उद्योगजगतातील ‘प्रवीण’ उद्योजक

19 Nov 2021 13:11:13

tourism _1  H x

कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय धोक्यात असल्याची चाहूल लागताच त्यांनी व्यावसायिक कूस बदलली. कोरोना काळात मास्क, ‘सॅनिटायझर’सारख्या वस्तूंची तेजी होती. त्या त्यांनी विकल्या. मसाला कंपनीची ‘फ्रेंचाईजी’ घेतली. स्थिती पूर्वपदावर येताच पुन्हा पर्यटनास सुरुवात केली. हरणं त्यांना मंजूर नाही म्हणून आज पुन्हा ते दिमाखात उभे राहिले. हा अवलिया पर्यटन उद्योजक म्हणजे ‘त्रिगुण ग्रुप ऑफ कंपनीज्’चे संचालक प्रवीण डाखवे.

 




कोरोनाचा सर्वात जास्त फटका बसला तो पर्यटन उद्योगाला. काही उद्योग तर ‘सपशेल’ झोपलेच. अगदी दिवाळखोरीत निघाले. ‘कोविड-19’चा विषाणू संपर्कातून फैलावतो म्हणून संपर्क होणार्‍या व्यवसायावर पहिली संक्रांत आली. आंतरराष्ट्रीय आणि राज्यांतर्गत दळणवळणास खीळ बसली. दळणवळणावर अवलंबून असलेला पर्यटन व्यवसाय ठप्प झाला. पर्यटन क्षेत्रातील अनेक उद्योजक शब्दश: रस्त्यावर आले. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. याबाबतीत प्रवीण डाखवे सजग राहिले. कोरोनामुळे पर्यटन व्यवसाय धोक्यात असल्याची चाहूल लागताच त्यांनी व्यावसायिक कूस बदलली. कोरोना काळात मास्क, ‘सॅनिटायझर’सारख्या वस्तूंची तेजी होती. त्या त्यांनी विकल्या. मसाला कंपनीची ‘फ्रेंचाईजी’ घेतली. स्थिती पूर्वपदावर येताच पुन्हा पर्यटनास सुरुवात केली. हरणं त्यांना मंजूर नाही म्हणून आज पुन्हा ते दिमाखात उभे राहिले. हा अवलिया पर्यटन उद्योजक म्हणजे ‘त्रिगुण ग्रुप ऑफ कंपनीज्’चे संचालक प्रवीण डाखवे.


 

गजानन डाखवे हे समाजक्षेत्रातील नावाजलेलं नाव. एका खासगी कंपनीत काम करत गजानन डाखवे लोकांच्या समस्यादेखील दूर करत. काही लोकांना तर ते अडचणीस धावून येणार्‍या देवासमान भासायचे. डाखवेंचं मूळ गाव हे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामधलं रोहा अष्टमी. निसर्गरम्य असं हे गाव अगदी रोहा रेल्वेस्थानकालगत वसलेलं आहे. मात्र, गजानन यांनी पोटापाण्यासाठी गावातून स्थलांतर केलं. गजानन यांची पत्नी सुनंदा म्हणजे वात्सल्याची मूर्तीच जणू! या दाम्पत्यास एकूण आठ मुले. पाच मुली आणि तीन मुलगे. या सगळ्यात लहानगा म्हणजे प्रवीण. कुटुंब जसजसं वाढत होतं, तसतसं बिर्‍हाडदेखील मोठ्या घरात जात होतं. त्यामुळे प्रवीणचं शालेय शिक्षण दादर आणि अंधेरीच्या शाळेत झालं.

पुढे महाविद्यालयीन शिक्षण दादरच्या कीर्ती महाविद्यालयात झाले. तिथून प्रवीणने ‘बीए’ पूर्ण केले. त्या काळात संगणकाने भारतात पाय ठेवला होता. इथून पुढचं जग हे संगणकाचं असेल हे प्रवीणला उमजलं. त्याने संगणक ज्ञान आत्मसात करायचं ठरवलं. दादरच्या एका ‘प्रसिद्ध इन्स्टिट्यूट’मध्ये संगणकाच्या अभ्यासासाठी प्रवेश घेतला. एक वर्ष मन लावून अभ्यास केला आणि एक वर्ष त्याच संस्थेत नोकरीसुद्धा केली. ‘बिर्ला’, ‘रिलायन्स’, ‘एल अ‍ॅण्ड टी’सारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये प्रवीणने नोकरी केली. त्यानंतर प्रवीणने एका प्रसिद्ध ‘आयटी’ कंपनीत दोन वर्षे नोकरी केली. पण, उद्योगात रमणार्‍या मनास नोकरीमध्ये श्वास कोंडल्यासारखं वाटतं. असा त्रास प्रवीणला जाणवू लागला. त्याने उद्योगात उतरण्याचा निर्णय घेतला.


 

आई-वडिलांच्या आशीर्वादाचे भांडवल घेऊन त्याने उद्योगास सुरुवात केली. विविध कॉर्पोरेट कंपन्या, बँकांना प्रवीण डाखवे यांची ‘कॉम्प्युहोम डाटा प्रॉडक्ट्स सॉफ्टवेअर्स’ पुरवू लागली. कंपनीची घोडदौड सुरू झाली. ‘सॉफ्टवेअर्स’सोबत ग्राहक ‘हार्डवेअर’ची मागणी करू लागल्याने पाच वर्षाने प्रवीण डाखवेंनी अजून एक कंपनी सुरू केली. ‘त्रिगुण एंटरप्रायझेस’ असं नाव ठेवण्यात आलं. नवीन इलेक्ट्रॉनिक उत्पादन बाजारात आलं की, प्रवीण डाखवेंच्या कंपनीमध्ये हमखास मिळणार अशी ‘त्रिगुण’ची ख्याती पसरली होती. या व्यवसायात उधारीवर व्यवसाय चालतो. डाखवे हे तर ‘होलसेलर’सारखे कमी नफा ठेवून व्यवसाय करत होते. उधारीवर माल जास्त झाल्याने नफ्याचं प्रमाण कमी होऊन तोटा व्हायला लागला. काहीजण तर उधारी चुकवू लागले आणि या सगळ्याचा परिणाम उद्योगावर झाला. नफा कमी होऊन खर्चाचे प्रमाण वाढले. कंपनीची परिस्थिती खालावत गेली.



 

आपण आपल्या आवडीचा दुसरा व्यवसाय केला, तर किंबहुना डाखवेंच्या मित्राने आवडीचा व्यवसाय करण्याचा सल्ला दिला. प्रवीण डाखवेंनी आपल्या आवडत्या पर्यटन क्षेत्रात जाण्याचे ठरवले. खरंतर प्रवीण डाखवेंना लहानपणापासूनच पर्यटनाची आवड होती. अनेक पर्यटनस्थळांना कुटुंबासोबत तर कधी मित्रांसोबत, तर कधी अगदी एकट्याने त्यांनी भेटी दिल्या. हळूहळू ते चार-पाच लोकांना पर्यटनस्थळी घेऊन जाऊ लागले. त्यानंतर ५०-६० लोकांनासुद्धा नेऊ लागले. प्रवीण डाखवेंच्या नियोजनाचे सगळे कौतुक करत. पर्यटकांनीसुद्धा स्वत:ची पर्यटन कंपनी सुरू करण्याची सूचना डाखवेंना केली. पर्यटकांच्या आशीर्वादाने ‘त्रिगुण टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स’ अर्थात ‘टीटीटी’ सुरू झाली. आजी-आजोबांसोबत सहल, ‘हुरडा पार्टी’, ‘पोपटी पार्टी’, प्रत्यक्ष मासेमारीचा अनुभव घेता येईल, अशी बोट सफारी सहल, कीर्तन सहल, नऊ देवी दर्शन सहल, आंबा महोत्सव, चिकू सफारी सहल, चिंतन सहल, वधू-वर मेळावा सहल, उद्योजक मेळावा सहल, ‘बोट पार्टी’, ‘एक रात्र बेटा’वर तसेच मुंबईकरांसाठी पावसाचा आनंद देणारी ‘वर्षा सहल’ अशा अनोख्या सहलीच्या ३९ संकल्पना ‘त्रिगुण’ने प्रत्यक्षात आणल्या. अशाप्रकारच्या ३९ अभिनव संकल्पना सहली आयोजित करणारी ‘त्रिगुण अम्युज्’ ही महाराष्ट्रातील एकमेव संस्था असल्याचा दावा प्रवीण डाखवे करतात.



 

कोरोनाकाळात पर्यटन व्यवसायावर प्रचंड मोठ्ठं संकट आलं. मात्र, या संकटाला शरण न जाता डाखवेंनी व्यावसायिक कौशल्य दाखविले. आपल्यावर आपल्या सहकार्‍यांच्या कुटुंबांची जबाबदारीसुद्धा आहे, हे ठाऊक असल्यामुळे त्यांनी आलेल्या एका संधीचे सोने केले. कोरोना काळात ‘मास्क’, ‘सॅनिटायझर’सारख्या अत्यावश्यक वस्तूंची मागणी वाढली होती. एका ‘हेल्थकेअर’ कंपनीच्या सहकार्याने ही उत्पादने त्यांनी विकण्यास सुरुवात केली. त्यातून एक नवी व्यावसायिक वाट गवसली. सोबतच ‘महास्पाईस’ नावाच्या मसाला कंपनीचे वितरक म्हणून जबाबदारी स्वीकारली. यासाठी त्यांनी तीन कंपन्या तयार केल्या. ‘अम्युज् हब हॉलिडेज्’, ‘अम्युज् एअर अ‍ॅण्ड टक’(टेक), ‘अम्युज् फूड हब’ अशा या तीन कंपन्या होत.


‘अम्युज् हब हॉलिडेज्’ सहलींचे व्यवस्थापन करते. ‘अम्युज् एअर अ‍ॅण्ड टक’(टेक) ही कंपनी ‘चार्टर’ विमानातून मुंबई दर्शन घडवते, तर ‘अम्युज् फूड हब’ ही कंपनी ड्रायफूट आणि मसाल्याचे वितरण करते. ‘त्रिगुण ग्रुप ऑफ कंपनीज्’च्या छताखाली या कंपन्या चालतात. प्रवीण डाखवे यांची मोठी मुलगी प्रांजल हिचे या उद्योजकीय वाटचालीत मोठे योगदान आहे. दुसरी कन्या जाई सध्या ‘सीए’चा अभ्यासक्रम पूर्ण करत आहे. या संपूर्ण उद्योजकीय प्रवासात प्रवीण डाखवेंना त्यांची पत्नी तेजल यांनी समर्थपणे साथ दिली. त्या ‘बँक ऑफ बडोदा’मध्ये कार्यरत आहेत.


“उद्योग करताना आत्मविश्वास असावा. घाबरून उद्योग-व्यवसाय करता येत नाही. त्यामुळे धाडस दाखवावे. बँकांना आपले उद्योजकीय प्रकल्प सादर करा. बँका योग्य प्रकल्पांना नक्कीच अर्थसाहाय्य करतात. आपल्यासारख्या इतर मराठी उद्योजकांना व्यवसाय द्या. अशा कृतींमुळे मराठी समाज उद्योगात अग्रेसर होईल. त्यामुळे अन्य मराठी उद्योजक व्यावसायिकांना यथाशक्ती मदत करा,” असे आवाहन प्रवीण डाखवे करतात. ‘बिझनेसमन्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्र’ अर्थात ‘बाम’ या उद्योजकीय संस्थेचे ते उपाध्यक्ष आहेत. संकटाला शरण न जाणारे प्रवीण डाखवे हे खर्‍या अर्थाने ‘प्रवीण’ उद्योजक आहेत.


 

8108105232

Powered By Sangraha 9.0