‘संवादशील संवेदना’ जोपासणारा अधिकारी

28 Dec 2021 22:14:18

sunil kadasane_1
 
 
विविध भाषा अवगत करून लोकसंवादाच्या माध्यमातून सामाजिक सलोखा निर्मितीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या नाशिक परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे अधीक्षक सुनील कडासने यांच्याविषयी...
 
 
लब्जो से फता करता हूं,
लोगों के दिलोंको,
मैं वो बादशहा हूं,
जो लष्कर नही रखता!
 
 
उर्दूमधील हा एक सुंदर शेर... या शेरचा मुख्य अर्थ असा आहे की, लोकसंवाद साधल्यास सुरक्षा विभागाची गरज भासत नाही. हा जरी एक ‘शायराना’ अंदाज आहे, असे म्हटले तरी, केवळ भाषेच्या प्राप्त ज्ञानावर लोकसंवाद साधत कायदा-सुव्यवस्था अबाधित राखता येते, याचे उदाहरण उभे केले आहे नाशिक परिक्षेत्राचे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे अधीक्षक सुनील कडासने यांनी.
 
भाषा हे संवादाचे उत्तम माध्यम आहे आणि लोकसेवेत असलेल्या प्रत्येकाने एकापेक्षा अधिक भाषांचे ज्ञान आत्मसात करणे आवश्यक आहे. यावर अढळ विश्वास असलेल्या कडासने यांनी उर्दूचा डिप्लोमा केला. २०१२ ते २०१६ या काळात मालेगाव येथे ते कर्तव्यावर असताना त्यांचा इस्लामिक आणि पर्शियन संस्कृतीशी जवळचा परिचय झाला. विविध पुस्तके याच काळात वाचनात आल्याने उर्दू साहित्याची महती समजण्यास त्यांना मदत झाली.
 
प्राप्त उर्दू ज्ञानाचा मालेगावसारख्या संवेदनशील ठिकाणी काम करताना कडासने यांना मोठा फायदा झाला. मालेगावमधील बहुतांश मुस्लीम हे मराठी बोलत नाहीत. तसेच इतिहास काळात सुमारे ३०० अरबी कुटुंब मालेगावात वास्तव्यास असल्याची नोंद आहे. त्यामुळे त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत संवाद साधणे आवश्यक ठरते. त्यामुळे मालेगावमधील नागरिकांचा विश्वास संपादन करण्यात कडासने यशस्वी झाले. मालेगाव येथे ‘माद्री’ ही भाषा विकसित झाल्याचे कडासने सांगतात. तसेच मालेगावमध्ये शायरीचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असून अगदी हातमाग कारखान्यात काम करणारा मजूरदेखील येथे उत्तम शायरी करत असल्याची माहिती कडासने देतात.
 
मराठी पोलिसांना उर्दू येत नाही. मात्र, कडासने यांनी उर्दूचे धडे गिरविल्याने अनेक लोक त्यांच्या जवळ आले. संस्कृती समजल्यास माणसे सहज जवळ येतात, अशीच कडासने यांची धारणा. कडासने यांनी उर्दू, अरबी, कुराण यांचे ज्ञान अर्जित केले. त्यामुळे त्याचा त्यांना अनेकार्थाने फायदा झाला. लोकांचे मन ओळखून काम करणे सहज शक्य झाल्याचे ते सांगतात. मालेगावमध्ये होणाऱ्या दंगली रोखता आल्या. तसेच जेथे लाठीचार्ज लागू शकत होता, तेथे केवळ संवादाने काम झाल्याचे कडासने आवर्जून सांगतात.
 
ते म्हणतात की, “शब्दांत ताकद असते. शब्द हृदयातून येतात, तेव्हा ते प्रार्थनेसमान असतात. त्यामुळे लोक खूप जवळ आले. लहान मुले जवळ आली. पोलीस व जनता यातील अविश्वासाची दरी मिटण्यास मदत झाली. समाज सशक्त ठेवणे हे पोलिसांचे कर्तव्यच आहे. लोकसंवाद हा त्याचा गाभा आहे. त्यामुळे कायद्याचे उत्तम पालन होते. लोकांच्या मनात विश्वास निर्माण करणे आवश्यक आहे,” असे कडासने सांगतात.
 
भक्ती संप्रदायापासून साहित्याने लोकांना घडविले आहे. संतांनी देशाला परोपकाराचा संस्कार दिला आहे. साहित्य हे जीवनदर्शक असल्याची भावना ते बोलून दाखवितात. आपले वडील व परिविक्षाधीन काळात सान्निध्य लाभलेले अधीक्षक सुरेंद्र कुमार यांच्यामुळे आपल्याला शायरीची आवड निर्माण झाल्याचे कडासने आवर्जून नमूद करतात.
 
मनमाड येथे काम करताना कडासने यांनी खऱ्या अर्थाने उर्दूचे धडे गिरविण्यास सुरुवात केली. अल्पसंख्याकांचा विश्वास संपादन करण्यासाठी त्यांची भाषा येणे आवश्यक असल्याचे ते सांगतात. श्रीरामपूर येथे कार्यरत असताना, आपल्या पोलीस दलातील कर्मचारी वर्गासाठी उर्दूचे धडे देणारी शिकवणी कडासने यांनी सुरू केली होती.
 
“मालेगाव येथे बदली झाल्यावर त्यांच्या उर्दूचा विकास अधिक वेगाने झाला. अरबी, फारशी, उर्दू, पंजाबी, तुर्की या भाषा बव्हंशी समान आहेत. उर्दू ही भारताची प्राचीन भाषा आहे. उर्दूचा अर्थ ‘आर्मी’ (लष्कर) असा होतो. म्हणून आजही दिल्लीत ‘उर्दू मोहल्ला’ आहे. उर्दू आणि इस्लामिक संस्कृती यांचा संबंध नाही,” असे ते आवर्जून सांगतात.
 
नाशिक येथे सध्या कार्यरत असताना २०१८ - २०१९ मध्ये ११५ प्रकरणे लाचलुचपतशी संबंधित होती, जी नंतर १२३ झाली. तसेच मागील वर्षी १०० आणि आता १३१ तक्रारी दाखल झाल्याची माहिती ते देतात. लाचलुचपत प्रतिबंधक खाते हे लोकाभिमुख असून सामान्य माणसाला त्याच्या दैनंदिन कामात कामात अडचण आल्यास लोक संपर्क साधतात. या खात्याकडे लोक स्वत:हून तक्रारी दाखल करण्यासाठी येत आहेत, हे चांगले लक्षण असल्याचे ते म्हणतात. सरकारी कामासाठी पावती न देता पैसे घेणे हीदेखील लाचखोरी आहे. म्हणूनच सरकारी कर्मचारी वर्गात लाचेच्या परिणामांची जाणीव होणे आवश्यक असल्याचे ते सांगतात.
 
सातारा येथील एक मध्यमवर्गीय व्यक्ती भर पावसात दुचाकीवर नाशिकमध्ये आली. त्याला न्याय देत संबंधितांवर कारवाई करत आवश्यक सरकारी कागद कडासने यांनी तत्काळ मिळवून दिला. यातून कडासने यांची संवेदनशीलताच दिसून येते. संवेदनशील कार्यासाठी भाषा अवगत करून संवाद साधत सामाजिक सलोखा निर्माण करण्याचे कार्य कडासने करत आहेत. त्यांच्या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
Powered By Sangraha 9.0