या बाबतीत माहिती देताना ते म्हणाले कि, '' पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण, पुण्याचं वैभव आणि अभिमान शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी आयुष्यभर छत्रपती शिवाजी महाराजांची अनन्य भक्ती केली. त्यांच्या लेखणीचा, व्याख्यानांचा, महानाट्याचा आणि एकूणच जगण्याचा विषय शिवराय हेच होते. त्यांनी लेखन, वक्तृत्त्व, नाटके, गडकोट मोहिमा या सर्व माध्यमांतून महाराष्ट्राच्या घराघरात शिवरायांचा जाज्ज्वल्य इतिहास साध्या आणि सोप्या भाषेत पोहोचवला, मनामनात रुजवला. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर जिथे जिथे शिवरायांच्या पालखुणा आहेत त्या साऱ्या गडकोटांवर आणि ऐतिहासिक स्थानांना भेटी देऊन आणि तिथला इतिहास जागवून ते नतमस्तक झाले. बाबासाहेबांच्या जाण्याने इतिहास आणि साहित्य क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. आज ते देहरुपाने आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या कार्यारूपाने ते भावी पिढ्यांना शिवरायांचा इतिहास सांगत कायमच प्रेरणा देत राहतील. अशी लोक समाजाची असतात ते समजला नेहमीच दिशा दाखवण्याचे काम करत असतात त्यामुळे पुणे महानगरपालिका वंदनीय बाबासाहेबांच्या स्मृती यथोचित जपण्याचे काम नक्कीच करेल. त्यांना समस्त पुणेकरांच्या वतीनं पुन्हा एकदा भावपूर्ण श्रद्धांजली''.
बाबासाहेब पुरंदरे यांनी आपल्यावाणीतून आणि लिखाणातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास देशभरातील कानाकोपर्यात पोहचवण्याचा प्रयत्न केला. गेले ८० वर्षे म्हणजेच ८ दशक छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ते जगले तो इतिहास सामान्य लोकांपर्यंत कसा पोहचेल यासाठी प्रयत्न केले. हा इतिहास लोकांपर्यंत चांगल्या आणि सोप्या स्वरूपात लोकांपर्यंत पोहचावा यासाठी त्यांनी ''शिवसृष्टीचा'' संकल्प केला आणि त्याचे कामही आज योग्य दिशेने सुरु आहे. परंतु आता बाबासाहेब पुरंदरे यांचे स्वप्न हे आता आमचे स्वप्न असणार आहे. त्यामुळे बाबासाहेब यांच्या स्वप्नातील शिवसृष्टी पूर्ण करणं हीच बाबासाहेब पुरंदरे यांच्यासाठी खरी आदरांजली आणि श्रद्धांजली असेल आणि आम्ही सर्व जण त्यासाठी काम करु.