अंतराळातून युद्धाचे आव्हान

31 Oct 2021 21:09:58

हायपरसोनिक_1  H
सध्या जागतिक व्यवस्थेत अंतराळातून येणार्‍या ‘हायपरसोनिक’ क्षेपणास्त्रांचा इशारा देणारी किंवा त्याला प्रतिबंध करणारी यंत्रणा नाही. सध्या उपलब्ध असलेली हवाई संरक्षण यंत्रणा केवळ पारंपरिक क्षेपणास्त्रांवरच काम करू शकते. एवढेच नाही, तर अंतराळातून डागलेल्या ‘हायपरसोनिक’ क्षेपणास्त्रांनी हवाई संरक्षण यंत्रणाही नष्ट केली जाऊ शकते. मानव म्हणून, आपल्याला जितकी शांतता हवी आहे, तितकीच आपल्याला युद्धाबद्दलची भीती आहे.
 
 
या समस्येचे भयावह सत्य हे आहे की, या समस्येचा आरंभकर्तादेखील मानवच आहे. युद्धे आता सामान्य राहिलेली नाहीत. युद्ध पारंपरिक शस्त्रांपासून सुरू झाले आणि ते महाकाय बॉम्ब, अण्वस्त्रे, आंतरखंडीय क्षेपणास्त्रे आणि सायबर युद्धापर्यंत पोहोचले. अंतराळयुद्धाबाबतचा ताजा दावा असा आहे की, भारताच्या शेजारी असलेल्या चीनने अलीकडेच पहिल्यांदाच अंतराळातून पृथ्वीवर कुठेही आण्विक हल्ल्याच्या सामर्थ्याची चाचणी घेतली आहे.
 
 
ताज्या घडामोडींनुसार, या वर्षी ऑगस्टमध्ये चीनने त्याच्या एका शक्तिशाली रॉकेट ‘लॉन्ग मार्च’मधून पृथ्वीच्या कक्षेत आण्विक शस्त्रे वाहून नेण्यास आणि गोळीबार करण्यास सक्षम ‘हायपरसोनिक’ क्षेपणास्त्र पाठवले. या क्षेपणास्त्राने पृथ्वीला प्रदक्षिणा घातली आणि त्यानंतर तज्ज्ञांनी लक्ष्याच्या जवळ गोळीबार केला. ‘युएस डिफेन्स अफेअर्स वेबसाईट’-‘द ड्राईव्ह’ने या क्षेपणास्त्राची चाचणी केल्याचा दावा करणारा अहवाल प्रसिद्ध केला आहे. असा दावा करण्यात आला आहे की, आता चीनकडे एवढी ताकद आहे की, नजीकच्या भविष्यात चीनकडून आपल्या क्षेपणास्त्रांच्या माध्यमातून अंतराळातून पृथ्वीच्या कोणत्याही कोपर्‍यात अणुबॉम्ब डागला जाऊ शकतो.
 
 
पहिल्या चाचणीत हे क्षेपणास्त्र लक्ष्यापासून ३२ किलोमीटर अंतरावर पडले असले, तरी ही क्षमता गाठल्यानंतर चीन अवकाशातून आपल्या कोणत्याही शत्रूवर अनाठायी हल्ला करू शकतो, असा धोका निर्माण झाला आहे. ही क्षेपणास्त्रे हजारो किलोमीटर दूरपर्यंत कोणत्याही व्यत्ययाशिवाय मारा करू शकतात. या गोष्टीने अमेरिकेसह संपूर्ण जगाला धक्का बसला आहे. अंतराळ युद्धाचा जो प्रश्न समोर येत आहे तो काही नवीन नाही.
 
 
गेल्या अनेक दशकांपासून, जगातील अनेक देशांमध्ये, अंतराळ युद्धाचे धोके आणि तयारी याबाबत एक ‘ब्लू प्रिंट’ तयार केली जात आहे. खुद्द अमेरिकाही या कामात बराच काळ गुंतलेली आहे. हे कोणापासून लपून राहिलेले नाही की, १९८३मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी ‘स्टार वॉर’च्या रूपात अशाच युद्धाचे स्वप्न पाहिले होते. अमेरिकेने अंतराळातून युद्धाची योजना ताबडतोब अमलात आणली नसली, तरी त्यानंतर सुमारे १३ वर्षे या कल्पनेमुळे जग भीतीच्या सावटाखाली असल्याचे दिसून आले आहे.
 
दरम्यान, १९९६मध्ये जेव्हा बिल क्लिटंन यांनी ‘स्टार वॉर्स’ योजना काही काळासाठी थांबवली, तेव्हा जगाने सुटकेचा नि:श्वास सोडला. परंतु, २०१८ साली अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा या योजनेवर पुनर्विचार करण्यास सांगण्यात आले. यासंदर्भात, मार्च २०१८मध्ये ‘युएस संरक्षण गुप्तचरसेवे’चे संचालक, लेफ्टनंट जनरल रॉबर्ट पी. अ‍ॅचशले ज्युनियर यांनी ‘युएस सिनेट’च्या सशस्त्र सेवा समितीसमोर दावा केला की, रशिया आणि चीन ही शस्त्रे विकसित करत आहेत जी ते अंतराळ युद्धात वापरू शकतात.
 
 
त्यामुळे त्यांनी अमेरिकेला सांगितले की, अंतराळ युद्धासाठी तयार राहा. ‘एअरबोर्न लेझर प्रोजेक्ट’ ज्यावर अमेरिकेने प्रदीर्घ काळ काम केले होते, त्यामध्ये अनेक प्रकारच्या शस्त्रांचा विचार करण्यात आला होता. क्षेपणास्त्रांव्यतिरिक्त, इतर अनेक प्रकारची शस्त्रे आहेत, ज्यात ‘फार आऊट वेपन्स’ या अपारंपरिक श्रेणीचा समावेश आहे, ज्याला ‘स्पेस वेपन्स’ म्हणतात. ‘प्रोपल्शन’मध्ये ‘एलियन बग्ज’, ‘स्पेस हॅकर्स’, ‘ई-बॉम्ब’, ‘सिस्टीम’, ‘स्पेस फायटर’, तंत्रज्ञान आणि अगदी प्लाझ्मा शस्त्रे यांचा समावेश होतो.
 
 
इथे महत्त्वाचा प्रश्न असा आहे की, शेजारील चीनकडे अंतराळातून क्षेपणास्त्राची क्षमता असेल, तर भारत त्याच्या सामर्थ्याशी कसा मुकाबला करू शकेल. अर्थात, चीनच्या अवकाशात ‘हायपरसोनिक’ क्षेपणास्त्रे तैनात केल्याने अमेरिकेलाच नव्हे, तर लडाख आणि अरुणाचल प्रदेशात चीनच्या लष्करी घुसखोरीच्या प्रयत्नांनाही मोठा धोका निर्माण होऊ शकतो. या ब्रह्मास्त्राचा मुकाबला करण्याची ताकद भारताकडे असणे आवश्यक आहे. यात आश्वस्त करणारी बाब म्हणजे ‘हायपरसोनिक’ क्षेपणास्त्र तंत्रज्ञान असलेल्या देशांत अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारताचाही समावेश होतो.
Powered By Sangraha 9.0