गुरुग्राममध्ये सार्वजनिक नमाजाविरोधात हिंदूंचे आंदोलन!

09 Nov 2021 12:13:04

masjid_1  H x W



खरे म्हणजे विविध ठिकाणच्या प्रशासन यंत्रणेने प्रथमपासूनच कठोर भूमिका घेतली असती, तर सार्वजनिक ठिकाणी नमाज पढण्याचे प्रकार घडले नसते किंवा वाढले नसते! पण मतपेढीच्या राजकारणातून अल्पसंख्याक समाजास खूश करण्यासाठी असे निर्णय घेतले गेले. त्यातून सार्वजनिक ठिकाणी नमाज पढण्याचा आपल्याला अधिकारच आहे, असे त्या समाजास वाटू लागले.



हरियाणातील गुरुग्राम प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी नमाज पढण्यासाठी ज्या ३७ जागा निश्चित केल्या होत्या, त्या जागांना होत असलेला वाढता विरोध लक्षात घेऊन त्या प्रशासनाने सात जागांची परवानगी रद्द केली. स्थानिक जनतेने घेतलेल्या आक्षेपामुळे ही परवानगी रद्द करीत असल्याचे स्पष्टीकरण प्रशासनाकडून देण्यात आले. गुरुग्राममधील सार्वजनिक स्थानी नमाज पढल्या जाणार्‍या जागांना हिंदू समाजाकडून घेतल्या जात असलेल्या आक्षेपांमुळे वाद निर्माण झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी नमाज पढण्याच्या घटना देशाच्या विविध भागांमध्ये घडत आहेत. अगदी मुंबईसारख्या महानगरांपासून अन्य शहरांमध्ये रस्त्यांवर नमाज पढला जात असल्याचे प्रकार काही नवीन नाहीत! पण हरियाणातील हिंदू समाजाने या प्रकारास आक्षेप घेतल्याने प्रशासनानेही या संदर्भात कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे.गेल्या महिन्यात गुरुग्रामच्या ‘सेक्टर ४७ ’ मध्ये शुक्रवारचा नमाज सार्वजनिक स्थानी पढण्यास स्थानिक जनतेने आक्षेप घेतला होता. गुरुग्राममधील हिंदू समाजाकडून सार्वजनिक स्थानी नमाज पढण्यास २०१८ पासूनच आक्षेप घेण्यात येत होता. आता हिंदू समाजाच्या या मागणीस समाजाकडून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून प्रशासनानेही कारवाई करण्यास प्रारंभ केला आहे. ‘सेक्टर १२ ’ मध्येही सार्वजनिक ठिकाणी शुक्रवारी नमाज पढला जात होता. त्यास हिंदू संघटनांनी आक्षेप घेतला. त्या ठिकाणी हिंदू समाजाकडून ‘गोवर्धन पूजे’चे आयोजन करण्यात आले. हिंदू समाजाच्या विरोधामुळे गुरुग्राममधील अन्य काही सार्वजनिक ठिकाणी नमाज पढण्याचे मुस्लीम समाजाने बंद केले. खरे म्हणजे विविध ठिकाणच्या प्रशासन यंत्रणेने प्रथमपासूनच कठोर भूमिका घेतली असती, तर सार्वजनिक ठिकाणी नमाज पढण्याचे प्रकार घडले नसते किंवा वाढले नसते! पण मतपेढीच्या राजकारणातून अल्पसंख्याक समाजास खूश करण्यासाठी असे निर्णय घेतले गेले. त्यातून सार्वजनिक ठिकाणी नमाज पढण्याचा आपल्याला अधिकारच आहे, असे त्या समाजास वाटू लागले. पण हिंदू समाजाकडून घेतला जात असलेला आक्षेप लक्षात घेऊन आणि हवा बदलत असल्याचे पाहून मुस्लीम समाजाने नमते घेऊन आपल्या भूमिकेत बदल केला!






सार्वजनिक स्थानी नमाज पढण्याच्या घटनांसंदर्भात हरियाणाचे गृहमंत्री अनिल वीज यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली ती लक्षात घेण्यासारखी आहे. रस्त्यांवर किंवा सार्वजनिक स्थानी स्थानिक प्रशासनाची अनुमती न घेता कसलेही धार्मिक मेळावे वा कार्यक्रम यांचे आयोजन करता नये. कोणतेही धार्मिक उपक्रम धार्मिक स्थळांच्या आवारातच संपन्न व्हायला हवेत. प्रत्येकाने आपले धार्मिक उपक्रम आपल्या धार्मिक स्थळी योजिले पाहिजेत.हरियाणाच्या गुरुग्राममध्ये नमाज पढण्यावरून जो वाद निर्माण झाला आहे त्याचे निमित्त करून मोदी सरकारच्या विरोधात असलेल्या माध्यमांनी हा विषय आंतरराष्ट्रीय करण्याचा प्रयत्नही केला आहे. मोदी सरकारच्या भूमिकेमुळे शेजारच्या देशामध्ये कशा प्रतिक्रिया उमटत आहेत याची विविध उदाहरणे देत ‘न्यू यॅार्क टाईम्स’च्या लेखात मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश आपली पत गमावत चालला आहे, असे म्हटले आहे. त्या लेखात गुरुग्राम ‘सेक्टर १२’ मध्ये गेल्या शुक्रवारी झालेल्या ‘गोवर्धन पूजे’चे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले आहे. अशा घटनांची दखल घेऊन, मोदी यांच्या राजवटीत अल्पसंख्याक समाजासमवेत भेदभाव केला जात आहे, हे आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चुकीच्या गोष्टी दुरुस्त करायच्या म्हटल्या की, त्यास विरोध होणे स्वाभाविकच आहे. तो विरोध लक्षात घेऊन अधिक खंबीरपणे हिंदू समाजाने आपले आंदोलन पुढे न्यायला हवे. हरियाणातील हिंदू संघटना तेच करीत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसत आहे. हरियाणा सरकारनेही कठोर भूमिका घेऊन सार्वजनिक स्थानी नमाज पढण्याचे प्रकार पूर्णपणे बंद केल्यास अशी कृती करणारे ते देशातील पहिले राज्य ठरेल.





 
आपल्या देशामध्ये रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी शुक्रवारचा नमाज पढण्याचे प्रकार नित्यनियमाने घडत असतात. यामुळे वाहतुकीची कोंडी होते, असंख्य लोकांची गैरसोय होते, याकडे ना प्रशासनाचे लक्ष असते ना असा नमाज आयोजित करणार्‍यांचे! आपल्या देशामध्ये मुस्लीम समाजाच्या प्रार्थनास्थळांवर लावण्यात आलेले कर्णे हेही अनधिकृतपणे लावलेले! या कर्ण्यांमुळे आजूबाजूच्या परिसरात होणारे ध्वनिप्रदूषण वेगळेच! पण अल्पसंख्याक समाजाचे तुष्टीकरण करणार्‍या राजकीय पक्षांना प्रार्थनास्थळांवरील हे कर्णे काढून टाकण्याचे धाडस होत नाही. शासकीय यंत्रणाच निष्क्रिय असेल तर काळ सोकवणारच ना!मागील लेखामध्ये जाहिरातींमधून केवळ हिंदू समाजास लक्ष्य करण्याच्या काही उदाहरणांची माहिती दिली होती. या नमाज प्रकरणाच्या निमित्ताने आमिर खान या नटाकडून ‘सीएट’ कंपनीसाठी जी जाहिरात केली गेली त्यास भाजपचे खासदार अनंतकुमार हेगडे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. सदर जाहिरातीमध्ये आमिर खान हा लोकांनी रस्त्यांवर फटाके न उडविण्याचे आवाहन करीत असल्याचे दाखविण्यात आले आहे. अशा जाहिराती करून आपण हिंदू समाजात असंतोष निर्माण करीत आहात आणि हिंदू समाजाच्या भावना दुखावत आहात, असे पत्र खा. हेगडे यांनी ‘सीएट’ कंपनीचे कार्यकारी संचालक आणि प्रमुख कार्यकारी संचालक अनंत वर्धन गोएंका यांना लिहिले आहे.






अनंतकुमार हेगडे यांनी गोएंका यांना पाठविलेल्या पत्रात आमिर खान याने केलेल्या जाहिरातीचा संदर्भ देऊन त्याद्वारे जनतेला चांगला संदेश दिला असल्याचे म्हटले आहे. त्याच पत्रात, सार्वजनिक मुद्द्यांसंदर्भातील तुमची कळकळ कौतुकास्पद आहे, असे म्हटले आहे. पण त्याचवेळी शुक्रवारी रस्त्यांवर पढले जाणारे नमाज आणि आपल्या देशात मशिदींवर लावण्यात आलेल्या लाऊड स्पीकरवरून दररोज जे ध्वनिप्रदूषण होत असते, असे सार्वजनिक महत्त्वाचे मुद्देही आपण विचारात घ्यावेत, असे त्यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे. भविष्यकाळात आपली संस्था हिंदू समाजाच्या भावनांचा आदर राखील आणि कोणत्याही कृतीद्वारे हिंदू समाजाच्या भावना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे दुखविणार नाही, अशी आशा अनंतकुमार हेगडे यांनी आपल्या पत्रातून व्यक्त केली आहे. अनंतकुमार हेगडे यांनी आमिर खानच्या जाहिरातीस घेतलेला आक्षेप लक्षात घेऊन भविष्यात असे प्रकार कोणी करणार नाही अशी अपेक्षा आहे. तसेच कोणीही यावे आणि हिंदू समाजास टपली मारून निघून जावे, असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा खा. अनंतकुमार हेगडे यांनी आपल्या पत्राद्वारे दिला आहे. हिंदू समाजास या पुढे गृहित धरून चालणार नाही, हेच या घटनांवरून दिसून आले आहे.










Powered By Sangraha 9.0