येत्या दि. ७ डिसेंबर रोजी सदबी’ज या प्रख्यात लिलावगृहाच्या लंडन कार्यालयात एका दुर्मीळ वस्तूचा लिलाव होणार आहे. तिची मूळ किंमत आहे १ पेनी. मात्र, लिलावात तिची किंमत ४० ते ६० लाख पौंड येईल, असा सदबी’जच्या संचालकांचा अंदाज आहे.
आपल्याकडे जसा १०० पैशांचा एक रुपया होतो, तसेच ब्रिटनमध्ये १०० पेनींचा एक स्टर्लिंग पौंड होतो. विदेशी चलन विनिमयाच्या सध्याच्या दरानुसार एका स्टर्लिंग पौंडचा भाव सुमारे ९९.७७ रुपये एवढा आहे. आता या भावानुसार ४० लाख ते ६० पौंड म्हणजे किती रुपये होतात, हे गणित तुम्हीच करून पाहा. येत्या दि. ७ डिसेंबर रोजी सदबी’ज या प्रख्यात लिलावगृहाच्या लंडन कार्यालयात एका दुर्मीळ वस्तूचा लिलाव होणार आहे. तिची मूळ किंमत आहे १ पेनी. मात्र, लिलावात तिची किंमत ४० ते ६० लाख पौंड येईल, असा सदबी’जच्या संचालकांचा अंदाज आहे.
सदबी’ज हे अत्यंत प्रख्यात असं लिलावगृह लंडनमध्ये सन १७४४ मध्ये सुरू झालं. त्याचा मूळ संस्थापक सॅम्युअल बेकर हा जुन्या दुर्मीळ पुस्तकांचा विक्रेता होता. १७७८ साली या लिलावगृहाचा एक भागीदार जॉन सदबी यांच्या नावावरून त्याला जे सदबी‘ज हे नाव मिळालं, ते कायम राहिलं. आज तर सदबी’जची मालकीदेखील अमेरिकन भागधारकांकडे आहे. त्यामुळे त्याचं मुख्यालय आता लंडनमध्ये नसून न्यूयॉर्कला स्थलांतरित झालं आहे. पण, जगभरातले सर्व लोक सदबी’ज म्हटलं की, आजही लंडन असंच धरून चालतात. प्रत्यक्षात आज न्यूयॉर्क आणि लंडनसह जगभरात ८० ठिकाणी सदबी’जची लिलावगृहं आहेत, तिथे नियमितपणे जुनी पुस्तकं, जुनी नाणी, कलावस्तू, जडजवाहीर, किंबहुना कोणत्याही मौल्यवान वस्तूंचे लिलाव चालतात. आता तर ‘ऑनलाईन’ सेवा उपलब्ध असल्यामुळे जगाच्या एका टोकाला चाललेल्या प्रत्यक्ष लिलावात, जगाच्या दुसऱ्या टोकाला असणारे ग्राहकसुद्धा सहभागी होऊन बोली लावू शकतो.
मागील दि. ७ डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या लिलावातली वस्तू आहे, १ पेनी किमतीचं एक पोस्टाचं तिकीट. आपल्याला चांगलीच परिचित असलेली ब्रिटिश महाराणी व्हिक्टोरिया हिचं ‘प्रोफाईल’ म्हणजे मुखड्याची एक बाजू संपूर्ण काळ्या रंगात त्यावर छापलेली आहे. हे डाक तिकीट ब्रिटिश पोस्ट खात्याने छापलेलं पहिलं तिकीट आहे. वर्ष आहे १९४०. तत्कालीन ब्रिटिश जनतेने‘ब्लॅकपेनी’ या नावाने हे तिकीट खूप लोकप्रिय झालं होतं. कारण, या तिकिटामुळे डाक किंवा टपाल खातं हे सार्वजनिक झालं. अगोदर ते राजेराजवाडे, सरदार, सावकार, व्यापारी आणि चर्च यांच्यापुरतेच मर्यादित होतं, आता कुणाही नागरिकाने इंग्लंड, स्कॉटलंड, आयर्लंड आणि वेल्स एवढ्या प्रदेशांतल्या आपल्या कुणाही मित्राला, नातेवाईकांना, कुटुंबीयांना पत्र लिहावं आणि त्यावर हे फक्त एक पेनी किमतीचं तिकीट चिकटवावं; मग, सरकारी टपाल खातं तेवढ्या माफक शुल्कात तुमचं पत्र तुमच्या संबंधितांना पोहोचवणार. या नव्या सोयीमुळे सर्वसामान्य नागरिकांना फार आनंद झाला. अर्थात, ही सर्वांचीच सोय होती.
यापूर्वी ब्रिटनमध्ये डाक किंवा टपाल नव्हतं असं नाही. राजे आणि सरदार यांचे संदेशवाहक तर असायचेच. ते घोड्यावरून किंवा पायी चालत पत्रांची ने-आण करीत. त्यांना ‘रनर्स’ असं म्हटलं जाई. म्हणजे त्यांनी धावत जावं, असे अपेक्षित असे. १६व्या शतकापासून व्यापार वाढायला लागल्यावर अनेक व्यापाऱ्यांनी आपापले संदेशवाहक तयार केले. आणखी पुढच्या काळात हे सरकारी किंवा व्यापारी संदेशवाहक सामान्य लोकांची खासगी पत्रं पण नेऊ लागले. त्याबद्दल ते पैसे घेत असत. मग सरकारनेच लोकांची पत्रं न्यायला-आणायला सुरुवात केली. पण, यासाठी किती पैसे आकारावे, यावर कोणतंही बंधन नव्हतं. पहिल्या चार्ल्सच्या काळात म्हणजे सन १६२५ ते १६४९ या काळात सरकारी टपाल खात्याने टपाल ने-आणीचे दर अनेकदा वाढवून भरपूर पैसे कमावले. पत्र पाठवणारा पैसे देत नसे, तर पत्र घेणारा पैसे द्यायचा.
हा सगळा भोंगळ, ढिला व्यवहार पुढची सुमारे पावणे दोनशे वर्षे तसाच चालू राहिला. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात ब्रिटनने हिंदुस्थान जिंकला. आफ्रिकेत आणि आशियात ब्रिटनचं मोठ साम्राज्य निर्माण झालं. व्यापार वाढू लागला, तसा एकंदर सगळाच पत्रव्यवहार वाढू लागला. ब्रिटिश व्यापारी आणि सैनिक दूरदूरच्या देशांमध्ये जाऊ लागले. त्यांचा पत्रव्यवहार वाढला. एक ब्रिटिश खासदार रॉबर्ट वॉलेस याला या स्थितीत ब्रिटिश टपाल व्यवस्थेमध्ये थारेपालटी सुधारणा कराव्यात, असं वाटू लागलं. पत्र पाठवणाऱ्या माणसानेच त्या पत्राची वाहतूक करण्याचं शुल्क म्हणून सरकारला ठरावीक पैसे द्यावेत आणि ते पैसे भरल्याची खूण म्हणून पत्राच्या लिफाफ्यावर एक छोटासा कागदी तुकडा चिकटवण्यात यावा. या कागदी तुकड्यावर किती पैसे भरले, ती किंमत लिहिलेली असावी नि नाण्यावर जसं राजा किंवा राणीचं मुंडकं कोरलेलं असतं, तसंच चित्र छापलेले असावं, या सगळया कल्पना वॉलेसच्याच. ब्रिटिश पार्लमेंटने या सुधारणा मान्य केल्या. १८३६ साली राजकुमारी अलेक्झान्ड्रिना व्हिक्टोरिया, ही फक्त १८ वर्षांची राजकन्या ब्रिटनची राणी बनली होती आणि १८४० साली तिने प्रिन्स अल्बर्टबरोबर विवाह केला होता. अवघी २१ वर्षं वयाची राणी व्हिक्टोरिया ब्रिटिश जनतेमध्ये फार लोकप्रिय बनली होती. साहजिकच सरकारी टपाल खातं छापणार असलेल्या पहिल्या-वाहिल्या डाक तिकिटावर तिची मुद्रा यावी, असं ठरलं.
दि. १० एप्रिल, १८४० या दिवशी हे पहिलं डाक तिकीट चिकटवलेला लिफाफा ‘चान्सलर ऑफ एक्सचेकर’ म्हणजेच केंद्रीय अर्थमंत्री फ्रान्सिस बेअरिंग याने मोठ्या समारंभाने खासदार रॉबर्ट वॉलेस याला दिला. टपाल खात्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी वॉलेसने जे परिश्रम केले, त्याबद्दल गौरव म्हणून त्याचा हा सन्मान करण्यात आला. प्रत्यक्षात दि. ६ मे, १८४० पासून हे डाक तिकीट सर्वांना उपलब्ध झालं आणि त्यांच्या रंगामुळे ‘ब्लॅकपेनी’ या नावाने लोकप्रिय झालं.
पुढच्याच वर्षी म्हणजे १८४१ साली ब्रिटिश टपाल खात्याने हेच एक पेनी किमतीचं डाक तिकीट रंगीत छापलं. लाल रंगाचं हे तिकीट ‘रेड पेनी’ म्हणून लोकप्रिय झालं. टपाल खात्याचं काम सार्वजनिक करून पत्रांच्या ने-आण करण्याकरिता डाक तिकीट लावण्याची ही संकल्पना अल्पावधीतच सर्व युरोपीय देशांमध्ये, त्यांच्या वसाहतींमध्ये आणि अमेरिकेत पसरली. लगेचच डाक तिकिटांचा संग्रह करण्याची कल्पना पॅरिसमधल्या एका पोस्टमास्तरच्याच मनात आली. मॅन्सन असं त्याचं आडनावच फक्त आज ज्ञात आहे. १८६४ साली जॉर्ज हर्पिन या आणखी एका फ्रेंच तिकीट संग्राहकाने ‘फिलाटेली’ असं नावचं या छंदाला दिलं, तेव्हापासून जगभरातल्या सर्व देशांमध्ये ‘फिलाटेलिक’ सोसायट्या, क्लब म्हणजे डाक तिकिटांचा संग्रह करण्याचा छंद जोपासणाऱ्या लोकांचे गट, मंडळं निघाली. भारतात पहिली ‘फिलाटेलिक’ सोसायटी १८९७ साली कोलकत्याला निघाली.
आता यानिमित्ताने आपण भारताच्या टपाल व्यवस्थेवर एक नजर टाकूया. ‘टप्पा’ किंवा मूळ तुर्की शब्द ‘तप्पा’ म्हणजे उंचवट्याची जागा. राज्याच्या मुख्य नगरापासून राज्यातल्या सर्व महत्त्वाच्या केंद्रांपर्यंत व्यापारी आणि लष्करी मार्ग होते. या मार्गावरूनच सरकारी आणि व्यापारी पत्रांचीही ने-आण चालत असे. पायी चालत किंवा धावत पत्र वाहून नेणाऱ्या लोकांना ‘जासूद’, ‘काशीद’, ‘लब’ किंवा ‘हरकारा’ असं म्हटलं जाई. शिवाय अधिक वेगाने जाण्यासाठी घोडा आणि कमाल वेगाने जाण्यासाठी सांडणी म्हणजे उंटीण यांची व्यवस्था सरकारातून केली जात असे. उंटापेक्षाही उंटीण जास्त वेगाने धावते. त्यावरून ‘सांडणीस्वार’ हा शब्द आला. “महाराज खानाकडून खलिताची थैली घेऊन ‘हरकारा आला आहे’ किंवा ‘घोडेस्वार आला आहे’ किंवा ‘सांडणीस्वार आला आहे’,” या शब्दांमधून पत्रं किती तातडीच आहे, साधं किंवा ‘स्पीड पोस्ट’ किंवा ‘टेलिग्राम’ हे कळत असे. या लोकांना आणि त्यांच्या जनावरांना वाटेत ठरावीक टप्प्यावर म्हणजेच वाटेतल्या ठरावीक उंचवट्याच्या जागेवर विश्रांतीसाठी अन्न-चारा पाणी किंवा बदली माणूस आणि जनावर मिळण्यासाठी जी ‘सराई’ किंवा ‘उतारगृह’ असे, ती ‘टपाल कचहरी’ म्हणजेच टपाल कार्यालय किंवा डाकचौकी किंवा नंतर ‘ईस्ट इंडिया’ कंपनीच्या काळात ‘डाक बंगला.’ डाक किंवा मूळ ‘डॉक’ या फारसी शब्दाचा अर्थ मोठ्या-मोठ्या मजला मारत एका ठिकाणांहून दुसऱ्या ठिकाणी जाणे.
शिवशाही, पेशवाईमध्येही डाक-टपाल व्यवस्था होतीच. मात्र, ती फक्त सरकारी आणि व्यापारी व्यवहारापुरती होती. अन्य समाजातले प्रतिष्ठित लोक एकमेकांना पत्र पाठवण्यासाठी खासगी नोकरांचा वापर करत असावेत. योगी चांगदेवांनी आपल्या शिष्यहाती ज्ञानेश्वरांना पाठवलेलं कोरं पत्र त्या पत्राला उत्तर म्हणून ज्ञानेश्वरांनी चांगदेवांना लिहून पाठवलेल्या ६५ ओव्या प्रसिद्धच आहेत. दि. १४ जानेवारी, १७६१ रोजी पानिपतावर मराठ्यांचा दारूण पराभव झाला. त्यांच वर्णन करणारं ‘दोन मोत्ये गळाली, बाकी अश्रफी, खुर्दा किती गेल्या त्याची गणती नाही’ हे सांकेतिक व्यापारी भाषेतलं पत्र आहे. ते नानासाहेब पेशव्यांना २४ जानेवारीला पुण्यात मिळालं.
आधुनिक भारतीय टपाल खात्याचा उगम मात्र ‘ईस्ट इंडिया’ कंपनीच्या कारभारातून झालेला आहे. ‘ईस्ट इंडिया’ कंपनीने आपलं पहिलं टपाल कार्यालय १६८८ साली मुंबईत उघडलं. यावेळी महाराष्ट्रात छत्रपती शंभुराजे औरंगजेबाशी प्रचंड झुंज देत होते. पुढे आणखी ८६ वर्षांनी म्हणजे १७७४ साली गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज याने पोस्टसेवा सर्वसामान्य जनतेला खुली केली. ब्रिटनचा तत्कालीन पोस्टमास्टर जनरल हेन्री बिशप याच्या नावाचा शिक्का मारून आणि दर १०० मैलांना दोन आणे असा दर लावून ‘ईस्ट इंडिया’ कंपनी कुणाचंही पत्र घेऊन जात असे. या पत्रांना ‘इंडियन बिशप मार्क’ असं म्हणतात. आजच्या डाक तिकीट संग्राहकांच्या जगात ही ‘बिशप मार्क’ पत्रं अत्यंत दुर्मीळ आणि म्हणूनच अत्यंत मौल्यवान समजली जातात. यावेळी पेशवाईत राघोबा दादाने पुतण्या नारायणरावांचा खून पाडला होता.
हे सगळं इंग्रज, पेशवाई, शिवशाही आणि त्या आधीच्या सुलतानी काळातलं झालं, पण मग हिंदू राज्यव्यवस्थेत टपाल यंत्रणा कशी होती? कारण, अथर्ववेदात संदेशवहन यंत्रणेचा उल्लेख आहे. तात्पर्य, संशोधनास भरपूर वाव आहे.