'मुंबई महापालिकेतील वाद 'राजदरबारी''

18 Dec 2021 00:34:11
 
bjp corporators_1 &n
 
 
 
मुंबई : मुंबई महापालिका प्रशासनातर्फे पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी बनविलेल्या 'आश्रय' योजनेतील कथित भ्रष्टाचाराचा वाद आता थेट राजदरबारी पोहोचला आहे. मुंबई महापालिकेच्या संदर्भातील या मुद्द्यावरून मुंबई महापालिकेतील भाजप नगरसेवकांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे तक्रार केली असून या संदर्भात कारवाईची मागणी केली आहे. शुक्रवार, दि. १७ डिसेंबर रोजी मुंबई भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेत या संदर्भात पाठपुरावा करण्याची मागणी केली आहे.
 
 
राज्यपालांच्या भेटीनंतर भाजप शिष्टमंडळाने म्हटले की, 'मुंबईतील सफाई कर्मचारी आवास योजना म्हणजेच आश्रय योजनेत घडलेल्या १८४४ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार या संदर्भात महानगरपालिका आयुक्त, महापौर व मुख्यमंत्री कार्यालयामध्ये तक्रार दिलेली आहे. मुख्यतः सदर कंत्राटामध्ये महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तिंना / कंपनीला जवळ जवळ 2000 कोटींचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यामध्ये एकच निविदा मागविली असल्याने हे केंद्रीय सतर्कता आयोगाच्या दिशानिर्देशाचे उल्लंघन आहे. मात्र अद्यापही त्यावर काहीही कार्यवाही झालेली नाही. म्हणूनच आज शुक्रवार, दि. १७ डिसेंबर रोजी राज्याचे संविधानिक प्रमुख राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे भाजपच्या शिष्टमंडळाने तक्रार करत आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.'
 
 
राज्यपालांचे आश्वासन
'मुंबई महापालिकेतील या कथित घोटाळ्याची आणि नोंदविण्यात आलेल्या आक्षेपांची चौकशी करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाला देण्यात येतील, असे राज्यपाल भगतसिंह कोसयारी यांनी दिले आहे,' असे भाजपतर्फे सांगण्यात आले आहे.
 
 
यावेळी भाजपचे आमदार मिहिर कोटेचा, महानगरपालिकेतील पक्षनेते विनोद मिश्रा, नगरसेविका रिटा मकवाना, राजेश्री शिरवडकर, हर्षिता नार्वेकर, शीतल गंभीर, आशा मराठे, नगरसेवक महादेव शिवगण आणि आकाश राज पुरोहित हे उपस्थित होते.
 
 
 
Powered By Sangraha 9.0