लग्नसोहळा सुरू असताना ‘मॅरेज हॉल’ पेटला

30 Nov 2021 12:29:34

Thane_1  H x W:
ठाणे : ठाण्यात सोमवारी आगीच्या तीन घटना घडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. भिवंडी शहरातील खंडूपाडा परिसरात असलेल्या ‘अन्सारी मॅरेज हॉल’मध्ये लग्न सोहळा सुरू असतानाच भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत लग्न मंडपासह मंडपालगत असलेली २० ते २५ दुचाकी वाहने जळून खाक झाली. लग्नात आणलेल्या फटाक्यामुळे आगीची ठिणगी पडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पाचपाखाडी येथील ‘बेंगाल कॅफे’च्या स्वयंपाक विभागात आग लागली, तर वागळे इस्टेट जयभवानी नगर येथील ‘मेयर ऑर्गनिक कंपनी’तही आगीची घटना घडली.
 
भिवंडी शहरातील खंडूपाडा परिसरात असलेल्या ‘अन्सारी मॅरेज हॉल’मध्ये रविवारी रात्री एक लग्नसमारंभ सुरु होता. यादरम्यान वाहन ‘पार्किंग’च्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत होती. आतषबाजी सुरु असतानाच फटाक्यांची ठिणगी उडून लग्न मंडपाला आग लागली. त्यानंतर हळूहळू ही आग पसरत गेली. या आगीमुळे मंडपालगत असलेल्या पार्किंग ठिकाणी असलेल्या सुमारे 20 ते 25 दुचाकी गाड्या जळून गेल्या. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. दरम्यान, भिवंडीत मोकळ्या जागेत अनेक विनापरवाना ‘मॅरेज हॉल’ थाटल्याचे समोर आले आहे.
Powered By Sangraha 9.0