माणुसकीचे नातेजपत अडल्या-नडलेल्यांसाठी धावून जाणार्या तीन चाकांवरील रत्नाकर गुरुजींविषयी...ठाण्यात सुधाकर कृष्णाजी रत्नाकर उर्फ रत्नाकर गुरुजी आणि त्यांची ‘आनंदप्रसाद रिक्षा’ आपल्या समाजसेवी वृत्तीमुळे चांगलीच नावाजली ते इतरांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील सोगांव या गावी १९५८ साली सुधाकर रत्नाकर यांचा जन्म झाला. गावापासून २० किमी दूर पायपीट करीत किन्हवली येथील शाळेत जुनी ‘एसएससी’ म्हणजेच अकरावीपर्यंत शिक्षण घेतले. सामाजिक समज नसतानाच सुधाकर यांच्या आईचा बालविवाह झाला, तर वडीलही मुके असल्याने रत्नाकर कुटुंब भिक्षुकी करून उदरनिर्वाह करायचे. अशा बिकट परिस्थितीमुळे कुटुंबात आर्थिक व भौतिक सुखांची आबाळच होती.
वडील जरी मुके असले तरी त्याही परिस्थितीत ते पंचाग वाचन करून खाणाखुणांद्वारे गावातील नागरिकांना सर्व विधी व तिथी सणांची माहिती देत प्रबोधन करायचे. सुधाकर यांच्यासह सर्व सात भावंडे, त्यात चार भाऊ आणि तीन बहिणी, असा हा मोठा कुटुंब कबिला. अशा परिस्थितीत सुधाकर यांचे शिक्षण सुरू झाले. पण, नियतीच्या मनात काही वेगळेच होते. सुधाकर तिसरी इयत्तेत असताना वडिलांचे छत्र हरपले.
अशा परिस्थितीत अविवाहित असलेले संन्यस्त प्रवृत्तीचे त्यांचे सख्खे काका पांडुरंग दाजी रत्नाकर यांनी सुधाकर यांच्या कुटुंबाचा भार पेलला आणि सुधाकर यांच्या शैक्षणिक वारीलाही गती मिळाली. परंतु, आठवीपर्यंत वर्गात स्कॉलर असलेले सुधाकर आजारपणामुळे अभ्यासात मागे पडले. पुढे कशीबशी अकरावीपर्यंत (तेव्हाची मॅट्रिक) मजल मारली. मात्र, अकरावीला एका विषयात अनुत्तीर्ण झाल्याने थेट अंबरनाथ येथील ‘आयटीआय’मध्ये प्रवेश घेतला.
‘आयटीआय’मधून टेलरिंगचे प्रशिक्षण घेऊन छोट्या-मोठ्या दुकानांमध्ये चाकरी केली. त्यावेळची अकरावी शिकले असले तरी सुधाकर इंग्रजी भाषाही अस्खलितपणे बोलतात. दरम्यान, क्षयरोगाने आईचेही छत्र डोक्यावरून हरपल्याने सुधाकर यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याशिवाय गत्यंतर उरले नाही. त्यांना ठाण्यातील प्रख्यात ‘रेमंड’ कंपनीत नोकरीची संधी चालून आली. तेव्हा, अंबरनाथ, बदलापूर अशी मजल-दरमजल करीत ते ठाणे गाठत असत. या प्रवासात त्यांनी भाड्याची १३ घरे बदलली. अखेर, ठाण्यातील सावरकर नगरातील यशोधन नाका येथे हक्काचा निवारा मिळाला.
कंपनी बंद पडल्यावर १९९५ सालापासून त्यांनी रिक्षा चालवण्याचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय करीत असतानाच रस्त्यात वृद्ध महिला, रुग्ण, दिव्यांग प्रवासी, परीक्षेला जाणारा विद्यार्थी, गर्भवती आढळल्यास त्यांची आस्थेने विचारपूस करून सुधाकर त्या प्रवाशांना आपल्या रिक्षात बसवितात आणि विशेष म्हणजे ते पैसे न घेता त्यांना इच्छित स्थळी सोडतात. प्रवासी कुठेही लांब राहत असला, तरी जमेल तितकी सेवा पुरवण्याकडे त्यांचा कल असतो. ठाणे, रायगड, डहाणू, मोखाडा व सायन, मुंबईपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी ते आपली रिक्षा घेऊन जातात. त्यात ते आपल्या कोणत्याही फायद्याची अपेक्षा करीत नाहीत. रुग्ण, ज्येष्ठ नागरिक व गर्भवती महिलांच्या हाकेला कोणत्याही ठिकाणाहून धावत येत आपली मोफत सेवा देण्याला ते आपले कर्तव्य मानतात. तब्बल २७ वर्षे त्यांची तीन चाकांवरची समाजसेवेची ‘सफर’ अव्याहतपणे सुरू आहे.
रिक्षाकडे केवळ व्यवसाय म्हणून न पाहता समाजसेवेचे साधन म्हणून पाहत असल्याने ठाण्यातील प्रवासी व रिक्षाचालकांमध्ये गुरुजींना आदराचे स्थान आहे. या रिक्षावर गुरुजींनी स्वतःचे भ्रमणध्वनी क्रमांकदेखील लिहिले असून, कुणीही फोन करताच रत्नाकर गुरुजी काही मिनिटांतच सेवेसाठी हजर राहतात. हे काम करताना आपणास होणारा आनंद अवर्णनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
रत्नाकर गुरुजी कपाळावर भगवा टिळा, पांढरा शुभ्र लेंगा आणि शर्ट अशा मराठमोळ्या वेशात घराबाहेर पडून रिक्षावर स्वार होतात आणि समाजसेवेचे व्रत नियमाने सुरू करतात. रोज सकाळी ८ वाजता रिक्षा चालवायला सुरुवात करतात ती रात्रीचे १० वाजेपर्यंत त्यांची समाजसेवी सफर सुरू असते. वयाची साठी उलटली तरी अव्याहत मेहनत करण्यात त्यांचा हातखंडा असल्याने रत्नाकर गुरुजींना सर्वपक्षीय नेतेमंडळीकडूनही आदराची वागणूक मिळत असल्याचे ते सांगतात.
समाजसेवेची ही प्रेरणा त्यांना दिवंगत आनंद दिघे यांच्याकडून मिळाली असून त्यांच्या ‘मनुष्यसेवा हीच ईश्वरसेवा’ या ब्रीदानुसार त्यांचा समाजसेवेचा वसा पुढे चालवीत असल्याचे ते सांगतात. आनंद दिघे यांच्या नावातील पहिला शब्द ‘आनंद’ आणि गुरुजींच्या मुलाचे नाव ‘प्रसाद’ म्हणून त्यांनी आपल्या रिक्षाला ‘आनंदप्रसाद’ हे नाव ठेवले आहे. दिघे यांच्या निर्वाणानंतर राजकारणात भावलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे जनसेवक आमदार संजय केळकर असल्याचे आवर्जून सांगणारे रत्नाकर गुरुजी यांनी आ. केळकर यांच्यासोबतचा आपला फोटोही रिक्षात कायमस्वरूपी लावला आहे.
यासह त्यांच्या रिक्षात थंड-गरम पाणी, प्रथमोपचार पेटी आणि ‘कोविड’ प्रतिबंधात्मक सुविधाही प्रवाशांसाठी त्यांनी रिक्षात तैनात ठेवलेल्या आहेत. ‘कोविड’काळात अनेक रुग्णांना त्यांनी रिक्षाने सोडण्यासह मदतही केली.‘लॉकडाऊन’मध्ये गरजूंचे फोन येताच धावून जाऊन रिक्षाने इच्छितस्थळी सोडल्याचे ते सांगतात.
विविध पुरस्कार आणि सन्मान मिळवणारे रत्नाकर गुरुजी आजच्या तरुणाईला संदेश देताना, समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, तेव्हा काळ-वेळ व पैसा-अडका याचा विचार न करता, मदतीसाठी धावून जाण्याचा सल्ला देतात. अशा या तीन चाकावरील समाजसेवी रत्नाकराला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!