नवरात्रोत्सवानिमित्त देवीच्या विविध रूपांचा जागर करताना दै. ‘मुंबई तरुण भारत’ विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या नवदुर्गांची प्रेरणा ७ ते १४ ऑक्टोबर या कालावधीत प्रसिद्ध करणार आहे. आज गुरुवार, दि. ७ ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. कोणताही सांस्कृतिक कार्यक्रम असो, प्रारंभी शारदावंदन केले जाते. या परंपरेलाच अनुसरून लेखमालेतील पहिला लेख एकविसाव्या शतकातील आधुनिक सरस्वती डॉ. शकुंतला गावडे यांच्या विद्याकर्तृत्वाला वंदन करणारा...
शालेय जीवनात उत्तम गुण असतील, तर विज्ञान शाखेकडे जाण्याचा प्रवाह असतानाही प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन डॉ. शकुंतला गावडे यांनी संस्कृतची आवड शाळेपासून जोपासली, वृद्धीत केली आणि आज त्यांनी केलेल्या विद्याकार्याचा अनेक विद्यार्थ्यांना लाभ होत आहे.
डॉ. शकुंतला गावडे या मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या विभागप्रमुख आणि मराठी विश्वकोशाच्या ‘जागतिक धर्म आणि तत्त्वज्ञान परिषदे’च्या समन्वयिका आहेत. त्यांनी ‘संस्कृत’ आणि ‘वेदांग ज्योतिष’ या विषयांमध्ये पदवी, तर संस्कृतमध्ये पदव्युत्तर पदवी सुवर्णपदक प्राप्त करून पूर्ण केली. ‘एस्केटोलॉजी इन उपनिषद’ या विषयात ‘एमफील’, तर ‘एस्केटोलॉजी इन वैदिक लिटरेचर कम्पेअर विथ द वेस्टर्न फिलॉसॉफी’ या विषयामध्ये मुंबई विद्यापीठाची ‘पीएच.डी’ संपादित केली आहे. वेदान्त, उपनिषदे, तत्त्वज्ञान, पुराणे या विषयांचा त्यांचा अभ्यास असून, त्यांनी अनेक राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांमध्ये अभ्यासपूर्ण सहभाग घेतला आहे.
मुंबईतील ‘रामनारायण रुईया महाविद्यालया’च्या विद्यार्थिनी असणार्या डॉ. शकुंतला गावडे यांना डॉ. उमा वैद्य, डॉ. गौरी माहुलीकर, डॉ. सिंधू डांगे यांसारख्या संस्कृत विद्वतजनांचे मार्गदर्शन लाभले आणि त्यातूनच त्यांची संस्कृतची आवड वृद्धिंगत झाली आणि योग्य दिशा मिळाली. ‘आपण संस्कृतभाषेच्या संवर्धन आणि संशोधनासाठी काहीतरी केले पाहिजे’ हे बीज मनात ठेवून त्यांनी संस्कृतसाहित्यातील संशोधन कार्यास सुरुवात केली. बँकॉक, कॅनडा, केलानिया विद्यापीठ श्रीलंका येथे, तर चिन्मय विश्वविद्यालय, केरळ, भक्तिवेदान्त विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ येथे संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय संशोधन चर्चासत्रांमध्ये त्यांनी सहभाग घेतला. वेदान्त किंवा तत्त्वज्ञान यासारख्या कठीण वाटणार्या विषयांना विद्यार्थिकेंद्रित ठेवून सुलभ करण्याचे त्यांनी प्रयोग केले. त्यातीलच एक म्हणजे ‘फिल्म अॅण्ड फिलॉसॉफी’ या उपक्रमाद्वारे फिल्म्सच्या आधारे त्यांनी विद्यार्थ्यांना त्यातील तत्त्वज्ञान उलगडून दाखवले. या प्रयोगावरती त्यांनी चिन्मय विश्वविद्यालयात २०१७मध्ये हा संशोधन निबंध सादर केला.
या शोधनिबंधाला ‘बेस्ट रिसर्च पेपर अॅवॉर्ड’देखील मिळाला. ‘एस्केटोलॉजी इन वैदिक लिटरेचर कम्पेअर्ड विथ द वेस्टर्न फिलॉसॉफी’ या त्यांच्या प्रबंधामध्येदेखील ‘आत्मा’ ही संकल्पना, आत्म्याचा मृत्यूनंतर होणारा प्रवास, स्वर्ग आणि नरक संकल्पना, पुनर्जन्म यांचा तत्त्वज्ञानाच्या आधारे विश्लेषणात्मक अभ्यास केला. केलानिया विद्यापीठ, श्रीलंका येथे त्यांना ‘व्हिजिटिंग फेलो’ म्हणून आमंत्रित केलेले होते. तसेच या विद्यापीठात संपन्न झालेल्या ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑफ संस्कृत स्टडीज्’ या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात ‘लाईफ आफ्टर डेथ इन वैदिक लिटरेचर’ या विषयावर ‘पॅनेल डिस्कशन’मध्ये त्यांनी अभ्यासपूर्ण सहभाग घेतला.
डॉ. शकुंतला गावडे यांचे वैदिक-संस्कृत साहित्य, धर्म आणि तत्त्वज्ञान, भक्ती आदी विविध विषयांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर नऊ, राष्ट्रीय स्तरावर १६ आणि राज्य स्तरावर पाच शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. ‘हेराज इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन हिस्ट्री अॅण्ड कल्चर’, ‘सेंट झेव्हिअर कॉलेज, मुंबई’, ‘सर दोराबजी टाटा ट्रस्ट’ यांच्या ‘भागवत पुराण’ या प्रकल्पाकरिता त्यांनी संशोधिका म्हणून कार्य केले. ‘स्प्रिंगर’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये ‘एन्सायक्लोपीडिया ऑफ हिंदूइजम अॅण्ड ट्रायबल रीलिजन’ या विषयावरती १३ लेखांचे योगदान दिले आहे. कला शाखेमध्ये प्रवेश घेऊन मळलेल्या वाटेवरून न जाता, त्यांनी संस्कृतमधील संशोधनाचा मार्ग निवडला.
आज त्या स्वत: संशोधन करताना मुंबई विद्यापीठाच्या सन्माननीय ‘पीएच.डी’ मार्गदर्शिका आहेत, तसेच अनेक संशोधकांना त्या अभ्यासपूर्ण साहाय्यदेखील करत आहेत. डॉ. शकुंतला गावडे या १६४ वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या संस्कृत विभागाच्या विभागप्रमुख आहेत. या पदाविषयी त्या आदराने बोलताना म्हणतात, “विद्वतजनांची परंपरा असणार्या संस्कृत विभागाचे स्वतंत्र भवन डॉ. गौरी माहुलीकर यांच्या प्रयत्नातून साकार झाले. हे संस्कृत भवन संस्कृत प्रेमीजन, विद्यार्थी यांच्या साहाय्याने आधुनिक काळासाठी सुसज्ज आणि विद्यादालन करण्याचा मानस आहेच.” तसेच आंतरराष्ट्रीय संस्था, विद्यापीठे यांच्या सहकार्याने संस्कृत विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. गावडे प्रयत्नरत आहेत. त्यासाठी आयोजित विविध कार्यशाळा, कोर्सेस यामध्ये त्या मार्गदर्शन करतात.
डॉ. शकुंतला गावडे यांना महाविद्यालयीन जीवनापासून विविध पुरस्कार मिळाले आहेत. त्यातील चिन्मय विश्वविद्यालयातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात त्यांच्या शोधनिबंधाला ‘बेस्ट रिसर्च पेपर’ पुरस्कार मिळाला. तसेच शैक्षणिक आणि अभ्यासेतर क्षेत्रात दिलेल्या संशोधन आणि अध्यापन कार्याकरिता शिक्षणक्षेत्रातील सन्माननीय ‘अॅकॅडमिस्तान टीचर अॅवॉर्ड २०२१ (यंग टीचर्स अॅवॉर्ड ह्युमॅनिटीज्) त्यांना ‘युजीसी’चे चेअरमन प्रा. डी. पी. सिंघ यांच्या आभासी उपस्थितीत देण्यात आला.
विद्वत्त्वं दक्षता शीलं सङ्कान्तिरनुशीलनम्। शिक्षकस्य गुणाः सप्त सचेतस्त्वं प्रसन्नता॥ हे आदर्श गुरूचे सात गुण सांगणारे सुभाषित डॉ. शकुंतला गावडे यांना यथार्थ ठरते. संस्कृत या प्राचीन भाषेमध्ये संशोधनाचे कार्य करणार्या तसेच विद्यार्थिप्रिय असणार्या डॉ. शकुंत ला गावडे या आधुनिक काळातील शारदेचेच जणू रूप आहेत...
संस्कृतप्रेमींकरिता विविध उपक्रम
डॉ. शकुंतला गावडे यांनी संस्कृतप्रेमींकरिता विविध उपक्रम राबवले, तथा त्या राबवतही आहेत. या उपक्रमांची माहिती https://sanskritbhavan.mu.ac. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच डॉ. शकुंतला गावडे यांचे संशोधन निबंध तथा त्यांची व्याख्यानेwww.shakuntalagawde.com या संकेतस्थळावर पाहता येतील.
- वसुमती करंदीकर