गड-किल्ले-दुर्गप्रेमींसाठी उपयुक्त पुस्तक

23 Oct 2021 21:37:02

durgavidhanam 2_1 &n

हिंदू साम्राज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा वारसा लाभलेल्या मराठीजनांना गड-किल्ल्यांची ओळख बालपणापासूनच होते. शिवनेरी किल्ल्यावरील शिवबांचा जन्म, स्वराज्यशपथेचा साक्षीदार रायरीचा किल्ला, स्वराज्यतोरण बांधलेला तोरणा किल्ला ते शिवरायांनी जिंकलेले असंख्य किल्ले, पन्हाळगड, विशाळगड, तानाजी मालुसरेंच्या बलिदानाने पावन झालेला सिंहगड, मुरारबाजींच्या पराक्रमाचा अभिमान बाळगणारा पुरंदर, अफझल खानवधाने नाव सार्थ झालेला प्रतापगड, स्वराज्याची पहिली राजधानी राजगड आणि शिवाजी महाराज सिंहासनाधीश झालेला रायगड नि शिवबाराजांनी बांधलेले सिंधुदुर्ग, पद्मदुर्गसारखे सागरी किल्ले... एक ना अनेक... शेकडो किल्ले... पण, छत्रपती शिवाजी महाराजच नव्हे, तर स्वराज्यस्थापनेच्या आधीपासून महाराष्ट्र व भारताला किल्ल्यांचा म्हणजेच दुर्गांचा प्रदीर्घ इतिहास आहे. भारतीय उपखंडातील दुर्गस्थापत्याचा इतिहास ‘हडप्पा संस्कृती’पूर्व काळापासून अस्तित्वात आल्याचे पुरावे मिळालेले आहेत, तर महाराष्ट्रात इ.स. पूर्व दुसर्‍या सहस्रकातील ताम्रपाषाणयुगीन गावाभोवतालच्या तटबंदीपर्यंत किल्लेबांधणीचा इतिहास पोहोचतो.




आज अनेक दुर्गप्रेमी तरुण-तरुणींचे गट महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांना भेटी देण्याचे, ट्रेकिंगचे उपक्रम राबवत असतात, तर कितीतरी शालेय विद्यार्थी सहलीच्या रूपाने व हौशी पर्यटक भटकंती करत गड-किल्ल्यांना भेटी देत असतात. पण, तिथे जाणार्‍या प्रत्येकाला त्या किल्ल्याची माहिती असतेच असे नाही. कधी स्थानिक व्यक्ती माहिती देतात. पण, ती अलिखित स्वरूपात असल्याने हवी तेव्हा वाचायला मिळत नाही. त्या पार्श्वभूमीवर डॉ. मिलिंद पराडकर यांचे महाराष्ट्रातील दुर्गांबद्दल माहिती देणारे ‘दुर्गविधानम्’ पुस्तक महत्त्वाचे ठरते. सुरुवातीला एका वृत्तपत्रात गड-किल्ल्यांची माहिती देणारी लेखमाला त्यांनी लिहिली होती व त्याचेच प्रकाशन गेल्या वर्षीच्या शिवजयंतीला पुस्तकरूपाने करण्यात आले. डॉ. मिलिंद पराडकर दुर्ग व भारतीय संस्कृतीचे व्यासंगी असून, राजगड व रायगड किल्ल्यावरील त्यांचा अभ्यास पूर्वप्रकाशित आहे. तर ‘दुर्गविधानम्’ या पुस्तकात डॉ. मिलिंद पराडकर यांनी भारतीय उपखंडातील दुर्गपरंपरेचा चार हजार वर्षे जुना इतिहास व महाराष्ट्रातील किल्ल्यांचा इतिहास एका पुस्तकात, ओघवत्या शैलीत मांडला आहे.त्यातील ‘दुर्गस्थापत्य, एक समृद्ध परंपरा’ या प्रकरणात गड-किल्ल्यांच्या हजारो वर्षांपासूनच्या बांधणीचा आढावा घेतलेला आहे. ‘एषां ही बाहुगुण्येन गिरिदुर्गो विशिष्यते’ या प्रकरणात पौराणिक, वेदकाळातील, उपनिषदकालीन कथा, प्रसंगांच्या आधारे दुर्गांची माहिती दिलेली आहे. ‘दुर्गांची दुनिया’ या प्रकरणात पॅलेस्टाईनजवळील जेरिको सिटी, बॅबिलोन, असीरिया, ग्रीस, रोम, युरोपातील दुर्गांबद्दल चर्चा केलेली आहे. कौटिल्याला राजनीतिधुरंदर म्हणून ओळखले जाते, ‘कौटिल्याचे दुर्ग’ व ‘नमस्तुभ्यम कौटिल्य’ या प्रकरणांत अर्थशास्त्र ग्रंथातील नगररचना, दुर्गबांधणी आदींची माहिती दिलेली आहे. गड-किल्ल्यांची निर्मिती मौर्यकाळानंतर कशाप्रकारे केली गेली, याची माहिती ‘मौर्योत्तर वारसा’ या प्रकरणात दिली आहे. ‘दुर्गसंपन्न सह्याद्री’ या प्रकरणात महाराष्ट्रातील सह्याद्रीतील दुर्गांच्या कुळकथेला सुरुवात केली असून ‘सातवाहनांचे दुर्ग’ या प्रकरणात सातवाहन काळापासूनच्या किल्ल्यांचे विस्ताराने विवेचन केलेले आहे. ‘दुर्गांचा देश’ प्रकरणात भारतभरातील गड-किल्ल्यांची, तर ‘मध्ययुगाची नांदी’ व ‘दुर्गसंपन्न मध्ययुग’ या प्रकरणांत त्या काळातील दुर्गरचनेची माहिती आहे.




‘देवगिरी ते विजापूर’, ‘अद्भुत अध्यायाची नांदी’, ‘प्रभुः दुर्गेण दुर्गमम्’, ‘गडपति, जळपति, भूपति’ या सर्वच प्रकरणांत त्या त्या काळातील सत्ताधीशांनी राज्यरक्षणासाठी बांधलेल्या किल्ल्यांची, सह्याद्रीतील किल्ल्यांची, छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची माहिती आहे. त्यात तट, बुरुज, खंदक, भुयारे वगैरेंनी दुर्ग कसा भक्कम केला जाई, हे सांगितले आहे. ‘ते हे राज्य’ या प्रकरणात दुर्ग म्हणजे अवघ्या राज्याचा पाठकणा कसा, याची महती सांगितली असून, सह्याद्रीच्या भौगोलिक रचनेशी सांगड घालत केलेली किल्लेबांधणी, राजगड सोडून रायगडला स्वराज्य राजधानी निवडण्यामागची कारणे आदी विविध प्रकारची माहिती दिलेली आहे. ‘आठवावा साक्षेप’ प्रकरणात, राज्यव्यवहारात दुर्गांचा अत्युत्कृष्ट वापर करणारे अन् दुर्गस्थापत्यकला पूर्णपणे अवगत असणारे शिवराय अखेरचे द्रष्टे दुर्गविशारद असल्याचे त्यांनी बांधलेल्या, जिंकलेल्या गड-किल्ल्यांचे व इतिहासकारांच्या मतांचे दाखले देत सांगितले आहे.‘दुर्गजळ’, ‘गडकोट म्हणजे’, ‘दुर्ग, कल्पनेपलीकडले’, ‘थोरल्या राजांची दुर्गव्यवस्था’, ‘आज्ञापत्रातील दुर्ग’, ‘दुर्गांवरील पाणीव्यवस्था’, ‘दुर्गांची शस्त्रशक्ती’ या प्रकरणात गड-किल्ल्यांचे महत्त्व, व्यवस्थापन, पाणी-शस्त्र वगैरेच्या दृष्टीने माहिती दिलेली आहे. ‘दुर्गविधानम्’ पुस्तक महाराष्ट्रातील दुर्ग अभ्यासकांना, दुर्गप्रेमींना अतिशय उपयुक्त ठरेल, असे आहे. पुस्तकाची छपाई उत्तम असून मुखपृष्ठावरील रायगडाचे छायाचित्र मनाला आकर्षूण घेतानाच स्वराज्याचा अभिमानही जागवते.



पुस्तकाचे नाव ः दुर्गविधानम्
लेखकाचे नाव ः डॉ. मिलिंद पराडकर
प्रकाशक ः निलचंपा प्रकाशन
पृष्ठे ः २१४
मूल्य ः रु. ५००/-






Powered By Sangraha 9.0