आरोग्य अ‍ॅप्स आणि डेटाचोरी

16 Dec 2021 11:47:23
Health APP _1  





‘डिजिटल’ युगात दररोज आपण अशीच माहिती कळत-नकळत ब्राऊझर्स किंवा अ‍ॅपमध्ये साठवत असतो. अशावेळी सुरक्षिततेची काळजी आपणच घेणे गरजेचे आहे.



'डेटा सुरक्षा’ या विषयावर जगभरात पुरेशी संवेदनशीलता दाखविली जात असली, तरी या ना त्या कारणास्तव वारंवार हजारो युझर्सचा डेटा चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस येतात. गेल्याच वर्षी अशाच प्रकारे ‘व्हॉट्सअ‍ॅप’च्या ‘डेटा प्रायव्हसी’बद्दल वादंग निर्माण झाला होता. ‘व्हेन यू आर नॉट पेईंग फॉर द प्रॉडक्ट, यू आर द प्रोडक्ट’ या उक्तीनुसार अनेकदा बड्या कंपन्या व्यवसायाचे हातखंडे वापरतात. सहज मोबाईल हाताळताना याची प्रचिती सर्वांना येतेच. तुम्ही एखाद्या कंपनीचा मोबाईल सर्च करता, त्यावेळेस तुम्हाला त्या दृष्टीने इतर जाहिरातीही दिसू लागतात.

मग आपसूकच युझर एखाद्या कंपनीसाठी ग्राहक बनतो. अशाचप्रकारचे अल्गोरिदम व्यापारासाठी कार्यरत असतात. बर्‍याचदा हे खपूनही जात असेल. मात्र, तुमच्या आजाराचा फायदा घेऊन अशा कंपन्या स्वतःचा फायदा लाटू लागल्या तर... यामागचे कारण म्हणजे ‘मेंटल हेल्थ अ‍ॅप’च्या ‘डेटा सुरक्षे’बद्दल नुकतेच उपस्थित करण्यात आलेले काही प्रश्न. रोगापेक्षा इलाज भयंकर अशा या अ‍ॅप्सची डोकेदुखीवाढू लागल्याने रुग्णांना याचा मन:स्ताप सहन करावा लागत आहे. कारण, युझर्सच्या मानसिक आरोग्याची माहिती हे अ‍ॅप्स चक्क जाहिरातींसाठी पुरवत असल्याच्या प्रकाराने खळबळ माजली आहे.
 
 
 
अशा आजारांबद्दल थेट मानसोपचार तज्ज्ञांकडे सल्ला घेण्यासाठी जाणार्‍यांची संख्या तुलनेने कमी आहे. त्यामुळे अशाच एका रुग्णाने एक बहुचर्चित ‘मेंटल हेल्थ थेरपी अ‍ॅप’ डाऊनलोड केले. आठवड्याला पाच हजार अशा शुल्कासह सेवा सुरूही झाली. मात्र, बर्‍याचदा डॉक्टरांच्या सल्ल्यासाठी वाट पाहावी लागत होती. महिन्यातून केवळ दोनदाच सल्ला मिळाला. ‘अ‍ॅप’द्वारेच डॉक्टरांना समस्या सांगितल्यावर तिथेच ऑनलाईन सल्ला मिळतो. मात्र, डॉक्टरांना दिलेल्या माहितीचा वापर जाहिरातींसाठी केला गेल्याचा आक्षेप रुग्णांनी नोंदवला आहे.
 
 
‘कोरोना’ काळातील मानसिक आरोग्य समस्यांच्या प्रकरणांतील वाढ लक्षणीय होती. आजही अनेकजण तशाच आजारांचा सामना करत असल्याचे सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते. 2020 मध्ये ही प्रकरणे 25 टक्क्यांनी वाढली होती. टाळेबंदी आणि निर्बंधांमध्ये मोबाईल वापरणार्‍यांच्या संख्येत झालेली वाढ ही अशा अ‍ॅप्सनिर्मितीसाठी पथ्यावर पडली. ‘अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन’च्या आकडेवारीनुसार, असे दहा ते वीस हजार अ‍ॅप्स आहेत. मात्र, सेवा देण्याच्या नावाखाली रुग्णांच्या वैयक्तिक माहितीच्या चोरीचाही प्रश्न या अ‍ॅप्समुळे उपस्थित झाला आहे. तसेच अ‍ॅपमधील डेटाच्या सुरक्षिततेबद्दलही पडताळणी झालेली दिसत नाही.
 
 
फिनलंडच्या एका घटनेतील एका अ‍ॅपचा डेटा चोरी झाल्यानंतर 30 हजार रुग्णांकडून हॅकर्सने बिटकॉईनची मागणी केली होती. तसे न झाल्यास रुग्णाचे व्हिडिओ आणि माहिती डार्कवेबवर टाकू, अशी धमकीसुद्धा दिली होती. विवाहबाह्य संबंध, बाल लैंगिक शोषण आदी प्रकरणांची संवेदनशील माहिती डार्कवेबवर टाकण्याच्या या धमक्या येऊ लागल्या. 650हून अधिक ‘मेंटल हेल्थ अ‍ॅप्स’चा ‘रिव्ह्यू’ करणारे ‘हार्वर्ड मेडिकल’चे जॉन टॉरस सांगतात की, “भावनिक माहिती गोळा करण्यासाठी कुठलेही ‘अल्गोरिदम’ नसते. डेटाची चोरी होत असेल, तर हा प्रकार अ‍ॅपच्या सुरक्षिततेशी निगडित आहे. कुठल्याही कंपनीचा व्यवसाय हा जाहिराती देणार्‍या कंपन्यांना डेटा दिल्याविना होऊच शकत नाही. त्यामुळे बारीक अक्षरात लिहिलेल्या अटीशर्तींकडे दुर्लक्ष करणे, हे युझरला महागात पडू शकते.” एका आकडेवारीनुसार, मानसिक आरोग्यासंदर्भातील रुग्णसेवा देणार्‍या या जगभरातील बाजारपेठेचा आवाका ३५ हजार कोटींचा आहे.
 
 
यातून फायदा घेणारेही आहेत. सर्वच कंपन्या आणि अ‍ॅप्स काही दोषयुक्त नाहीत. मात्र, जखम मांडीला आणि इलाज शेंडीला, अशा प्रकारच्या अडचणी डेटाचोरीमुळे निर्माण झाल्या. अनेकांना आणखी मन:स्ताप सहन करावा लागला होता. युरोपातील ब्रिटनची राष्ट्रीय आरोग्य पुरवठादार संस्था सांगते की, हजारो अ‍ॅप्सची आम्ही पडताळणी केली. त्यापैकी 68 टक्के कंपन्यांनी अपेक्षित सुरक्षिततेचे टप्पेच पार केलेले नाहीत. अ‍ॅप्स हे रुग्णांच्या सुरक्षेसह मानसिक आरोग्यासाठी तयार करण्यात आले आहेत. मात्र, तसे होताना दिसत नाही, असेही ताशेरे या संस्थेने ओढले आहेत. ‘डिजिटल’ युगात दररोज आपण अशीच माहिती कळत-नकळत ब्राऊझर्स किंवा अ‍ॅपमध्ये साठवत असतो. अशावेळी सुरक्षिततेची काळजी आपणच घेणे गरजेचे आहे.





Powered By Sangraha 9.0