कांदळवनाच्या संरक्षणासाठी झटून त्यावर आधारित उपजीविका योजनेच्या माध्यमातून लोकांना रोजगाराची संधी देणारी वनदुर्गा म्हणजे चेतना एकनाथ शिंदे...
नवरात्रीच्या जागराला सुरुवात झालेली असताना समाजातील स्त्री तत्त्वांच्या कौतुक सोहळ्यालाही प्रारंभ झाला आहे. वनविभागासारख्या प्रचंड अंगमेहनत आणि साहसी कामांसाठी ओळखल्या जाणार्या विभागातील महिला अधिकार्यांचे कौतुकही या जागरात करणे आवश्यक आहे. कांदळवनासारख्या दुर्लक्षित पर्यावरणीय परिसंस्थेच्या संवर्धनासाठी झटणार्या वनाधिकारी म्हणजे चेतना शिंदे.
त्या भिवंडीमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी, कांदळवन कक्ष म्हणून कार्यरत आहेत. जवळपास एक हजार, ९७६ हेक्टर क्षेत्रावर पसलेल्या कांदळवनाच्या रक्षणाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. कामसू, जिगरबाज आणि प्रामाणिक वृत्तीने काम करण्यासाठी त्या ओळखल्या जातात. लोकांना उपजीविकेचे साधन निर्माण करून देत त्यांच्या मदतीने कांदळवन संवर्धनाचे काम सध्या त्या करत आहेत.
शिंदे यांचा जन्म दि. ३ ऑगस्ट, १९८८ रोजी मुंबईत झाला. त्याचे शालेय शिक्षण मुंबईत आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबई आणि दापोलीत झाले. दापोली कृषी विद्यापीठामधून त्यांनी ‘अॅग्रिकल्चर’मधून पदवीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर २०१२ साली गुजरातच्या आनंद विद्यापीठामधून त्यांनी ‘कृषी-अर्थशास्त्र’ विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पदव्युत्तर शिक्षणानंतर त्यांच्यासमोर एकतर ‘पीएच.डी.’ आणि दुसरा म्हणजे स्पर्धा परीक्षांचा मार्ग खुला होता. मात्र, त्यांनी लहानपणापासूनच सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न मनी बाळगले होते.
त्यामुळे साहजिकच त्यांचा कल स्पर्धा परीक्षांच्या दिशेने होता. २०१२ साली त्यांनी ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगा’च्या परीक्षांसाठी अभ्यास करण्यास सुरुवात केली. दरम्यानच्या काळात त्यांनी आयोगाच्या वेगवेगळ्या परीक्षाही दिल्या. त्यामध्ये ‘महाराष्ट्र वनसेवे’च्या परीक्षेचाही समावेश होता. २०१६ साली शिंदे ‘महाराष्ट्र वनसेवे’ची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि त्यांचे स्वप्न पूर्ण झाले. मात्र, त्यांना या विभागासंबंधी कौटुंबिक किंवा सामाजिक पार्श्वभूमी नव्हती. कृषिक्षेत्राचा अभ्यास असल्याने केवळ त्याचे शास्त्रीय ज्ञान होते. परंतु, वनपरिसंस्थेची माहिती नव्हती. त्यामुळे वनविभाग आणि इथल्या पर्यावरणीय परिसंस्थांची माहिती जाणून घेण्यासाठी वनसेवेत दाखल होण्यापूर्वी झालेल्या वनप्रशिक्षणाची त्यांना मदत झाली. साधारण दीड वर्ष हे प्रशिक्षण पार पडले. परिणामी, या काळात वनपरिसंस्था समजून घेण्यामधील त्यांची रुची वाढत गेली.
वनप्रशिक्षणानंतर २०१८ मध्ये शिंदे वनसेवेत रुजू झाल्या. शहापूर सर्कलमधील खर्डी वनपरिक्षेत्रामध्ये त्यांची ‘प्रोबेशन’ कालावधीसाठी नियुक्ती करण्यात आली. या पाच ते सहा महिन्यांच्या काळात त्यांनी वनविभागातील विविध विभागांमध्ये होणारे कामकाज समजून घेतले. पुढे त्याच दरम्यान वनविभागांतर्गत कांदळवन संवर्धनासाठी काम करणार्या कांदळवन कक्षामध्ये काही नवीन परिक्षेत्र तयार करण्यात येत होती. याअंतर्गत तयार होणार्या भिवंडीच्या वनपरिक्षेत्र अधिकारी या पदासाठी शिंदे यांना विचारणा करण्यात आली आणि ऑगस्ट, २०१८मध्ये त्या भिवंडी वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून रुजू झाल्या.
भिवंडीमध्ये रुजू झाल्यानंतर शिंदे यांनी प्रादेशिक विभागाशी समन्वय साधून तिथल्या कांदळवन क्षेत्राची माहिती जाणून घेतली. प्रत्यक्ष फिरून आपल्या ताब्यात येणार्या जागांची पाहणी केली. तसेच कांदळवन आधारित उपजीविका योजनेअंतर्गत कोणते प्रकल्प भिवंडी कांदळवन क्षेत्रात सुरू करता येतील, याचा मागोवा घेतला. या काळात त्याच्या मदतीसाठी कर्मचारी आणि कांदळवन प्रतिष्ठानाअंतर्गत प्रकल्प साहाय्यकांची नियुक्ती झाली. त्यामुळे त्यांच्या कामाला बळ मिळाले. १ जानेवारी, २०२० साली प्रादेशिक वनविभागाकडून भिवंडीमधील कांदळवन क्षेत्र ‘कांदळवन कक्षा’च्या ताब्यात देण्यात आले आणि तेव्हापासून शिंदे यांच्या कामाला खर्या अर्थाने सुरुवात झाली. उपजीविका प्रकल्पाअंतर्गत मालोडी येथे त्यांनी जिताडा (मासा) पालन प्रकल्प सुरू केला. मात्र, कामाला सुरुवात झाल्याच्या चार महिन्यांमध्येच देशव्यापी ‘लॉकडाऊन’ लागला आणि ‘लॉकडाऊन’च्या कठीण काळातच शिंदे यांनी विविध कामे केली.
एप्रिल महिन्यामध्ये ‘लॉकडाऊन’चा फायदा उचलून खारबाव येथे कांदळवनांची तोड करून त्यावर बांध घालण्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी वरिष्ठांच्या मदतीने तातडीने त्या ठिकाणी धाव घेत बांधकामासाठी आलेली वाहने ताब्यात घेतली. त्यानंतर पुढील दोन-तीन महिन्यांमध्ये त्यांनी शेतीसाठी कांदळवन क्षेत्रावर झालेल्या अतिक्रमणाची प्रकरणे हाताळली. शेती करण्यासाठी कांदळवन क्षेत्रावर होणारे अतिक्रमण लक्षात आल्यावर त्यांनी ग्रामपंचायतींना भेट देऊन हे काम अवैध असल्याची माहिती दिली. त्यामुळे गावकर्यांमध्ये कांदळवनाविषयी जागरूकता निर्माण झाली. त्याच काळात ‘लॉकडाऊन’पूर्वी सुरू केलेल्या ‘जिताडा’ पालन प्रकल्पामधून तयार झालेले जिताडे विकून तिथल्या लाभार्थ्यांना सुमारे एक लाख, ४० हजार रुपयांचा फायदा झाला.
‘लॉकडाऊन’मध्ये शिथिलता आल्यानंतरही शिंदे यांनी कादळवनांवर होणार्या अतिक्रमणाबाबत अनेक यशस्वी कारवाया केल्या. त्यांनी कांदळवनांमधून गावकर्यांना उपजीविका निर्माण करून देण्यासाठी ‘जिताडा’ पालन आणि शोभिवंत मत्स्यपालनाचे प्रकल्प सुरू केले आहेत. तसेच साधारण ३१ हेक्टर क्षेत्रावर नव्याने कांदळवनांची लागवड केली आहे. त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा!