खडतर परिस्थितीवर मात करून कलागुणांच्या जोरावर जिद्दीने थेट विदेशात भरारी घेणाऱ्या पोलीस खात्यातील आरती आनंद बेळगली (माया पाटील) यांच्याविषयी...
'मुलगी शिकली...प्रगती झाली’ हे बोधवाक्य प्रचलित आहे. मुलगा शिकला, तर एकच घर उजळते. मात्र, मुलगी शिकली तर दोन घरे उजळतात. अशीच एक अबला आज सबला बनून केवळ स्वतःच्या दोन कुटुंबांचा नव्हे, तर देशाचाही आधार बनली आहे. यावर्षी विदेश मंत्रालय, भारत सरकार यांच्या आदेशाने संपूर्ण भारतातून निवड झालेल्या साहाय्यक सुरक्षा अधिकाऱ्यांच्या यादीत ठाणे शहर पोलीस दलातील महिला पोलीस नाईक पदावर कार्यरत असणाऱ्या आरती आनंद बेळगली (पूर्वाश्रमीच्या माया पाटील) यांची निवड झाली आहे. पोलीस दलासाठी ही बाब अभिमानाची आहेच ; किंबहुना त्यांच्या निवडीमुळे ठाण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
अतिशय सामान्य कुटुंबातून आलेल्या आरती यांचा जन्म १९८० साली ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील अलिमघर येथील आगरी समाजातील कुटुंबात झाला.वडील कान्हा पाटील व आई लीलाबाई यांनी अतिशय काबाडकष्ट करून आरती यांना लहानाचे मोठे केले. वडील खासगी कंपनीमध्ये कामाला होते. त्यांच्या चार भावंडांपैकी मोठी बहीण लहानपणीच वारली. त्यांचा मोठा भाऊ २००९ मध्ये निवर्तला. आता आरती आणि त्यांचा मधला भाऊ दोघेच कुटुंबाचा आधार आहेत. आरती यांचे प्राथमिक शिक्षण ठाणे महानगरपालिकेच्या शाळेतून, तर महाविद्यालयीन शिक्षण ठाण्यातील बांदोडकर कॉलेजमधून झाले. कौटुंबिक व आर्थिक अडचणींना तोंड देत त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच आरती यांची कला, साहित्य, क्रीडा सर्वच क्षेत्रांत चमक दिसून येत होती.
कबड्डी तर त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय. त्यात त्यांनी शाळा, महाविद्यालय आणि नंतर पोलीस दलासाठी जिल्हास्तरावर, राज्यस्तरावर कर्तृत्व गाजवले. शालेय जीवनात नेहमीच आदर्श विद्यार्थी असलेल्या आरती यांना शिष्यवृत्तीदेखील मिळाली होती. घरची परिस्थिती जेमतेम असल्याने आरती यांना नोकरीधंदा करणे क्रमप्राप्त होते. समाजातील रूढी-परंपरा आड येत होत्या. मात्र, त्यांनी दृढनिश्चय केला. त्यात पोलीस विभागातील नोकरी त्यांना खुणावत होती. २००३ मध्ये ठाणे शहर पोलीस दलात भरती झाल्यानंतर प्रशिक्षण कालावधी पूर्ण करुन नोकरीस सलग्न झाल्या. तेव्हापासून आजतागायत आपले कर्तव्य आज कष्टाने व प्रामाणिकपणे त्या बजावत आहेत. आरती यांचा विवाह २००६ मध्ये झाला असून विवाहानंतरही त्या आपले कर्तव्य बजावत आहेत. त्यांच्या या अथक परिश्रम व प्रामाणिकपणाबद्दल त्यांना वरिष्ठांकडून अनेक बक्षिसेही मिळाली. त्यांच्या या एकूणच गुणवत्तेची परिणती त्यांच्या राष्ट्रीय स्तरावरील निवडीमध्ये झाली, असे म्हणता येईल. ही निवड विदेश मंत्रालय, दिल्ली येथून अनेक गुणवत्ता व निकषांवर करण्यात येते.
याबाबत आरती यांना विचारले असता त्या म्हणतात की, “ब्युरो ऑफ सिक्युरिटी’, विदेश मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून जुलै २०१९ मध्ये प्रतिनियुक्तीकरिता परिपत्रक निघाले होते. त्यास अनुसरून प्रतिनियुक्तीकरिता मी अर्ज केला होता, तेव्हा मुलाखतीकरिता मला बोलावण्यात आले व मी गुणवत्तेत तसेच मुलाखतीत उत्तीर्ण होऊन माझी निवड साहाय्यक सुरक्षा अधिकारी अशी करण्यात आली व सध्या विदेश मंत्रालय, दिल्ली भारत सरकार येथे प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहे.” अलीकडेच परदेशातील मिशनवरही त्यांची निवड झाल्याचे त्यांनी सांगितले. आरती यांची राष्ट्रीय स्तरावर विदेशात जाऊन देशाकरिता कर्तव्य बजाविण्यासाठी निवड झाल्याने त्यांचे वरिष्ठ अधिकारी व मित्र परिवाराकडून कौतुक होत असून सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.विदेश मंत्रालयाअंतर्गत दिल्लीतील प्रशिक्षण कालावधी पूर्ण होताच त्यांना भारतीय दूतावासाच्या आस्थापनेवर आदेशानुसार कर्तव्य करावयाचे असून, या कामातही आरती नक्कीच आपली चमक दाखवून देतील, यात शंका नाही.
आरती आनंद बेळगली पूर्वाश्रमीच्या (माया पाटील) यांना याबाबत विचारता, त्यांनी याचे श्रेय आपले वरिष्ठ, पती आनंद गजानन बेळगली, सासू-सासरे व मुलगी श्वेता यांना दिले आहे. कारण, कुटुंबाच्या पाठबळ व सहकार्याशिवाय कर्तव्यासाठी इतक्या दूर विदेशात काही वर्षांसाठी जाणे शक्यच नव्हते, असे त्या मानतात. ‘कोविड’ काळात त्यांनी साप्ताहिक सुट्टीव्यतिरिक्त एकही सुट्टी घेतली नाही. जीवावर उदार होऊन सेवा बजावली. कधी कधी, तर ‘कोविड’ यादी बनवण्यासाठी पहाटेपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’देखील करावे लागल्याचे त्या नमूद करतात.
तरुणांना संदेश देताना त्या म्हणतात की, “आजचा संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. तेव्हा विचार बदला, आयुष्य बदलेल! भविष्याचा विचार करा, मोठ्यांचे मार्गदर्शन घ्या. आईवडिलांचा सन्मान करा. देशाच्याप्रति प्रेमभावना राहू द्या आणि देशाची प्रगत राज्यात गणना होईल, याकडे लक्ष द्या,” असा सल्लाही त्या आवर्जून देतात. खडतर परिस्थितीशी दोन हात करून आरती यांनी विदेशात भरारी घेतली. हे नवे कर्तव्य चांगल्याप्रकारे पार पाडून पोलीस दल, कुटुंबीय तसेच ठाणेकरांनाही अभिमान वाटेल, असे कार्य करण्याचा विश्वास मनी बाळगणाऱ्या आरती यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे शुभेच्छा!