मुंबई (अक्षय मांडवकर) - ठाण्याला पश्चिम उपनगराशी जोडणाऱ्या घोडबंदर ते गायमुख रस्त्याच्या प्रस्तावाला तुर्तास स्थगिती देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडलेल्या 'राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकी'मध्ये या रस्त्याच्या रूंदीकरणामध्ये वन्यजीवांसबंधी उपाययोजना सुचवण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे. या रस्ताच्या रुंदीकरणामध्ये 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'चे २०.६ हेक्टर वनक्षेत्र बाधित होणार आहे.
घोडबंदर ते गायमुख रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा विचार करुन 'महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळा'ने (एमएसआरडीसी) या रस्त्याचे रुंदीकरणाचा प्रस्ताव मांडला आहे. मात्र, या प्रस्तावाला तुर्तास काही कालावधीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे. सद्यपरिस्थितीमध्ये हा रस्ता 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'च्या उत्तरेकडील सीमेलगत भागामधून जातो. या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी 'एमएसआरडीसी'ला राष्ट्रीय उद्यानातील एकूण २०.६ हे. वनक्षेत्राची आवश्यकता होती. तसेच रुंदीकरणामध्ये २००९ झाडे कापावी लागणार होती. त्यामुळे मंजुरीसाठी हा प्रस्ताव मंगळवारी पार पडलेल्या 'राज्य वन्यजीव मंडळा'च्या बैठकीत मांडण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंडळातील सदस्यांच्या सूचनेनुसार या प्रस्तावाला स्थगिती देऊन वन्यजीव अभ्यास गटाची नियुक्ती केली आहे.
'एमएसआरडीसी'ला सद्याच्या रस्त्याचे चौपदरीकरण करुन त्यावर उन्नत पूल बांधायचा आहे. या उन्नत पूलावरुन कार्गो ट्रकसारखे अवजड वाहने जातील आणि खालच्या चौपदरी रस्त्यावरुन हलकी वाहने जाऊ शकतील. मात्र, या रस्त्यावर वाहनांच्या धडकेत बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. याचा विचार करुन गायमुख येथे हा प्रकल्प उन्नत स्वरुपाचा करण्याचा विचार 'राज्य वन्यजीव मंडळा'च्या बैठकीत मांडण्यात आला. ज्याठिकाणी बिबट्याचा भ्रमणमार्ग आहे, अशा साधारण ३५० मीटर क्षेत्रावरुन हा मार्ग उन्नत स्वरुपाचा नेण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मंडळाचे सदस्य किशोर रिठे यांनी दिली. तसेच काही ठिकाणी वन्यप्राण्यांना जाण्यासाठी कलवट तयार करण्यावर चर्चा करण्यात आली. यासाठी मुख्यमंत्र्यांनी मंडळातील सदस्य आणि वनाधिकाऱ्यांची समिती नेमली असून या समितीकडून प्रत्यक्ष जागेवर पाहणी करुन तो अहवाल पुढील बैठकीत मांडला जाणार आहे.