सावरकरांची तथाकथित क्षमापत्रे आणि महात्मा गांधी

16 Oct 2021 21:09:59


savrkar 2_1  H





केंद्रीय सूचना आयुक्त उदय माहुरकर लिखित ‘वीर सावरकर - द मॅन व्हू कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टीशन’ या पुस्तकाचे प्रकाशन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे नुकतेच पार पाडले. या कार्यक्रमात बोलताना राजनाथ सिंह म्हणाले होते की, “राष्ट्रनायकांविषयी वाद-प्रतिवाद व्हावा. मात्र, त्यांचा द्वेष करणे योग्य नाही. त्यांच्यावर नाझीवादी, फॅसिस्टवादी असल्याचा आरोप लावणार्‍यांना सावरकर हे यथार्थवादी आणि राष्ट्रवादी होते हे कधीही समजू शकत नाही. त्यांनी दया अर्ज केल्याचा आरोप केला जातो. मात्र, कैद्यांना मिळणार्‍या मार्गाचा वापर त्यांनी महात्मा गांधींच्या सांगण्यावरून केला होता आणि महात्मा गांधींनीदेखील त्यांच्या सुटकेची मागणी केली होती, याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. सावरकर हे महानायक होते, आहेत आणि भविष्यातही राहतील. सावरकर हा केवळ विचार नसून ते भारताच्या साहसाचे, सन्मानाचे, सामर्थ्याचे, धैर्याचे आणि सनातन विचाराचे प्रतीक आहेत.” परंतु, संरक्षणमंत्र्यांच्या या विधानामागचा संपूर्ण अर्थ समजून न घेता पुन्हा एकदा सावरकरांच्या तथाकथित माफीनाम्यांवरुन चिखलफेक करण्याचा उद्योग काही नतद्रष्ट मंडळींनी केला. तेव्हा याच विषयावरील सावरकर अभ्यासक अक्षय जोग यांचे ‘सावरकरांची तथाकथित क्षमापत्रे : आक्षेप आणि वास्तव’ हे पुस्तक दसर्‍याच्या औचित्यावर प्रकाशित झाले आहे. त्यातील याच विषयावर प्रकाश टाकणारा पुस्तकातील हा संपादित भाग...





सर्वप्रथम हे स्पष्ट करायला हवे की, महात्मा गांधी किंवा अन्य कोणाच्याही सांगण्यावरून सावरकरांनी आवेदनं किंवा तथाकथित क्षमापत्रे पाठवली नव्हती. गांधींनी केवळ सावरकरांचे धाकटे बंधू नारायणराव सावरकरांच्या पत्राला उत्तर देताना दि. 25 जानेवारीला ”I suggest, however, your framing a brief petition setting forth the facts of the case bringing out in clear relief the fact that the offence committed by your brother was purely political. I suggest this in order that it would be possible to concentrate publicattention on the case.” इतकेच सांगितले होते (संदर्भ ः Collected Works of Mahatma Gandhi-Vol 19, Page 348)

सावरकरांची आवेदनपत्रं


अंदमान बेटांच्या मुख्य आयुक्तांना ऑक्टोबर १९१४ ला पाठवलेल्या आवेदनात सावरकर अशी नि:स्वार्थी मागणी करतात की, “जर सरकारला अशी शंका असेल की, हे सर्व लिहिण्यामागील माझा खरा हेतू फक्त माझी सुटका करणे हा आहे, तर मी विनंती करतो की माझा अपवाद करून, मला मुळीच न सोडता बाकी सर्वांची मुक्तता करा, स्वयंसेवक चळवळ चालू राहू द्या आणि जणू मलाच सक्रिय भूमिका बजावण्याची अनुमती मिळाल्या इतका आनंद होईल.” (Home Department, १९१४, Political- Part B, No.२४५, National Archives of India, New Delhi,Government of India)



दि. ५ ऑक्टोबर, १९१७ साली पाठवलेल्या आवेदनात सावरकर म्हणतात, “मी मनापासून विनंती करतो की, स्वतःच्या सुटकेसाठी मी हे लिहीत आहे, असे जर सरकारला वाटत असेल किंवा अशा प्रकारच्या क्षमेसाठी माझे नाव मुख्य अडथळा ठरत असेल, तर मग सरकारने त्यांच्या दयेमधून माझे नाव वगळावे आणि बाकी सर्वांची सुटका करावी. यामुळे मला माझ्या स्वत:च्या मुक्ततेइतकेच समाधान लाभेल.” (Government of India, Home Department (Political), J.U ८०६, १९१८, Indian Office, London : संकेत कुलकर्णी, लंडन)सावरकरांची आवेदनपत्रे-मागण्या क्रांतिकारकांच्यावतीने व सर्व क्रांतिकारकांच्यासाठी होत्या, केवळ स्वतःकरितानव्हत्या. इतकंच काय, तर सावरकर ‘एकवेळ मला न सोडता बाकी सर्वांना सोडले तरी चालेल,’ अशी नि:स्वार्थ मागणीदेखील करताना दिसतात.दि. ४ एप्रिल, १९१८ च्या पत्रात सावरकर म्हणतात, ’‘अर्ज पाठविण्यात सर्व राजकीय बंद्यांची निरपवाद बंधमुक्तता हा माझा उद्देश आणि साध्य असल्यामुळे ते साधण्याच्या मार्गात माझे वैयक्तिक उदाहरण काट्यासारखे आड येत असेल, तर एकटे माझे नाव या बंधमुक्ततेतून वगळावयाला माझी अत्यंत संतोषाने संमती आहे.” (समग्र सावरकर वाड्.मय- खंड ५, पृष्ठ ४७९) बरं, ही निःस्वार्थी मागणी करताना सावरकरांची प्रकृती ढासळलेली होती. त्यांचे वजन मार्च १९१७ मध्ये ११९ पौंड होते, ते ऑगस्ट १९१८ मध्ये ९८ पौंड इतके कमी झाले होते. ’‘एवढेसे पत्र लिहिताना शरीराला त्रासाची जाणीव होते आहे. दिवसानुदिवस (हा जड देह) झुरत चालला आहे.” (उपरोक्त, पृष्ठ ४८१) असे हृदय हेलावून टाकणारे सावरकरांचे वाक्य त्याच पत्रात आढळते. सुखासीन आयुष्यातील निःस्वार्थी मागणीपेक्षा कष्टप्रद परिस्थितीतील निःस्वार्थी मागणीमागील त्याग हा वंदनीय असतो व अनुकरण करण्यास कठीण असतो. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या बदल्यात भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा त्याग केला, हा आरोपच फोल ठरतो. सावरकर आवेदनात स्वत:सह अंदमानातीलच नव्हे, तर भारतातील राजबंदीवानांना आणि परदेशात अडकून पडलेल्या सर्वांना राजक्षमेचा लाभ मिळावा, अशी सामूहिक मागणी करत होते. ‘फक्त मलाच सोडा किंवा निदान मला तरी सोडा,’ अशी स्वार्थी मागणी करत नव्हते.



सावरकरांनी कारावासातील मुक्ततेनंतर अटीनुसार राजकारणाव्यतिरिक्त समाजसुधारणा, शुद्धी, विज्ञाननिष्ठता, भाषाशुद्धी, लिपीसुधारणा अशा प्रकारे प्रचंड राष्ट्रसेवा केली. ब्रिटिशविरोधी नसला तरी हाही एक समाजस्वातंत्र्यलढाच आहे. ब्रिटिश गुलामीची शृंखला तोडण्यासाठी झटणारे राजकीय क्रांतिकारक सावरकर, त्याच तडफेने स्वदेशी सप्तशृंखला (स्पर्शबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी, सिंधूबंदी, शुद्धीबंदी, वेदोक्तबंदी व व्यवसायबंदी) तोडण्यासाठी झटणारे कृतिशूर समाजक्रांतिकारकही होते.
जे जे राजबंदीवान अंदमानातून सुटले, त्यातील बहुतांशी जणांनी अशाच प्रकारच्या करारपत्रावर स्वाक्षर्‍या करून सुटका करून घेतली होती. अरविंद घोष यांचे बंधू बारिंद्रकुमार घोष, लाहोर कटातील आरोपी सचिंद्रनाथ संन्याल हे सावरकरांचे ‘सेल्युलर कारागृहा’तील सहबंदीवान होते, त्यांनी सावरकरांसारखी आवेदनं पाठवली होती. (Petition from Barendra K. Ghose convict no.३१५४९ to the Home Member of the Government of India, National Archives of India आणि सान्याल, शचिंद्रनाथ. बंदी जीवन, संपादक- बनारसीदास चतुर्वेदी, आत्माराम अ‍ॅण्ड सन्स, दिल्ली, प्रकाशन वर्ष दिलेले नाही, पृष्ठ २१२, २२७) त्यांची सुटका झाली, पण सावरकरांची सुटका झाली नाही.



कालजयी सावरकर : पुस्तक ऑर्डर देण्यासाठी येथे क्लिक करा!


काकोरी कटात अटक झालेले रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहिरी आणि अशफाकउल्ला खान यांना नंतर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांनी देखील फाशीची शिक्षा रद्द करावी म्हणून सावरकरांसारखीआवेदनं पाठवली होती. (आत्मकथा रामप्रसाद बिस्मिल, सम्पादक- बनारसीदास चतुर्वेदी, सत्यधर्म प्रकाशन, २०१२, पृष्ठ १०९-११५आणि {U Remember Us Once in- While- Letters of Martyrs: Publication Division, Fifth Edition, , २०१३)रामप्रसाद बिस्मिल यांच्याप्रमाणे लाहिरी यांनीदेखील आवेदनपत्र लिहिले आहे, याची भगतसिंगांना पूर्णपणे कल्पना होती. भगतसिंग यांनी आपल्या ’किरती’ या नियतकालिकात जानेवारी १९२८ मध्ये प्रसिद्ध करुन ’काकोरी के शहिदों की फाँसी के हालात’ या शीर्षकाचा लेख लिहिला होता आणि भगतसिंगांनी लाहिरींबद्दल लिहिताना, ‘वायसराय ने रहम की दरख्वास्त नामंजूर कर दी थी’ असेही त्या लेखात लिहिले होते. (भगतसिंह और उनके साथियों के संपूर्ण उपलब्ध दस्तावेज, संपादक- सत्यम्, राहुल फाऊंडेशन प्रकाशन, लखनौ, तिसरा पुनर्मुद्रण, २०१७, पृष्ठ ११४) स्वतः भगतसिंगांनी फाशीची शिक्षा रद्द करावी म्हणून आवेदनपत्र पाठवलेले नसले, तरी क्रांतिकारकांची अशी आवेदनपत्र पाठवण्यामागील भूमिका किंवा खेळी काय आहे, याची त्यांना ते स्वत: एक क्रांतिकारक असल्याने पूर्णपणे कल्पना असणार. त्यामुळे इतर क्रांतिकारकांनीही अशी आवेदनपत्र पाठवू नयेत, अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे दिसून येत नाही. आवेदनपत्र पाठवल्याचे ज्ञात असूनही भगतसिंग राजेंद्रनाथ लाहिरींच्या हौतात्म्याने प्रभावित झाले होते आणि १९२७मध्ये जन्मलेल्या आपल्या भावाचे नाव त्यांनी ’राजेंद्र’ असे ठेवले होते. (उपरोक्त, पृष्ठ ५१७)इथे एक लक्षात घ्यायला हवे की, काही विरोधकांचा असा आक्षेप असतो की, सावरकरांनी क्षमा मागितली, पण भगतसिंगांनी क्षमा मागितली नाही आणि सावरकरांची क्षमापत्रे भगतसिंगांना ज्ञात नव्हती वगैरे. भगतसिंगांना सावरकरांची आवेदनपत्रं जरी ज्ञात असती, तरी त्यांनी त्यांच्या त्यागाचा, देशभक्तीचा गौरव करण्यात हात आखडता घेतला नसता. कारण, रामप्रसाद बिस्मिल आणि राजेंद्रनाथ लाहिरी यांनी आवेदनपत्रं लिहिलेली भगतसिंगांना ज्ञात होते आणि तरीही त्यांनी त्यांच्यावर आपल्या नियतकालिकात त्यांच्या आवेदनपत्रांचा उल्लेख करुन, लेख लिहून त्यांच्या हौतात्म्याचा गौरव केला होता.






आवेदनपत्रं का पाठवली?


सावरकर, गांधी आणि नेहरु हे कायद्याचे अभ्यासक आणि पदवीधर होते. ब्रिटिश निर्बंधानुसार (कायदा) राजकीय बंदिवानांना सुटका करुन घेण्यासाठी कोणते अधिकार उपलब्ध आहेत, याचे त्या तिघांनाही ज्ञान होते. म्हणून मग सावरकरांनी त्या अधिकाराचा उपयोग करुन सुटकेसाठी आवेदनं पाठवली होती. गांधी किंवा नेहरु यांनी अशी आवेदनं पाठवली नाहीत. कारण, त्यांना त्याचा उपयोग करुन घ्यायचा नव्हता, हे त्यांचे स्वातंत्र्य किंवा मत होते. तसेच त्यांना सावरकरांसारखी ५० वर्षांची जन्मठेपेची शिक्षा झालेली नव्हती आणि त्यांना झालेला काही कारावास सश्रम असला तरी सावरकरांच्या काळे पाण्यावरील शिक्षेइतका क्रूर आणि अमानवी नव्हता.सावरकर हे उपयुक्ततावादी होते. त्यानुसार शत्रूच्या कारागृहात शिक्षा आणि छळ भोगत बसणे ही त्यांची देशभक्तीची संकल्पना नव्हती. त्यापेक्षा कारागृहाबाहेर पडून सक्रियपणे राष्ट्रकार्य, समाजकार्य करणे हे सावरकरांना अभिप्रेत होते. कारण, या सक्रिय राष्ट्रकार्याचा, समाजकार्याचा देशाला, समाजाला काहीतरी उपयोग होतो. नुसतं शत्रूच्या कारागृहात खितपण पडण्याने राष्ट्राला, समाजाला काय उपयोग होतो, अशी सावरकरांची भूमिका होती.



सावरकरांवर ब्रिटिश राजसत्तेशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेण्याचा प्रसंगच उद्भवला नाही, पण तशी वेळ आली असतीच तर सावरकरांनी तशी शपथ घेतली असती आणि वेळ येताच ती मोडलीही असती. कारण, शत्रूला खोटे आश्वासन देणे, शत्रूला फसवणे, शत्रूचा विश्वासघात करणे, शत्रूशी द्रोह करणे यात गैर काय आहे? पण, आपल्याकडे शत्रूशी खरं बोलायचं, शत्रूला दिलेले वचन प्राणपणाने पाळायचं आणि स्वकियांशी द्रोह, विश्वासघात करायचा असे सद्गुण-विकृती (*या शब्दाचे जनक सावरकरच आहेत.) प्रचलित आहे. त्यामुळे सावरकरनीती कळणे अथवा समजणे जरा कठीण जाते. अर्थात, हा दोष सावरकरांचा नव्हे.



|




Powered By Sangraha 9.0