आयुर्वेदशास्त्र आणि शस्त्रक्रिया

04 Jan 2021 23:05:50

Ayurveda_1  H x
 
 
 
 
दि. १९ नोव्हेंबर, २०२० रोजी एका अधिसूचनेचे स्पष्टीकरण सादर करण्यात आले, ज्याद्वारे भारतीय औषधी केंद्रीय परिषद ‘सीसीआयएम’ने (सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन) आयुर्वेदिकतज्ज्ञांना ‘स्नातकोत्तर शिक्षणा’नंतर म्हणजेच ‘पोस्ट ग्रॅज्युएशन’नंतर काही निवडक शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली. या अधिसूचनेच्या प्रसारणानंतर ‘आयएमए’ने (इंडियन मेडिकल असोसिएशन) दि. ११ डिसेंबर, २०२० रोजी बंद पुकारला. ‘आयडीए’नेदेखील (इंडियन डेंटल असोसिएशन) या अधिसूचनेचा निषेध केला. हा प्रस्ताव नेमका काय आहे, याबद्दल आजच्या लेखातून जाणून घेऊया.
 
 
२०१६ साली ‘सीसीआयएम’ने ही अधिसूचना काढली, ज्यात नमूद केले गेले की, आयुर्वेदाचेशल्य (सर्जरी) व शालावय (ईएनटी) यात ‘स्नातकोत्तर’ शिक्षण घेतलेल्या वैद्यांना अधिकृतरीत्या शस्त्रक्रिया करता येतील. १९ नोव्हेंबर, २०२० रोजी या नियमातील प्रासंगिक प्रावधानांचे स्पष्टीकरण दिले गेले. यानुसार सुमारे ५८ शस्त्रक्रिया प्रक्रिया (टेक्निक आणि सर्जिकल डेमोन्स्ट्रेशन) करण्याची परवानगी दिली गेली आहे. यापैकी काही शस्त्रक्रियांचा इथे नामोल्लेख करते- skin grafting, Ear Lobe Repair, laparotomy, laser Ablation, Fistulectomy, Simple cysts & benign tumor removal, Circumcision, herniotomy/ hernioplasty, Hydrocele, Appendisctomy, Intubation, Cataract surgery, Root canal treatment, Pterygium, Glaucoma, Deviated Septum, Rhinoplasty, Otitis media, Nasal polyps इत्यादी.
 
 
’आयएमए’ व ‘आयडीए’चा याला पाठिंबा नाही, पण विरोध आहे. पण, आयुर्वेदशास्त्र, त्यातील अभ्यासक्रम आणि सद्यपरिस्थिती काय आहे, हे जाणून न घेता हा विरोध आहे. म्हणून आयुर्वेदशास्त्राबद्दल थोडं बघूया.
 
जगातील सर्वात प्राचीन वैद्यकशास्त्र म्हणजे आयुर्वेद. आयुर्वेदाचे आठ भाग आहेत. कायचिकित्सा (Medicine), बालरोग (Pediatrics), शल्यतंत्र (Surgery), शालाक्य तंत्र (ENT) , स्त्रीरोगप्रसुती (Gynaec-OBS) इ. यातील आचार्य चरक आणि त्यांची शिष्य परंपरा (म्हणजेच अत्रेय संप्रदाय) ‘मेडिसिन ब्रांच’ आणि आचार्य सुश्रुत व त्यांची शिष्य परंपरा (म्हणजेच धन्वंतरी संप्रदाय) ’सर्जिकल ब्रांच’ अशा झाल्या. सुश्रुत संहितेत शवविच्छेदनापासून विविध शस्त्रक्रियांचा उल्लेख केलेला आहे. तसेच विविध यंत्र-शस्त्रांबद्दल (Surgical Tools and Devices) बद्दल विस्तृत सांगितले आहे. यात cataract surgery, Plastic Surgery, Rhinoplasty, skin grafting व अन्य सुमारे १०० शस्त्रक्रियांचा उल्लेख आहे. कालपरत्वे काही ग्रंथसंपदा नष्ट झाल्या (नालंदा, तक्षशिला विद्यापीठाच्या नाशामध्ये काही ग्रंथ नव्हे, शेकडो ग्रंथसंहिता जाळल्या गेल्या.) त्यातील शास्त्रं हळूहळू लोप पावत गेले, तरी सुश्रुत संहिता, चरक संहिता, अष्टांग संग्रह, अष्टांगहृदय इ. संहिता व त्यावरील विविध भाष्यग्रंथ आजही उपलब्ध आहेत. हे सर्व बीएएमएसच्या शिक्षणात समाविष्ट आहे.
 
सुश्रुत संहितेत सांगितलेल्या ‘सर्जिकल इन्स्ट्रुमेंट’चा आजही शस्त्रक्रियेत वापर होतो, उपयोग होतो. शास्त्र टिकण्यासाठी त्यात सतत प्रयोग आणि सुधारणा होणे गरजेचे आहे. आयुर्वेदातही विविध प्रयोग सुरु आहेत. पंचकर्मांना लागणार्‍या विविध साधनांमध्ये आधुनिकीकरण (Modernization) केले गेले आहे. विविध चिकित्सा पद्धतींवर संशोधन सुरु आहे. Scholarly journals आणि PubMed journals मधून हे प्रसारित पण केले जात आहेत. म्हणजे, आयुर्वेदात ही प्रगती सुरु आहे. कुठल्याही शास्त्राचेही मूळ सिद्धांत अबाधित ठेवूनच त्यात नवनवीन शोध व विस्तार केल्यास शास्त्राची सकारात्मक प्रगती होऊ शकते, तसेच आयुर्वेदशास्त्राचेही आहे.
 
बरेचदा अ‍ॅलोपॅथी डॉक्टर्सचे म्हणणे असते की, ‘आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आयुर्वेदात सांगितला नाही, तर आयुर्वेदतज्ज्ञ ते कसा करू शकतात?’ तर त्याचे उत्तर खालीलप्रमाणे आहे-
 
जे काही शोध लागलेत, जसे- Surgical scalpels (१९१४ मध्ये Morgan Parkerने तयार केले) एक्स-रे (१८९५ मध्ये Wilhelm Röntgen, Physics Professor), सीटीस्कॅन (१९७१ मध्ये llan MacLeod Cormack, physicist) इ. हे कुठल्या अ‍ॅलोपॅथी डॉक्टरने शोधलेले नाहीत. शस्त्रक्रिया सोपी व्हावी, त्यातील गुंतागुंत कमी होऊन ऑपरेशननंतरच्या मृत्यूंचे प्रमाण कमी होण्यासाठी ही सर्व तंत्रे वापरात येतात. ‘मॉडर्न टूल्स अ‍ॅण्ड टेक्निक्स’ यांचा रोज नवीन शोध लागत आहे. त्यातील तंत्रं शिकून, व्यवहारात आणून उत्तम रुग्णसेवा करता यावी, हे ध्येय असल्यास अ‍ॅलोपॅथी किंवा आयुर्वेदतज्ज्ञ कोणीही हे वापरून अंमलात आणू शकतात. शास्त्र आणि व्यवहार हे दोन्ही बघता ही काळाचीदेखील गरज आहे.
 
भारतामध्ये सद्यपरिस्थिती अशी आहे की, खेड्यापाड्यातून अ‍ॅलोपॅथी डॉक्टर्सचे प्रमाण खूप कमी आहे. अशा ठिकाणी आयुर्वेदतज्ज्ञ आपली सेवा देत आहेत. अशा वेळेस काही औषधीचिकित्सा, तसेच गरज पडल्यास OPD Levelच्या शस्त्रक्रियाही हे वैद्य करत असतात. व्यवस्थित शास्त्रशुद्ध शिक्षण व प्रशिक्षण घेऊन हे वैद्य खेड्यापाड्यातून आणखी चांगले सेवाकार्य करू शकतील. दैनंदिन जीवनातील बदल आपण बघतो. चुलीवर स्वयंपाकापासून गॅस, हॉट-प्लेट, मायक्रोवेव्हपर्यंतचा प्रवास आपणांस माहिती आहे. तसेच पाटा-वरवंटा ते मिक्सर ग्राईंडर हा प्रवासही माहीत आहे. ते जसे सर्वजण समजून, आत्मसात करून वापरू लागली, तसेच प्रत्येक गोष्टीमधून होताना आढळते. वाहनांमधला बदल, पोषाखांमधला बदल, शिक्षणातील बदल इ. आपण स्वीकारावेत. काही बदल लवकर पचनी पडतात, काहींना वेळ लागतो. मनुष्याचे जीवन सुकर होण्यासाठी, आयुष्यमान सुधारण्यासाठी, उत्तम आरोग्यप्राप्तीसाठी वैद्यकशास्त्रांमधूनदेखील वेळोवेळी बदल होत गेला आहे. या अधिसूचनेद्वारेदेखील हेच साध्य करण्याचा प्रयत्न आहे. यामार्फत समाजातील विविध स्तरांतील रुग्णांना सुरक्षित, तात्कालिक व दर्जेदार वैद्यकीय सेवा मिळणे अधिक सोयीस्कर होऊ शकते.
 
कोरोनाच्या काळात आयुर्वेदाच्या चिकित्सेने रुग्णांना उपशय मिळाल्याचे आपण बघत आहोत. रोगप्रतिकार शक्ती सुधारून कोरोना होऊ न देणे व झाल्यास त्याची तीव्रता व प्रखरता कमीत कमी ठेवणे शक्य झाले. भारतातील वैद्यकशास्त्राचा आवाका समजून घेण्याची वेळ आता आली आहे. संपूर्ण जगात जसे योगशास्त्र पोहोचले, तसेच आयुर्वेदशास्त्राचेही होऊ लागले आहे. मात्र, खेड्यापाड्यांतून, जिल्ह्यांतून, तालुक्यांमधून सर्वत्र वैद्यकीय सेवा पोहोचत नाही, ही वस्तुस्थिती आहे. ‘आयुर्वेद धन्वंतरी’ (Ayurveda-MS) जर वरील प्रमाणे काही शस्त्रक्रिया अधिकृतरित्या करू शकले, तर ही दरी भरून काढणे अधिक सोपे होऊ शकते.
 
 
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
 
 
 
Powered By Sangraha 9.0