महाराष्ट्रात प्रथमच बीन हंसाचे दर्शन; भिगवणाच्या पाणथळ क्षेत्रात हिवाळी मुक्काम

27 Dec 2021 12:24:19
bean goose _1



मुंबई (अक्षय मांडवकर) -
हंस प्रजातीमधील बीन गूज (bean goose) या स्थलांतरित पाणपक्ष्याचे महाराष्ट्रात प्रथमच दर्शन घडले आहे. भिगवण येथील पाणथळ क्षेत्रात सध्या हा पक्षी मुक्कामाला आहे. भारतातून बीन गूझ (bean goose) पक्ष्यांच्या हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या नोंदी असून महाराष्ट्रात हा पक्षी राजहंस पक्ष्यांच्या थव्यांसोबत भरकटून आल्याची शक्यता आहे.
 
 
राज्यात हिवाळ्याची सुरुवात झाल्यापासून उत्तर आशिया भागातून अनेक पक्षी भारतात आणि खास करुन महाराष्ट्राच्या पाणथळ क्षेत्रात स्थलांतर करुन आले आहेत. अशावेळी अनेक दुर्मीळ पक्ष्यांचे दर्शन पक्षीनिरीक्षणांना होत आहे. महाराष्ट्रातून प्रथमच रेड नाॅट या पक्ष्यांची नोंद झाल्यानंतर आता बीन गूज (bean goose) या पक्ष्यांची राज्यातील पहिलीच नोंद करण्यात आली आहे. उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील भिगवणचा परिसर हा स्थलांतरित पक्ष्यांच्या विविधतेसाठी ओळखला जातो. याठिकाणी हजोरांच्या संख्येने विविध प्रजातींचे स्थलांतरित पक्षी येतात आणि त्यांच्या निरीक्षणासाठी पक्षीनिरीक्षक, अभ्यासक आणि पर्यटकांचा याठिकाणी मुक्काम असतो. अशा भिगवणच्या पाणथळ क्षेत्रात हंस प्रजातीमधील बीन गूझ (bean goose) या पक्ष्यांची नोंद झाली आहे. भिगवणचे गाईड संदीप नगरे यांना बीन गूजचे (bean goose) सर्वप्रथम दर्शन घडले.

 
 
बीन गूज (bean goose) पक्षी युरोप, सायबेरिया या भागात वीण करतो आणि दक्षिण चीन किंवा मध्य आशिया भागात हिवाळी स्थलांतर करत असल्याची माहिती तज्ज्ञ पक्षीनिरीक्षक आदेश शिवकर यांनी दिली. भारतात आजवर या पक्ष्याच्या पाच नोंदी असून महाराष्ट्रातील ही बीन गूजची (bean goose) पहिलीच नोंद असल्याचे शिवकर यांनी सांगितले. राजहंस या देखण्या पक्ष्याच्या थव्याबरोबर सध्या हा एकमेव बीन गूज (bean goose) भिगवण पाणथळ क्षेत्रात वावरत आहेत. या पक्ष्याला पाहण्यासाठी पक्षीनिरीक्षकांची गर्दी झाली आहे. अशा वेळी या पक्ष्याला कोणत्याही प्रकारचा धोका जाणवू नये म्हणून संदीप नगरे आणि इतर गाईड मंडळी उत्साही पक्षीनिरीक्षकांना या पक्ष्याच्या जवळ जाण्यापासून रोखत आहेत. राजहंस पक्ष्यांच्या थव्याबरोबर हा पक्षी भरकटलेल्या अवस्थेत याठिकाणी आल्याची शक्यता शिवकर यांनी वर्तवली आहे.
 
 
 
बीन गूजविषयी...
बीन गूज (bean goose) हा पूर्णपणे शाकाहारी पक्षी असून तो पाणथळ क्षेत्रात असलेल्या पाणवनस्पतींवर आपली गुजराण करतो. पाणवनस्पती खाण्यासाठी त्याच्या चोचीच्या टोकाला नखासारखा एक अवयव असतो. या पक्ष्यामधील नराचे वजन १.७ ते ४ किलो आणि मादीचे वजन २.८४ किलोपर्यंत असते. त्यांची लाबी ६८ ते ९० सेमी दरम्यान असते. तर पंखांचा विस्तार १४० ते १७४ सेमीपर्यंत असतो.
Powered By Sangraha 9.0