दृष्टिबाधितांची प्रकाशदायिनी

27 Oct 2021 12:50:58

Anagha_1  H x W
 
अंध विद्यार्थ्यांना ऑडिओ पुस्तके उपलब्ध करून त्यांच्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश निर्माण करणाऱ्या नाशिक येथील अनघा कुलकर्णी यांच्या कार्याविषयी...
दृष्टिबाधित हे जरी दिव्यांग असले तरी त्यांच्या कार्याने त्यांनी समाजातील अनेकांना नवीन दृष्टी प्रदान केल्याची अनेक उदाहरणे आहेत. अशा दृष्टिबाधित विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास सुखकर व्हावा, यासाठी नाशिक येथील अनघा विनय कुलकर्णी व त्यांचे सहकारी अविरत कार्यरत आहेत.
विद्युत शाखेच्या अभियंता असलेल्या अनघा कुलकर्णी यांना शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसा हा बालपणापासूनच लाभला. हेलन केलर यांच्याबद्दल वाचल्यावर जन्मांध लोकांसाठी काहीतरी करणे आवश्यक आहे, या ध्यासाने त्यांनी आपले कार्य सुरू केले. २००८ साली नाशिकला स्थिरावल्यावर ‘थर्ड आय फाऊंडेशन’च्या वीणाताई सहस्रबुद्धेंच्या कार्याने प्रेरित होऊन त्यांनी अंध मुलांसाठी काम करण्यास सुरुवात केली.
‘नॅब’ (नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाईंड) मार्फत फक्त बारावीपर्यंत त्यातही अगदी मर्यादित विषयांवर ऑडिओ पुस्तके उपलब्ध असतात. त्यापुढे शिकण्याची इच्छा असणाऱ्या ग्रामीण आणि गरीब अंध विद्यार्थ्यांना यामुळे अनेकविध अडचणींचा सामना करावा लागतो. हे लक्षात घेऊन अनघा कुलकर्णी यांनी व त्यांच्या ‘यशोवाणी ग्रुप’च्या सहकार्‍यांमार्फत आपल्या घरातच पुस्तके वाचून रेकॉर्ड करण्यास सुरुवात केली. त्यांच्या ऑडिओ फाईल्स बनवत अंध विद्यार्थ्यांच्या पेनड्राईव्ह/ सीडी, मोबाईलच्या मेमरी कार्डमध्ये विनामूल्य लोड करून देण्याचे कार्य हाती घेतले. यासाठी आवश्यक असणारे संपादनदेखील अनघा कुलकर्णी व त्यांचे सहकारी घरच्या घरीच करतात. यात कुठेही पैशांचा विषय नसल्याचे ते आवर्जून नमूद करतात. प्रत्येक वाचक स्वतःचे मोबाईल, पेनड्राईव्ह, लॅपटॉप वापरतो. ज्या अंध विद्यार्थ्यांकडे जास्त क्षमतेचा पेनड्राईव्ह नाही, अशा विद्यार्थ्यांना तो उपलब्ध करून देण्याचे कार्यदेखील त्या करतात. त्यातील डेटा काढून घेऊन हे विद्यार्थी तो पेनड्राईव्ह परत देत असल्याचेदेखील अनघा कुलकर्णी सांगतात.
ज्या विद्यार्थ्यांना ऑडिओ स्वरूपात पुस्तक हवे आहे, असे विद्यार्थी स्वत: पुस्तक देण्यासाठी असून, बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना कुरियर किंवा विनामूल्य पोस्टाच्या सेवेच्या माध्यमातून वाचन सामग्री कुलकर्णी व त्यांचे सहकारी उपलब्ध करून देतात. अंध विद्यार्थ्यांना ते काय ऐकत आहेत, हे नीट समजावे व त्यात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी रात्री उशिरा किंवा पहाटे अनघा कुलकर्णी व त्यांचे सहकारी हे कार्य हाती घेतात. मोठ्याने वाचन करणे, ही एक संथ प्रक्रिया आहे. तासभर वाचन केल्यास १० ते १२ पाने सहज वाचून होतात. तसेच थकवादेखील जाणवतो. त्यामुळे २०० पानांच्या पुस्तकासाठी एक वाचक २०-२५ दिवस सहज घेतो. ५००-१००० पानांच्या पुस्तकांचे वाचन समूहात पानांचे वाटप करून केले जात असल्याचे त्या सांगतात. या कामाची प्रेरणा त्यांना हेलन केलरचे आत्मचरित्र, स्वामी विवेकानंदांचे विचार यातून मिळाल्याचे अनघा सांगतात.
ग्रामीण भागातील अंधांच्या समोर अनेक अडचणी आहेत. त्याच वेळी वीणा सहस्रबुद्धे यांच्या ‘थर्ड आय फाऊंडेशन’विषयी एका नियतकालिकात वाचल्यावर कामाची दिशा मिळाल्याचे अनघा सांगतात. अनघा कुलकर्णी यांच्या या कार्यात खऱ्या अर्थाने सातत्य आले ते प्राची गुर्जर यांनी स्थापन केलेल्या ‘यशवाणी ग्रुप’मुळे.
अंध विद्यार्थी आणि सामान्य विद्यार्थ्यांना उपलब्ध असणाऱ्या साधनांमध्ये मोठी तफावत जाणवते. ‘ब्रेल लिपी’तील पुस्तकांचा दिवसेंदिवस कमी होणारा वापर, पुस्तकांच्या वापरातल्या अडचणी, मोठा आकार, वजन खूप आणि त्यात ही पुस्तके टिकाऊ नसून प्रचंड महागही असतात आणि सहज उपलब्धही होत नाहीत. अंध विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त इतर महत्त्वाची गाईड्स, नोट्स, विविध प्रकाशनांचे स्टडी मटेरियल यांची प्रचंड वानवा आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ‘नॅब’चे काम मोठे असले तरी त्यांच्याकडेही अशी सगळी पुस्तके उपलब्ध असतात, असेही नाही. अशा वेळी अनघा कुलकर्णी यांच्यासारखी मंडळी ही पोकळी निश्चितच भरुन काढतात.
विलक्षण प्रतिभावान अंध विद्यार्थी, त्यांच्या महत्त्वाकांक्षा आणि त्यांना लागणारी आपली गरज ओळखून अनघा कुलकर्णी यांचे अविरत कार्य सुरू आहे. त्या या कामाकडे उपकार, दान-धर्म अशा पद्धतीने अजिबात पाहत नाहीत. केवळ आत्मिक समाधान आणि विद्यार्थ्यांना अभ्यासाची साधने मिळणे, याचे समाधान असल्याचे त्या आवर्जून सांगतात. अंध व्यक्तींसाठी घराबाहेर न पडतादेखील आवश्यक काम करता येते. एरवी वाचनात न येणारी पुस्तके जेव्हा या विद्यार्थ्यांच्या समोर येतात, तेव्हा त्यांना होणारा अकल्पित आनंद अत्यंत सुखावणारा असल्याचे अनघा विशेषत्वाने अधोरेखित करतात.
अनघा कुलकर्णी यांच्या कार्यातून ‘एलआयसी’ पॉलिसी एजंट असलेला आकाश जाधव, ‘आरबीआय’मध्ये ‘प्रोबेशनल ऑफिसर’ असलेले चंद्रशेखर परदेशी, ‘सीपीटी’ पास होणारा पहिला दृष्टिबाधित वेदान्त मुंदडा यांना आपल्या करिअरची दिशा सापडली आहे. अनघा कुलकर्णी यांनी अनवट वाटेवरती चालून कितीतरी अंध विद्यार्थ्यांना ज्ञानाचा उजेड दाखवला आहे. त्यांच्या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
Powered By Sangraha 9.0