डोंबिवलीची ‘घरगुती’ चव!
उत्तम पगाराची नोकरी सोडून व्यवसायाकडे वळलेल्या डोंबिवलीतील अमेय वर्तक आणि अलोक ताम्हनकर या दोन मराठी तरुणांनी ३२ हून अधिक उद्योजकांची तब्बल ३०० पेक्षा जास्त उत्पादने एकाच छताखाली खवय्यांना उपलब्ध करून दिली आहेत. ‘घरगुती-गृहउद्योगांचे माहेरघर’ या ब्रॅण्डखाली खवय्यांना शुद्ध, उत्तम चवीचे आणि भेसळमुक्त पदार्थ मिळत आहेत, हेच त्यांचे खास वैशिष्ट्य आहे.
अमेय हे फायनान्समध्ये ‘क्रेडिट मॅनेजर’ म्हणून उत्तम पगाराची नोकरी करत होते. सोशल मीडियावर एक विनोदी किस्सा आला होता. तो किस्सा वाचून त्यांनी व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. लाख रुपये पगाराची नोकरी सोडून व्यवसाय करण्याचा निर्णय घेणार्यांना लोक वेडा म्हणतात, असं त्यांचं वैयक्तिक मत. असंच वेड घेऊन जगणारी अमेय आणि अलोक ही जोडगोळी. नोकरी सोडल्यानंतर अमेय वर्तक यांचे आता एकूण चार व्यवसाय सुरू आहेत. त्यापैकी तीन व्यवसायांत अलोक ताम्हनकर हे त्यांचे भागीदार आहेत.
व्यवसायासाठी लागणार्या सकारात्मक दृष्टिकोनासोबत जे गुण व्यवसाय वाढीसाठी लागतात, त्याची सरमिसळ म्हणजे ही जोडी. दोघांनाही आपापल्या मर्यादा माहिती आणि ‘पॉझिटिव्ह’-‘निगेटिव्ह’ बाजूसुद्धा. त्यामुळे त्यांचे निर्णयावरून वाद होत नाही. कामं-जबाबदार्या नीट वाटलेल्या असतात. अमेय आणि अलोक ‘वायर्ड एक्सप्रेशन्स’ या त्यांच्या संस्थेतर्फे कवितांचे, गाण्याचे, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम ते करतात. दोन कार्यक्रमांची त्यांनी स्वत: निर्मिती केली आहे. त्यापैकी एक कार्यक्रम म्हणजे ‘प्रेम, कॉफी आणि शब्द काही’ या कार्यक्रमाचे सादरीकरण संदीप खरे आणि स्पृहा जोशी करतात. ‘थिएटर’साठी त्यांनी नोकरी सोडली. थिएटर करतानाच त्यांनी प्रिटिंग व्यवसायात पाऊल टाकले. त्यांचा हा व्यवसाय ‘प्रिंट व्ह्यू’ नावाने डोंबिवली पश्चिमेला सुरू आहे.
अनेक क्षेत्रामध्ये अमेय यांनी आपले नशिब आजमावले. आपण खाद्यक्षेत्रातील व्यवसाय सुरू करावा असे त्यांना वाटले. आईच्या हाताच्या बासुंदीची चव इतरांनाही आवडेल असे वाटले. त्यात कोणत्याही प्रकारची भेसळ नाही. आईच्या हाताची बासुंदी घेऊन आपण काहीतरी व्यवसाय सुरू करावा, असा विचार मनात आला. तो निर्णय त्यांनी अंमलातही आणला. अमेयच्या आईच्या हाताची बासुंदी खाणार्यांच्या तोंडातून ‘अप्रतिम, घरची चव’ अशा अनेक शब्दांत दाद देऊन जातात. २५ एप्रिलला आईच्या वाढदिवसाच्या दिवशीच त्यांच्या बासुंदी व्यवसायाचा शुभारंभ झाला. डोंबिवली, अंधेरी, विलेपार्ल, जोगेश्वरी, नाशिक, पुणे, मुंबई या विविध ठिकाणी बासुंदीची चव पोहोचली आहे आणि बघता बघता केवळ साडेपाच महिन्यांत एक हजार एक किलोचा टप्पा या बासुंदीने सर केला आहे. पारंपरिक मराठमोळी बासुंदीची चव जपणे हे एकमेव उद्दिष्ट बाळगून हा व्यवसाय सुरू आहे. मशीनचा वापर केला जात नाही. बासुंदी या एका उत्पादनामुळे ‘घरगुती’ ही संकल्पना डोक्यात आली आणि प्रत्यक्षात उतरली. बासुंदीसाठी वेगळे दुकान चालू करूया, असे त्यांनी ठरविले. पण, एका उत्पादनासाठी दुकान घेणे कितपत परवडणारे आहे, हा विचार मनात आला. दुकान उभे करणे, त्यांचे ‘इंटरियर’ अशा विविध गोष्टी दुकाने सुरू करताना येतात. आपल्यासारखे स्वत:चे उत्पादन बाजारात घेऊन फिरणारे खूप व्यावसायिक आहेत. या व्यावसायिकांसमोर असलेली आव्हाने कोणती त्यांचा अभ्यास या दोघांनी केला. त्यामध्ये पाच आव्हाने समोर आली.
गृहउद्योजकांनी दुसर्या दुकानदारांना माल विकला, तर गृहउद्योजकाचे नाव ग्राहकांपर्यत न पोहोचता त्या दुकानदाराचे नाव पोहोचते. या अनुषंगाने गृहउद्योजकाच्या उत्पादनांना दुकानांनी स्वत:चे नाव लावण्याची शक्यता ही गोष्ट बर्याचदा घडते. त्यामुळे उद्योजकाची ओळख बाजारात होत नाही. त्यामुळे उत्पादनाची ओळख बाजारात टिकवणे अवघड होते. दुसरी गोष्ट म्हणजे दुसर्यांच्या दुकानात आपले उत्पादन विकायचे म्हणजे त्या दुकानदारांनाही २५ ते ३० टक्के नफा सोडावा लागतो. ‘क्रेडिट’वर माल द्यावा लागतो, तुमचे कुठे दुकान आहे का? असा प्रश्न त्यांना फोनवर येतो तेव्हा ते काहीसे ओशाळून ‘नाही हो, घरूनच करतो’ असे सांगतात. गृहउद्योजकांची ही आव्हाने पाहता त्यांना हक्कांचे दुकान मिळाले पाहिजे. त्या सर्व उद्योजकांना एकच छताखाली घेऊन यावे ही संकल्पना सुचली. आज ३२ हून अधिक गृहउद्योजकांची उत्पादने शिवमंदिर रोड येथील ‘घरगुती गृहउद्योगांचे माहेरघर’ या दुकानात मिळतात. या गृहउद्योगांना मार्केटमध्ये उभे राहायचे आहे. त्यामुळे ते उत्तम दर्जाची उत्पादने ग्राहकांना देण्याचा प्रयत्न करतात. बॅ्रण्डची उत्पादने ही त्यांच्या नावावर जातात. पण या गृहोद्योगांची उत्पादने ही त्यांच्या चवीवर ग्राहक घेत असतात. या ठिकाणी मसाले, लाडू, पापड, तूप, बासुंदी अशी विविध प्रकारची उत्पादने उपलब्ध आहेत. अनेक गृहउद्योजक पाच ते सहा उत्पादने करतात. त्यासाठी त्यांना स्वतःचे दुकान सुरू करणे न परवडणारे असते. या प्रकारच्या गृहउद्योगांना त्यांच्या नावासह दुकानात हक्काची बाजारपेठ या डोंबिवलीकर तरुणांनी उपलब्ध करून दिली आहे. ‘घरगुती गृहउद्योगांचे माहेरघर’ हे सुरू करून आता केवळ एकच महिना झाला आहे. आता 32 गृहउद्योगाची उत्पादने या दुकानात मिळत आहे. येत्या दोन-चार दिवसांत अजून दोन ते तीन उत्पादने नव्याने येणार आहेत. अमेय आणि अलोक हे मध्यस्थ म्हणून फारसे कमाई करीत नाही. उत्पादन उत्पादित करणार्या गृहउद्योगांना जास्तीत जास्त नफा व्हावा, हेच त्यांचे उद्दिष्ट आहे. ‘घरगुती’ नावाची कंपनी तयार करावी आणि डोंबिवलीत आणि इतरत्र हिच्या शाखा असाव्यात, ज्यामुळे जास्तीत जास्त गृहउद्योगांना बाजारपेठ उपलब्ध होईल, हा त्यांचा विचार घेऊन ते ठामपणे उभे आहेत. अमेय आणि अलोक यांनी ही उत्पादनाची चव चाखली आहे. त्यानंतर उत्पादने दुकानात ठेवली आहेत. मराठी तरूणांनी व्यवसायात उतरण्याची गरज आहे. मराठी माणूस व्यवसायात उतरण्यास घाबरत असतात. कारण, त्यांच्याकडे आर्थिक पाठबळ नसते. डोंबिवलीतील दोन तरूणांनी उद्योजक बनण्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरविले आहे. तो वाढायला मात्र तुमची साथ हवी आहे.