मुंबई
(विशेष प्रतिनिधी) - 'ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्या'च्या 'पर्यावरणीय
संवेदनशील क्षेत्रा'ला (इएसझेड) केंद्र सरकारने अंतिम मंजूरी दिली आहे.
४८.३०५ चौ.किमी विस्तार असलेल्या या अभयारण्याचे इएसझेड क्षेत्राची अंतिम
अधिसूचना मंगळवारी प्रसिद्ध झाली. या अधिसूचनेमुळे रखडलेल्या बांधकामांना
दिलासा मिळाला आहे.
अभायारण्ये, राष्ट्रीय उद्याने आणि
व्याघ्र प्रकल्पाच्या सभोवतालचा विकासाचा दबाव कमी करुन त्या क्षत्राचे
संरक्षण करण्यामध्ये 'ईएसझेड' एक कवच क्षेत्रासारखे काम करते. मुंबई, ठाणे
आणि नवी मुंबईच्या मध्यभागी असलेल्या खाडीमध्ये 'ठाणे खाडी फ्लेमिंगो
अभयारण्य' आहे. हे अभयारण्य १६.९०५ चौ.किमी क्षेत्रावर पसलेले आहे. या
अभयारण्याच्या 'ईएसझेड' क्षेत्राचा प्रस्ताव गेल्या कित्येक वर्षांपासून
खितपत पडला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ईएसझेड
क्षेत्र अंतिम होईपर्यंत अभयारण्याच्या हद्दीपासून १० किलोमीटर क्षेत्रावर
ईएसझेड क्षेत्र घोषित करण्यात आले होते. त्यामुळे अगदी धारावीपासून,
घोडबंदर रोड आणि नवी मुंबईतील अनेक इमारती आणि आयटी पार्क यांच्या
बांधकामावर निर्बंध आले होते. त्यामुळे ईएसझेड क्षेत्रासंबंधीचा अंतिम
प्रस्ताव मंजूरीकरिता राज्य सरकारने मार्च महिन्यात केंद्रीय पर्यावरण
मंत्रालयाला पाठवला होता. त्यापूर्वी त्यामध्ये काही बदल करण्यात आले होते.
अभयारण्याच्या ३४.०६ चौ.किमीच्या 'ईएसझेड' क्षेत्राच्या
प्रस्तावामध्ये केंद्र सरकारच्या समितीने फेब्रुवारी, २०२० मध्ये सुधारणा
सुचवल्या होत्या. त्यानुसार अभयारण्याच्या संरक्षणासाठी उत्तरेकडील
कांदळवनाचे राखीव वनक्षेत्र यामध्ये समाविष्ट करण्याची सूचना समितीने केली
होती. अभयारण्याचे मूळ 'ईएसझेड'चे क्षेत्र हे पूर्व आणि पश्चिम सीमांवर
विस्तारित होते. तसेच 'ईएसझेड'चे बफर क्षेत्र हे ० ते ३.५ किमीपर्यंत
परसलेले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनंतर प्रस्तावित
ईएसझेडमध्ये १४.१६ चौ.किमी क्षेत्राची वाढ करुन ते अंतिम मंजूरीकरिता
केंद्राकडे पाठवण्यात आले.
या प्रस्तावाला केंद्र सरकाराने मंजूरी
देऊन मंगळवारी त्यासंबंधीची अधिसूचना जारी केली. त्यानुसार तसेच 'ईएसझेड'चे
कमाल बफर क्षेत्र ० ते ३.८९ किमीपर्यंत विस्तारीत करण्यात आले ठाण्याच्या
दिशेने ते २.२ किमीपर्यंत विस्तारित केले आहे. 'ईएसझेड'चे एकूण क्षेत्रफळ
४८.३०५ चौ.किमी झाले आहे. 'ईएसझेड'ची ही सीमा दक्षिणेला सायन-पनवेल
महामार्ग, पश्चिमेला पूर्वद्रुतगती महामार्गला लागून असलेले राखीव कांदळवन,
उत्तरेला दिव्याच्या खाडीला संमातर असलेले राखीव कांदळवन आणि पूर्वेला नवी
मुंबईच्या राखीव कांदळवन क्षेत्राच्या सीमेला लागून असल्याची माहिती ठाणे
खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी एन.जी.कोकरे यांनी दिली.
ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यामध्ये कांदळवनांच्या १२ प्रजाती, ३९ कांदळवन
सहयोगी प्रजाती, १६७ पक्ष्यांच्या प्रजाती, ४५ माशांच्या प्रजाती,
फुुलपाखरांच्या ५९ आणि कीटकांच्या ६७ प्रजाती आढळतात.