रा. स्व. संघाचे प. पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी नागपूर येथे शुक्रवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी विजयादशमी उत्सवामध्ये केलेल्या संबोधनाचे विचारपाथेय...
हे वर्ष आम्हाला स्वातंत्र्य मिळाल्याचे ७५ वे वर्ष आहे. १५ ऑगस्ट, १९४७ या दिवशी आम्ही स्वतंत्र झालो. आम्ही आमच्या देशाला पुढे नेण्यासाठी आमच्या देशाची सूत्रे आमच्या हाती घेतली. 'स्वाधीनता' ते 'स्व-तंत्रता' या आमच्या प्रवासाचा तो प्रारंभ बिंदू होता. आम्हाला एका रात्रीत स्वातंत्र्य मिळाले नाही, हे आम्ही सर्व चांगल्या प्रकारे जाणतो. स्वतंत्र भारताचे चित्र कसे असेल, याची भारताच्या परंपरेनुसार मनांमध्ये समान कल्पना घेऊन देशाच्या सर्व भागातील विविध जाती, समाज यांच्याशी संबंधित वीरांनी तप, त्याग आणि बलिदानरुपी हिमालय उभे केले. दास्याच्या वेदना सोशीत असलेला समाजही एकत्रित त्यांच्या मागे उभा राहिला. त्यातूनच शांततापूर्ण सत्याग्रहासह सशस्त्र संघर्षापर्यंतचे सर्व मार्ग स्वातंत्र्याच्या टप्प्यापर्यंत पोहोचले. परंतु, आमची भेदभावाने जर्जर झालेली मानसिकता, स्वधर्म, स्वराष्ट्र आणि स्वातंत्र्य याबाबतचे अज्ञान, स्पष्टतेचा अभाव, डळमळीत आणि बेगडी धोरणे आणि त्याआधारे इंग्रजांकडून खेळली गेलेली कूटनीती या कारणांमुळे फाळणीची कधीही भरून न निघणारी वेदना प्रत्येक भारतीयांच्या हृदयात रुतून बसली. आमच्या संपूर्ण समाजास आणि विशेष करून नव्या पिढीने हा इतिहास जाणून, समजून आणि कायमचा स्मरणात ठेवायला पाहिजे.
सामाजिक समरसता
एकात्म आणि अखंड राष्ट्राची पूर्वअट समताधिष्ठित भेदभावरहीत समाजाचे अस्तित्व असणे ही आहे. या कार्यामध्ये बाधा ठरत असलेली जातींवर आधारित विषमतेची समस्या ही आमच्या देशाची जुनी समस्या आहे. ही समस्या दूर करण्यासाठी अनेक प्रयत्न अनेक प्रकारे, अनेक दिशांनी करण्यात आले. तरीही ही समस्या पूर्णपणे नष्ट झालेली नाही. समाजाचे मन अजूनही जातीनिहाय विषमतेच्या भावनेने ग्रस्त आहे. देशातील बौद्धिक वातावरण पाहता ही उणीव भरून काढून एकमेकांमध्ये आत्मियता आणि संवाद साधण्यापेक्षा त्यात बाधा निर्माण करणारेच जास्त आहेत. हा संवाद सकारात्मक होईल, यावर लक्ष ठेवायला हवे. समाजामध्ये आत्मियता आणि समतेवर आधारित व्यवस्था असावी, असे वाटणाऱ्या सर्वांना प्रयत्न करावे लागतील. सामाजिक आणि कौटुंबिक स्तरावरील संवाद वाढवायला हवा. कुटुंबांमधील मैत्री आणि स्नेह, सामाजिक समता आणि ऐक्य दृढ करण्यास उपयुक्त ठरू शकेल. सामाजिक समरसतेचे वातावरण निर्माण करण्याचे कार्य संघाचे स्वयंसेवक सामाजिक-समरसता उपक्रमांच्या माध्यमातून करीत आहेत.
स्वातंत्र्य आणि एकात्मता
भारताचे अखंडत्व व एकात्मतेवरील श्रद्धा आणि मनुष्याची स्वातंत्र्याची कल्पना तर शतकांच्या परंपरेतून आतापर्यंत आपल्या येथे चालत आली आहे. त्यासाठी रक्त सांडण्याचे आणि घाम गाळण्याचे कार्यही चालत आले आहे. हे वर्ष श्री गुरु तेगबहादूरजी महाराज यांच्या प्रकाशाचे ४००वे वर्ष आहे. संप्रदायामध्ये असलेल्या कट्टरपणातून जे अत्याचार होत आले, ते समाप्त करण्यासाठी आणि आपापल्या पंथांची उपासना करण्याचे स्वातंत्र्य देऊन सर्व उपासनांचा मान राखण्यासाठी आणि त्यांना स्वीकारण्याची या देशाची जी परंपरागत पद्धती आहे, तिची पुन्हा स्थापना करण्यासाठी त्यांनी बलिदान केले. ते 'हिंद की चादर' म्हणून ओळखले जात. प्राचीन काळापासून कालौघात झालेल्या चढउतारांमध्ये भारताच्या उदार आणि सर्वसमावेशक संस्कृतीचा प्रवाह अखंड प्रवाहित ठेवण्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीरांच्या आकाशगंगेतील ते सूर्य होते. आमच्या त्या महान पूर्वजांच्या मनात असलेली गौरवाची भावना, ज्या भारतमातेसाठी त्यांनी आपले सर्वस्व वाहिले, त्या मातृभूमीवर असलेली अविचल भक्ती; तसेच त्यांच्याकडून संरक्षित आणि वर्धिष्णू झालेली आमची उदार, सर्वसमावेशक संस्कृती आमच्या राष्ट्रजीवनाचे अनिवार्य आधार आहेत.
भारतवर्षाच्या कल्पनेत स्वतंत्र जीवन याचा एक निश्चित अर्थ आहे. कित्येक शतकांपूर्वी महाराष्ट्रामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज होऊन गेले. त्यांनी रचलेल्या पसायदानामध्ये ते म्हणतात-
जे खळांची व्यंकटी सांडो।
तयां सत्कर्मी रति वाढो। भूतां परस्परे पडो, मैत्र जीवांचे॥
दुरितांचे तिमिर जावो।
विश्व स्वधर्मसूर्ये पाहो
जो जे वांछील तो ते लाहो। प्राणिजात॥
याचा अर्थ दुष्टांची दुष्टबुद्धी नष्ट होवो, त्यांच्यात सदाचार वाढो, प्राणिमात्रांमध्ये परस्पर मित्रभाव वाढो, संकटांचा अंधार विरून जावो, सर्वांमध्ये स्वधर्माची भावना जागृत होवो आणि सर्वांच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, असा आहे.
हीच गोष्ट आधुनिक काळामध्ये गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी रचलेल्या आपल्या प्रसिद्ध कवितेत वेगळ्या प्रकारे सांगितली आहे.
चित्त जेथा भयशून्य उच्च जेथा शिर, ज्ञान जेथा मुक्त, जेथा गृहेर प्राचीर आपन प्रांगणतले दिवस - शर्वरी वसुधारे राखे नाइ खण्ड शूद्र करि। जेथा वाक्य हृदयेर उत्समूख हते उच्छसिया उठे जेथा निर्वारित स्रोते, देशे देशे दिशे दिशे कर्मधारा धाय अजस्त्र सहस्रविध चरितार्थाय। जेथा तूच्छ आचारेर मरू-वालू-राशि विचारेर स्रोतपथ फेले नाइ ग्रासि-पौरुषेरे करेनि शतधा नित्य जेथा तूमि सर्व कर्म चिंता-आनंदेर नेता।
निज हस्ते निर्दय आघात करि पिता भारतेरे सेई स्वर्गे करो जागृत॥
शिवमंगलसिंह सुमन जी यांनी या पंक्ती हिंदीमध्ये अनुवादित केल्या आहेत-
जहां चित्त भय से शून्य हो, जहां गर्व से माथा ऊँचा करके चल सकें, जहां ज्ञान मुक्त हो। जहां दिन रात विशाल वसुधा को खंडों में विभाजित कर छोटे और छोटे आंगन न बनाए जाते हों, जहां हर वाक्य हृदय की गहराई से निकलता हो। जहां हर दिशा में कर्म के अजस्र नदी के स्रोत फूटते हों, और निरंतर अबाधित बहते हों। जहां विचारों की सरिता तुच्छ आचारों की मरू भूमि मे न खोती हो। जहां पुरुषार्थ सौ सौ
टुकडो में बँटा हुआ न हो।
जहां पर सभी कर्म, भावनाएँ, आनंदानुभूतियाँ तुम्हारे अनुगत हों।
हे पिता, अपने हाथों से निर्दयता पूर्ण प्रहार कर उसी स्वातंत्र्य स्वर्ग में
इस सोते हुये भारत को जगाओ।
देशाच्या स्वातंत्र्योत्तर जीवनासंबंधीच्या या कल्पनाचित्रासंबंधात जेव्हा परिस्थिती पाहतो तेव्हा 'स्वाधीनता ते स्वतंत्रता' यापर्यंतची आमची यात्रा अजून चालू आहे, ती पूर्ण झाली नाही हे लक्षात येते. भारताची प्रगती किंवा जगात सन्मानित स्थानी
भारताने पोहोचणे ज्यांना आपल्या निहीत स्वार्थाच्या विरुद्ध वाटते, अशी काही तत्त्वे या जगात आहेत. काही देशांमध्ये त्यांचा प्रभावही आहे. भारतात सनातन मानवतेच्या मूल्यांवर आधारित विश्वाची धारणा करणारा धर्म प्रभावी झाल्यास अशा स्वार्थी तत्त्वांचे कुत्सित खेळ बंद होतील. विश्वास त्याचे हरवलेले संतुलन आणि परस्पर स्नेहाची भावना देणारा धर्माचा प्रभावच भारतास प्रभावी करीत आहे. हे सर्व होऊ नये म्हणून भारतातील जनता, भारतातील सद्यस्थिती, भारताचा इतिहास, भारताची संस्कृती, भारतात राष्ट्रीय नव्या उदयाचा आधार बनू शकणाऱ्या शक्ती या सर्वांच्या विरुद्ध असत्य, कुत्सित प्रचार करून जगास आणि भारतीय जनतेला संभ्रमित करण्याचे काम केले जात आहे. आपला पराभव किंवा संपूर्ण विनाशाची भीती या शक्तींच्या डोळ्यांसमोर असल्याने आपल्यातील शक्तींना सहभागी करून घेऊन कधी उघड, तर कधी छुपेपणाने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्या सर्वांकडून केली जाणारी कटकारस्थाने आणि संभ्रमाचे जाळे या संपासून सावध, सजग राहून आपण स्वतःस आणि समाजास वाचवायला हवे. संक्षेपात सांगायचे झाल्यास दुष्ट लोकांची तिरकस बुद्धी अजूनही आहे तशीच आहे आणि ते नवनवीन साधनांचा वापर करून आपली दुष्कृत्ये पुढे रेटून नेण्याच्या प्रयत्नात आहेत. आपला निहीत स्वार्थ साधण्यासाठी काही अहंकारी कट्टरपंथीयांचा पाठिंबा मिळवायचा, लोकांच्या अज्ञानाचा फायदा उठवून त्यांना असत्य माहिती देऊन त्यांना संभ्रमित करायचे, त्यांच्या वर्तमान किंवा काल्पनिक समस्यांचे भांडवल करून त्यांना भडकवायचे, समाजामध्ये कोणत्याही प्रकारे आणि कोणतीही किंमत मोजून असंतोष माजवायचा, परस्पर विरोध, भांडणतंटे, दहशत आणि अराजकता निर्माण करून आपला ढासळत चाललेला प्रभाव पुन्हा समाजावर लादण्याचा त्यांचा कुहेतू या आधीच उघड झाला आहे.
आपल्या समाजामध्ये 'स्व'संदर्भात असलेले अज्ञान, अस्पष्टता आणि अश्रद्धा याच्या जोडीने आजकाल जगामध्ये अत्यंत गतीने प्रचारित होत असलेल्या गोष्टी या स्वार्थी शक्तींच्या कुटील खेळांसाठी सोयीच्या झाल्या आहेत. 'बिटकॉईन'सारखे निर्बंध नसलेले चलन मुक्त आर्थिक स्वैराचाराचे माध्यम बनून सर्व देशांच्या अर्थव्यवस्थेपुढे आव्हान म्हणून उभे राहू शकते. 'ओटीटी प्लॅटफॉर्म'वरून काहीही प्रदर्शित होते आणि कोणीही ते पाहते, अशी अवस्था आहे. आता 'ऑनलाईन' शिक्षण दिले जात आहे. लहान मुलांनी मोबाईल पाहणे हे नियम झाल्यासारखेच झाले आहे. विवेकबुद्धी आणि योग्य नियंत्रणाचा अभाव, या सर्व नवीन वैध अवैध साधनांच्या संपर्कात आलेल्या समाजास कुठे आणि कुठेपर्यंत घेऊन जाईल, हे सांगणे कठीण आहे. परंतु, देशविरोधी तत्त्वे या साधनांचा कशाप्रकारे उपयोग करू इच्छितात, हे सर्व जाणतात. हे सर्व लक्षात घेऊन अशा गोष्टींवर योग्य नियंत्रण आणण्याची व्यवस्था शासनास करावी लागेल.
कुटुंब प्रबोधन
अशा सर्व गोष्टींवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी आपापल्या घरातच काय उचित आहे, काय अनुचित आहे, काय करायला हवे, काय करायला नको, याचा विवेक देणारे संस्काराचे वातावरण निर्माण करायला हवे. अनेक व्यक्ती, संघटना, संत-महात्मे हे कार्य करीत आहेत. आपणही आपल्या कुटुंबामध्ये अशा प्रकारे चर्चा, संवाद सुरू करून सहमती मिळवू शकतो. कुटुंब प्रबोधन कार्यक्रमाच्या माध्यमातून संघाचे स्वयंसेवकही हे कार्य करीत आहेत. 'मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक' असे वाक्य आपण ऐकले, वाचलेले असेल. भारतीय संस्कार जगतावर सर्व बाजूंनी हल्ले करून आमच्या जीवनातून श्रद्धेचे उच्चाटन करणे आणि भ्रष्ट स्वैराचार यांचे बीजारोपण करण्याचे जे प्रयत्न सुरू आहेत, त्यावरील उपायांचा आधार हीच विवेकबुद्धी असेल.
'कोरोना'शी संघर्ष
कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेशी सामना करण्याची पूर्ण तयारी करून आम्ही आमच्या स्वातंत्र्याचे ७५वे वर्ष साजरे करण्याची तयारी करीत आहोत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये समाजाने पुन्हा एकदा आपल्या सामूहिक प्रयत्नांद्वारे कोरोना महामारीच्या प्रतिकाराचे उदाहरण घालून दिले. या दुसऱ्या लाटेने मोठ्या प्रमाणात विनाश केला आणि युवा अवस्थेत असलेल्या अनेकांच्या जीवनास ग्रासले. परंतु, या स्थितीतही आपल्या प्राणांची पर्वा न करता ज्या बंधु-भगिनींनी समाजाची सेवा करण्यासाठी परिश्रम घेतले ते सर्व कौतुकास पात्र आहेत. असे असले तरी संकटाचे ढग अजून विरलेले नाहीत. कोरोनाविरुद्धचा आमचा संघर्ष अजून समाप्त झालेला नाही. एवढेच नव्हे, तर तिसऱ्या लाटेस तोंड देण्याची तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे. मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे, ते पूर्ण करावे लागेल. समाजदेखील जागृत आहे. त्याचप्रमाणे संघाच्या स्वयंसेवकांनी आणि समाजातील अनेक सज्जन आणि संघटनांनी गावपातळीवर, कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी समाजाला मदत करणाऱ्या, जागृत राखणाऱ्या कार्यकर्त्यांच्या समूहांना प्रशिक्षित केले आहे. आमची तयारी पूर्ण आहे आणि बहुधा या संकटाचा हा अंतिम टप्पा जास्त तीव्र असणार नाही, अशी अपेक्षाही ठेवत आहोत. असे असले तरी कोणत्याही अनुमानावर विसंबून न राहता पूर्णपणे जागृत राहून आणि सरकारी निर्बंधांचे पालन करीत आम्हाला वाटचाल करावी लागेल.
कोरोनाच्या काळात सर्व व्यवहार बंद ठेवण्याची ना शासनाची, ना समाजाची मन:स्थिती आहे. कोरोनाच्या गेल्या दोन लाटांमध्ये करण्यात आलेल्या 'लॉकडाऊन'मुळे देशाच्या आर्थिक क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. ते नुकसान भरून काढून देशाचे अर्थचक्र पहिल्यापेक्षा अधिक वेगाने गतिमान करण्याचे आव्हान आम्हा सर्व लोकांसमोर आहे. त्यासाठी चिंतन आणि प्रयत्नही सुरू आहेत. आपल्या भारतीय आर्थिक क्षेत्रामध्ये आज कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा सामना करण्याचा आत्मविश्वास आणि सामर्थ्य दिसून येत आहे. काही क्षेत्रांमधून, अत्यंत गतीने व्यापार आणि आर्थिक व्यवहार होत असल्याचे ऐकण्यास मिळत आहे. सर्वांचा सहभाग शासनाने मिळविल्यास या संकटाचा सामना देश करेल, असा विश्वास वाटत आहे.
समाजामध्ये 'स्व'चे जागरण आणि आत्मविश्वास वाढत असल्याचे दिसून येत आहे. श्री रामजन्मभूमी मंदिरासाठी धनसंग्रह करण्याच्या अभियानाच्या वेळी जो सार्वत्रिक उत्साह आणि भक्तियुक्त प्रतिसाद मिळाला तो याच 'स्व' च्या जागरणाचा प्रभाव आहे. याचा स्वाभाविक परिणाम समाजातील पुरुषार्थाचे अनेक क्षेत्रांमध्ये प्रकटीकरण करण्यात होतो. आमच्या खेळाडूंनी 'टोकियो ऑलिम्पिक'मध्ये एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्यपदके जिंकून आणि 'पॅरा ऑलिम्पिपिक'मध्ये पाच सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्य पदके जिंकून अत्यंत कौतुकास्पद विजय मिळवून आपला पुरुषार्थ दाखवून दिला आहे. देशामध्ये सर्वत्र झालेल्या त्यांच्या अभिनंदनात आम्ही सर्व सहभागी आहोत.
आरोग्यासंदर्भात आमचा दृष्टिकोन
आमच्याकडे आमच्या 'स्व' परंपरेपासून आलेली दृष्टी आणि ज्ञान आजदेखील उपयुक्त आहे, हे कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीने दाखवून दिले आहे. आमच्या परंपरागत जीवनशैलीमुळे आजारांचा प्रतिबंध करण्यामध्ये आणि आयुर्वेदिक औषधांनी कोरोनाच्या प्रतिकार आणि उपचारांमध्ये प्रभावी भूमिका बजाविल्याचा अनुभव आपण घेतला. आपल्या विशाल देशामध्ये प्रत्येक व्यक्तीस सहजपणे उपलब्ध आणि स्वस्तातील आरोग्य व्यवस्था आवश्यक आहे, हे आपण सर्व जाणतो, तसा अनुभवही घेत आहोत. भौगोलिक विस्तार आणि लोकसंख्येच्या दृष्टीने विशाल असलेल्या या देशामध्ये आम्हाला रोगमुक्तीबरोबरच आयुर्वेदाचा विचार करावा लागेल.
आहार, विहार, व्यायाम आणि चिंतन यासंदर्भातील आमच्या परंपरागत विधिनिषेधांच्या आधारांवर असे जीवन, ज्याची शैली रोग होणार नाहीत वा ते कमीत कमी होतील, असे वातावरण निर्माण केले जाऊ शकते. आमची ती जीवनशैली पर्यावरणाशी पूर्णपणे सुसंगत आणि संयम आदी दैवी गुणसंपदा प्रदान करणारी आहे. कोरोना साथीच्या काळात सार्वजनिक कार्यक्रम, विवाह आदी कार्यक्रमांवर प्रतिबंध होता. आपल्याला ते सर्व साधेपणाने पार पडावे लागले. त्यामुळे उत्साह आणि झगमगाट, छानछोक यावर मर्यादा आल्या. पण, आपण पैसे, ऊर्जा आणि अन्य साधनसामग्रीच्या वायफळ खर्चापासून वाचलो. त्याचा पर्यावरणावर थेट अनुकूल परिणाम झाल्याचा प्रत्यक्ष अनुभव आपण घेतला. आता परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर या अनुभवातून बोध घेऊन त्या आपल्या मूळ जीवनशैलीनुसार अनावश्यक खर्च टाळून आणि डामडौलापासून दूर राहून पर्यावरणाशी सुसंगत जीवनशैलीचे अनुकरण करायला हवे. पर्यावरणाशी सुसंगत जीवनशैलीचा प्रचार, प्रसार करण्याचे कार्य अनेकांकडून केले जात आहे. संघाचे स्वयंसेवकदेखील पर्यावरणविषयक उपक्रमांच्या माध्यमांतून पाण्याची बचत, प्लास्टिकमुक्ती, वृक्षारोपण अशा सवयी लोकांना लावण्याचा प्रयत्न करीत आहेत.
आयुर्वेदासह आज उपलब्ध असलेल्या सर्व उपचार पद्धतींच्या उपयोगाने लहान- मोठ्या आणि प्राथमिक उपचाराची व्यवस्था प्रत्येक व्यक्तीला आपल्या गावामध्ये उपलब्ध होऊ शकते. दुसऱ्या स्तरातील उपचार खंड स्तरावर आम्ही व्यवस्थित केले आणि जिल्हा स्तरांवर तिसया स्तराचे उपचार आणि महानगरांमध्ये अतिप्रगत विशिष्ट उपचार अशी व्यवस्था केली जाऊ शकते. उपचार पद्धतीच्या अहंकारास दूर ठेऊन सर्व उपचार पद्धतींचे सुयोग्य नियोजन करून प्रत्येक व्यक्तीला स्वस्त, सुलभ, परिणामकारक उपचार मिळतील, अशी व्यवस्था निर्माण होऊ शकते.
आमची आर्थिक दृष्टी
विद्यमान अर्थचिंतन आज नवीन समस्यांचा सामना करीत असून त्यांचे समाधानकारक उत्तर अन्य देशांकडे नाही. यांत्रिकीकरणामुळे वाढती बेकारी, अनैतिक तंत्रज्ञानामुळे घटत चाललेली मानवी मूल्ये आणि उत्तरदायित्वाशिवाय प्राप्त झालेले सामर्थ्य ही त्याची उदाहरणे आहेत. भारताकडून अर्थव्यवस्थेच्या आणि विकासाच्या नवीन मापदंडांची संपूर्ण जगास अपेक्षा आणि प्रतीक्षा आहे. आमची विशिष्ट आर्थिक दृष्टी, आमच्या राष्ट्रास जो प्रदीर्घ जीवनानुभव प्राप्त झाला, तसेच देशविदेशांमध्ये केलेल्या आर्थिक पुरुषार्थामुळे निर्माण झाली आहे. त्यामध्ये सुखाचा उगम मनुष्याच्या आतमध्ये मानण्यात आला आहे. सुखवस्तूंमध्ये असत नाही किंवा सुख केवळ शरीराचे असत नाही. शरीर, मन, बुद्धी, आत्मा या चौघांना एकाचवेळी सुख देणारी, मनुष्य, सृष्टी, समष्टी यांचा बरोबर विकास करीत त्यास परमेष्टीच्या दिशेने प्रवृत्त करणारी, अर्थ, काम यांना धर्माच्या अनुशासनामध्ये ठेवून मनुष्यमात्राच्या खऱ्या स्वातंत्र्यास प्रोत्साहन देणारी अर्थव्यवस्था आमच्या येथे चांगली मानली गेली आहे. आमच्या आर्थिक दृष्टीमध्ये उपभोग नव्हे, तर संयम महत्त्वाचा आहे. भौतिक साधनसंपत्तीचा मनुष्य हा स्वामी नसून विश्वस्त आहे. सृष्टीचा तो एक घटक आहे. स्वतःच्या उपजीविकेसाठी सृष्टीचे दोहन करण्याबरोबरच तिचे संरक्षण, संवर्धन करणे हे त्याचे कर्तव्य आहे, असे आम्ही मानतो. ही दृष्टी एकांगी, टोकाची नाही. केवळ भांडवलदार किंवा व्यापारी किंवा उत्पादक वा श्रमिक यांच्या एकतर्फी हिताची नाही. या सर्वांना ग्राहकांसह एका परिवारासारखे समजून सर्वांच्या सुखाचा विचार करणारी, संतुलित आणि परस्पर संबंधांवर आधारित अशी ही दृष्टी आहे. या दृष्टीच्या आधारावर विचार करून जगाच्या आतापर्यंतच्या अनुभवावरून जे नवीन शिकलो, चांगले शिकलो आणि जे आजच्या आमच्या देशाच्या काल परिस्थितीशी सुसंगत आहे, त्याच्याशी जुळवून घेऊन अशी एक नवीन आर्थिक रचना आम्ही आपल्या देशामध्ये निर्माण करून दाखवू, ती काळाची गरज आहे. समग्र आणि एकात्म विकासाच्या नवीन धारणक्षम मापदंडाचे प्रकटीकरण होणे, हा स्वातंत्र्याचा स्वाभाविक परिणाम आहे, 'स्व'च्या दृष्टीचा हा बहुप्रतीक्षित आविष्कार आहे.
लोकसंख्या धोरण
देशाच्या विकासाचा विचार जेव्हा करू लागतो, त्यावेळी आणखी एक समस्या पुढे उभी राहते आणि त्यामुळे सर्व काळजीत आहेत, असे वाटत राहते. वेगाने वाढत असलेली देशाची लोकसंख्या नजीकच्या भविष्यात अनेक समस्यांना जन्म देऊ शकते. हे लक्षात घेऊन त्यावर योग्य विचार व्हायला हवा. २०१५ मध्ये रांची येथे झालेल्या अ. भा. कार्यकारी मंडळाच्या बैठकीत या विषयावर एक प्रस्ताव संमत करण्यात आला.
लोकसंख्या वाढीच्या दरातील असंतुलनाचे आव्हान
देशात लोकसंख्या नियंत्रणासाठी करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांमुळे गेल्या दशकात लोकसंख्या वाढीच्या दरामध्ये बऱ्यापैकी घट झाली आहे. परंतु, या संदर्भात अखिल भारतीय कार्यकारी मंडळाचे म्हणणे आहे की, २०११च्या जनगणनेच्या धार्मिक आधारांवर (रिलिजिअस ग्राऊंड) करण्यात आलेल्या विश्लेषणावरून विविध संप्रदायांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात जे परिवर्तन झाल्याचे दिसून आले, ते लक्षात घेऊन लोकसंख्याविषयक धोरणाचा पुनर्विचार करण्याची आवश्यकता असल्याचे दिसून येत आहे. विविध संप्रदायांच्या लोकसंख्या दरांमधील लक्षणीय अंतर, सातत्याने होत असलेली विदेशी घुसखोरी आणि मतांतरण या कारणांमुळे देशाची एकूण लोकसंख्या आणि विशेष करून सीमावर्ती भागातील लोकसंख्येच्या प्रमाणात वाढत चाललेले असंतुलन देशाच्या ऐक्यास, अखंडतेस आणि सांस्कृतिक ओळखीचा विचार करता गंभीर संकटाचे निमित्त होऊ शकते.
जगातील ज्या प्रमुख देशांनी १९५२ मध्ये लोकसंख्या नियंत्रणासाठीच्या उपाययोजनांची घोषणा केली होती. त्यामध्ये भारताचा समावेश होता. पण, त्यानंतर पुढे २००० मध्ये एका समग्र लोकसंख्याविषयक धोरणाची निर्मिती आणि लोकसंख्या आयोगाची स्थापना करणे भारतास शक्य झाले. या धोरणाचा हेतू, २.१ची एकूण जन्मदराची आदर्श स्थिती २०४५ पर्यंत गाठायची आणि स्थिर व सुयोग्य लोकसंख्येचे लक्ष्य प्राप्त करणे हा होता. आपली राष्ट्रीय साधनसामग्री आणि भविष्यातील गरजा लक्षात घेऊन जन्म दराचे हे उद्दिष्ट समाजातील सर्व घटकांना समान लागू होईल. पण, २००५-०६चे राष्ट्रीय जन्मदर आणि आरोग्यविषयक सर्वेक्षणआणि २०११च्या जनगणनेचे ०-६ या वयोगटातील धार्मिक आधारांवरील आकड्यांवरून 'असमान' एकूण जन्मदर आणि बाल लोकसंख्येमधील गुणोत्तराची कल्पना येते. सन १९५१ आणि २०११ या दरम्यान लोकसंख्येच्या वाढीच्या दरामध्ये जे प्रचंड अंतर दिसून आले ते पाहता भारतात उत्पन्न झालेल्या धर्मपंथांच्या अनुयायांच्या लोकसंख्येचे प्रमाण ८८ टक्क्यांवरून घसरून ते ८३.८ टक्क्यांवर आले. त्याउलट मुस्लिमांची लोकसंख्या ९.८ टक्क्यांवरून १४.२३ टक्क्यांवर गेली.
याशिवाय देशाच्या सीमावर्ती भागांमध्ये म्हणजे आसाम, प. बंगाल आणि बिहार या राज्यांच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये मुस्लीम लोकसंख्या वाढीचा दर राष्ट्रीय दरापेक्षा किती तरी अधिक आहे. बांगलादेशमधून सातत्याने होत असलेल्या घुसखोरीमुळे हे घडत असल्याचे संकेत यावरून मिळतात. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या 'उपमन्यु हाजरिका आयोगा'चे निष्कर्ष आणि वेळोवेळी देण्यात आलेले न्यायालयीन निर्णय यावरून यास पुष्टी देण्यात आली आहे. बेकायदेशीर घुसखोरांकडून राज्यातील नागरिकांचे हक्क हिरावून घेतले जात आहेत, हेही सत्य आहे. तसेच या राज्यांच्या मर्यादित साधनसामग्रीवर मोठ्या प्रमाणात ताण पडत असून त्यामुळे सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक तणावास ते कारणीभूत ठरत आहे. ईशान्य राज्यांमध्ये धर्माच्या आधारावर होत असलेल्या लोकसंख्याविषयक असंतुलनाने गंभीर रूप घेतले आहे. अरुणाचल प्रदेशात भारतात उत्पन्न मत-पंथांना मानणारे १९५१ मध्ये ९९. २१ टक्के लोक होते. २००१ मध्ये ते प्रमाण ८१.३ टक्क्यांवर आणि २०११ मध्ये ते ६७ टक्क्यांवर आले. केवळ एका दशकामध्ये अरुणाचल प्रदेशामध्ये ख्रिश्चन लोकसंख्येमध्ये १३ टक्के वाढ झाली. त्याचप्रकारे मणिपूरमधील लोकसंख्येचे प्रमाण १९५१ मध्ये जे ८० टक्के होते ते २०११च्या जनगणनेमध्ये ५० टक्क्यांवर आले. वरील उदाहरणे आणि देशाच्या विविध जिल्ह्यांमध्ये ख्रिश्चन लोकसंख्या वाढीच्या दरात झालेली अस्वाभाविक वाढ पाहता काही स्वार्थी तत्त्वे संघटितपणे मतपरिवर्तन करण्याचे कार्य करीत असल्याचे संकेत यावरून मिळतात.
अखिल भारतीय कार्यकारी मंडळ या सर्व लोकसंख्याविषयक असंतुलनाबद्दल गंभीर चिंता व्यक्त करून सरकारकडे आग्रह करीत आहे की :
1. देशामध्ये उपलब्ध साधनसामग्री, भविष्यातील आवश्यकता आणि लोकसंख्येतील असमतोलाची समस्या लक्षात घेऊन देशाच्या लोकसंख्याविषयक धोरणाची पुनर्रचना करून सर्वांसाठी ते धोरण समान रूपात लागू केले जावे.
२. सीमेपलीकडून होत असलेल्या बेकायदेशीर घुसखोरीवर पूर्णपणे अंकुश लावण्यात यावा. राष्ट्रीय नागरिक नोंदणी पुस्तकाची निर्मिती करून या घुसखोरांना नागरिकत्वाचे हक्क आणि जमीन खरेदी करण्याच्या अधिकारांपासून वंचित करण्यात यावे.
अखिल भारतीय कार्यकारी मंडळ सर्व स्वयंसेवकांसह देशवासीयांना आवाहन करीत आहे की, त्यांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य समजून लोकसंख्येत असमतोल निर्माण करण्यास कारणीभूत ठरत असलेल्या कारणांचा शोध घेऊन जनजागरणाच्या माध्यमातून लोकसंख्येचे जे असंतुलन होत आहे, त्यापासून देशाला वाचविण्यासाठी कायद्याद्वारे मान्य असे सर्व प्रयत्न करावेत.
अशा विषयांसंदर्भात जे धोरण आखले जाते, त्याची सार्वत्रिक संपूर्ण आणि परिणामकारक अंमलबजावणी होण्यासाठी त्याआधी व्यापक लोकप्रबोधन आणि नि:पक्ष कार्यवाही होणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत असमतोल लोकसंख्या वाढीमुळे देशात स्थानिक हिंदूंवर पळून जाण्यासाठी दबाब आणण्याचे, त्यांच्यावर अन्याय होत असल्याचा घटना उजेडात आल्या आहेत. प. बंगालमध्ये अलीकडेच झालेल्या निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचारात हिंदू समाजाची जी वाईट अवस्था झाली, त्यामागे शासन, प्रशासनाने केलेला हिंसक तत्त्वांचा अनुनय आणि लोकसंख्येतील असमतोल कारणीभूत असल्याचे दिसून आले. हे लक्षात घेऊन सर्वांना समान रूपात लागू होईल, असे धोरण तयार करायला हवे. आपल्या लहान समूहाच्या संकुचित स्वार्थाच्या मोहजालाच्या पलीकडे जाऊन संपूर्ण देशाचे हित सर्वोपरी मानून वाटचाल करण्याची सवय आम्हा सर्वांना लावून घ्यावी लागेल.
वायव्य सीमेच्या पलीकडे...
आणखी एक परिस्थिती जी अनपेक्षित नव्हती, पण अपेक्षिल्यापेक्षा आधीच निर्माण झाली, ती म्हणजे अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांचे सरकार स्थापन होणे. त्यांच्या पूर्व इतिहास, धार्मिक कट्टरता आणि अत्याचार, इस्लामच्या नावाखाली निर्माण केली जात असलेली दहशत या सर्व बाबी तालिबान्यांसंदर्भात संशय निर्माण करण्यासाठी पुरेशा आहेत. आता तर त्यांच्या समवेत चीन, पाकिस्तान आणि तुर्कस्तान सामील झाल्याने एक अपवित्र युती निर्माण झाली आहे. अब्दालीच्या नंतर पुन्हा एकदा आमची वायव्य सीमा हा आमच्या गंभीर काळजीचा विषय बनला आहे. आम्ही निश्चिंत राहू शकत नाही, असे संकेत मिळत आहेत. तालिबान्यांकडून कधी शांततेची, तर कधी काश्मीरची चर्चा होत आहे. हे पाहता आम्ही निर्धास्त राहू शकत नाही. आम्हाला आमच्या सर्व सीमा लष्करी तयारीनिशी पूर्णपणे सुसज्ज ठेवायला हव्यात. या परिस्थितीत देशाची अंतर्गत सुरक्षा, व्यवस्था आणि शांततेकडेही शासन, प्रशासन आणि संपूर्ण समाजास पूर्णपणे जागृत राहून सिद्धता ठेवावी लागेल. संरक्षणसंदर्भात स्वयंपूर्णता आणि 'सायबर' सुरक्षा यासारख्या नव्या विषयांतील अद्ययावत ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रयत्नांचा वेग वाढवायला हवा. संरक्षणाच्या बाबत आम्हाला लवकरात लवकर स्वयंपूर्ण व्हायला हवे. चर्चेचे दरवाजे खुले ठेवून आणि हृदय परिवर्तन होऊ शकते, हे न नाकारता सर्व प्रकारच्या शक्याशक्यतांना सामोरे जाण्यासाठी आपणास सज्ज राहावे लागेल. या संकटाच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमधील जनतेचे भारतासमवेत भावनिक एकरूपही अत्यंत त्वरेने होण्याची आवश्यकताही दिसून येत आहे. राष्ट्रीय मनोवृत्तीच्या नागरिकांचे मनोधैर्य खच्ची करण्यासाठी आणि आपले दहशतवादी साम्राज्य पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी ठरवून हिंदू नागरिकांना लक्ष्य करून त्यांची हिंसा करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. या परिस्थितीला नागरिक धैर्याने तोंड देत आहेत आणि निश्चितपणे देत राहतील. परंतु, दहशतवाद्यांच्या कारवायांचा बंदोबस्त आणि त्यांचे समूळ उच्चाटन करण्याच्या प्रयत्नांना अधिक गती देण्याची आवश्यकता आहे.
हिंदू मंदिरांचा प्रश्न
राष्ट्राची एकात्मता, अखंडता, संरक्षण, सुव्यवस्था, समृद्धी आणि शांततेसाठी आव्हान बनून आलेल्या व आणण्यात आलेल्या अंतर्गत अथवा बाह्य समस्यांचा प्रतिकार करण्याची तयारी करीत असतानाच हिंदू समाजाचेही काही प्रश्न असून ते सोडविण्यासाठी कार्य करण्याची आवश्यकता आहे. हिंदू मंदिरांची आजची स्थिती हा असाच एक प्रश्न आहे. दक्षिण भारतात मंदिरे पूर्णपणे सरकारच्या ताब्यात आहेत. उर्वरित भारतातील काही सरकारकडे, तर काहींची खासगी कुटुंबांकडे मालकी आहे. काही मंदिरे समाजाने स्थापित केलेल्या कायद्याने स्थापित केलेल्या विश्वस्त न्यासाच्या ताब्यात आहेत. अनेक मंदिरांची काही व्यवस्थाच नाही. अशा मंदिरांच्या स्थावर/जंगम मालमतेचा अपहार होण्याच्या अनेक घटना पुढे आल्या आहेत. प्रत्येक मंदिर आणि त्यामध्ये प्रतिष्ठित देवता यांची पूजाअर्चा आदींचे विधी वेगवेगळे आहेत. त्यामध्ये लक्ष घालण्यासारखे विषयही पुढे येत आहेत. देवाचे दर्शन, त्याची पूजाअर्चा हे सर्व जातपातपंथ याचा विचार न करता सर्व भक्तांना सुलभ व्हायला हवे. सर्व मंदिरांमध्ये अशी स्थिती नाही. मंदिरांच्या, धार्मिक आचारांसंदर्भात शास्त्राचे जाणकार विद्वान, धर्माचार्य, हिंदू समाजाची श्रद्धा आदींचा विचार न करताच निर्णय घेतले जातात, ही परिस्थिती सर्वांच्यासमोर आहे. धर्मनिरपेक्ष असूनही केवळ हिंदू धर्मस्थानांना व्यवस्थेच्या नावाखाली ताब्यात घेणे, अभक्त/अधर्मी/ अन्य धर्मीयांच्या हातून त्यांचे संचालन करणे आदी अन्याय दूर व्हावेत, हिंदू मंदिरांचे संचालन हिंदू भक्तांच्याच हाती राहील आणि हिंदू मंदिरांच्या संपत्तीचा उपयोग देवाच्या पूजेसाठी आणि हिंदू समाजाच्या सेवा व कल्याणासाठीच व्हावा हे उचित आणि आवश्यक आहे. या विचाराच्या जोडीनेच हिंदू समाजाच्या मंदिरांचे सुयोग्य व्यवस्थापन आणि संचालन करून मंदिरे पुन्हा समाजजीवनाची आणि संस्कृतीची केंद्रे बनतील, अशी रचना हिंदू समाजाच्या ताकदीवर कशी निर्माण केली जाऊ शकते, याची योजना तयार करणे आवश्यक आहे.
आमच्या एकात्मतेचे सूत्र
शासन, प्रशासनातील व्यक्ती आपले कार्य करीत असले तरीही सर्व राष्ट्रीय उपक्रमांमध्ये समाजाचा मन, वचन आणि कार्याच्या रूपात सहभाग असणे महत्त्वपूर्ण आहे. अनेक समस्यांचे निदान तर सर्वप्रथम केवळ समाजाकडूनच केले जाते. हे लक्षात घेऊन वरील समस्यांच्या संदर्भात समाजाचे प्रबोधन करण्याबरोबरच समाजाचे मन, वचन आणि आचरण यांच्या सवयींमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे. तसेच प्राचीन काळापासून चालत आलेल्या या सनातन राष्ट्राच्या अमर स्वत्वाचा परिचय पूर्ण समाजास चांगल्याप्रकारे व्हायला हवा. भारतातील सर्व भाषिक, पंथिक, प्रांतीय अशा विविधतेला पूर्ण सामावून, त्यांचा सन्मान ठेऊन आणि त्यांना संपूर्ण संधी देण्यासह राष्ट्रीयतेच्या समान सूत्रांमध्ये गुंफून जोडणारी आमची संस्कृती आहे. त्याला अनुरूप असे आम्हाला बनावे लागेल. आपले मत, पंथ, जात, भाषा, प्रांत आदी संकुचित अहंकारांना आम्हाला विसरावे लागेल. बाहेरून आलेल्या सर्व संप्रदायांना मानणाऱ्या भारतीयांसह सर्वांना, आमची आध्यात्मिक मान्यता, उपासना करण्याची पद्धती वेगळी असली तरी अन्य सर्व दृष्टीने आम्ही एक सनातन राष्ट्र, एक समाज, एक संस्कृती यामध्ये वाढलेल्या पूर्वजांचे वंशज आहोत हे मान्य करायला हवे, लक्षात घ्यायला हवे. त्या संस्कृतीमुळेच आम्ही सर्व आपापली उपासना करण्यासाठी स्वतंत्र आहोत. आपल्या मनाप्रमाणे प्रत्येक जण येथे आपली उपासना निश्चित करू शकतो. परकीय आक्रमकांसमवेत काही उपासना पद्धती भारतात आल्या हे ऐतिहासिक तथ्य आहे. परंतु, आज भारतात त्या उपासना पद्धती मानणाऱ्यांचे नाते आक्रमकांशी नसून देशाच्या रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या हिंदू पूर्वजांशी आहे. आमच्या समान पूर्वजांमध्ये आम्हा सर्वांचे आदर्श आहेत. ही बाब लक्षात घेतल्या कारणानेच या देशाने कधी हसनखां मेवाती, हकीमखान सुरी, खुदाबख्श आणि गौसखां यासारखे वीर, अश्फाकउल्लाखान यासारखे क्रांतिकारक पाहिले. हे सर्व सर्वांसाठी अनुकरणीय आहेत.
फुटीरतेची मानसिकता, संप्रदायांची आक्रमकता, दुसऱ्यांवर वर्चस्व प्रस्थापित करण्याची आकांक्षा आणि लहान स्वार्थाच्या संकुचित विचारांच्या बाहेर येऊन पाहिल्यास जगावर तुटून पडलेली कट्टरता, असहिष्णुता, दहशतवाद, द्वेष, वैर आणि शोषण या प्रलयाचा तारणहार केवळ भारत आणि त्यामध्ये उपजलेली, फुललेली सनातन हिंदू संस्कृती आणि सर्वांचा स्वीकार करणारा हिंदू समाज आहे हे लक्षात येईल.
संघटित हिंदू समाज
आमच्या देशाच्या इतिहासामध्ये काही आपसांतील कलह, अन्याय, हिंसा यांसारख्या घटना घडल्या आहेत. प्रदीर्घ काळापासून फुटीरता, अविश्वास, विषमता आणि विद्वेष राहिला असेल, किंवा वर्तमानकाळामध्ये असे काही घडले असेल तर त्याची कारणे समजून घेऊन त्यांचे निवारण करताना, अशी घटना पुन्हा घडणार नाही, परस्परांतील विद्वेष, भेदभाव दूर व्हावा आणि समाज जोडलेला राहील अशी आपली वाणी आणि कृती असायला हवी. आमच्यातील भेद, संघर्ष यांचा उपयोग करून आमच्यामध्ये फूट पाडू पाहणारे, परस्पर प्रामाणिकतेबद्दल अविश्वास निर्माण करणारे आणि आमच्या श्रद्धेस नष्टभ्रष्ट करू पाहणारे तत्त्व सापळा रचून आमची चूक होण्याची वाट पाहत आहे, हे लक्षात घेऊन आपल्याला वाटचाल करायची आहे. भारताच्या मूळ मुख्य राष्ट्रीय प्रवाहाशी नाते असलेल्या हिंदू समाजात आपल्या संघटित सामाजिक सामर्थ्याची जाणीव, आत्मविश्वास आणि निर्भय वृत्ती असेल तेव्हा हिंदू समाज हे सर्व करू शकेल. त्यामुळे आज जे आपणास हिंदू मानतात त्यांचे, आपले वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक जीवन आणि उपजीविकेच्या क्षेत्रातील आचरणाद्वारे हिंदू समाजजीवनाचे उत्तम आणि सर्वांसुंदर रूप निर्माण करण्याचे कर्तव्य आहे. सर्व प्रकारच्या भयापासून मुक्त व्हायला हवे. दुर्बलता ही डरपोकपणाला जन्म देते. व्यक्तिगत पातळीवर आम्हाला शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक बळ, साहस, ओज ,धैर्य, आणि तितिक्षा यांची साधना करायला हवी. समाजाचे सामर्थ्य त्या समाजाच्या एकतेवर, समाजाच्या सामूहिक हिताची समज आणि त्याबाबत असलेली जागरूकता यावर अवलंबून असते. समाजात भेद निर्माण करणारे विचार, व्यक्ती, समूह, घटना, उसकण्याचे प्रकार यापासून सावध राहून समाजास सर्व प्रकारच्या आपसातील संघर्षांपासून दूर ठेवण्यासाठी, त्यापासून वाचण्यासाठी सर्वांनी तत्पर राहणे आवश्यक आहे. ही बलोपासना कोणाच्या विरोधात किंवा प्रतिक्रिया म्हणून नाही. ही समाजाची स्वाभाविक अपेक्षित अवस्था आहे. बल, शील, ज्ञान आणि संघटित समाजाचेच जग ऐकते. सत्य आणि शांतता या गोष्टीही शक्तीच्या आधारावरच चालतात. बलशीलसंपन्न आणि निर्भय बनून ना भय देत काहू को, ना भय जानत आप, असा हिंदू समाज निर्माण करावा लागेल. जागरूक, संघटित, बलसंपन्न आणि सक्रिय समाज हेच सर्व समस्यांवरील उत्तर आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे कार्य गेली ९६ वर्षे निरंतर करीत आहे आणि कार्याची पूर्तता होईपर्यंत करीत राहणार आहे. आजच्या शुभ पर्वाचा हाच संदेश आहे. नऊ दिवस देवांनी व्रतस्थ राहून, शक्तीची आराधना करीत सर्व शक्तींचे संघटन बनविले. त्याने विभिन्न रूपांमधील मानवतेची हानी करणारे संकट पूर्णपणे नष्ट झाले. आज जागतिक परिस्थितीच्या भारताकडून अनेक अपेक्षा आहेत आणि भारतास त्यासाठी सिद्ध व्हायचे आहे. आमच्या समाजाच्या ऐक्याचे सूत्र आपली संस्कृती, समान पूर्वजांच्या गौरवामुळे मनामध्ये उठणारे समान तरंग आणि आपल्या या पवित्र मातृभूमीबद्दल असलेला विशुद्ध भक्तिभाव हेच आहे. 'हिंदू' शब्दाने तोच अर्थ व्यक्त होतो. आपण सर्व या तीन तत्त्वांशी तन्मय होऊन, आपापल्या अंतर्भूत वैशिष्ट्यांना सनातन ऐक्याचा शृंगार बनवून संपूर्ण देशास उभे करू शकतो, आम्हाला ते करायला हवे. हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य आहे. या तपस्येमध्ये आपल्या सर्वांच्या योगदानाची समिधा अर्पण करावी, असे आवाहन करून मी माझे निवेदन समाप्त करतो.
भ्रांती जनमन की मिटाते क्रांती का संगीत गाते एक के दशलक्ष होकर कोटियों को हैं बुलाते तुष्ट मां होगी तभी तो विश्व में सम्मान पाकर।
बढ रहे हैं चरण अगणित बस इसी धुन में निरंतर चल रहे हैं
चरण अगणित ध्येय के पथपर निरंतर।
भारतमाता की जय!
(अनुवाद : दत्ता पंचवाघ)