काशिविश्वनाथ धाम प्रकल्पाचे १३ डिसेंबर रोजी उद्घाटन!

29 Nov 2021 22:05:05

KashiVishwanath_1 &n
 
 
महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन काशीनगरीत तशी व्यवस्था या धामामध्ये करण्यात आली आहे. आता दि. १३ डिसेंबर रोजी पंतप्रधान या प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. त्यानिमित्ताने भारतातील सर्व पवित्र नद्यांच्या जलाचा अभिषेक काशी विश्वेश्वरावर करण्यात येणार आहे. तसेच या प्रसंगी बारा ज्योतिर्लिंगाचे पुरोहितही उपस्थित राहणार आहेत.
अयोध्येतील भव्य राम मंदिराचे निर्माणकार्य वेगाने सुरू असतानाच हिंदू समाजास अत्यंत पवित्र असणाऱ्या काशीनगरीत आकारास येत असलेल्या काशिविश्वनाथ धाम प्रकल्पाचे कार्य अत्यंत गतीने पूर्णत्वास नेले जात आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या दि. १३ डिसेंबर रोजी करणार असल्याने तत्पूर्वी काशिविश्वनाथ धाम प्रकल्प पूर्ण केला जाणार आहे. काशिविश्वनाथ मंदिर आणि त्या सभोवतीचा परिसर भव्य रूपात निर्माण करण्याचे कार्य २०१८ पासून सुरु आहे. काशिविश्वेश्वराचे दर्शन घेण्यासाठी येणाऱ्या भाविकांना सर्व सुविधा सहजपणे उपलब्ध होतील अशा सर्व सोयी या काशिविश्वनाथ धाम प्रकल्पात करण्यात आल्या आहेत. काशिविश्वनाथ मंदिरापासून गंगा नदीपर्यंतच्या ललिता घाटापर्यंत एक भव्य मार्ग तयार करण्यात आला आहे. काशिविश्वनाथ मंदिर परिसरातून थेट गंगामातेचे दर्शन होईल अशाप्रकारे हा परिसर विकसित करण्यात आला आहे. काशिविश्वनाथ धाम प्रकल्प ४०० कोटींचा असून त्याद्वारे काशिविश्वनाथ मंदिरापासून गंगेवरील ललिता घाटापर्यंतच्या भागाचा या प्रकल्पात समावेश करण्यात आला आहे. काशिविश्वनाथ मंदिर परिसरातील ऐतिहासिक वास्तूंचे जतन करणे, मंदिर परिसरामध्ये भाविकांना नवीन सोयीसुविधा उपलब्ध करुन देणे, मंदिर परिसरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन त्यांना काशी विश्वनाथाचे दर्शन सहजपणे होईल अशी व्यवस्था करणे, यात्रेकरूंच्या सोयीसाठी यात्री सुविधा केंद्रांची व्यवस्था, विश्रामगृहे, स्वच्छतागृहे यांची सोय उपलब्ध करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या विश्वनाथ धाम प्रकल्पातून गंगा नदीचे थेट दर्शन होईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
 
काशिविश्वनाथ मंदिरालगत उभारण्यात आलेल्या भव्य मंदिर चौकात यात्रेकरूंसाठी उपाहारगृहे, आध्यात्मिक पुस्तकांची दुकाने उभारण्यात येणार आहेत. तसेच मुमुक्षु भवन, वैदिक केंद्र, भोगशाला, दोन वस्तुसंग्रहालये आदींची उभारणी करण्यात येणार आहे. ललिता घाटापासून विश्वनाथ मंदिरापर्यंतचा रस्ता खूप रुंद करण्यात आल्याने भाविकांना गर्दीचा त्रास होणार नाही. काशिविश्वनाथ धाम परिसराची उभारणी करताना प्रकल्प परिसरात अनेक लहानमोठी मंदिरे आढळून आली. त्या मंदिरांची उभारणीही त्याच परिसरामध्ये करण्यात आली आहे. हिंदू समाजास पवित्र असलेल्या काशीनगरीचे रूप काशी विश्वनाथ धाममुळे पालटणार आहे. भाविकांना बाबा भोलेनाथाचे दर्शन सुलभपणे होण्याची व्यवस्था या प्रकल्पाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. काशिविश्वनाथ मंदिर परिसर भव्यदिव्य असावा, हे लक्षात घेऊन विश्वनाथ धामाची उभारणी करण्यात आली आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले होते. आता या प्रकल्पाचे उद्घाटनही त्यांच्याच हस्ते होणार आहे. वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा लोकसभा मतदार संघ आहे. त्यांच्या मतदार संघात ‘काशिविश्वनाथ धाम’ प्रकल्प साकारत आहे. या प्रकल्पामुळे हिंदू भाविकांना अनेक सोयी प्राप्त होणार आहेत. बाबा भोलेनाथाचे दर्शन घेणे, बाबा भोलेनाथास जलाभिषेक करणे, भाविकांना सुकर होणार आहे. महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन काशीनगरीत तशी व्यवस्था या धामामध्ये करण्यात आली आहे. आता दि. १३ डिसेंबर रोजी पंतप्रधान या प्रकल्पाचे उद्घाटन करणार आहेत. त्यानिमित्ताने भारतातील सर्व पवित्र नद्यांच्या जलाचा अभिषेक काशिविश्वेश्वरावर करण्यात येणार आहे. तसेच या प्रसंगी बारा ज्योतिर्लिंगाचे पुरोहितही उपस्थित राहणार आहेत. काशिविश्वनाथ मंदिर आक्रमकांच्या खाणाखुणांपासून पूर्णपणे मुक्त होणार नसले तरी समस्त हिंदू समाजास या काशी विश्वनाथ धाम प्रकल्पामुळे नक्कीच अभिमान वाटेल.
 

शशी थरूर यांचे आक्षेपार्ह विधान!

 
तिरुवनंतपुरमचे काँग्रेस खासदार शशी थरूर नेहमीच वादात सापडत असतात. आताही त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे आणि त्यासमवेत व्हायरल केलेल्या छायाचित्रांमुळे ते टीकेचे धनी झाले आहेत. महिलांसंदर्भात काय बोलावे आणि काय नको याचे भान न राहिलेल्या थरूर यांच्या त्या विधानाचा सर्व थरांतून निषेध करण्यात येत आहे. सहा महिला खासदारांसमवेत शशी थरूर यांनी काढलेले सेल्फी छायाचित्र ट्विटरवरून समाजमाध्यमांवर प्रदर्शित होताच त्यावर टीकेची एकच झोड उठली. थरूर यांनी ते छायाचित्र ‘व्हायरल’ करताना त्यावर जे भाष्य केले होते ते महिलांचा अवमान करणारे असल्याची टीका त्यांच्यावर करण्यात आली. त्या छायाचित्रासमवेत थरूर यांनी लोकसभा ही कार्य करण्यासाठी ‘आकर्षक जागा’ असल्याचे विधान केले. हे विधान महिला वर्गाचा अवमान करणारे आहे याचे भान शशी थरूर यांना राहिले नाही. तसेच त्यांच्यासमवेत ‘सेल्फी’ काढणाऱ्या सहा महिला खासदारांनाही त्यात काही गैर वाटले नाही हे त्याहूनही विशेष! शशी थरूर यांच्यासमवेत काढलेल्या त्या छायाचित्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, पतियाळाच्या खासदार प्रणित कौर, दक्षिण चेन्नईच्या खासदार तामिझची थंगपांडियन, जादवपूरच्या खासदार मिमी चक्रवर्ती, बशीरहाटच्या खासदार नुसरत जहाँ आणि करुरच्या खासदार, एस. ज्योतिमणी यांचा समावेश होता. ‘माझ्या सहयोगी खासदारांसमवेत काढलेले छायाचित्र. कोण म्हणतो लोकसभा ही कार्य करण्यासाठी ‘आकर्षक जागा’ नाही?’ असे थरूर यांनी भाष्य केले. त्यावर समाजमाध्यमातून तीव्र प्रतिक्रिया उमटली. थरूर यांचे विधान समस्त महिला वर्गाचा अपमान करणारे, त्यांच्याबद्दल अनादर दर्शविणारे असल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या. थरूर यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्याचे लक्षात येताच आपल्या वक्तव्याबद्दल थरूर यांनी माफी मागितली. तसेच आपण जे भाष्य केले होते ते विनोदाच्या अंगाने केले होते, असे स्पष्टीकरण त्यांनी केले. त्या महिला खासदारांच्या पुढाकारामुळे ते छायाचित्र काढण्यात आले आणि त्यांनी आग्रह धरल्याने विनोदाच्या अंगाने त्यावर भाष्य केले, असे थरूर यांनी म्हटले. काँग्रेसचे खासदार थरूर अधूनमधून आपल्या वक्तव्याने वादाच्या भोवऱ्यात सापडतात. त्यांनी नुकताच काढलेला ‘सेल्फी’ आणि त्यावर केलेले भाष्य यावरून ते समाजमाध्यमांवर टीकेचे धनी झाले आहेत!
Powered By Sangraha 9.0