नाट्य, संगीत, गायन, अभिनय, लघुपट निर्मिती आणि कलाक्षेत्रात अशी मनसोक्त मुशाफिरी करणारे कल्याणचे कलोपासक दत्तात्रय लधवा यांच्या जीवनप्रवासाचा आढावा घेणारा हा लेख...
समितीच्या, विद्यार्थी परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून महाविद्यालयीन जीवनापासूनच दत्तात्रय लधवा राजकीय क्षेत्रात सक्रिय होते. पण, पदवीच्या दुसर्या वर्षाला असताना त्यांच्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली आणि त्यातूनच पुढे लधवा यांनी सांस्कृतिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविला.
दत्तात्रय यांचा जन्म कल्याणचा. कर्नाटकमधील गदग हे त्यांचे मूळ गाव. पण, त्यांचे वडील नोकरी-व्यवसायानिमित्त कल्याणमध्ये आले आणि त्यानंतर ते कायमचे कल्याणकर झाले. कल्याण-डोंबिवली महापालिकेत त्यांचे वडील नोकरी करीत होते. दत्तात्रय यांचे बालपण कल्याणमधील टिळक चौक परिसरात एकत्र कुटुंबात गेले. टिळक चौकात त्यांचा वाडा होता.
पण, दत्तात्रय दहावीत असताना त्यांचा तो वाडा पडला. सुभेदारवाडा शाळेतून त्यांनी शालेय शिक्षण पूर्ण केले, तर महाविद्यालयीन शिक्षण त्यांनी ‘बिर्ला महाविद्यालया’मधून घेतले. महाविद्यालयीन जीवनापासूनच राजकारणाची आवड असल्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे महाविद्यालयमंत्री म्हणून त्यांनी चार वर्षे ते कार्यरत होते. ‘कॉलेज रिप्रेझेेन्टेटिव्ह’ (सीआर) म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. तसेच त्यांनी सिनेटच्या निवडणुकीतही आपले नशीब आजमावून बघितले. राम कापसे यांचा दत्तात्रय यांच्या डोक्यावर हात होता.
तसेच राम कापसे यांनी दत्तात्रय यांच्यासाठी खूप काम केले होते. दत्तात्रय यांना पदवीच्या द्वितीय वर्षाला असताना ‘बिर्ला महाविद्यालया’ची ‘चॅम्पिनयनशिप’ मिळाली होती. ‘एनसीसी’, ‘स्पोर्ट्स’ अशा सर्वच क्षेत्रात त्यांनी यश संपादित केले होते. पुढे शिवलिंग भोसले यांच्याकडे कडोंमपात नोकरी करण्याची इच्छा दत्तात्रय यांनी व्यक्त केली होती. त्याकाळी नोकरी मिळविणे सहज शक्य होते आणि तसेच झाले. भोसले यांनी दत्तात्रय यांना लगेचच नोकरीत रूजू होण्याचा सल्ला दिला आणि दि. 27 जानेवारी, 1988 रोजी ते कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सेवेत दाखल झाले.
नोकरी करताना दत्तात्रय यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. त्यांनी नोकरीच्या सर्व जबाबदार्या सांभाळत ‘बी. कॉम’ची पदवी मिळविली. त्यानंतर ते वकिली अभ्यासाकडे वळले. दत्तात्रय यांचे वडील 1992 साली नोकरीतून निवृत्त झाले. पुढे त्यांनी दूध डेअरीचा व्यवसाय सुरू केला आणि तो उत्तमरीत्या चालत होता. डेअरीच्या कामांमुळे दत्तात्रय यांच्या वकिली शिक्षणाला मात्र ‘ब्रेक’ लागला. त्यांना एकच वर्ष वकिलीचे शिक्षण घेता आले. वडिलांच्या निधनापश्चात डेअरीची सर्व धुरा ही आपसूकच दत्तात्रय यांच्या खांद्यावर येऊन पडली. पण, या व्यवसायाकडे पूर्णवेळ लक्ष देणे शक्य नसल्यामुळे नाईलाजाने दत्तात्रय यांनी डेअरी व्यवसाय बंद करण्याचा निर्णय घेतला.
दत्तात्रय यांना गायनाचीही तितकीच आवड! फक्त साधीसुधी आवड नव्हे, तर त्यांच्या गाण्याच्या ‘सीडी’ बाजारातदेखील उपलब्ध आहेत. ‘शिवाई ते नवलाई’ हा त्यांचा गाण्याचा कार्यक्रम खूपच गाजला. गायनातील या मुशाफिरीमुळे ते राजकीय क्षेत्रापासून मात्र कायमचेचे दूर झाले. दत्तात्रय म्हणतात की, “आमच्या कार्यक्रमात जी मुले त्यावेळी होती, ती मुले आज विविध क्षेत्रात मोठ्या पदांवर कार्यरत आहेत,” असेही ते आवर्जून नमूद करतात.
दत्तात्रय यांची ‘हौशी कलावंत’ नावाची एक संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून तब्बल पाच ते सहा हजार विद्यार्थी आजवर घडले आहेत. या संस्थेतर्फे एक महिन्याची कार्यशाळा घेतली जाते. गेल्या 42 वर्षांपासून ही संस्था विद्यार्थी घडविण्याचे काम अविरतपणे करत आहे. मात्र, कोरोनामुळे मागील दोन वर्षे या कार्यशाळेचे आयोजन करता आले नसल्याची खंत दत्तात्रय बोलून दाखवतात. खरंतर दत्तात्रय इयत्ता सातवीला असल्यापासून कलाक्षेत्रातही तितकेच सक्रिय असले तरी त्यांनी कलेचे शास्त्रोक्त शिक्षण घेतले नाही.
पण, दत्तात्रय यांचे वडील नाटकात काम करीत असत. तेव्हा वडिलांकडूनच दत्तात्रय यांना कलेचा वारसा मिळाला. तसेच सुभेदारवाडा शाळेत शिक्षण झाल्याने तेथील विविध उपक्रमांमध्येदेखील दत्तात्रय अगदी हौसेने सहभागी होत. पुण्यात जसा सदाशिव पेठेचा परिसर आहे, तसाच कल्याणमधील टिळक चौक. तिथेही गणेशोत्सव आणि इतर सणउत्सवांत होणार्या विविध कार्यक्रमांमुळे माझी जडणघडण झाल्याचे दत्तात्रय अधोरेखित करतात.
कडोंमपाचा ‘कल्याण म्युनिसपल स्पोर्ट्स क्लब’ आणि वाचनालय असा नाटकांचा एक ग्रुप आहे. या नाटकाच्या ग्रुपसोबतही दत्तात्रय यांनी सात ते आठ नाटकांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. त्यात दत्तात्रय यांना सहावेळा पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ‘शेवंता जिती हाय’ या नाटकात नकारात्मक भूमिका दत्तात्रय यांनी साकारली होती. हे नाटक खूप गाजले. 2007 पासून दत्तात्रय हे सावित्रीबाई फुले नाट्यगृहाचे व्यवस्थापक म्हणून काम पाहत आहेत. महापालिकेत नाटकातील अभिनयामुळे त्यांची एक वेगळीच छाप पडली. दत्तात्रय यांची स्वतंत्र निर्मितीही एका बाजूला सुरू होतीच. ‘नजराणा गीतांचा’ कार्यक्रम, ‘माय संस्कृती पॅ्राडक्शन’, 2004 साली ‘गंमत जंमत बालस्वराची’ ही त्यांची उल्लेखनीय कलानिर्मिती. सध्या दत्तात्रय यांचे एका लघुपटावर काम सुरू आहे.
आजवर 20 ते 25 हून अधिक लघुपटांची निर्मिती केली आहे. रत्नाकर गायकवाड यांचे बदलापूरला वृद्धाश्रम होते. त्या ठिकाणी जाऊन वृद्धाश्रमावर त्यांनी लघुपटतयार केला आहे. महापालिकेच्या पर्यटन बसमध्ये कल्याण-डोंबिवलीतील विविध ठिकाणांची माहिती दिली जाते. त्याचे सर्व चित्रीकरणदेखील दत्तात्रय यांनीच केले आहे. ‘कोविड’ काळात महापालिकेच्या ‘फेसबुक’ पेजवर दिवसभर विविध कार्यक्रम दाखविले जात होते. ज्यामध्ये अगदी सांस्कृतिक कार्यक्रमांपासून प्रबोधनात्मक कार्यक्रमांचादेखील समावेश होता. त्यामध्ये ‘हॅलो डॉक्टर’ हा कार्यक्रमदेखील 22 विभागांत सादर केला होता. त्याच्या आयोजनातही दत्तात्रय यांचा महत्त्वाचा सहभाग होता. तेव्हा, दत्तात्रय यांच्यासारख्या हरहुन्नरी कलाकराला दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील प्रवासासाठी शुभेच्छा!