‘एनडीपीएस’ कायद्यातून प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्यांची संतती वा मुस्लीम अल्पसंख्यकांना सवलत देण्याचे नमूद नाही. तसेच ड्रग्ज वापरणार्यावर कारवाई करणे कसे योग्य, ड्रग्ज वापरणारा गुन्हेगार कसा, असे प्रश्नही विचारले गेले. त्यातून ड्रग्ज वापरणारे मासूम व त्याची विक्री, वाहतूक करणारेच गुन्हेगार आहे, असे ठसवण्याचा उद्देश होता. पण, कायद्यानुसार दोघेही गुन्हेगारच आहेत.
चित्रपट अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली आणि साधारण २६ दिवसांनंतर त्याची तुरुंगातून सुटका झाली. पण त्याच्या अटकेपासून ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’, भाजप, केंद्र सरकारवर सुरू झालेला आरोपांचा सिलसिला अजूनही थांबलेला नाही. आर्यन खान मुस्लीम असल्यानेच त्याला लक्ष्य करण्यात आल्याचा दावा करण्यापासून ते तो प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्याचा मुलगा असल्यानेच अटक केल्याचे म्हटले गेले. त्यात तथाकथित मानवाधिकारवादी, उदारमतवाद्यांपासून गीतकार जावेद अख्तर यांचाही समावेश होतो. त्यांच्या बोलण्याचा अर्थ, मुस्लिमाने कोणताही गुन्हा केला तरी त्याला शिक्षा करू नये, कारण,तो अल्पसंख्य आहे, असा होतो. महाराष्ट्राचे अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी ‘एनसीबी’ अधिकारी समीर वानखेडेंपासून भाजपच्या विविध नेत्यांवर एकापाठोपाठ आरोप केले. त्यामागे मुस्लीम ‘उम्मा’च्या नात्यासह जावई समीर खानला ड्रग्ज प्रकरणात आठ महिन्यांपर्यंत गजाआड केल्याचा रागही होताच. त्यानंतर भाजपकडूनही नवाब मलिकांवर प्रत्यारोप करण्यात आले. एकूणच आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाने आरोप-प्रत्यारोपांचा डाव रंगला व राज्यासह देशभर त्याची चर्चाही झाली, वृत्तपत्रांना मथळे, स्तंभलेखकांना लिहिण्याची संधी, वृत्तवाहिन्यांना २४ तासांसाठी मसाला मिळाला. त्यातल्या सर्वांचाच जोर आर्यन खान २३ वर्षांचे कुक्कुले, निरागस बाळ असून त्याला ड्रग्ज प्रकरणात मुद्दाम अडकवल्याचे सांगत, ड्रग्ज वापरणारा गुन्हेगार कसा असे विचारत पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना शिव्याशाप देण्यावरच होता. इतकी वर्षे केंद्र सरकारविरोधात भुंकण्यासाठी कोणताही ठोस मुद्दा न सापडल्याने आर्यन खान ड्रग्स प्रकरणावरून आपली ती हौसही कित्येकांनी पूर्ण करून घेतली. अर्थात, आर्यन खानची बाजू घेतली गेली. कारण, तो शाहरुख खानचा मुलगा होता. त्यामुळेच त्याला ड्रग्जविषयक कायदेशीर कारवाईत अपवाद समजले जावे, त्याला सोडून द्यावे, असे या सर्वांचे म्हणणे होते. मात्र, या सर्व प्रकरणात कोणालाही ड्रग्जवर बोलण्याचे, लिहिण्याचे भान असल्याचे दिसले नाही. ड्रग्जचा विषय फक्त आर्यन खान वा नवाब मलिकांच्या जावयापुरता मर्यादित नाही, तर तो समाजासह देशासमोरचाही धोका आहे, हे समजून घेतले पाहिजे. पण, त्यापेक्षा सेलिब्रिटींच्या मागे धावण्यालाच प्राधान्य दिले गेले.
ड्रग्जमुळे ते सेवन करणार्याला उच्च रक्तदाब, नाकातून रक्त येणे, हिंसक भावना उचंबळून येणे, रक्तवाहिन्यांत अडथळा, यकृत, किडनी, फुप्फुसांचे आरोग्य बिघडणे, नैराश्य, आर्थरायटिस, एंग्माइटी आणि इतरही असंख्य शारीरिक, मानसिक व्याधी जडतात. शरीराचा आणि मनाचा र्हास झाल्याने ड्रग्जसेवन करणारी व्यक्ती निरुपयोगीच ठरते, त्याचे नुकसान त्या व्यक्तीला, कुटुंबाला आणि समाजाला भोगावे लागते. त्यापेक्षाही अधिक धोकादायक बाब म्हणजे, ड्रग्जमुळे देशाची अपरिमित हानी होते. ड्रग्जचा व्यापार बेकायदेशीर असल्याने त्यावर कोणाचेच नियंत्रण नसते. त्यातून लाखो-कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते आणि त्यात ओतला जाणारा पैसा अवैध मार्गानेच कमावलेला असतो. तसेच ड्रग्जमाफिया कोणी सर्वसामान्य व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक नसतात, तर त्यांचे लागेबांधे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर, हवाला नेटवर्क, दहशतवादी संघटना आणि भारताला शत्रू मानणारे देश, अशा सर्वांशीच असतात. त्यामुळे त्यातला पैसा देशविघातक शक्तींच्या हातात जात असतो व त्याचा वापर पुन्हा भारताविरोधातच वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. म्हणूनच ड्रग्जकडे फक्त आर्यन खान प्रकरणापुरते न पाहता, त्याचा सर्वांनीच विरोध केला पाहिजे. पण तसे होताना दिसत नाही, उलट राजकीय नेते आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना कितीतरी बेजबाबदारांनी भाबडेपणाने शाहरुख खानच्या घराबाहेर पाठिंब्याचे फलक झळकावण्यापासून ते आर्यन खानची सुटका झाल्यानंतर पुष्पवृष्टीपर्यंतचा फालतु उद्योगही केला. तेही साहजिकच, कारण या एकूणच प्रकरणात ड्रग्जचे भयाण वास्तव कोणी सांगितलेच नाही. जसे नेते-अभिनेते, तशी जनता किंवा जशी जनता, तसे नेते-अभिनेते, असा हा प्रकार होता. पण, ड्रग्ज सेवन, विक्री वा जवळ बाळगणे फक्त भारतातच गुन्हा नाही, तर जगातील बहुतांश देशात त्याबाबत कठोर कायदेही आहेत. म्हणजेच, त्या सर्वांनाच ड्रग्जमुळे होणारे नुकसान, तोटा, हानी, धोक्याची माहिती आहे व त्याला रोखण्यासाठी त्यांनी उपाय योजलेले आहेत.
अमेरिका, युनायटेड किंग्डम, फ्रान्स, रशिया, तुर्की ऑस्ट्रेलियासारख्या देशांत ड्रग्जप्रकरणात तुरुंगवास किंवा भरीव आर्थिक दंडाची तरतूद आहे. तर मलेशिया, व्हिएतनाम, थायलंड, इंडोनेशिया, सिंगापूर, फिलिपिन्स आदी विविध देशांत ड्रग्जप्रकरणी मृत्युदंडापर्यंतची शिक्षा दिली जाते. तसेच इतरही अनेक देशांत ड्रग्ज प्रकरणात कठोरातील कठोर शिक्षा देण्याच्या तरतुदी आहेत. म्हणजेच जगातील विकसित देशांपासून विकसनशील देशांपर्यंत प्रत्येकानेच ड्रग्जप्रकरणात अडकलेल्यांना गुन्हेगार मानल्याचे दिसून येते. भारतातील परिस्थितीही याहून भिन्न नाही. भारतातही १९८५ च्या ‘एनडीपीएस’ कायद्यांतर्गतच आर्यन खानवर कारवाई करण्यात आली आणि यापुढेही न्यायालयीन सुनावणीदरम्यान त्याच्यावरील गुन्हा सिद्ध झाला, तर पुढील कारवाई करण्यात येईल. देशहिताच्या आधारावरच सदरचा कायदा करण्यात आला असून त्यातून विशिष्ट व्यक्तींना वा प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्यांच्या संततीला वा मुस्लीम अल्पसंख्यकांना सवलत देण्याचे कुठेही नमूद केलेले नाही. तसेच ड्रग्ज वापरणार्यावर कारवाई करणे कसे योग्य, ड्रग्ज वापरणारा गुन्हेगार कसा, असे प्रश्नही विचारले गेले. त्यातून ड्रग्ज वापरणारे मासूम असून त्याची विक्री, वाहतूक करणारेच गुन्हेगार आहे, असे ठसवण्याचा उद्देश होता. पण, कायद्यानुसार ते दोन्हीही घटक गुन्हेगारच आहेत. सोबतच ड्रग्जचा संबंध देशहिताशी असल्याने त्याच्याशी तडजोड करणे कोणालाही शक्य नाही. देशहिताचा बळी देऊन चित्रपट अभिनेत्याच्या मुलाला सवलत देता येणार नाही. कारण, देश टिकला तरच देश म्हणजेच नागरिक टिकेल.