अंत्यसमयी पर्यावरण रक्षणाचे कार्य करणार्या नाशिक येथील आकांक्षा नाईक यांच्याविषयी...
पंचतत्त्वांनी बनलेले शरीर घेऊन जन्माला आलेला मनुष्य पर्यावरणासोबत जगतो आणि शेवटी त्याच पंचतत्त्वात विलीन होतो. मात्र, आपल्या जीवनप्रवासात कायमच सोबत असलेल्या पर्यावरणाचा र्हास मानवाच्या हातून कळत न कळतपणे होत असतो. अगदी जीवनाच्या अंतिम समयी सरणावरील लाकडांच्या रूपाने मानवाच्या हातून वृक्षतोड होत असते. अशावेळी अंतिमसमयी निवर्तलेल्या व्यक्तीद्वारे अप्रत्यक्षपणे आणि प्रत्यक्षपणे त्याच्या अंतिमसंस्कारासाठी जमलेल्या आप्तेष्टांद्वारे पर्यावरणाचा र्हास होऊ नये, यासाठी नाशिक येथील आकांक्षा नाईक यांनी कार्य केले आहे. त्यांच्या कार्याने त्या खर्या अर्थाने अंत्यसमयाची पर्यावरण प्रकाशदायिनी ठरतात.
आकांक्षा यांना पर्यावरण सजगतेचे बाळकडू त्यांचे आई-वडील मोनल व आनंद नाईक यांच्याकडूनच मिळाले. त्यांनी त्र्यंबकेश्वरजवळ जमीन घेऊन त्यावर स्वतःचे जंगल उभे केले. निसर्गाचे आपण देणे लागतो, याच धारणेवर आकांक्षा यांचे कार्य उभे आहे. मृत्यूचा विचार तरुण वयात खरे तर सहसा मनातही डोकावत नाही. परंतु, या तरुण मुलीने पर्यावरणपूरक अंत्यसंस्काराचा केवळ विचारच केला नाही तर त्यादृष्टीने पावले उचलण्याचे धाडसदेखील दाखविले, हे विशेष. आज देशभरात फक्त दहन संस्कारासाठी दररोज लाखो वृक्षांची कत्तल होते. सर्वसाधारणपणे एका मृतदेहाचे दहन करण्यासाठी 280 ते 300 किलो लाकूड लागते. त्याला पर्याय म्हणून अनेक महानगरपालिकांमध्ये विद्युतदाहिनी अथवा डिझेलदाहिनीची सोय करून दिलेली आहे. मात्र, हे पर्यायसुद्धा म्हणावे तेवढे पर्यावरणपूरक आहेत, असे नाही.
आकांक्षा नाईक यांच्या आजोबांचे २०१८ मध्ये निधन झाले. तेव्हा विद्युतदाहिनीसाठी मागणी केली गेली. परंतु, विद्युतदाहिनीचा पर्याय उपलब्ध न झाल्यामुळे त्यांना दहनासाठी लाकडांचा वापर करावा लागला आणि तिथे उपस्थित आकांक्षाच्या मनात अनेक प्रश्न उभे राहू लागले. आपल्यासारखाच अनुभव आणखीही काही लोकांना आल्याचे त्यांच्या लक्षात आले व अंत्यसंस्कारांसाठी काही पर्यावरणपूरक मार्ग आहे का? याचा शोध त्यांनी घेण्यास सुरुवात केली. त्यातूनच त्यांना शेणाच्या ओंडक्यांच्या आकारातील लाकडाबद्दल माहिती मिळाली. केवळ मनोराज्य न रंगवता त्यावर कार्य करण्यास त्यांनी सुरुवात केली. लागणारी यंत्रे मागवत, प्रसंगी रात्रपाळी करून त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी गाईचे शेण वापरून ओंडके तयार केले. यात आकांक्षा यांना त्यांच्या पतीची मोलाची साथ लाभली.
कार्याच्या ठिकाणी केवळ रात्रीच वीज उपलब्ध असल्याने रात्रपाळीतील कामाचा पर्याय निवडण्यात आला. काम करताना गाईच्या शेणाचा पुरवठा अपुरा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मग एका गोशाळेत वर्षभराच्या शेणाच्या किमतीची देणगी दिली आणि ते वर्षभर उचलण्याची जबाबदारी त्यांनी घेतली. तयार झालेले लाकूड अधिक दहनक्षम व्हावे यासाठी विविध प्रकारे मिश्रणे करून वेगवेगळ्या प्रकारची अधिक दहनक्षमता असणारे लाकूड बनविण्यात आले. यश आणि अपयशाच्या दोरीवर हा प्रवास सुरू होता. मात्र, त्यांनी माघार घेतली नाही. काही मोठ्या कंपन्यांमध्ये, ज्यांना बॉयलरसाठी लाकूड लागते, त्यांच्याशी बोलणी करण्याचा प्रयत्नही केला. आपला शोध कुठेतरी कमी पडतो याची कल्पना असल्याने ध्येयासक्त आकांक्षा यांनी आपला शोध अधिक वाटांनी घेण्यास सुरुवात केली.
ही वाटचाल सुरू असताना त्यांना विजय लिमये यांच्याबद्दल समजले. लिमये यांनी शेतीमधील ‘वेस्ट’पासून ‘ब्रिकेट्स’ तयार करून पर्यावरणपूरक अंतिम संस्कारांचे काम नागपूरमध्ये केले आहे. बर्याच प्रयत्नानंतर आकांक्षा यांचा लिमये यांच्याशी संपर्क झाला. माहितीची बरीच देवाणघेवाण झाली. आकांक्षा यांच्या धडपडीला न्याय मिळावा म्हणून लिमये स्वतः नाशिकला आले. त्यांनी मनपा आयुक्तांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती दिली. पुढे महिनाभराच्या प्रयत्नानंतर त्यांना एका बेवारस मृतदेहाचे पर्यावरणपूरक दहन करण्याची संधी मिळाली, जी त्यांनी पूर्णपणे पार पाडली. या घटनेला प्रसिद्धी मिळाल्यावर समाजामध्ये आपल्या संकल्पनेचे स्वागत होईल, असे आकांक्षा यांना वाटले. मात्र, तसे झाले नाही. अनुभव हेच उत्तम शिक्षण हाच प्रत्यय त्यांना आला. पहिल्या यशस्वी प्रयोगानंतर नाशिकमधील गायधनी कुटुंबाकडून त्यांच्या आईच्या पार्थिवावर असे दहनसंस्कार करण्यासाठी आकांक्षा यांना विचारणा झाली.
त्यांनी या दहन संस्काराचा खर्च उचलण्याची तयारीदेखील दाखवली. परंतु, समाजातून अशाप्रकारे प्रथमच कोणीतरी पुढे आले म्हणून त्यांनी व त्यांच्या सहकार्यांनी हा दहन संस्कार स्वखर्चाने पार पाडला. असे संस्कार हे स्वखर्चाचे आहेत, असे समजले तेव्हा काही नकारही पचवावे लागले. मात्र, त्यांनी आपला अविरत प्रयत्न हार न मानता सुरू ठेवला. स्वत:ला याबाबतीत निराश वाटले की, प्रयत्नांच्या बाबतीत ,‘थोडा हैं थोडे की जरूरत हैं!,’ असं समजावत मी प्रयत्न करत राहाते! असा आशावाद त्यांच्या बोलण्यात सहज डोकावून जातो. नुकताच कौटुंबिक व्यवसाय सुरू केलेल्या नाईक या, “नजीकच्या काळात आपण यशस्वीपणे पर्यावरणपूरक दहन संस्कार करून निसर्ग संवर्धनाला अल्पसा का होईना पण हातभार लावू. हा पावलापुरता प्रकाशच आम्हाला पुढचा मार्ग दाखवेल,” असा आशावाद व्यक्त करतात. त्यांच्या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!