२०२१ आणि शेअर बाजाराची कामगिरी

24 Dec 2021 12:46:56
BSE _1



खरंतर जानेवारी ते डिसेंबर हे शेअर बाजाराचे वर्ष नव्हे. एप्रिल ते मार्च असे आर्थिक वर्ष हेदेखील शेअर बाजाराचे वर्ष म्हणून गणले जात नाही, तर संवत्सर ते संवत्सर हे शेअर बाजाराचे एक वर्ष म्हणून ओळखले जाते. म्हणजे दिवाळी पाडवा - बलिप्रतिपदा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा) ते पुढच्या वर्षीचे लक्ष्मीपूजन म्हणजे आश्विन अमावास्या. हा संवत्सराचा कालावधी असतो व हाच कालावधी शेअर बाजाराचे वर्ष असते. दरवर्षी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मोठ्या थाटामाटात नवीन वर्षाची सुरुवात करत असलो तरीही शेअर बाजाराला ‘कॅलेंडर’ वर्ष कसे गेले, हादेखील गुंतवणूकदारांसाठी तितकाच उत्सुकतेचा विषय असतो. त्यानिमित्ताने २०२१ मध्ये शेअर बाजाराच्या कामगिरीचा घेतलेला हा आढावा...



२०२१ हे वर्ष शेअर बाजाराला ‘कभी खुशी, कभी गम’ अशा स्वरूपाचे गेले, असे म्हणता येईल. या वर्षी गुंतवणूकदारांनी जास्त जोखीम पेलली. कारण, कोरोनामुळे अर्थव्यवस्था ठप्प झाली होती. त्यामुळे त्यातून मार्ग म्हणून गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात जास्त जोखीम घेतली. परिणामी, त्यांना परतावाही जास्त मिळाला. ‘जास्त जोखीम, जास्त परतावा’ हे शेअर बाजाराचे ब्रीद आहे. ‘रिस्क हैं तो इश्क हैं’ ही शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांची धारणाच! गेल्या वर्षीच्या चलनवाढीचा विचार करता, मुदतठेवीत गुंतवणूक असणार्‍यांना गेल्या वर्षी ‘निगेटिव्ह’ परतावा मिळाला होता. सोन्यानेही गेल्या वर्षी गुंतवणूकदारांना हात दिला नाही.



सार्वजनिक उद्योगातील बँका, कंपन्या व बांधकाम उद्योगातील कंपन्या यांचे भाव चढे होते. २०२१ मध्ये शेअर बाजारात गुंतवणूक वाढली. परिणामी, ‘डिमॅट’ खाती उघडणार्‍यांचे प्रमाणही वाढले. जानेवारी २०२१ मध्ये ‘डिमॅट’ खात्यांचे प्रमाण जे १.७ दशलक्ष होते, ते वाढून ऑक्टोबर २०२१ पर्यंत साडेतीन दशलक्ष इतके झाले. ३१ डिसेंबर, २०२० रोजी मुंबई शेअर बाजार निर्देशांक ४७,७५१ अंशांवर बंद झाला होता. सोमवार, दि. २० डिसेंबर रोजी तो ५८२८३.४२ अंशांवर बंद झाला होता. गेल्या एका वर्षाच्या तुलनेत शेअर बाजार निर्देशांकात१०,५३२.४२ अंशांची वाढ झालेली आहे.


कोरोना जोशात असताना दि. २३ मार्च, २०२० रोजी मुंबई शेअर बाजार निर्देशांक प्रचंड कोलमडून २५,९८१ अंशांवर बंद झाला होता. १८ ऑक्टोबर रोजी मुंबई शेअर बाजाराने प्रचंड उसळी घेतली होती. या दिवशी शेअर बाजार निर्देशांक ६१,७६६ अंशांवर बंद झाला होता. बँकांतील मुदत ठेवींवर वर्षात मिळणार्‍या पाच टक्के व्याजाच्या तुलनेत, शेअर बाजारने गुंतवणूकदारांना भरभरून परतावा दिला. २०२१ मध्ये भांडवली बाजारपेठेत ‘आयपीओ’ ही फार मोठ्या प्रमाणावर आले व या कंपन्यांचे ‘लिस्टिंग’ झाल्यामुळे शेअर बाजारातील ‘ट्रेडिंग’चे प्रमाणही वाढले.


कमी भांडवल असणार्‍या कंपन्यांची कामगिरी २०२१ मध्ये चांगली राहिली. त्यांच्या कामगिरीत ५७ टक्के वाढ झाली. २०२० या वर्षी ही वाढ ३२ टक्के इतकी होती म्हणजे, तुलनात्मकदृष्ट्या २०२१ मध्ये २५ टक्के अधिक वाढ झाली. हैदराबाद येथील ‘ब्राईटकॉम’ या कंपनीने २०२१ मध्ये गुंतवणूकदारांना २७६९ टक्के परतावा दिला. ‘टाटा टेलिसर्व्हिसेस महाराष्ट्र’ या कंपनीने २,२८० टक्के, ‘जीआरएम ओव्हरसिज’ कंपनीने १,२१९ टक्के, ‘ओरम प्रायव्हेट’ या कंपनीने ८४१ टक्के, तर ‘रतन इंडिया एंटरप्रायझेस’ या कंपनीने ७१९ टक्के असे भरघोस परतावे दिले.
 
 
 
 
‘सारेगम’ आणि ‘टिप्स इंडस्ट्रीज’ या दोन कंपन्यांनी प्रत्येकी ४९६ टक्के व ४०१ टक्के परतावा दिला. २००० पर्यंत या कंपन्या ‘म्युझिक कॅसेट’ उत्पादित करीत, पण तांत्रिक प्रगतीमुळे ‘कॅसेट’ कालबाह्य झाल्यामुळे आता या कंपन्या ‘डिजिटल रेडिओ’ व सिनेमा यांची निर्मिती करतात. ‘इंडियन रेल्वेज केटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशन’ (आयआरसीटीसी) या कंपनीचे शेअरचे बाजारी मूल्य ३१ डिसेंबर, २०२० रोजी जे २८८ रुपये होते, ते वाढत १८ ऑक्टोबर, २०२१ रोजी १,१७६ रुपये झाले. या शेअरने गुंतवणूकदारांना ३०८ टक्के परतावा दिला.
 
 
 
बँकांची शेअर बाजारातील कामगिरी
 
 
स्टेट बँकेच्या शेअरच्या बाजारीमूल्यात २०२१ मध्ये ७० टक्के वाढ झाली. ‘इंडियन ओव्हरसिज बँके’च्या शेअरच्या बाजारीमूल्यात ९३ टक्के वाढ झाली. सार्वजनिक क्षेत्रातील इतर बँकांच्या शेअर्सनीही चांगली कामगिरी केली. ‘न्यू जनरेशन’ खासगी क्षेत्रातील ‘आयसीआयसीआय’ बँकेच्या शेअर मात्र मागणी कमी होती. या बँकेच्या शेअरच्या बाजारीमूल्यात फक्त ३६ टक्के वाढ झाली. ‘एचडीएफसी’ बँक, ‘कोटक महिंद्रा’ बँक यांच्या भागधारकांना २०२१ मध्ये चांगला परतावा मिळू शकला नाही. या अगोदरच्या वर्षी या बँकांची कामगिरी चांगली होती.
 
 
 
‘निफ्टी’ सार्वजनिक उद्योगातील बँका (पीएसयू) ‘बँक इंडेक्स’मध्ये १२ सार्वजनिक क्षेत्रातील बँका व जम्मू आणि काश्मीर बँक ’लिस्ट’आहे. २०२१ मध्ये या ‘इंडेक्स’ने ४७ टक्के परतावा दिला किंवा बँकांशिवाय बांधकाम उद्योगातील कंपन्यांची कामगिरीही शेअर बाजारात चांगली होती. ‘निफ्टी रिअ‍ॅल्टी इंडेक्स’ने गुंतवणूकदारांना ५२ टक्के परतावा दिला. ‘निफ्टी मेटल इंडेक्स’ने आजपर्यंत गुंतवणूकदारांना ६८ टक्के परतावा दिला आहे. ‘जास्त जोखीम, जास्त परतावा’ हे जरी शेअर बाजाराचे ब्रीदवाक्य असले, तरी ते नेहमीच यशस्वी होईल, असेही नाही. जास्त जोखमीने नुकसान झाल्याची उदाहरणेही भरपूर आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांची अशी मनोवृत्ती असते की, ते सुरुवातीला गुंतवणूक करण्याचे धाडस करीत नाहीत, सुरुवातीस गुंतवणूक करण्यास कचरतात. पण, शेअर जर वर जातो आहे असेे दिसले की, ते गुंतवणूक करतात. एका अर्थी अशी सावधानता बाळगणे बरोबर आहे.
 
 
 
डिसेंबर २०१९ पासून डिसेंबर २०२० या कालावधीत ‘डिमॅट’ खाती २६ टक्क्यांनी वाढली. डिसेंबर २०१९ मध्ये असलेली ३९.४ दशलक्ष खाती काढून डिसेंबरमध्ये ४९.८ दशलक्ष खाती झाली. डिसेंबर २०२० ते ऑक्टोबर २०२१ या कालावधीत ‘डिमॅट’ खात्यांमध्ये ४८ टक्के वाढ होऊन, खात्यांचे प्रमाण ७३.८ दशलक्ष इतके झाले. फक्त फेब्रुवारी २०२१ मध्ये १.७ दशलक्ष नवी ‘डिमॅट’ खाती उघडली गेली. ऑक्टोबरपर्यंत साडेतीन दशलक्ष खाती उघडली गेली. आता एखाद्या भागधारकाला जर फायदा मिळविण्यासाठी किंवा अन्य काही कारणास्तव शेअर विकायचे असतील, तर त्याचे ‘डिमॅट’ खाते असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
 
 
 
ऑक्टोबरमध्ये शेअर बाजाराने कमाल पातळी गाठली होती. शेअर बाजार जेवढा वर जातो, तेवढी किरकोळ गुंतवणूकदारांची शेअर बाजारात गुंतवणूक वाढते. ज्या गुंतवणूकदारांनी २०२१ मध्ये शेअर बाजार कमाल वर असताना गुंतवणूक केली, त्यांना आता नुकसानीचा चटका बसत असेल, पण जे अगोदरपासून शेअर बाजारात होते, त्यांनी शेअर बाजाराने कमाल पातळी गाठल्यावर जर विक्री केली असेल, अशांनी भरपूर नफा कमविला असेल.
 
 
 
गुंतवणुकीच्या बाबतीत एकाच टोपलीत सर्व अंडी ठेवू नका, हे तत्त्व कधीही विसरू नका. संपूर्ण गुंतवणूक शेअर बाजारात करू नका. गुंतवणुकीसाठी इतर पर्यायही निवडा. जास्त परताव्याच्या आमिषाने तोंडघशी पडू नका. मुंबई शेअर बाजाराचा ‘प्राईस-टू-अर्निंग्ज’ रेशोचे प्रमाण सध्या २६.७६ टक्के आहे. २०२० अखेरीच्या तुलनेत हे प्रमाण फार कमी आहे. २०२० मध्ये मुंबई शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदारांनी फार मोठ्या प्रमाणावर म्हणजे २३ अब्ज युएस डॉलर्स गुंतवणूक केली होती. कारण, २०२० मध्ये पाश्चिमात्य देशांत गुंतवणुकीवर मिळणार्‍या व्याजाचे प्रमाण कमी होते. भारतात गुंतवणूक केल्यास जास्त परतावा मिळेल, या कारणाने भारतात परदेशी गुंतवणूक फार मोठ्या प्रमाणावर आली होती.
 
 
 
२०२१ मध्ये कोरोनाने जगातल्या सर्व अर्थव्यवस्था उलट्याच्या सुलट्या करुन टाकल्या होत्या. भारत मात्र कोरोनातून लवकर सावरत आहे. ‘ओमिक्रॉन’ची पीडा मात्र भारताला न लागो, ही प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे. तसेच २०२१ मध्ये शेअर बाजारात साडेचार अब्ज युएस डॉलर इतकीच गुंतवणूक आली. ऑक्टोबरमध्ये जेव्हा शेअर बाजाराने कमाल उसळी घेतली होती तेव्हा, तसेच नोव्हेंबर व डिसेंबरमध्ये शेअर बाजारात असलेली परदेशी गुंतवणूक फार मोठ्या प्रमाणावर काढून घेण्यात आली.




त्यामुळे १८ ऑक्टोबर रोजी शेअर बाजार निर्देशांकानेजी कमाल पातळी गाठली होती, त्यात नंतर ७.७ टक्के घट झाली.
‘फेडरल रिझर्व्ह ऑफ दि युनायटेड स्टेट्स’ व ‘दि अमेरिकन सेंट्रल बँक’ यांनी मार्च २०२० पर्यंत नोटा न छापण्याचा निर्णय घेतला आहे. ‘दि बँक ऑफ इंग्लंड’ने यापूर्वीचे व्याजदर वाढविले आहेत. हे असेच सुरू राहिल्यास २०२२ मध्ये भारतातील शेअर बाजारात परदेशी गुंतवणूक येण्याचे प्रमाण कमी असेल. २०२२ मध्ये प्राथमिक भांडवली बाजारपेठेची घोडदौड मात्र कायम राहील. कारण, बरेच ‘आयपीओ’ २०२२ मध्ये भांडवली बाजारपेठेत धडकणार आहेत. २०२१ मध्ये विक्रीस आलेल्या ‘आयपीओ’ पैकी सर्व ‘आयपीओ’ विक्रीमूल्यांहून जास्त रकमेस ‘लिस्ट’ झाले नाहीत.
 
 
 
 
बरेच ‘आयपीओ’ कमी किमतीत ‘लिस्ट’ झाले. ‘पेटीएम’चा शेअर तर ‘लिस्टिंग’च्या वेळी इतका कोलमडला की, त्याचे शेअर बाजारात काही दिवस गंभीर परिणाम जाणवत होते. त्यामुळे कित्येक गुंतवणूक क्षेत्रातील जाणकार असा सल्ला देतात की, ‘आयपीओ’मध्ये गुंतवणूक करण्यापेक्षा सदर शेअर ‘लिस्ट’ झाल्यावर शेअर बाजारात विकत घ्या. त्यावेळी गुंतवणूदाराला त्या शेअरचे खरे मूल्यांकन समजलेले असते. २०२१ मध्ये शेअर बाजारात देशांतर्गत गुंतवणूकदार जास्त सक्रिय होते. या वर्षीच्या मुहूर्तांच्या सौद्याच्या दिवशीही शेअर बाजारात सकारात्मक वातावरण होते.



२०२२ मध्ये समजा परदेशी गुंतवणूक रोडावली, तर भारतीय गुंतवणूकदार ‘इश्क’ करण्याची ‘रिस्क’ घेतील का, हा कळीचा मुद्दा आहे. आता डिसेंबर संपत आला आहे. जानेवारी २०२२ संपल्यानंतर लगेच फेब्रुवारीमध्ये केंद्रीय अर्थमंत्री लोकसभेत २०२२-२०२३ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हे बजेट कसे असावे, याबाबतच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. मागण्या पुढे येत आहेत. या अर्थसंकल्पात काय प्रस्तावित असेल, यानुसार भारतीय अर्थव्यवस्था तसेच शेअर बाजार आकार घेईल. जर तो नवा जीवाणू-जंतू फार मोठ्या प्रमाणावर आला नाही, कोरोनाही बराचसा कमी झाला व आकस्मिक काही संकट देशावर आले नाही, तर २०२२ हे वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसह शेअर बाजारालाही चांगले असेल, हे निश्चित!




Powered By Sangraha 9.0