नखशिखांत कलाव्रती!

06 Oct 2021 11:33:36

Kiran Jagtap_1  
 
 
‘नखांजली’ या कलेच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण करणारे नाशिकचे नखशिखांत कलाव्रती किरण जगताप यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख...
 
 
"रेखांजली शब्द मला परिचयाचा आहे. पण, तुझ्या कलेला मात्र ‘नखांजली’ म्हणावं असं मला वाटतं,” किरण जगतापांनी साकारलेले आपले ‘नखचित्र’ पाहताना कुसुमाग्रज म्हणाले आणि या आगळ्यावेगळ्या कलेला तिचे नाव मिळाले, असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. व्यवसायाने ‘आर्किटेक्ट’ व ‘इंटिरिअर डिझायनर’ असणाऱ्या नाशिकचे किरण जगताप यांचा नखचित्रांच्या अनवट वाटेवरचा प्रवास सुरू झाला, तो वयाच्या दहाव्या वर्षांपासून. या क्षेत्रातले त्यांचे गुरू व मार्गदर्शक होते उत्तम चित्रकार असणारे त्यांचे वडील मोरेश्वर जगताप.
 
 
चित्रकारांच्या हातात कला असते. रंगरेषांच्या विविध माध्यमांत ते वावरत असतात, हा सर्वसाधारण समज. ‘नखांजली’त मात्र ही कला कलाकाराच्या बोटांच्या नखात एकवटते. यासाठी आवश्यकता असते ती समोरच्या जाडसर ‘हॅण्डमेड’ कोऱ्या कागदावर विशिष्ट आकृती साकारण्यासाठी लागणाऱ्या दृष्टीची. हाताचे मधले बोट व अंगठा यांच्या चिमटीत कागद फिरवून त्यावर ठरलेला आकार साकारणे ही एक प्रकारची साधनाच!
 
 
“सतत फिरवला जाणारा कागद फाटू नये किंवा चित्र बिघडू नये यासाठी काळजी घ्यावी लागते. कुठल्याही कलेसाठी आवश्यक असतो तसाच सराव इथेही करावा लागतो,” असे ‘नखांजली’विषयी बोलताना किरण जगताप सांगतात.
 
 
गेली जवळपास ३० वर्षे चित्रांच्या या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या किरण जगताप यांची सुरुवात मात्र लहानशा पोस्टकार्ड साईजच्या पेपरपासून झाली. फुले व प्राण्यांच्या चित्रांपासून झालेली सुरुवात पुढे ‘पोट्रेट’ साकारण्यापर्यंत गेली व लोकमान्य टिळक, राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, गजानन महाराज अशी अनेक व्यक्तिचित्रे त्यांनी साकारली आहेत. कला आत्मसात होऊ लागली तसे तिचे रूपांतर छंदात झाले व पुढे ‘ए-४’-‘ए-३’ साईज ते त्याहूनही मोठमोठ्या कागदांवर कलेचे विविध आविष्कार त्यांच्याकडून साकारले जाऊ लागले. वडिलांनी कलेचा पाया रचून दिल्यानंतर आपण त्यात पुढे विविध प्रयोग करत हे माध्यम विकसित केले व ही कला नावारूपाला आणण्याचा प्रयत्न केला, असे किरण जगताप आवर्जून नमूद करतात. अलंकारिक शैली, पक्षी, कार्टून्स, पंचनदी तसेच व्यक्तिचित्र अशा अनेक चित्रमालिका किरण जगताप यांनी साकारल्या आहेत व रसिकांकडून त्यांचे वेळोवेळी कौतुकही होत असते. गणेश मालिकेतील मूर्त व अमूर्त शैलीतील त्यांनी साकारलेल्या प्रतिमा विलक्षण आहेत. चित्रकारांच्या बोटांमध्ये कला आणि जादू असते, असे म्हटले जाते, 'Art at his fingertips' हे वर्णन किरण जगतापांसाठी शब्दशः खरे ठरते, असेच त्यांचे कार्य पाहून वाटते.
 
 
महाविद्यालयामध्ये असताना एका मित्राने काही नखचित्रे महाविद्यालयाच्या नोटीस बोर्डवर लावली, हे किरण जगताप यांच्या चित्रांचे पहिले प्रदर्शन असल्याचे ते आवर्जून सांगतात. पहिल्याच प्रदर्शनात त्यांच्या कलेला भरभरून प्रतिसाद मिळाला. पुढे महाराष्ट्रातील अनेक लहान-मोठ्या शहरांमध्ये विविध नामांकित संस्थांकडून त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले. कलाक्षेत्रातील दिग्गज मंडळी तिथे उपस्थित राहू लागली. आपल्या वेगळेपणामुळे उमटून दिसणाऱ्या या कलेसाठी किरण जगताप यांना अनेक अभिप्राय मिळाले. त्यापैकी पु. ल. देशपांडे यांनी, ’‘मला माझी सही नखचित्रातून करायला शिकव” हे सांगणे तसेच किरण जगताप यांनी साकारलेला ‘कॉमन मॅन’, जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आर. के. लक्ष्मण यांनी संग्रही ठेवणे, हे त्यांना ही कला जोपासण्यासाठी प्रोत्साहन देणारे ठरले. तसेच बाबासाहेब पुरंदरे, पं. भीमसेन जोशी यांनी दिलेले आशीर्वाददेखील त्यांच्यासाठी मोलाचे ठरले आहेत. कलेची अभिव्यक्ती सातत्याने उत्क्रांत होत असते. प्राचीन काळी संवाद साधण्यासाठी मानव गुहांमध्ये दगडांच्या माध्यमातून चित्रे साकारत ते आज एकीकडे ‘डिजिटल पेंटिंग्स’ होऊ लागलेली असली तरी कला साकारण्यासाठी असणाऱ्या ऊर्मीमध्ये बदल होत नाही. माध्यमांचे बंधन कलेच्या प्रामाणिक आविष्काराला कधीच नसते, हेच किरण जगताप यांच्या ‘नखांजली’ या कलेमधून प्रकर्षाने जाणवते.
 
 
या कलेची वाट चालणारे संपूर्ण जगभरातून आजही अगदी मोजकेच कलाकार आहेत. अत्यंत कमी साधनांतून चित्र साकारणाऱ्या या कलेला जगभर पोहोचवण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत व त्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे हे आपले दायित्व आहे, असेच किरण जगताप यांना वाटते. विविध वृत्तपत्रे, आकाशवाणी, वृत्तवाहिन्यांमधून झालेल्या मुलाखती, शाळा महाविद्यालयांमध्ये होणारे सराववर्ग, चित्रप्रदर्शने व प्रदर्शनादरम्यान किरण जगताप यांनी करून दाखवलेली चित्रांची प्रात्यक्षिके यातून महाराष्ट्रात या कलेची ओळख होत आहे. येत्या काळात महाराष्ट्राबाहेरही चित्र प्रदर्शन भरवत ‘नखांजली’चा विस्तार करण्याचाही किरण जगताप यांचा मानस आहे.
 
 
अनावश्यक वाढल्यावर काढून टाकावा असा घटक म्हणजे नखे. मात्र, याच नखांच्या साहाय्याने कला वाढविता येते, मांडता येते हेच किरण जगताप यांच्या कार्यावरून दिसून येते. कला व्यक्त करण्यासाठी आणि साकारण्यासाठी निसर्गाने आपल्याच शरीरात सुविधा दिली आहे. हेच ‘नखांजली’ हा कला प्रकार पाहताना दिसून येते. जगताप यांच्या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
Powered By Sangraha 9.0