मुंबई : करीना कपूर आणि अन्य काही तारे तारकांवर मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आलेल्या कारवाईनंतर आता या यादीत अभिनेत्री आलिया भट्टचा देखील समावेश झाला आहे. दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यामुळे आलियावर आता गुन्हा नोंद करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेतर्फे हा गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याच्या घरी पार्टी आयोजित केली होती. या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या करिना कपूर, अमृता अरोरा, सीमा खान, महीप कपूर यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते.
दरम्यान, या पार्टीमध्ये सहभागी झालेल्या आलियासह इतर सर्वांची देखील कोरोना चाचणी करण्यात आली होती. कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह येऊनही या सर्वांना १४ दिवस गृह विलगीकरणात ठेवण्याचे आदेश मुंबई महापालिकेने दिले होते. परंतू आलियाने महापालिकेच्या आदेशांना केराची टोपली दाखवत दिल्ली येथील कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली आहे. त्यासोबतच दिल्लीतील गुरुद्वारा बंगला साहेब या ठिकाणी देखील आलियाने भेट दिली होती. तसेच इतरही काही कार्यक्रमात आलिया सहभागी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, आलियाने कोरोना प्रतिबंधक नियमांचे उल्लंघन केले आहे, असा ठपका ठेवत आलियावर महापालिका प्रशासनातर्फे गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.