यंदाचे वर्ष हे भीमशाहीर वामनदादा कर्डक यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. दि. १५ ऑगस्टपासून त्याची सुरुवात झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची समाजपरिवर्तनाची चळवळ लोकांपर्यंत नेली ती शाहिरांनी, त्यामध्ये वामनदादा कर्डक अग्रस्थानी होते. त्यांच्या गीतांनी समाजप्रबोधन तर केलंच, पण सामाजिक परिवर्तनाची क्रांतिज्योत अखंड तेवत ठेवली. या ज्योतीने अनेक ज्योती उजळल्या. आजही लाखो दीन-दलितांच्या, उपेक्षितांच्या घराघरांत प्रत्येकाच्या ओठांवर त्यांची गीतं आहेत. ती ’आंबेडकरी विचारांची गीते’ म्हणूनच ओळखली जातात.
भीमशाहीर वामनदादा कर्डक जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन’ व ‘शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी, पुणे’ यांच्या संयुक्त विद्यमाने भीमशाहीर वामनदादा कर्डक यांच्या विशेष गीतांचा माझ्या भीमाला स्मरून, ‘गीत वामनाचे गाईन’ हा कार्यक्रम सादर करणार आहेत. औरंगाबादचे कलाकार नितीन गायकवाड आणि त्यांचे सहकारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी दि. ६ डिसेंबर रोजी प्र-कुलगुरू डॉ.एन. एस. उमराणी यांच्या विशेष उपस्थितीत ह कार्यक्रम समताभूमी, महात्मा फुले निवासस्थान, म. फुले पेठ येथे संध्याकाळी ६ वाजता झाला. या कार्यक्रमाला उपस्थित सार्यांसाठीच हा एक अविस्मरणीय कार्यक्रम होता.
वामनदादा कर्डकांनी कविता लेखनाला साधारणतः १९४३ पासून सुरुवात केली. त्यापूर्वी ’सत्यशोधकी जलसे’ व ‘आंबेडकरी जलसे’ अस्तित्वात होते. ‘जलसे’कारांनी आपले वगनाट्य सादर करताना अनेक कवने सादर केली. ही पारंपरिक कवने समाजाने ऐकलेली होती. त्यात काही अंशी दैववाद आलेला होता. व्यक्तिवर्णनपर आणि भक्तिपर गीतरचनांमध्ये भावनेच्या अतिरेकाने दैववाद घुसलेला होता. वामनदादांनी आपल्या रचनांमध्ये समग्र बदल घडवून आणला.आशय आणि सादरीकरणात बदल करत नव्या काळाचे नवे गाणे त्यांनी जन्माला घातले. तरीसुद्धा वामनदादांची कविता ही लोककविता नाही. लोककवितेचा रचयिता ज्ञात नसतो. लोककविता म्हणजे वास्तवातील लोकांची कविता असा अर्थ नसून ’लोक’ याचा अर्थ ’समाज’ असा ध्वनित होतो. लोकपरंपरा जपणारे अनेक लोक आहेत. लोकवाङ्मयाचेही अनेक प्रकार आहेत. ‘गोंधळ’, ‘भारुड’, ‘लावणी’, ‘लळित’ आदी प्रकार हाताळणारे आणि जाणणारे समाज, असा लोकप्रवाहातील रचनाचा अर्थ घेतला तरीही वामनदादा यात बसत नाही. त्यांच्या कवितेत ’लोकमन’, ‘लोकरंग’ आणि ‘लोकढंग’ आहे, पण त्याची ‘लोककविता’ नाही. खर्या अर्थाने वामनदादाची कविता ही आधुनिक आंबेडकरवादी गेय कविता आहे. वामनदादा म्हणतात, “मी चातुर्वर्णाची चौकट तोडली. तसाच मी काव्यशास्त्राच्या चौकटीतून मुक्त आहे. तरी गाणं म्हटलं की, यमक आलंच. संपूर्णपणे यमकाचं बंधन तोडता येत नाही. मी संगीतशास्त्राचे नियमदेखील तोडले आहेत, तरी आमच्यादेखील गाण्याला एक शास्त्र आहे. बुद्ध, फुले, आंबेडकर जमेल तसे गायनातून सांगणे एवढेच माझे काम. तरी मानवी जीवनाच्या कप्प्या-कप्प्यात शिरून मी लिहीत आलो. मी माणसांचंच गाणं गात आलोय. माणसांनीच ते मान्य केलंय.” ते प्रांजळपणे सांगतात, ’‘मी प्रेमाच्या परवडीची गाणी गात नाही आणि माझं गाणं फारसं बोचरंसुद्धा नसतं. मी वाङ्मयीन मूल्याची मुळीच पर्वा केलेली नाही. एक तळमळणार्या माणसाची तळमळ म्हणूनच मी माझी गाणी प्रकाशित करीत आलो.” वामनदादाच्या बहुसंख्य कविता अभ्यासल्या, तर त्यातून ते आंबेडकरी विचारांच्या कवितांचे प्रवर्तक होते, असे म्हणावे लागते आणि ते बरोबरही आहे. कारण, आंबेडकरी विचार प्रवाहाला स्वतःची प्रेरणा, स्वतःचे आदर्श आणि स्वतःची जीवनप्रणाली होती. वामनदादा लिहीत होते तेव्हा मराठी कवितेच्या भव्य प्रांगणात केशवसुत, बालकवी, गोविंदाग्रज, कुसुमाग्रज, बा. भ. बोरकर, पी.सावळाराम, ना. घ. देशपांडे, गदिमा, जगदीश खेबुडकर आदी अनेक प्रथितयश कवींच्या कविता होत्या. त्यांच्या चित्रपटांतील गाणी, भावगीते, भक्तिगीते आणि नाट्यगीताचा प्रभाव होतकरू आणि नवकवींवर होत होता.
आंबेडकरी प्रेरणा मानणार्या काही कवींना मराठीतील अनेक रचनाकारांच्या कवितांचे आकर्षण होते, तर काहींना मराठी-हिंदी गीतांच्या चालींचे आकर्षण होते. अशा काही भावलेल्या चालींचा नेमका भाव, मूड कर्डकांनी घेतला, म्हणून त्यांनी चालीवर रचलेली गाणी घेतली. परंतु, तीसुद्धा नवीन आणि स्वतंत्र वाटली. वामनदादांच्या कवितेने मानवतेचा ध्यास घेतलेला होता. त्यांनी सामान्य माणसाच्या जीवनाचे सहजसुंदर काव्य साध्या, सोप्या भाषेत लिहिले. माणसाचा जन्म, त्याचे सुख-दुःख, त्याचा प्रपंच, कर्तृत्व, त्याच्या जीवनाचे सार आपल्या वास्तव कवितेतून त्यांनी प्रांजळपणे मांडले. ’वंदन माणसाला’ कवितेत ते म्हणतात, ‘वंदन माणसाला, वंदन माणसाला, दे कायेचे अन् मायेचे चंदन माणसाला, कुणी बनविले धनी, कुणाला कुणी बनविले दास, कष्टकर्यांच्या गळी, बांधला कुणी गुलामी फास, वामन ऐक आता सांगे भीमगाथा, जीर्ण पिढीचे नको रूढीचे बंधन माणसाला!’ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपार श्रद्धा असलेले वामनदादा त्यांच्याबद्दल म्हणतात, ‘काय सांगू तुला आता भीम माझा कसा होता, लेकराला जशी माता, भीम माझा तसा होता... झुंज देऊन काळाशी, सात कोटी गुलामांचा उंचविला इथे माथा, भीम माझा असा होता...’ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दलिताच्या सामाजिक हक्कासाठी न्याय्य संघर्ष केला. अन्याय-अत्याचाराविरोधात दलित समाजात आत्मप्रत्ययाची ऊर्मी निर्माण होण्यासाठी आणि त्यांच्यातील आत्मभान जागवण्यासाठी त्यांनी अविरत परिश्रम केले. सुमारे सात कोटी लोकांचा हा समाज आपल्या पायातल्या गुलामगिरीच्या बेड्या निमूटपणे वागवत होता. प्रारब्धाला दोष देऊन कित्येक वर्षे असाह्य जिणे कंठीत होता.
डॉ. बाबासाहेबांचे महनीय कार्य असे की, या कोट्यवधी जनतेच्या मनात त्यांनी अन्यायाची चीड निर्माण केली. स्वाभिमानाची ठिणगी पेटवली. शतशतकांचे वैचारिक साखळदंड तोडून टाकले. हे कार्य सहज घडण्यासारखे नव्हते. सर्वच दृष्टींनी नागवला गेलेला दलित समाज त्याच्या स्वतःच्यापायावर उभा करावयाचा असेल, तर त्याला आत्मस्थितीचे ज्ञान दिले पाहिजे. आपले जन्मसिद्ध अधिकार कोणते याची जाणीव त्याच्या चित्तात उत्पन्न केली. डॉ. बाबासाहेबांच्या मार्गानेच गुलामीचे बंध तुटतील, मानव मुक्त होईल, त्यांच्यासाठी अंत:करणपूर्वक काही करावे, अशी भावना वामनदादा आत्मविश्वासाने व्यक्त करतात.’माणसा इथे मी तुझे गीत व्हावे, असे गीत गावे तुझे हित व्हावे, तुझ्याच भुकेचे कोडे उलगडावे... तुझे दुःख सारे गळूनी पडावे, एकाने हसावे लाखाने रडावे, जुने सारे सारे असे ना उरावे...’ आपण व आपल्या भोवतीच्या जगाचे यथार्थ भान आल्याशिवाय गुलामाला आपली गुलामगिरीही कळत नाही. म्हणून डॉ.आंबेडकरांनी आपले कृतिशील विचार वृत्तपत्रांच्या माध्यमातून, भाषणांतून आणि गावोगावी पसरलेल्या अस्पृश्य वस्तीतील दीनदलितांना पोटाशी धरून वर्षानुवर्षे सांगत राहिले. कोणताही नेता जनतेच्या सर्व स्तरांत प्रेमाने, आपुलकीने वावरतो आणि सामन्यातील सामान्य होऊन त्यांच्यातील माणूसपणाला आत्मीयतेने हृदयाशी कवटाळतो, उदराशी धरतो, तेव्हा त्या जनसमूहाचे रुपांतर एकात्म समाजात होते. असा एकात्म समाज हा समता आणि बंधुतेच्या पायावरच उभा राहील, अशी त्याची धारणा होती. याच धारणेने वामनदादांनीही त्याची जीवननिष्ठा आणि विचारनिष्ठा सांभाळली. समस्त उपेक्षितांच्या जीवनाची प्रेरणा वामनदादांनी आपल्या कवितेतून अनेकदा व्यक्त केली. ’भीमवाणी’, ’ललकारी’, ’गडी तुम्ही भीमराणाचे’, ’भीमा तुझ्या मताचे’, ’भीमा तुझ्या जन्मामुळे’ आदी विविधांगी कवितांमधून वामनदादांनी भीमविचारांची प्रेरणा व्यक्त करत जागवली आहे. भीमनामक सूर्याने कालच्या काळ्याकुट्ट भूतकाळावर प्रकाशझोत टाकण्याचे महान कार्य केले, हे वामनदादा अतिशय प्रभावी आणि आशयसंपन्न भूमिकेतून ’भीमा तुझ्या जन्मामुळे’ या कवितेत व्यक्त होतात. त्या प्रखर जाणीवेने वामनदादा म्हणतात,
जखडबंद पायातील साखळदंड,
तटातट तुटले तू ठोकताच दंड...
झाले गुलाम मोकळे,
भीमा तुझ्या जन्मामुळे...
काल कवडीमोल जिणे वामनाचे होते, आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते...
बुद्धाकडे जनता वळे,
भीमा तुझ्या जन्मामुळे...
’वामन’ हा अखिल मानव जातीचा प्रतिनिधी आहे. तो उपेक्षित, नाकारलेल्या, पशुतुल्य मानल्या गेलेल्या समूहाचा प्रतिनिधी आहे. त्याच्या वाट्याला आलेली गुलामीचे हीन-दीन, लाचार जिणे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळे दूर भिरकावले गेले. अंधारकोशात गुरफटलेल्या अवघ्या शोषित, पीडित, दु:खित जीवांना, मानवी समूहांना मुक्त करणारा हा विचार वामनदादांनी अतिशय सोप्या भाषेत परंतु, वजनदार शब्दांत मांडून आपल्या कवनातील प्रचंड ताकद दाखवून दिली आहे. वामनदादा खर्या अर्थाने आंबेडकरी प्रेरणेचे एकनिष्ठ कवी होते. १९९३ साली वर्धा येथे झालेल्या अखिल भारतीय आबेडकरी साहित्य संमेलनामध्ये अध्यक्षीय भाषणातून त्यांनी आपली लेखन प्रेरणा व्यक्त करताना ते म्हणतात,
‘’मी अडाणी समाजाची बोलभाषा स्वीकारली व तीच माझ्या गीताची भाषा झाली.”
भीमवाणी पडली माझ्या कानी, तीच वाणी ठरली माझी गाणी...
आम्ही तुझे संतान भीमा,
आम्ही तुझे संतान...
तुझा वारसा पुढे न्यावया करू
जीवाचे दान...
असे आपले जीवितकार्य मानणार्यांमध्ये वामनदादा अग्रभागी होते. बाबासाहेबांचे विचार, बोल कानावर यावेत ते लोकांपर्यंत पोहोचते करावेत. मुक्तीच्या लढ्यासाठी नवजागरण घडवून आणावे. हे त्यावेळच्या चळवळीतील प्रत्येक लेखक-कवींचे प्रमुख ध्येय आणि कार्य होते. युगायुगांच्या काळोखानंतर त्यांना डॉ.बाबासाहेबाच्या रुपाने सूर्य गवसला होता. बाबासाहेबांनी आधुनिक भारताची विषम अशी समाजघडी विस्कटवून टाकली होती. बुद्धाच्या रुपाने, संविधानाच्या साक्षीने नवसमाज रचनेचा पाया मजबूत केला. अशा प्रकारची वामनदादांच्या लेखणीची प्रेरणा आणि धारणा होती. ते म्हणतात,
तुझी निष्ठा, तुझे जीवन,
तुझी श्रद्धा भीमावरची ।
नसावी नाटकी,
वामन खरे बलिदान मागावे ॥
पुणे शहरापासून जवळ असलेल्या देहू रोड येथे दि. २५ डिसेंबर, १९५४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या हस्ते भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. त्याच्या सभोवतीची जागा बुद्धविहारासाठी सुरक्षित ठेवण्यात आली होती. याप्रसंगी डॉ. बाबासाहेबांनी बौद्ध धर्मावर भाषणही केले होते. त्यांच्या महानिर्वाणानंतर काही कालावधीतच बाबासाहेबांचा स्तूप देहू रोडला उभारला जात होता. परंतु, अर्धा समाज तटस्थ होता. तेव्हा वामनदादा दु:खी-कष्टी होता. तेव्हा समाजाला आवाहन करताना ते लिहितात,
जेथे समाज सारा हा एकरूप आहे, तेथेच खरा माझ्या बाबाचा स्तूप आहे ।
वादात रंगते ना, रंगून भागते ना, नेतृत्व ते आम्हाला
तीर्थस्वरूप आहे ।
द्वेषाचा दर्प नाही, तो कालसर्प नाही, सत्कारणी कृतीचा जेथे हुरूप आहे ।
तनमनाने धनाने, जळतो धीमेपणाने, मानू तयास आम्ही तो भीमरुप आहे ।
नव्या समाजरचनेत भीमरायाचा सैनिक फसवला जाऊ नये. भीमसैनिक दुबळा नसावा, लाचार नसावा. तो बलदंड, स्वाभिमानी आणि समाजहितैषी असावा, असे वामनदादांना मनोमन वाटत होते. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर खरा नेता त्यांच्या दृष्टीस पडत नाही. त्यांचे मन व्याकूळ होते. आपल्या लेकरांना समजावणारी, बळ देणारी, ऊर्जास्रोत असणारी ’भीमाई’ आता नाही. भीमरायांची बरोबरी कुणीच करू शकत नाही. परंतु, अशा या माझ्या भीमरायाचा विचार चिरंतन आहे. ते लिहितात,
कालचे रिकामे, आताचे रिकामे,
जगतात आई तुझीयाच नामे
इथे गीत वामनाचे खरे तेच गाई,
तुझीच कमी आहे गं भीमाई
कुणाचेच काही इथे कष्ट नाही....
बाबासाहेबांच्या मृत्यूने बाबासाहेब नष्ट होत नाहीत, तर ते वेगवेगळ्या रुपांनी चिरंजीव झालेत. त्यांची सततची सोबत आपणांस असल्याचे वामनदादा कवितेतून पटवून देतात.नको म्हणून नाही, भीम आहे सर्व ठायी... आहे त्यांची कीर्ती, कीर्तीला मृत्यू नाही... हे खरेच आहे की, दुःखिताच्या लढ्यातून, प्रतिकाराच्या आंदोलनातून, ग्रंथांतून, लोकशाही प्रणालींतून, संसदेतून, राज्यघटनेतून, बुद्धतत्त्वामधून, ऐक्यातून, माणसाच्या सरणामधून भीम जीवंत आहेत.म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर आपल्या लाडक्या शाहिराबद्दल म्हणायचे, माझी दहा भाषणे आणि माझ्या शाहिराचं एक गाणे बरोबरीचे आहे. एवढा मोठा सन्मान आपल्या प्राणप्रिय नेत्याचा मिळाला, तर वामनदादांना आकाश ठेंगणे झाल्यासारखे वाटायचे. वामनदादा, तुम्ही कवितेतील तुफान होतात.
जळू परंतु धरती उजळू ।
प्रकाश इथे असाच उधळू ॥
सदा चांदणे सुखी नांदणे ।
हेच आम्हाला हवे ।
तुफानातील दिवे आम्ही ।
तुफानातील दिवे ।
असा विश्वात्मक विचार देत तुम्ही आयुष्याची मशाल करून अंधार जाळला. तुमची अतिशय समरसतेने आणि एकात्म भावाने लिहिलेली क्रांतिगीते पुढच्या पिढ्यांनाही प्रेरणा देत राहतील. महाराष्ट्रातल्या सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील लोकसंस्कृतीचे चालतेबोलते विद्यापीठ असलेल्या भीमशरण आणि बुद्धशरण वामनदादांना जन्मशताब्दीनिमित्त विनम्र अभिवादन!
डॉ. सुनील भंडगे
(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ लोकशाहीर अण्णा भाऊ साठे अध्यासन प्रमुख आहेत.)