कला प्रांतात विहरणारी स्मिता

17 Oct 2021 20:29:42

smita _1  H x W

 

रांगोळी धार्मिक आणि सांस्कृतिकतेचे प्रतीक मानले जाते. प्रत्येक शुभकार्यात रांगोळी काढली जाते. डोंबिवलीतील एका महिला कलाकाराने वणीच्या सप्तशृंगी देवीची मनमोहक रांगोळी काढली आहे. स्मिता साळुंखे यांनी काढलेली ही रांगोळी हुबेहूब सप्तशृंगी देवीसारखी दिसत असल्याने तो चर्चेचा विषय ठरला. त्यांच्या कलाप्रवासाविषयी जाणून घेऊया...
 
 
 
स्मिता साळुंखे यांचा जन्म जळगाव येथील एका छोट्याशा गावात झाला. त्यांचे बालपण कल्याणमध्ये गेले. रामबागेतील आदर्श विनोदिनी मंडळाच्या माध्यमिक शाळेतून शालेय शिक्षण पार पडले. त्यानंतर त्यांनी बिर्ला महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. पदवी घेतल्यावर त्या कला शिक्षणाकडे वळल्या. त्यांनी ‘फाऊंडेशन डिप्लोमा’चे शिक्षण आर्ट मॉडेल कॉलेज, दादर येथून घेतले.
 
‘आर्ट टीचर ऑफ डिप्लोमा जे. जे. स्कूल ऑफ आर्ट’चे शिक्षण त्यांनी पूर्ण केले. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. स्मिता साळुंखे यांनी अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये नोकरी केली. त्या ओंकार स्कूल, डोंबिवली, होली एंजल्स स्कूल, सिस्टर निवेदिता स्कूल, डोंबिवली, श्रीराम ज्युनिअर महाविद्यालय, ऐरोली या आणि अजून काही शाळांमध्ये त्यांनी नोकरी केली.
 
 
श्रीराम महाविद्यालयानंतर त्यांनी काही काळ नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. काही वर्षांनी त्यांनी आपल्या क्षेत्रात पुन्हा कमबॅक करण्याचे ठरविले. त्यांना तशी संधीही चालून आली. ग्रीन्स इंग्लिश स्कूलमध्ये आता त्या गेल्या तीन वर्षांपासून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. नोकरीच्या ज्या काही संधी चालून आल्या, तशा त्यांनी त्या स्वीकारल्या. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्या नेहमी झटताना दिसून येतात.
 
 
विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांना पाठविणे, त्यांच्याकडून स्पर्धेची तयारी करून घेणे, इव्हेंट अ‍ॅरेंज करणे, अशी विविध कामे त्या करतात. १९९९ला त्यांचे लग्न झाले आणि त्या डोंबिवलीकर झाल्या. सध्या त्या डोंबिवलीतील मिलापनगर परिसरात राहत आहेत. त्यांचे बालपणही चांगले गेले. आई, वडील, एक भाऊ आणि एक बहीण असा त्यांचा परिवार होता. वडील कंपनीत कामाला होते. आई गृहिणी आहे.
 
 
स्मिता साळुंखे यांना लहानपणापासूनच कलेची आवड होती. वयाच्या आठव्या-नवव्या वर्षी ही आवड त्यांच्या आई-वडिलांच्याही लक्षात आली. त्यांनी स्मिता यांना कायम प्रोत्साहित केले. त्यांना कलेचे शिक्षणही दिले. खरेतर स्मिता यांच्या घरात कलेचा वारसा नव्हता. त्यांच्या वडिलांना कलेची आवड होती, एवढाच काय तो कलेशी असलेला संबंध. पण, त्यांच्या वडिलांनी स्मिता यांच्यामध्ये असलेले गुण हेरले होते. त्या काळात क्लासेसचे फार फॅड नव्हते. कोणताही क्लास न लावता स्मिता यांच्यात कला विकसित होत होती. त्यांना ड्रॉईंग, पेंटिंग, हस्तकला याव्यतिरिक्त चित्रकलेचीदेखील आवड आहे.
 
 
स्मिता यांनी विविध शाळा आणि महाविद्यालयातून नोकरी केली आहे. त्या सर्वच ठिकाणी त्यांच्या कामाचे कौतुक झाले आहे. शाळेतील प्रदर्शन, इव्हेंट अ‍ॅरेंजमेंट स्मिता या करीत असत. ‘लॉकडाऊन’च्या काळात त्यांनी ‘ऑनलाईन अ‍ॅक्टिव्हिटी क्लासेस’मध्ये ड्रॉईंग, स्केचेस आणि क्राफ्ट शिकविले. मुले ‘लॉकडाऊन’मध्ये कंटाळली होती. या क्लासेसमुळे ती रिफ्रेश झाली. तसेच गणशोत्सवातही त्यांनी शाळेतील ‘ऑनलाईन’ लेक्चरमध्ये गणपती सजावट, क्ले गणपती कसा बनवायचे हे मुलांना शिकविले.
 
 
स्मिता या सणवाराला रांगोळीसारखेच मेहंदीही काढायच्या. शेजारी-पाजारीही स्मिता यांच्याकडून मेहंदी आवर्जून काढून घेत असत. मागील तीन वर्षांपासून त्या नवरात्रोत्सवात देवीची रांगोळी रेखाटतात. यापूर्वी त्यांनी देवीचा चेहरा, महालक्ष्मी तसेच आषाढी एकादशीला विठ्ठल-रखुमाई रेखाटले आहेत. यंदा त्यांनी सप्तशृंगी देवीची रांगोळी रेखाटली आहे. तीन वर्षांपासून त्या विविध प्रकारच्या मोठ्या व पोस्टर रांगोळी काढत आहेत.
 
 
स्मिता साळुंखे यांनी यंदाच्या नवरात्रोत्सवात त्यांच्या घरात सप्तशृंगी देवीची रांगोळी काढली आहे. ही रांगोळी चार बाय चार फुटांची आहे. त्यासाठी त्यांना अंदाजे आठ ते नऊ किलो रांगोळी आणि रंग लागले आहेत. ही रांगोळी काढण्यासाठी त्यांना चार दिवस लागले. विविध रंगांचे शेडिंग करून देवीचे हुबेहूब रूप त्यांनी साकारले आहे. त्यात त्यांनी देवी, दागिने, भावभावना व अनेक बारकावे दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. ही रांगोळी पाहिल्यावर ती रांगोळी आहे की पेंटिंग, असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. त्यांनी रांगोळीचे कोणतेही विशेष प्रशिक्षण घेतलेले नाही. या रांगोळीला प्रेक्षकांकडूनही ‘वा क्या बात हैं।’चीच दाद मिळाली आहे. कलाप्रेमींनी रांगोळीचा हा वारसा पुढे नेला पाहिजे, असे त्यांना वाटते. 




स्मिता यांनी आतापर्यंत १०० पेक्षा अधिक विद्यार्थी कलेच्या क्षेत्रात घडविले आहेत. त्या स्वत: कॅनव्हॉस पेंटिंग, वारली पेंटिंग, मधुबनी पेंटिंग करतात. अनेक जण त्यांना भेटवस्तू देण्यासाठीही ऑर्डर्स देत असतात. लोकांच्या मागणीनुसार त्या त्यांना पेंटिंग बनवून देतात. आतापर्यंत त्यांना ‘आदर्श कला शिक्षक पुरस्कार’ आणि ‘कलाप्रेमी अ‍ॅवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले आहे. अशा या हरहुन्नरी कलाकाराला पुढील वाटचालीसाठी दैनिक ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.


Powered By Sangraha 9.0