बलुचिस्तानातील हिंसक घटनांकडे सामान्य उपद्रव म्हणून नव्हे, तर दीर्घकालीन संघर्षाच्या दृष्टीने पाहावे लागते. बलुचिस्तानच्या व्यापक हिताचा विरोध प्रारंभी पाकिस्तानने केला आणि आता तेच काम चिनी अतिक्रमण करत आहे.
पाकिस्तानने गेल्या कित्येक वर्षांपासून बलुचिस्तानमध्ये कायम केलेली स्थिती पाहता, त्याला ‘दहशतीचे राज्य’ हेच एकमेव विशेषण चपखल बसत असल्याचे सिद्ध होते. या दहशतीच्या राज्यात शांततामय मार्गाने आपल्या अधिकारांसाठी आवाज उठविणाऱ्या बलुच जनतेचे पाकिस्तानी पोलीस आणि सशस्त्र बले इस्लामी दहशतवाद्यांच्या साथीने सातत्याने उत्पीडन करत आहेत. बलुचिस्तानात पाकिस्तानकडून होणाऱ्या संघटित बर्बरतेविरोधात आवाज बुलंद करणाऱ्या इथल्या युवा राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे नेहमीच अतिशय कठोरतेने दमन करण्यात आले. परिणामी, या सततच्या दडपशाहीचा विरोध करणे, त्याला प्रत्युत्तर देणेही स्वाभाविकच म्हटले पाहिजे. त्यातूनच आपल्याला पाकिस्तानी सुरक्षा बलांविरोधात हिंसाचाराच्या बातम्या मिळत राहतात. सध्याच्या काळात तर सुरक्षा बलांविरोधातील हिंसाचारी कारवायांत काहीसा वेग आल्याचे दिसते.
नुकत्याच बलुचिस्तानच्या हरनाई जिल्ह्यामध्ये ‘फ्रंटियर कॉर्प्स’च्या (एफसी) एका चौकीवर झालेल्या सशस्त्र हल्ल्यात ‘एफसी’च्या बलुचिस्तान शाखेशी संबंधित सात पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा करण्यात आला. तथापि, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या चकमकीत सातपेक्षाही अधिक जणांचा बळी गेला व त्यात निमलष्करी बलाच्या सहा कर्मचाऱ्यांचा आणि दोघा खासगी सुरक्षारक्षकांचा जागीच मृत्यू झाला, तर कित्येक सैनिक गंभीर जखमी झाले. ‘एफसी’वरील हल्ला, बलुचिस्तानच्या पंजगुर जिल्ह्यातील एका फुटबॉल मैदानाजवळ बॉम्बस्फोटाच्या दोन दिवसांनंतर झाला. फुटबॉल मैदानाजवळील हल्ल्यात दोन प्रेक्षकांचा बळी गेला होता, तर सहा जण जखमी झाले होते. ‘फ्रंटियर कॉर्प्स’वरील हल्ल्याआधी लष्कर, निमलष्करी बले आणि पोलीस बलांवर अनेकानेक गंभीर हल्ले झालेले आहेत. दोन महिन्यांपूर्वी ऑक्टोबरच्या मध्यात ग्वादर जिल्ह्याच्या ओरमारा भागातील किनारी महामार्गावर सुरक्षा बलांच्या ताफ्यावर सशस्त्र हल्ला करण्यात आला होता व त्यात १४ सुरक्षा कर्मचारी, ‘एफसी’चे सात कर्मचारी आणि तितकेच सुरक्षारक्षक मृत्युमुखी पडले होते.
कठोर दमन!
पाकिस्तानी लष्कराने बलुचिस्तानमध्ये राष्ट्रवादी शक्तींविरोधात कितीतरी मोहिमा चालवल्या. उल्लेखनीय म्हणजे, या मोहिमांचे समर्थन कुख्यात गुन्हेगार आणि धार्मिक कट्टरपंथीयांनीही केले व यालाच स्थानिक लोक ‘डेथ स्क्वॉड’ असेही म्हणतात. बलुचिस्तानमध्ये राजकीय कार्यकर्ते, बुद्धिजीवी, महिला, इतकेच नव्हे तर बालकांनाही सुरक्षा यंत्रणा अचानक कधीही गायब करतात आणि सुरक्षा बलांविरोधातील हिंसक घटना त्यांनी केलेल्या अत्याचारांवरील प्रतिक्रियाच असते. दरम्यान, ‘एफसी’वरील हल्ल्याच्या पाच दिवसआधी सुरक्षाबलांनी बलुचिस्तान प्रांताच्या आवारा भागातील एका चकमकीत दहा संशयित दहशतवाद्यांना ठार मारले होते. ‘फ्रंटियर कॉर्प्स’ पाकिस्तानचे एक निमलष्करी बल असून ते सध्या अफगाणिस्तान आणि इराणच्या संवेदनशील सीमेवरील बलुचिस्तान व खैबर पख्तूनख्वामध्ये नियंत्रण, टेहळणी तथा कायदा-व्यवस्था कायम राखण्यासाठी तैनात आहे. ‘फ्रंटियर कॉर्प्स’च्या दोन प्रांतीय शाखा आहेत : १. ‘एफसी एनडब्ल्यूएफपी’ - यात एकेकाळी उत्तर-पश्चिम सीमा प्रांत नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि ‘एफएटीए’च्या जनजातीय प्रदेशाचा विलय केलेल्या खैबर पख्तूनख्वा प्रांताचा समावेश होतो. २. ‘एफसी बलुचिस्तान’ - या सुरक्षाबलातील सैनिक बलुचिस्तान प्रांतात तैनात आहेत.
दरम्यान, पाकिस्तानी सुरक्षाबलांनी या भागात याआधी ‘ऑपरेशन रद्द-उल-फसाद’च्या अंतर्गत सातत्याने दहशतवाद-विरोधी अभियान राबविले आहे. स्थानिक कायदाविषयक संस्थांच्या समर्थनाने सुरक्षाबलांनी चालवलेल्या या लष्करी अभियानाचा हेतू बलुचिस्तानमधील उग्रवाद्यांच्या व्यापक यंत्रणेला संपवण्याचा होता. २२ फेब्रुवारी, २०१७ रोजी सुरू करण्यात आलेल्या या अभियानाचा उद्देश १५ जून, २०१४ रोजी पाकिस्तान अफगाणिस्तान सीमेवरील उत्तर वजिरिस्तानमधील उग्रवाद्यांविरोधात सुरू करण्यात आलेल्या ‘ऑपरेशन जर्ब-ए-अज्ब’च्या माध्यमातून मिळालेले फायदे अधिक बळकट करण्याचा होता. उल्लेखनीय म्हणजे, पाकिस्तानी लष्कराने या अभियानांतून देशाच्याच नागरिकांना ठार मारण्याची तत्परता दाखवली व याकडेच पाकिस्तानी पंजाबी आणि देशाच्या उर्वरित भागातील लढ्याच्या रूपाने पाहिले जाते.
सामरिक आणि वित्तीय हित
अफगाणिस्तान आणि इराणशी सीमा लागून असलेला बलुचिस्तान पाकिस्तानमधील सर्वात मोठा आणि सर्वात अस्थिर प्रांत आहे. लष्कर-ए-झांगवी, तालिबानसह अनेक सशस्त्र दहशतवादी संघटनांच्या बहुस्तरीय धोक्याचा या प्रांताला सातत्याने सामना करावा लागतो. बलुचिस्तानमधील राष्ट्रवादी संघटनांनी मात्र पाकिस्तानपासून या प्रांताला स्वातंत्र्य मिळावे, अशी मागणी केलेली आहे. त्यातूनच इथल्या राष्ट्रवादी संघटनांच्या निशाण्यावर पाकिस्तानी सशस्त्र बलांबरोबरच चीनने सुरू केलेल्या ६२ अब्ज डॉलर्सच्या गुंतवणूक योजनेतील प्रकल्पही आलेले आहेत व चिनी लोकांवरील हल्ल्याच्या घटनांतही कायम वाढ होते आहे. नुकतेच एका चिनी नागरिक आणि त्याच्या दुभाषावर कराची शहराबाहेरील एका कार शोरूममध्ये हल्ला करण्यात आला. कराचीला पाकिस्तानची आर्थिक राजधानी म्हणतात व इथे चिनी नागरिकांवर झालेल्या हल्ल्यातून चीनच्या ‘बेल्ट अॅण्ड रोड इनिशिएटिव्ह’चा विरोध करणाऱ्या विद्रोही संघटनांनी आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करताना आपली रणनीतीही बदलल्याचे दिसून येते. शहरी केंद्र, चिनी नागरिक आणि चिनी गुंतवणुकीला लक्ष्य करण्यातून एका प्रकारे नव्या वसाहतवादी घुसखोरांच्या रूपातील चिनी आक्रमणाचा विरोध करण्याचाच उद्देश आहे.
उल्लेखनीय म्हणजे, बलुचिस्तानचे स्वतःचे एक भू-स्थानिक महत्त्व असून, हा प्रांत नैसर्गिक वायू आणि तेलासारख्या नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध आहे. पण, त्याचा उपयोग स्थानिकांच्या फायद्यासाठी कधी झाला नाही, अशी इथल्या जनतेची, राष्ट्रवाद्यांची तक्रार असते. सोबतच बलुचिस्तान पाकिस्तानचा सर्वात मोठा प्रांत असला तरी तिथली लोकसंख्या सर्वात कमी आहे. स्वतंत्र देश म्हणून पाकिस्तानच्या उदयानंतर बलुचिस्तान प्रांत भीषण संकट आणि उग्रवादाने ग्रासला गेला. १९४७ साली पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान प्रांताचे विलीनीकरण करण्याच्या मोहम्मद अली जिना यांच्या कुटील डावपेचांचा स्थानिक जनजातींनी जोरदार विरोध केला होता. तेव्हापासून बलुच राष्ट्रवादी मंडळी स्वातंत्र्यासह राजकीय आणि आर्थिक स्वायत्ततेसाठी लढा देत आहे. इस्लामाबादचे म्हणजे पाकिस्तानी सत्ताधाऱ्यांचे बलुच राष्ट्रवाद्यांशी नेहमीच तणावपूर्ण संबंध राहिले. सप्टेंबर २०१९ पासून स्थलांतरित बलुची नागरिक, बलुच अधिकार कार्यकर्ते आणि समर्थकांकडून जगभरात पाकिस्तानविरोधात निदर्शने केली जात आहेत. नुकतीच अमेरिकेतील ‘द आर्मड् कन्फ्लिक्ट लोकेशन अॅण्ड इव्हेंट डाटा प्रोजेक्ट’ या तत्काळ डेटा संग्रह आणि विश्लेषण व संकटाच्या अंदाजावर कार्य करणाऱ्या संस्थेने २०२०च्या सुरुवातीपासून केलेली नोंद जपानच्या ‘निक्केई’ या प्रमुख वृत्तपत्राने समोर आणली. त्यानुसार बलुचिस्तानमध्ये ‘बेल्ट अॅण्ड रोड इनिशिएटिव्ह’ योजनेचा विरोध करणाऱ्या संघटनांकडून संघटित हिंसाचाराच्या प्रकरणांत वाढ झाली आहे. यावरूनच, बलुचिस्तानातील हिंसक घटनांकडे सामान्य उपद्रव म्हणून नव्हे, तर दीर्घकालीन संघर्षाच्या दृष्टीने पाहावे लागते. बलुचिस्तानच्या व्यापक हिताचा विरोध प्रारंभी पाकिस्तानने केला आणि आता तेच काम चिनी अतिक्रमण करत आहे. पण, या दोन्ही संकटाचा मुकाबला पुन्हा एकदा सशस्त्र संघर्षाच्या दिशेने चालल्याचे दिसते.
(अनुवाद : महेश पुराणिक)