गडचिरोली जिल्ह्यामध्ये झालेल्या चकमकीत मिलिंद तेलतुंबडे यांच्यासह २६ नक्षलवाद्यांची झालेली हत्या आणि त्या चकमकीच्या आधी एक दिवस प्रशांत बोस उर्फ किशनदा आणि त्याची पत्नी शीला मरांडी या दोघांना झालेली अटक हा नक्षलवादी चळवळीस जबर धक्का मानला जात आहे. देशामध्ये फुटीरतेची बीजे पेरणारी नक्षलवादी चळवळ मुळापासून उखडली जायला हवी.
नक्षलवादी चळवळीला जबरदस्त हादरा बसेल, अशा दोन घटना अलीकडेच घडल्या. त्यातील एक घटना महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आणि दुसरी घटना झारखंड राज्यात घडली. या दोन्ही घटनांमुळे नक्षलवादी चळवळीचे पेकाट मोडल्यासारखी अवस्था झाली आहे. पहिल्या घटनेत महाराष्ट्र राज्याच्या ‘सी-६०’ या नक्षलवाद्यांच्या बंदोबस्तासाठी निर्माण करण्यात आलेल्या पोलीस दलाच्या तुकडीने गेल्या शनिवारी झालेल्या प्रदीर्घ चकमकीत २६ नक्षलवाद्यांचा खात्मा केला. ‘कोटिगुल-ग्यारापत्ती’ जंगल परिसरात नक्षलवाद्यांच्या मागावर ‘सी-६०’ पोलीस पथक होते. त्या भागात नक्षलवादी जमणार असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्याने पोलीस त्यांच्या मागावर होते. पोलीस पथक सकाळीच शोधमोहिमेवर निघाले होते. पोलीस आपल्या मागावर असल्याचे कळताच नक्षलवाद्यांनी त्या पथकावर जबरदस्त गोळीबार केला. पोलिसांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात जवळजवळ दहा तास चकमक सुरू होती. या दहा तासांच्या चकमकीत २६ नक्षलवादी मारले गेले. या शोधमोहिमेत सहभागी झालेल्या पोलिसांपैकी फक्त चौघे जखमी झाले. जखमी पोलिसांना पुढील उपचारांसाठी त्वरित इस्पितळात दाखल करण्यात आले. पोलिसांसमवेत जी चकमक झडली, त्यामध्ये पोलिसांना हवा असलेला मिलिंद तेलतुंबडे नावाचा नक्षलवादी नेता मारला गेला. तसेच नक्षलवाद्यांचे काही कमांडरही मारले गेले. सहा महिला नक्षलवादीही ठार झाल्या. मिलिंद तेलतुंबडे हा जहाल नक्षलवादी मारला गेल्याने त्या चळवळीचा एक आधारस्तंभ गेला आहे. मिलिंद तेलतुंबडे याला पकडण्यासाठी ५० लाखांचे बक्षीस घोषित करण्यात आले होते. मिलिंद तेलतुंबडे हा नक्षलवादी चळवळीच्या केंद्रीय समितीचा सदस्य होताच. त्याव्यतिरिक्त त्याच्यावर अन्य अनेक जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या होत्या.
दि. ३१ डिसेंबर, २०१७ या दिवशी पुण्यात डाव्या विचारसरणीच्या संघटनांनी ‘एल्गार परिषदे’चे आयोजन केले होते. त्यामध्ये सहभागी झालेल्यांनी भडक भाषणे करून समर्थकांच्या भावना भडकविण्याचा उद्योग केला होता. १ जानेवारी, २०१८ या दिवशी भीमा-कोरेगाव लढाईचा स्मृतिदिन होता. तेथे जमलेल्या जमावास भडकविल्याने हिंसाचार उसळला आणि त्याचे पडसाद अवघ्या महाराष्ट्रात उमटले. मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात या हिंसाचाराचा वणवा पेटला. पण, ज्या प्रकारे हा हिंसाचार उसळला आणि त्यानंतरच्या घटना घडल्या त्या जमावाला भडकविल्यानेच घडून आल्याचे दिसून आले. समाजामध्ये दुफळी कशी माजेल आणि त्यावर आपली राजकीय पोळी कशी भाजून घेता येईल, या हेतूने हा सर्व हिंसाचार घडविण्यात आल्याचे दिसून आले. भीमा-कोरेगाव हिंसाचाराचा सूत्रधार असल्याची नोंद मिलिंद तेलतुंबडे याच्या नावावर आहे. जंगल आणि शहरी क्षेत्रामध्ये नक्षलवादी संघटनेचा प्रभाव वाढविण्याची जबाबदारी मिलिंद तेलतुंबडे याच्यावर होती. मिलिंद तेलतुंबडे हा अन्य एक प्रमुख नक्षलवादी नेता आनंद तेलतुंबडे याचा भाऊ. आपल्या भावापासून प्रेरणा घेऊन आपण या चळवळीत आलो, असे मिलिंद तेलतुंबडे सांगत असे.
अलीकडील काळामध्ये नक्षलवाद्यांसमवेत ज्या चकमकी घडल्या, त्यातील ही एक मोठी चकमक मानली जात आहे. या चकमकीनंतर घटनास्थळाहून पोलिसांनी बरीच शस्त्रे आणि दारुगोळा जप्त केला. २०१८ मध्ये पोलिसांना शरण आलेल्या पहाडसिंह नावाच्या माओवाद्यांच्या दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवादी चळवळीचे महत्त्वाचे केंद्र अमरकंटक येथे निर्माण करण्याची जबाबदारी या मिलिंद तेलतुंबडे याच्यावर सोपविण्यात आली होती. नक्षलवादी नेत्यांना पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत वावरण्यासाठी सुरक्षित भूप्रदेश निर्माण करण्याची जबाबदारी मिलिंद तेलतुंबडे याच्यावर होती.
‘एल्गार परिषदे’संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून अधिक तपास केला जात असता आणखी धक्कादायक माहिती हाती लागली. नक्षलवाद्यांनी मोदी यांची राजवट संपुष्टात आणण्याची योजना आखली होती. राजीव गांधी यांची हत्या ज्या प्रकारे करण्यात आली तसे काही तरी करून ‘मोदीराज’ समाप्त करण्याची योजना असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेला आढळून आले. कोणी बनविली होती ही योजना? त्याचा ‘मास्टरमाईंड’ कोण होता? कॉम्रेड किशन आणि काही प्रमुख माओवाद्यांनी मोदी यांची राजवट संपविण्यासाठी ठोस योजना आखली होती, असे चौकशीत उघड झाले आहे.
प्रारंभी नक्षली चळवळीला हादरा देणाऱ्या दोन घटना घडल्याचा उल्लेख केला आहे. त्यातील एक घटना म्हणजे मिलिंद तेलतुंबडे याची चकमकीत झालेली हत्या. दुसरी घटना म्हणजे, कालच्या शुक्रवारी झारखंड पोलिसांनी प्रशांत बोस उर्फ किशनदा या नावाच्या ७५ वर्षे वयाच्या एका नक्षलवाद्यास त्याच्या पत्नीसह अटक केली. या किशनदा यास पकडण्यासाठी एक कोटी रुपयांचे बक्षीस घोषित करण्यात आले होते. किशनदा आणि त्यांची पत्नी शीला मरांडी हे दोघेही सक्रिय नक्षलवादी. दोघेही नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचे सदस्य. या दोन्ही वयस्कर नक्षलवादी नेत्यांना अटक झाल्याने या चळवळीस नक्कीच जबर धक्का बसला आहे. प्रशांत बोस यास अटक झाल्याने माओवादी चळवळीला हादरा बसल्याचे मानण्यात येत आहे. ‘एमसीसीआय’ आणि ‘पीडब्ल्यूजी’ या दोन महत्त्वाच्या नक्षलवादी संघटनांचे विलिनीकरण करून ‘सीपीआय’ (माओवादी) ही आग्नेय आशियातील सर्वात मोठी अतिरेकी संघटना निर्माण करण्यात किशनदा याने महत्त्वाची भूमिका बजाविली होती. आंध्र प्रदेश, तेलंगण या एकेकाळी नक्षलवाद्यांचा प्रभाव असलेल्या क्षेत्रामध्ये ही चळवळ आक्रसत असतानाच किशनदा या ‘मास्टरमाईंड’ला अटक झाली आहे. नक्षलवादी चळवळीतील दुसऱ्या क्रमांकाचा हा नेता सुमारे तीन दशके भूमिगत राहून कारवाया करीत होता. प्रशांत बोस यांच्यावर बिहार, झारखंड आणि ओडिशा या राज्यांचा समावेश असलेल्या पूर्व भारताची जबाबदारी होती. नेपाळ ते केरळपर्यंत ‘रेड कॉरिडॉर’ निर्माण करण्यामागे या किशनदा याची मुख्य भूमिका राहिल्याचे मानण्यात येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यामध्ये झालेल्या चकमकीत मिलिंद तेलतुंबडे यांच्यासह २६ नक्षलवाद्यांची झालेली हत्या आणि त्या चकमकीच्या आधी एक दिवस प्रशांत बोस उर्फ किशनदा आणि त्याची पत्नी शीला मरांडी या दोघांना झालेली अटक हा नक्षलवादी चळवळीस जबर धक्का मानला जात आहे. देशामध्ये फुटीरतेची बीजे पेरणारी नक्षलवादी चळवळ मुळापासून उखडली जायला हवी. समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जागृती झाली तर ही सडकी, देशविघातक विचारसरणी भारतातून हद्दपार झाल्यावाचून राहणार नाही.