युवा खगोलप्रेमी

02 Dec 2021 12:33:26

Umesh Ghude_1  
 
 
उद्यापासून नाशिकमध्ये संपन्न होणाऱ्या मराठी साहित्य संंमेलनाचे अध्यक्ष म्हणजे ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि लेखक डॉ. जयंत नारळीकर. तेव्हा त्यांच्याच प्रेरणेने वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगून खगोलविश्वात रमणाऱ्या उमेश संतोष घुडे या युवा खगोलप्रेमीविषयी...
अमावस्या, पौर्णिमा आणि ग्रहणांचा संबंध धर्म आणि कर्मकांडाशी लावण्यात आघाडीवर असलेल्या आपल्या देशात आजही खगोलशास्त्राकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. परंतु, आपल्याच आजुबाजूला काही मंडळी खगोलशास्त्राबाबत जागृती करण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घालत असतात. त्यापैकी एक व्यक्ती म्हणजे ठाण्यातील उमेश संतोष घुडे हा तरूण होय!
मुळचा ठाणे जिल्ह्यातील मुरबाडचा असणारा उमेश ठाण्यात स्थायिक आहे. केळकर महाविद्यालयातून त्याने ‘तंत्रज्ञान’ विषयामधील पदवी शिक्षण पूर्ण केले. शाळेत असताना ‘खगोलशास्त्र’ या विषयाची त्याची पहिली ओळख झाली. फेब्रुवारी २००३ मध्ये झालेल्या एका दुर्देवी घटनेमुळे खरेतर सर्वात आधी अंतराळ आणि रॉकेट वगैरे अशा काही गोष्टी असतात, हे त्याला कळलं. ती दुर्देवी घटना म्हणजे अंतराळवीर कल्पना चावला यांचा अंतराळातून परतताना झालेला अपघात. तो सरस्वती शाळेत शिकत होता. त्या शाळेतील एक माजी विद्यार्थी जे ‘नासा’मध्ये कार्यरत होते, त्यांनी शाळेला भेट दिली असता, विद्यार्थ्यांसाठी एक व्याख्यान घेतले होते. ते व्याख्यान उमेशने काळजीपूर्वक ऐकले. त्या व्याख्यानात काही अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टीही होत्या. जसे की, अंतराळात जाणे, रॉकेट पृथ्वीच्या कक्षेबाहेर घेऊन जाणे, अंतराळात जाऊन स्पेसवॉक करणे... असं मानवाला सुद्धा जमू शकतं? याचे त्याला आकलन झाले आणि या विषयाचे कुतूहल निर्माण झाले.
तेव्हाच्या शिक्षण पद्धतीप्रमाणे विज्ञान पुस्तकातला एक तीन पानी धडा सोडला, तर खगोलशास्त्राबद्दल फार काही विशिष्ट अभ्याक्रम पाठ्यपुस्तकांत समाविष्ट नसायचा. त्यामुळे मोहन आपटे, डॉ. जयंत नारळीकर, दा. कृ. सोमण, पराग महाजनी, प्रदीप नायक, बाळ फोंडके इत्यादी प्रसिद्ध विज्ञान लेखकांची पुस्तके तो वाचू लागला. पुढे २०१२च्या सुमारास नेहरू तारांगण येथे एक वर्ष कालावधीच्या एका अभ्यासक्रमाला त्याने प्रवेश घेतला. दर रविवारी होणारी आणि नावाजलेल्या व्यक्तींकडून दिली जाणारी व्याख्याने ऐकून बालपणापासून जोपासलेल्या आवडीला एक विशिष्ट दिशा मिळू लागली. याच दरम्यान काही रात्रीचे आकाशदर्शनाचे कार्यक्रम आणि दुर्बिणीमधून दूरवरच्या गोष्टी न्याहाळण्याची संधी त्याला मिळत गेली. नेहरू तारांगणमधील अभ्यासक्रम संपल्यानंतर या क्षेत्रामध्ये काहीतरी करण्याची इच्छा त्याच्या मनात जोर धरू लागली. तेथील प्रभू वेलार सरांबरोबर मुंबई आणि ठाण्यामधली शाळा आणि गृहसंकुलांमध्ये जाऊन खगोलशास्त्राच्या लहान मोठ्या कार्यशाळा घेण्याची त्याला संधी मिळत गेली. ठाण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी आबासाहेब जऱ्हाड यांच्यातर्फे सुरु झालेल्या ‘तारांगण आपल्या दारी’ या उपक्रमामुळे ठाणे, पालघर, शहापूर, डहाणू इत्यादी ठिकाणच्या शाळांमध्ये जाऊन त्याने मुलांमध्ये खगोलशास्त्राची आवड निर्माण केली.
जास्तीत जास्त लोकांना समाविष्ट करून खगोलशास्त्राचा एक व्यापक समुदाय सुरु करणे आणि लोकांमधील अंधश्रद्धा आणि भ्रामक समजुतींना दूर सारून विज्ञान आणि तंत्रज्ञानावर त्यांचा विश्वास दृढ करणे, हा त्याचा महत्त्वाचा उद्देश आहे. तसेच भविष्यामध्ये शहराबाहेर एक सर्वसमाविष्ट विज्ञान केंद्र उभारणे, तेथे दूर अंतराळातील गोष्टी न्याहाळण्यासाठी अद्ययावत उपकरणे बसवणे, भौतिक आणि खगोलशास्त्र या विषयांमध्ये उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलांना या गोष्टींचा लाभ मिळवून देणे, हे त्याचे काही दूरगामी विचार आहेत.
ठाण्यात दुर्बिणीच्या साहाय्याने अवकाश दर्शन घडविण्याचे काम उमेश करत आहे. २००९ मध्ये ‘लुलीन’ नामक एक धुमकेतू पृथ्वीजवळ आला होता. त्यावेळी मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या गच्चीवरून दुर्बिणीच्या साहाय्याने दा. कृ. सोमण सरांनी तो पाहण्याची संधी दिली होती. त्या छोटेखानी कार्यक्रमात त्यांनी एखादा ‘अ‍ॅस्ट्रोनॉमी क्लब’ ठाण्यामध्ये असावा, जेणेकरून ठाणेकर आणि आसपासच्या नागरिकांना खगोलशास्त्र अनुभवण्याची संधी मिळू शकेल, अशी इच्छा व्यक्त केली होती. तेव्हाच उमेशने ठरवलं की, असा उपक्रम आपण सुरु करून त्यात विज्ञान आणि खगोलशास्त्राच्या व्यापक गोष्टींचा समावेश करायचा. त्यातूनच ‘अमेच्युर अ‍ॅस्ट्रोनॉमी क्लब’ या संकल्पनेने जन्म घेतला आणि एका छोट्या दुर्बिणीपासून सुरु झालेला प्रवास अथांगपणे सुरु आहे.
ठाणे शहरामध्ये गृहसंकुले आणि प्रभागातील मोकळ्या मैदानांत छोटेखानी उपक्रम राबवण्यासाठी राजेश मोरे यांची त्याला मोलाची साथ मिळत असल्याचे तो सांगतो. परंतु, शहरांमधील प्रदूषण आणि प्रकाशामुळे बरेच अडथळे निर्माण होतात. त्यामुळे ते शहरापासून दूर जिथे प्रदूषण कमी आणि भरपूर काळोख असेल अशा ठिकाणी आकाश दर्शनाचे अभ्यासवर्ग आयोजित करत असतो. ग्रामीण भागातील आश्रमशाळा, अनाथाश्रमे, आदिवासी पाडे याठिकाणी तो कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता असे अभ्यासवर्गही घेतो. जेणेकरून तेथील मुलांना आणि नागरिकांनासुद्धा अवकाशाची ओळख होऊन मुलांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होईल. अशा या खगोलप्रेमी युवकाला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
Powered By Sangraha 9.0