर्वांना नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा...!
 
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
  
९८२०२८६४२९
vaidyakirti.deo@gmail.com
Powered By Sangraha 9.0