घर असावे घरासारखे,
नकोत नुसत्या भिंती,
तिथे असावा प्रेम जिव्हाळा,
नकोत नुसती नाती...
कवीने घराची तंतोतंत व्याख्या या काव्यात केलेली आहे. पूर्वीच्या काळी शेणामातीची घरं असत. त्यावर सुंदर नक्षीकाम केलेले असे. कालांतराने घराची रचना बदलली. शेणामातीची घरे जाऊन आता सिमेंट-विटांची घरे आली. या घरांना सुंदर बनवणारी माणसेदेखील निर्माण झाली. ती माणसे म्हणजे ‘इंटिरिअर डिझायनर.’ ही माणसे साध्या चार भिंतीला राजवाड्याचं रुप देऊ शकतात. एखादा राजमहाल लाजेल, एवढी सुंदर रचना हे ‘इंटिरिअर डिझायनर’ करतात. त्या महिलेनेसुद्धा अशा शेकडो घरांना आपल्या रचनेने जीवंतपणा दिला. त्या म्हणजे ‘इंटिरिअर डिझायनर’ म्हणजे ‘युनिक डिझायनर’च्या संचालिका राजेश्री शेळके.
विठ्ठल गावडे हे भारताच्या ‘इंडियन एअरलाईन्स’मधून सेवानिवृत्त झाले. मात्र, त्यांच्या या नोकरीमुळे त्यांचा संसार हा एका ठिकाणी स्थिर नव्हता. सतत भारतातील कोणत्या ना कोणत्या शहरात त्यांची बदली होत असे. पदरी दोन मुली आणि एक मुलगा. सोबत पत्नी सुशीलाची खंबीर साथ होती. त्यामुळे बदल्या जरी झाल्या, तरी मुलांकडे सुशीला गावडे बारीक लक्ष द्यायच्या. मुलांचे शिक्षणसुद्धा एकाच शहरात न होता विविध शहरांत झाले. राजेश्री यांचं प्राथमिक शिक्षण औंधमध्ये झालं, तर माध्यमिक शिक्षण नालासोपाराच्या इंग्लिश स्कूलमध्ये झालं. दहावी झाल्यानंतर त्याने ‘फॅशन डिझायनिंग’चा कोर्स केला. ९०च्या आसपास राजेश शेळके या होतकरू तरुणासोबत राजेश्रींचा विवाह झाला. एक कन्यारत्नदेखील झालं. या सगळ्या घडामोडीत नोकरी करायची त्यांना संधी मिळालीच नाही. सहा वर्षे राजेश्रीने कुटुंबाला दिली.
१९९६ साली त्या एका ‘आर्किटेक्ट फर्म’मध्ये नोकरीस लागल्या. ‘ऑफिस असिस्टंट’ असं काहीसं ते पद होतं. पगार होता पाच हजार रुपये. दहा वर्षे राजेश्रींनी नोकरी केली. “त्या फर्मचे मालक नवीन पाटकर हे माझे या क्षेत्रातील पहिले गुरु. त्यांच्यामुळे मला संगणक शिकता आला. ‘ड्रॉईंग डिझाईन’ शिकता आले,” असे त्या कृतज्ञतापूर्वक नमूद करतात. १९९५च्या दरम्यान या फर्मने प्रभादेवीच्या ‘सिद्धिविनायक मंदिरा’चे काम केले होते. त्या कामामध्ये राजेश्री यांचादेखील खारीचा वाटा होता. मात्र, स्वत:चं वेगळं काही असावं, ही महत्त्वाकांक्षा स्वस्थ बसू देत नव्हती. याच महत्त्वाकांक्षेतून २००३च्या आसपास ‘अमन इंटरप्रायझेस’ उदयास आली. या कंपनीच्या माध्यमातून राजेश्री शेळके विविध बँकांच्या पॅनेलवर गेल्या. अनेक बँकांची कार्यालये सुंदर करण्याचे काम त्यांनी केले. काही कार्यालयांना फर्निचर किंवा तत्सम वस्तूदेखील पुरवल्या.
निव्वळ मुंबईच नव्हे, तर गोवा, सुरत, जयपूर, जोधपूर, अहमदाबाद अशा शहरांतील बँकाची कार्यालये त्यांनी डिझाईन केली. त्यांच्या कामाची पद्धत, डिझाईन, कामाप्रति झोकून देण्याची वृत्ती या सार्या गुणांमुळे बँकेच्या वर्तुळात त्या प्रसिद्ध होत्या. याबाबतीत एक किस्सा त्यांच्या कामाची पावती देतो. किस्सा असा आहे, ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’च्या गव्हर्नरपदी रघुराम राजन यांची निवड झाली होती. त्यांच्या कार्यालयाचे काम १५ दिवसांत पूर्ण करायचे होते. अनेक कंपन्यांनी असमर्थता दर्शवली. राजेश्री शेळके यांनी मात्र हे आव्हान स्वीकारलं. सायंकाळी कार्यालय सुटल्यानंतरच काम करता येणं शक्य होतं. शेळके यांनी आपल्या मजुरांसह त्या बँकेतच तळ ठोकला. अक्षरश: रात्रीचा दिवस करून अवघ्या १५ दिवसांत काम पूर्ण करून दिले. बँक अधिकार्यांना प्रशिक्षण देणार्या पुण्यामधील एका प्रशिक्षण संकुलाचे कामदेखील ‘युनिक डिझायनर्स’ने पूर्ण केले.
त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा निवासी घरांकडे वळवला. आतापर्यंत त्यांनी ५०० हून अधिक घरांच्या अंतर्गत सजावटीचे काम पूर्ण केले आहे. मुंबई, नवी मुंबईसह पुणे, गोवा, सुरत, अहमदाबाद अशा शहरातील घरांनादेखील शेळके यांनी आपल्या उद्योजकीय सेवेने सौंदर्य बहाल केले आहे. भविष्यात एकाच छताखाली घरच्या सगळ्या सुविधा पूर्ण करेल, असे फर्निचर शोरुम उभारण्याचा राजेश्री शेळके यांचा मानस आहे. एका मुलीने उद्योगास सुरुवात केलेली ही उद्योजिका आज २५ हून अधिक लोकांना प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष रोजगार देते. अंतर्गत सजावटीच्या सगळ्या सेवा सुविधा ‘युनिक डिझायनर्स’मध्ये मिळतात.
२०१२ पासून राजेश्री शेळके यांना त्यांच्या पतीने, राजेश शेळके यांनी मोलाची साथ दिली. त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला आणि आपल्या उद्योजिका पत्नीच्या खांद्याला खांदा लावून सोबत केली. आपल्या पतीमुळे आपला उद्योजकीय प्रवास सुकर झाला, असे राजेश्री शेळके आवर्जून सांगतात.
“घर खरेदी करताना प्रत्येकाची एक भावना असते. त्याच्या भावना त्या वास्तूशी जोडलेल्या असतात. त्या घरातील एकूण एक कोपरा त्या घरातील व्यक्तींशी जणू संवाद साधत असतो. त्यामुळे त्या सगळ्यांच्या भावनांचा विचार करून आम्ही रचना करतो आणि सजावट करतो. यासाठी अगदी जमिनीवरच्या लादीपासून ते छतापर्यंत, दिवाणाघरापासून ते स्वयंपाकघरापर्यंत सर्व घटकांचा विचार केला जातो. घराचे काम करताना ते आपलेच घर आहे, या भावनेने त्या घराला आम्ही सेवा देतो,” असं राजेश्री शेळके म्हणतात. घराला स्त्रीशिवाय घरपण नसते, असे म्हणतात; पण आमच्या घराला राजेश्री शेळके यांच्यामुळे सौंदर्य आहे, असे ‘युनिक डिझायनर्स’चे ग्राहकसुद्धा बहुधा म्हणत असतील.