दगडात प्राण फुंकणारा ‘सुमन’

16 Dec 2021 11:49:38

suman dabholkar_1 &n
 
‘कला असे मानवाचे भूषण। परी पाहिजे त्यात जीवनाचे स्मरण।’ हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार आचारणात आणणाऱ्या सुमन विलास दाभोलकर याच्या अंगभूत पाषाणकलेचा घेतलेला हा आढावा...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली हे मूळ गाव असलेल्या सुमन दाभोलकर याची आई गृहिणी, तर वडील सरकारी नोकरीत. भावंडांमध्ये सुमन थोरला. मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या सुमनच्या घराण्यात पूर्वजापर्यंत कुणाचाच कलेशी दुरान्वये संबंध नव्हता. तरीही दुर्लक्षित असलेला दगड जेव्हा सुमनच्या नजरेस पडतो, तेव्हा त्या दगडातून बोलकी कलाकृती साकारते. दगडाला जीवंत करणारा हा अवलिया ठाण्याचे भूषण ठरला आहे. मागील अनेक वर्षांपासून तो नामांकितांचे ‘स्टोन आर्ट’ बनवून रसिकमनाच्या पसंतीस उतरला.
 
लहानपणापासूनच चित्रकलेची आवड असल्याने शालेय स्तरावर चित्रकलेसह विविध स्पर्धांमध्ये सुमन अव्वल येत असे. पण, चित्रकलेलाच त्याने प्राधान्य दिले. कणकवलीतच दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सुमनने ‘फाईन आर्ट’साठी ठाणे गाठले. मुंबईतील एका लांबच्या नातेवाईकाकडे वास्तव्याला राहून २००८ साली ‘जी.डी.आर्ट’ पूर्ण केले. या परीक्षेत गुणवत्ता यादीत महाराष्ट्रात सुमन चौथा आला. सध्या सुमन हा ठाण्यातील नावाजलेल्या शाळेत कलाशिक्षक आहे.
 
कणकवलीतील गड नदीतील मोठंमोठाले दगड रंगवण्यास सुमनने सुरुवात केली. त्या दगडांना जीवंत करण्याचा प्रयत्न केला. काही दगडांना मासे, काहींना कासव अशी रूपं दिली, तर ‘संविधान दिना’चे औचित्य साधून विशाल खडकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र साकारले. हळूहळू नदीतले दगड घरी आणून त्यावर रंगसंस्कार करू लागल्याने त्यातच त्याची रुची वाढू लागली. चित्रकलेच्या शिक्षणामुळे दगडावर चित्र साकारणं यात त्याचा हातखंडा बनला. नैसर्गिक आकार न बदलता दगडाची काटछाट न करता, विविध चेहरे साकारण्याचं आव्हान स्वीकारून त्याने आतापर्यंत शंभरहून अधिक दगडांना जीवंत केलंय. ‘भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली,’ या नारायण सुर्वेंच्या कवितेतील ओळींप्रमाणे दगडाचा आकार पण तोडलेल्या भाकरीसारखा त्याला वाटतो; म्हणूनच दगड निवडल्याचे तो सांगतो. यातूनच सुमनची चिकित्सा, जिज्ञासू वृत्ती दगडांत काहीतरी शोधू लागली. मग त्यातून साकारले गेले,निरनिराळे चेहरे. भारत आणि भारताबाहेरील विविध क्षेत्रांतील मातब्बर व्यक्तींचे ‘स्टोन आर्ट’ त्याने साकारले आहे. त्यात छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योेतिबा फुले, जगप्रसिद्ध वैज्ञानिक आईन्स्टाईन, भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम, अभिनेता नाना पाटेकर, अमिताभ बच्चन, स्वप्निल जोशी, क्रिकेटपटू विराट कोहली, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, कपिल देव, ओशो, रतन टाटा, कविवर्य नारायण सुर्वे इत्यादी अनेक मान्यवरांच्या रंगशिल्पांचा समावेश आहे. नुकतेच दुर्घटनेत हुतात्मा झालेल्या भारताचे सीडीएस जनरल बिपीन रावत यांचेही ‘स्टोन आर्ट’ सुमनने साकारले. सर्वाधिक ‘स्टोन आर्ट पोट्रेट’ साकारल्याबद्दल सुमन दाभोलकरची ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्येही नोंद करण्यात आली आहे.
 
त्याच्या या कलेची सर्वप्रथम दखल घेतली अभिनेता सोनू सूदने. कोरोना काळात सोनूच्या समाजकार्याला मानवंदना म्हणून त्यांचं एक ‘स्टोन आर्ट’ सुमनने साकारलं होतं. ते ‘स्टोन आर्ट’ त्यांच्यापर्यंत पोहोचलं.सूद यांनी सुमनला त्यांच्या ट्विटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावरील अकाऊंटवरून ‘स्टोन मॅन’असे संबोधून प्रसिद्ध केले. तसेच अमिताभ बच्चन यांनीही सुमनच्या ‘स्टोन आर्ट’वर त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ‘अद्भुत, स्नेह, आदर’ अशी प्रतिक्रिया नोंदवत सुमनच्या कलेला प्रोत्साहन दिले. मुंबईत अंधेरी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर ’जय हे’ या संग्रहालयासाठी केलेल्या पेंटिंग प्रकल्पात सुमनचा चित्रकार म्हणून सहभाग होता. हा प्रकल्प आयुष्यात अविस्मरणीय ठरल्याचे सुमन सांगतो.
 
‘कोविड’ काळातही सुमनने ‘कोविड’ रुग्णालयामध्ये ‘रिसेप्शनिस्ट’ म्हणून काम करून ‘कोविड योद्ध्या’चे कर्तव्य पार पाडले. शिवाय कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी एका चित्रप्रदर्शनाच्या माध्यमातून मिळालेली रक्कम जिल्ह्याधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. चिपळूण पूरग्रस्तांनाही आर्थिक मदत केली. भविष्यात ‘स्टोन आर्ट’ कलेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याचा सुमनचा प्रयत्न आहे. नवीन पिढीला संदेश देताना सुमन मौलिक उपदेश करतो. तो म्हणतो की, “या क्षेत्रात अतिशय मेहनत आहे. कलेत वैश्विक विचार असावेत. स्वतःचं काहीतरी असावं. केवळ दुसऱ्याचं अनुकरण करण्यापेक्षा योग्य विचार, चिंतन, मनन, वाचन, अनुभव इत्यादींची सांगड कलेत असणे गरजेचे आहे.”
 
केवळ कौतुकाने कलाकाराचं पोट कधीच भरत नाही. मात्र, ‘स्टोन आर्ट’मुळे मराठी माध्यमातून प्रसिद्धी मिळते. तसेच याची विक्रीदेखील मोठ्या प्रमाणावर होत आहे. मुंबई ,ठाणे, पुणे, कोलकाता, दिल्ली, तामिळनाडू इत्यादी ठिकाणांहून सुमनच्या ‘स्टोन आर्ट’ना उत्तम मागणी आहे. अनेकजण दगडावर स्वतःचे फोटो करवून घेताहेत. वाढदिवसानिमित्त, लग्नवाढदिवसानिमित्त किंवा अन्य विशेष प्रसंगांसाठी भेट म्हणून देण्यासही ‘स्टोन आर्ट’ला मागणी असल्याने यातच करिअर समृद्ध करण्याचे सुमनने ठरवले आहे. त्याच्या या पाषाणवाटेला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
Powered By Sangraha 9.0