रशिया ते मुंबई व्हाया हिमालय; बुटेड गरुडचा ५ हजार किमीचा प्रवास

24 Nov 2021 19:33:57
egale _1  H x W



मुंबई (अक्षय मांडवकर) -
रशियावरुन साधारण ५ हजार किमीपेक्षा अधिकचे अंतर कापून मुंबईमध्ये पाहुणा पक्षी दाखल झाला आहे. बुटेड गरुड (Booted Eagle) प्रजातीमधील हा पक्षी आपल्या हिवाळी स्थलांतराच्या निमित्ताने सध्या मुंबईत पाहुणाचारासाठी थांबला आहे. रशियामध्ये संकटात सापडलेल्या बुटेड गरुड (Booted Eagle) प्रजातीचे स्थलांतर जाणून घेण्यासाठी सॅटेलाईट ट्रान्समीटर लावलेला हा पहिलाच बुटेड गरुड आहे.

हिवाळ्याची चाहूल सुरू होताच मुंबईत देश-विदेशातून स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनास सुरुवात झाली आहे. बुटेड गरुड (Booted Eagle) ही अशीच एक स्थलांतरित पक्षी प्रजाती आहे. ती सायबेरियात घरटी बांधते आणि हिवाळ्यासाठी भारतात स्थलांतर करते. रशियामध्ये अल्ताई प्रजासत्ताकच्या आग्नेय भागात चुया स्टेपमध्ये संशोधकांनी ३० जुलै, २०२१ रोजी एका मादी बुटेड गरुडाच्या (Booted Eagle) पाठीला सॅटेलाईट ट्रान्समीटर लावले होते. तसेच तिच्या पायात CB24 या सांकेतिक क्रमाकांची रिंग देखील लावण्यात आली. त्यानंतर या पक्ष्याने त्याठिकाणाहून उड्डाण केले. त्यानंतर उपग्रहाच्या माध्यमातून मिळणाऱ्या संकेतांच्या आधारे या मादी गरुडाच्या (Booted Eagle) स्थलांतर मार्गाचा आढावा संशोधकांकडून घेण्यात येत होता. अशावेळी कारोकोरम आणि हिमालय पर्वतरांग पार करुन ही मादी गरुड २१ नोव्हेंबर रोजी मुंबईत दाखल झाल्याची माहिती या पक्ष्याच्या स्थलांतराचा अभ्यास करणारे संशोधक इगोर कर्याकिन यांनी दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. रशियापासून मुंबईपर्यंत स्थलांतर करण्यासाठी तिने जवळपास ५,१९६ किमी अंतर कापल्याचे त्यांनी सांगितले.

२१ नोव्हेंबरला मुंबईत दाखल झाल्यानंतर हा मादी बुटेड गरुड (Booted Eagle) पक्षी नवी मुंबईतील भेंडखळे आणि पांजे येथील पाणथळ क्षेत्रात विसाव्याला थांबला होती. दरम्यानच्या काळात या मादीने कर्नाळा पक्षी अभयारण्याला देखील भेट दिली. त्यानंतर तिने थेट उड्डाण करुन चेंबूर येथील भाभा अणुसंशोधन केंद्र गाठले. तिथून पश्चिम मुंबईच्या दिशेने उड्डाण करुन अंधेरीतील लोखंडवाला वसाहतीनजीक असलेल्या पाणथळ क्षेत्रात ती दाखल झाली. तिथून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, ठाणे घोडबंदर रोड करत या मादी बुटेड गरुड पक्ष्याचे (Booted Eagle) शेवटचे उपग्रह स्थान विहार तलावानजीक असलेल्या डोंगरावर आढळले आहे. कर्याकिन यांच्या मते, ही मादी पक्षी पश्चिम घाटामध्ये स्थलांतर करण्याची शक्यता आहे. मुंबईत दाखल झालेल्या या मादी पक्ष्याचे छायाचित्र काढण्याचे आवाहन कर्याकिन यांनी पक्षीअभ्यासक आणि पक्षीनिरीक्षकांना केले आहे.


स्थलांतराचा अभ्यास महत्त्वाचा
रशियामध्ये हे बुटेड गरुड पक्षी (Booted Eagle) संकटात सापडले आहेत. सायबेरियामध्ये ते दुर्मिळ असून अलिकडच्या वर्षांत त्याची संख्या कृमगतीने वाढत आहे. त्यामुळे या पक्ष्यांचा स्थलांतराचा अभ्यास करुन त्यांचा स्थलांतर मार्ग जाणून घेण्यासाठी संशोधकांनी प्रथमच गुडेट गरुड प्रजातीमधील पक्ष्याला सॅटेलाईट ट्रान्समीटर लावले आहे.
Powered By Sangraha 9.0