काही आठवड्यांपूर्वी भारतीय आणि चिनी लष्कराचे गस्ती पथक अरुणाचल प्रदेशातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणजेच ‘एलएसी’वर कित्येक तास एकमेकांविरोधात आमने-सामने उभे ठाकले होते. दोन्ही देशांतील वादाचा मुद्दा, १७ हजार फूट उंचावरील शिखरावर नियंत्रण मिळवण्याचा आहे. कारण, या शिखरावर जो देश नियंत्रण प्राप्त करेल, त्या देशाच्या लष्कराला सीमेच्या दोन्ही बाजूला ‘कमांडिंग व्ह्यू’ मिळेल. मात्र, भारतीय लष्कराने अगदी सुरुवातीपासूनच या शिखरावर आपले नियंत्रण प्रस्थापित केले आहे.
दरम्यान, सीमेच्या दोन्ही बाजूला ‘कमांडिंग व्ह्यू’चा अर्थ, भारतीय लष्कर या शिखरावरून चिनी लष्कराचे अतिक्रमण उधळून लावेलच. पण, ते काम वेळेआधीच फत्ते करू शकेल. उंचावरील ठिकाणांवर नियंत्रणाचे सामरिक महत्त्व भारताला १९८४ सालच्या सियाचिन युद्धात आणि १९९९ च्या कारगील युद्धात समजले होते. तर एका बड्या लष्करी अधिकार्याच्या मतानुसार, हजारो फूट उंचावरील ठिकाणांवर बसलेल्या शत्रूने खाली एखादा दगड जरी फेकला, तरी तो बंदुकीच्या गोळीप्रमाणेच काम करेल.