
नाशिक : दि. ३ ते ५ डिसेंबर दरम्यान नाशिक येथे आयोजित ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात यंदा साहित्य महामंडळाच्या अध्यक्षांच्या हस्ते संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर हे अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्याची शक्यता आहे.प्रकृतीच्या कारणास्तव संमेलनाचे मावळते अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो अनुपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. नाशिकमध्ये ‘भुजबळ नॉलेज सिटी’ येथे दि. ३ ते ५ डिसेंबर दरम्यान होणार्या ९४ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ, लेखक जयंत नारळीकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
नियोजित अध्यक्षांकडे गेल्या संमेलनाच्या अध्यक्षांनी सूत्रे प्रदान करण्याचा एक छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन उद्घाटन सत्रात केले जात असते. ९३ वे साहित्य संमेलन उस्मानाबाद येथे गेल्यावर्षी झाले होते. त्या संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो होते. प्रकृतीच्या कारणामुळे दिब्रिटोे त्या संमेलनालाही पूर्ण काळ उपस्थित राहू शकले नव्हते. आता नाशिकमध्ये होणार्या संमेलनालाही त्यांना रितसर निमंत्रण पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, प्रकृतीच्या कारणास्तव दिब्रिटो साहित्य संमेलनाला उपस्थित राहणार नसल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नियोजित संमेलनाध्यक्ष जयंत नारळीकर यांना यंदाच्या वर्षाची सूत्रे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांच्या हस्ते देण्यात येण्याची शक्यता आहे.