अफगाणी बालके धोक्यात

08 Oct 2021 12:19:04

UNICEF_1  H x W
तालिबानने हिंसाचाराच्या माध्यमातून अफगाणिस्तानची सत्ता बळकावली आणि त्या देशात अराजकाला सुरुवात झाली. देशातील मुली-महिला, अल्पसंख्याक समुदायांचे जिणे मुश्कील झाले, तालिबानी कट्टरतेसमोर अनेकांना आपला जीवही गमवावा लागला. आता अफगाणिस्तानवर कब्जा केलेल्या तालिबानी सत्तेची किंमत त्या देशातील लाखो बालकांनाही चुकवावी लागत आहे. नुकताच ‘युनिसेफ’ने अफगाणिस्तानातील बालकांच्या स्थितीच्या अनुषंगाने एक अहवाल सादर केला, त्यातून ही माहिती समोर आली असून, त्या देशातील लाखो बालकांना तातडीच्या मदतीची आवश्यकता असल्याचे आवाहन ‘युनिसेफ’ने केले आहे. तालिबानच्या ताब्यानंतर अफगाणिस्तानला आतापर्यंत साहाय्य करणाऱ्या अनेक जागतिक संस्थांनी देश सोडला व इथल्या बालकांच्या अडचणींत वाढ झाली. विशेष म्हणजे, ही बालके अगदी सुरुवातीपासूनच मानवी आणि परकीय साहाय्यतेवरच आश्रित होती. तथापि, अफगाणिस्तानवरील तालिबानचे नियंत्रण आणि सरकारच्या गठनानंतर परिस्थिती बिकट होत चालली आहे. देशात अन्न आणि पाण्यासारख्या मूलभूत गरजांच्या कमतरतेने अनेक लोक भूकबळी ठरत आहेत. देशातील मोठी लोकसंख्या भूकबळीशी झुंजत असताना बालकांची स्थिती मात्र अतिशय दयनीय झाली आहे. त्यावरच ‘युनिसेफ’ने अहवाल तयार केला असून, धोक्याचा इशारा दिला आहे. ‘युनिसेफ’चा अहवाल धक्कादायक असून त्यानुसार चालू वर्षात अफगाणिस्तानातील दहा लाखांपेक्षा अधिक बालके भूकबळी ठरू शकतात. इतक्या मोठ्या संख्येने बालके कुपोषित होऊ शकतात किंवा अन्नाची अनुपलब्धता आणि अनारोग्यामुळे या बालकांचा जीवही जाऊ शकतो, तर अन्य एका अंदाजानुसार अफगाणिस्तानातील किमान ४२ लाख बालके शालेय शिक्षणापासून वंचित आहेत, त्यात २२ लाख मुलींचा समावेश आहे. ‘डब्ल्यूपीएफ’च्या आकडेवारीनुसार अफगाणिस्तानमध्ये सुमारे २० लाख बालके कुपोषित आहेत. आंतरराष्ट्रीय संस्थांच्या मते, या समस्येवर युद्धपातळीवर तोडगा काढला नाही, तर यातून गंभीर मानवी संकट उत्पन्न होऊ शकते. यामुळे चालू वर्षाच्या अखेरपर्यंत लाखो बालकांना गंभीर आणि जीवघेण्या कुपोषणाचा सामना करावा लागू शकतो.
 
 
 
दरम्यान, अफगाणिस्तानच्या घोर प्रांतात गेल्या सहा महिन्यांत १७ बालकांचा कुपोषणाने मृत्यू झाला आहे. आता अफगाणिस्तानवर तालिबानी शासन आल्याने कुपोषणाने जीव जाणाऱ्या बालकांच्या संख्येत आणखीही वाढ होऊ शकते. ‘युनिसेफ’च्या कार्यकारी व्यवस्थापक हेनरीटा फोर याबाबत म्हणाल्या की, “आम्ही तालिबान आणि अन्य पक्षांना ‘युनिसेफ’ आणि आमच्या सहकाऱ्यांना गरजू बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी सुरक्षा पुरवण्यात साहाय्य करावे, असे आवाहन करतो.” त्या म्हणाल्या की, “देशात मूलभूत सोयी-सुविधांचा प्रचंड अभाव आहे. अन्न आणि पाण्याच्या पुरेशा पुरवठ्याअभावी कितीतरी लोकांना भूकबळीच्या गर्तेत ढकलले आहे. आमच्या अंदाजानुसार येणाऱ्या महिन्यांत देशात भीषण दुष्काळ पडू शकतो. त्याचे विनाशकारी परिणाम होऊ शकतात. थंडीच्या सुरुवातीला बालके आणि महिलांच्या गरजांमध्ये वाढ होईल. पण, त्या भागवणारी साधनसामग्री त्यावेळी नसेल.” दरम्यान, ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ कार्यालयाच्या मते, अफगाणिस्तानची लोकसंख्या ३०.९ कोटी आहे, त्यातील १४ कोटी लोकांसमोर दोन वेळच्या अन्नाचे गंभीर संकट उभे ठाकले आहे. तर अफगाणिस्तान तीन वर्षांत दुसऱ्यांदा भयावह दुष्काळाचा सामना करत आहे, यामुळे देशाची परिस्थिती अतिशय वाईट झाली आहे. दरम्यान, अफगाणिस्तानवर तालिबानी राजवटीनंतर त्या देशाला दिली जाणारी परकीय मदत स्थगित करण्यात आली आहे. तालिबानी शासनानंतर जागतिक बँकेने अफगाणिस्तानला दिली जाणारी आर्थिक मदत आणि कोट्यवधींचा निधी पुरवठा रोखला आहे. जागतिक बँकेने अफगाणिस्तामध्ये २००२ सालापासून आतापर्यंत किमान ५.३ अब्ज डॉलर्स खर्च केले आहेत. अफगाणिस्तानत जागतिक बँकेच्या २७ योजना चालू आहेत. पण, त्यांनाही निधी दिला जाणार नाही. गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय नाणे निधीनेदेखील तालिबानला कोणत्याही प्रकारचे साहाय्य देण्यापासून मनाई केली आहे. एकूणच आर्थिक कंगालावस्थेने देशात अन्न व पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे व त्याचा फटका अफगाणिस्तानातील बालकांना बसणार, असे दिसते.
 
 
Powered By Sangraha 9.0