वैविध्यपूर्ण विषयांनी नटलेले ‘प्रतिबिंब’

06 Nov 2021 20:31:50

Pratibimb 2.jpg_1 &n


गेल्या दीड वर्षांपासून जगासह भारतावर कोरोनाची आपत्ती कोसळलेली आहे. कोरोनाच्या पहिल्या वर्षात तर सर्व काही बंद वा निर्बंधयुक्त असल्याने अनेक गतिविधी थांबल्या होत्या. यंदा मात्र लसीकरण सुरू झाल्याने कोरोनाचे सावट जवळपास नाहीसे झाल्यासारखे आहे. पण, कोरोनाच्या संकटाला संधी मानून आपल्या व्यवसायात वा नव्या वाटा शोधत गेल्या दीड वर्षांत अनेकांना नवनवे प्रयोग केले.





प्रारंभी कोरोना काळात फक्त जीवनावश्यक गतिविधींना परवानगी असल्याने शेती, शेतमाल पुरवठा या क्षेत्रात नव्या कल्पना प्रत्यक्ष अंमलात आणता आल्या. शेतकर्‍यांनी आपल्या व्यवसायात नव्याचा स्वीकार केलाच, पण तरुणांनीही तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती, शेतकरी व ग्राहक सर्वांचा फायदा होईल, यासाठी नावीन्याची कास धरली. ‘अंतरीचे प्रतिबिंब’ या दिवाळी अंकात कोरोना काळात कृषी क्षेत्रात झालेल्या याच नव्याची उदाहरणांसह स्फूर्तिदायक, प्रेरणादायक माहिती देण्यात आली आहे, तसेच पावसाच्या लहरीपणावर अवलंबून राहण्यापेक्षा हवामानाशी कसे जुळवून घेता येईल, हे सांगणाराही लेख या दिवाळी अंकात आहे.






कोरोना काळात बहुतांश माणसे घरीच होती, घरी बसूनच काम करत होती. त्यामुळे वेळही भरपूर उपलब्ध होता. त्याचा सदुपयोग कित्येकांनी शेअर मार्केट म्हणजे काय हो, असे विचारत त्याचा अभ्यास करण्यासाठी, त्यात गुंतवणूक कशी करावी ते शिकण्यासाठी केला. म्हणूनच कोरोना काळात ‘शेअर मार्केट’मध्ये गुंतवणूक करणार्‍यांची संख्या ५० हजारांनी वाढली. त्याच अनुषंगाने ‘शेअर मार्केट’विषयीचा लेखही ‘अंतरीचे प्रतिबिंब’ दिवाळी अंकात आहे.आशियाई सिंह, गीरचे सिंहांसाठीचे अभयारण्य आणि सिंह फक्त गीरचे अभयारण्यच नव्हे, तर भारतात अन्यत्रही वसावा, जगावा म्हणून पावले उचलली पाहिजेत, हे सांगणारा महत्त्वाचा लेख या अंकात आहे. श्रीदत्तगुरूंचे पवित्र स्थान म्हणून ओळखल्या जाणार्‍या गुजरातमधील गिरनार पर्वताची परिक्रमा करण्याची अनेकांची इच्छा असते. दरवर्षी कितीतरी भाविक-भक्त आणि हौशी पर्यटक गिरनारच्या दहा हजारांपेक्षा पायर्‍या चढून श्रीदत्तगुरूंपुढे नतमस्तक होतात. त्याच गिरनार पर्वताच्या परिक्रमेचा स्वानुभव सांगणारा आणि वाचणार्‍याला प्रत्यक्ष अनुभूती देणारा लेख ‘अंतरीचे प्रतिबिंब’मध्ये आहे.





यंदा जपानमध्ये ‘ऑलिम्पिक २०२०’ पार पडले आणि त्यात भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करत सुवर्ण, रौप्य, कांस्यपदके जिंकली. त्यामुळे देशात प्रसिद्ध खेळांव्यतिरिक्तच्या क्रीडाक्षेत्राबाबत सकारात्मक वातावरण तयार झाले. या ‘ऑलिम्पिक’मधील भारताचे यश देशातील भावी खेळाडूंसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. त्याबद्दलचे विविध लेख ‘अंतरीचे प्रतिबिंब’ दिवाळी अंकात आहेत.बाबाराव सावरकर, तात्याराव सावरकर आणि बाळ सावरकर या सावरकर बंधूंची क्रांतिगाथा सांगणारा लेख या दिवाळी अंकाचे वैशिष्ट्य. कारण, स्वातंत्र्यवीर सावरकरांची माहिती बर्‍यापैकी अनेकांना असते, पण गणेश उपाख्य बाबाराव सावरकर आणि डॉ. नारायण उपाख्य बाळ सावरकर यांची माहिती असणारे कमीच. त्या पार्श्वभूमीवर ‘अंतरीचे प्रतिबिंब’मधील लेख महत्त्वाचा. राजकीय विभागात पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्याय कोणाचा, याविषयी चर्चा करणारा लेखही या अंकात आहे. तसेच अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर त्रास झालेल्यांनी त्यांनाच पुस्तकांचा विषय केला. कारण, ट्रम्प अध्यक्ष होतील, याचा वेध घेण्याची त्यांच्या राजकीय, सामाजिक, बौद्धिक, वैचारिक क्षेत्रातील विरोधकांची क्षमता नव्हती. त्यामुळे ते कसे चुकीचे, वाईट, खलनायक आहेत, हे सांगणारी अनेक पुस्तके अमेरिकेत लिहिली गेली. त्याचीच माहिती देणारा लेख ‘अंतरीचे प्रतिबिंब’मध्ये आहे. सोबतच भारत स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहे, त्याविषयी विशेष संपादकीय लेखही अंकात आहे. तसेच इतरही अनेक वैविध्यपूर्ण विषयांवरील लेख, कथा या अंकात आहेत.





दिवाळी अंकाचे नाव ः अंतरीचे प्रतिबिंब
संपादक ः प्रज्ञा जांभेकर
पृष्ठसंख्या ः १८६
मूल्य ः रु. ३०० /-















Powered By Sangraha 9.0