आम्हा सर्व हिंदूंना आदर्श असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या एका मंदिरावर आंध्र प्रदेशामध्ये हल्ला व्हावा, कोदंडधारी रामाच्या मूर्तीची विटंबना व्हावी याला काय म्हणावे? आंध्र प्रदेशातील हिंदू समाज पूर्ण ताकदीनिशी आणि संघटितपणे त्या राज्यात उभा नसल्याने हिंदूविरोधी समाजकंटकांचे फावते आहे, हे हिंदू समाजाच्या लक्षात कधी येणार?
हिदू मंदिरांवर हल्ले करणारे समाजकंटक खरे म्हणजे आपल्या देशातच काय, अन्य देशांमध्येही अस्तित्वात असता कामा नयेत. पण, अन्य धर्मीयांबद्दलच्या द्वेषातून असे हल्ले करणाऱ्या धर्मांध समाजकंटकांना आवर घातला जात नसल्यानेच त्यांच्याकडून असे प्रकार घडत आहेत, हे उघडच आहे. हिंदू मंदिरांवर हल्ले होण्याच्या घटना देशात आणि परदेशातही घडत आहेत. पाकिस्तानमध्ये तर अशा घटना सातत्याने घडत आहेत. तेथील सरकारचा अशी कृत्ये करण्यास प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष ‘आशीर्वाद’ असल्यानेच त्या देशात अशी संतापजनक कृत्ये घडत आहेत. पण, भारतातही हिंदू मंदिरांवर हल्ले होण्याच्या घटना घडाव्यात? खरे म्हणजे असे घडता नये, पण येथील हिंदू समाजाच्या डोळ्यांदेखत अशा घटना घडत आहेत.
संबंधित सरकारने त्याविरुद्ध तत्परतेने ठोस कारवाई केल्याचेही दिसून येत नाही. आंध्र प्रदेशमधील जगनमोहन रेड्डी सरकारच्या कारकिर्दीमध्ये त्या राज्यातील विजयनगर जिल्ह्यातील रामतीरधाम या खेड्यातील राम मंदिरावर काही समाजकंटकांनी हल्ला केला. मंदिराची कुलूपं तोडून टाकली. मंदिरातील कोदंडस्वामी रामाच्या मूर्तीची विटंबना केली. ही घटना दि. २८ आणि २९ डिसेंबरच्या रात्री घडली. मंदिरांवर हल्ले होण्याच्या अशाच तीन घटना अलीकडील काही दिवसांमध्ये आंध्र प्रदेशमध्ये घडल्या. तसेच गेल्या वर्षी आंध्रच्या काही भागांत हिंदू धार्मिक स्थळांवर हल्ले झाले. पण, त्या राज्यातील जगनमोहन रेड्डी सरकारने हल्लेखोरांविरुद्ध काही कठोर कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. आंध्र प्रदेशातील हिंदू मंदिरांवर होत असलेल्या हल्ल्यांचा विश्व हिंदू परिषदेने तीव्र निषेध केला आहे. या घटनांचा निषेध करताना, विश्व हिंदू परिषदेने जगनमोहन सरकारच्या निष्क्रियतेबद्दल त्या सरकारवर ठपका ठेवला आहे. जगनमोहन रेड्डी सरकार सत्तेवर आल्यानंतर राज्यातील हिंदूंविरोधी शक्तींचा आत्मविश्वास वाढला असून त्यातून हे हल्ले होत आहेत, असे विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे. सरकारने मंदिरांवर हल्ले करणार्यांवर कारवाई न केल्यास आंदोलनाशिवाय आमच्यापुढे अन्य पर्याय राहणार नसल्याचा इशारा विहिंपने दिला आहे.
मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात एका हिंदू मंदिराचा भव्य रथ समाजकंटकांनी जाळून टाकण्याचा प्रकार घडला होता. एकूणच जगनमोहन रेड्डी सरकार सत्तेवर आल्यानंतर हिंदूविरोधी तत्त्वांच्या कारवायांना धरबंध राहिला नसल्याचे दिसून येत आहे. आम्हा सर्व हिंदूंना आदर्श असलेल्या प्रभू रामचंद्रांच्या एका मंदिरावर आंध्र प्रदेशामध्ये हल्ला व्हावा, कोदंडधारी रामाच्या मूर्तीची विटंबना व्हावी याला काय म्हणावे? आंध्र प्रदेशातील हिंदू समाज पूर्ण ताकदीनिशी आणि संघटितपणे त्या राज्यात उभा नसल्याने हिंदूविरोधी समाजकंटकांचे फावते आहे, हे हिंदू समाजाच्या लक्षात कधी येणार?
झाकीर नाईक याचा मंदिरविरोधी प्रचार
भारत सरकार कारवाई करेल म्हणून सध्या मलेशियाच्या आश्रयाला गेलेल्या जहाल मुस्लीम धर्मप्रसारक झाकीर नाईक याने पुन्हा हिंदू समाजाच्या विरोधात वक्तव्य केले आहे. पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिरांवर हल्ले होण्याच्या ज्या घटना घडल्या, त्याचे समर्थन या झाकीर नाईकने मलेशियात दडून बसून केले. पाकिस्तानमधील खैबर पख्तुन्ख्वा या भागातील एका पुरातन हिंदू मंदिराचा विध्वंस करण्याची घटना अलीकडेच घडली. त्या घटनेचे जोरदार समर्थन झाकीर नाईक याने केले आहे. इस्लामी देशामध्ये मंदिरे उभारण्यास परवानगी देता नये, असेही झाकीर नाईकने म्हटले आहे. सर्व मुस्लीम मौलवी, उलेमा, इमाम, विद्वान यांचेही असेच मत असल्याचे झाकीर नाईक याने म्हटले आहे. झाकीर नाईक याने केलेले हे वक्तव्य पाहता मुस्लीम समाजातील जहाल मंडळी कशाप्रकारे विचार करीत आहेत, याची कल्पना येते. इस्लामशिवाय अन्य कोणत्याच धर्माचे अस्तित्व असता नये, या दिशेने विचार करायला लावणारी ही मानसिकता आहे. आपल्या देशासह अन्य विविध देशांमध्ये ही विचारसरणी प्रमाण मानून अनेक जहाल मुस्लीम दहशतवादी संघटना कार्यरत आहेत. अशा संघटनांनी जो उच्छाद मांडला आहे, त्याची झळ अनेक देशांना पोहोचत आहे, हे आपण सर्व जाणत आहोतच.
‘हलाल’संबंधी पत्रकास आक्षेप घेतल्यावरून केरळमध्ये चौघांना अटक
आजकाल मांसाहारी पदार्थांच्या पाकिटावर सदर पदार्थामध्ये वापरलेले मांस ‘हलाल’ असल्याचा उल्लेख दिसून येतो. मांसाहार करणाऱ्या हिंदू समाजाचे प्रमाण बरेच वाढले असले तरी आधुनिक हिंदू पिढी ‘हलाल’चा फारशा गांभीर्याने विचार करताना दिसत नाही. पण, या ‘हलाल’चे ‘स्लो पॉयझनिंग’प्रमाणे समाजावर आज ना उद्या वाईट परिणाम होणार आहेत, हे जाणलेल्या संघटनांनी ‘हलाल’ या प्रकारास आक्षेप घेण्यास प्रारंभ केला आहे. मुस्लीम समाजास ‘हलाल’ पद्धतीचेच मांस, मटण लागते. त्याशिवाय अन्य कोणत्याही प्रकारच्या मांसाहारी पदार्थांचे सेवन ते करीतच नाहीत. पण, त्याची सक्ती अन्य धर्मीयांवर कशाला करायची? देशाच्या अनेक भागांत ‘हलाल’ आणि ‘झटका’ प्रकारच्या मांसाची विक्री होत असल्याचे दिसून येते. पण, मुस्लीम समाजास ‘हलाल’ पद्धतीच्या मांसाशिवाय अन्य कोणतेही मांसाहारी पदार्थ निषिद्ध आहेत. हे सर्व लक्षात घेता, शहरांमधील मॉल्समध्ये केवळ ‘हलाल’ असा उल्लेख संबंधित विक्री केंद्रावर दिसून येतो. तसेच मांसाहारी पदार्थांच्या वेष्टनावर ‘हलाल’ असा उल्लेख असतो. अन्य कोणताच उल्लेख असत नाही. हे सर्व कशाचे द्योतक आहे? मुस्लीम समाजाची मर्जी राखण्यासाठीच हे सर्व केले जात आहे ना? याच ‘हलाल’वरून केरळमध्ये एक घटना घडली. तेथील एका बेकरीमध्ये पदार्थ ‘हलाल’ प्रकारचे असल्याची माहिती देणारे पत्रक लावण्यात आले होते. त्या पत्रकास एका हिंदू संघटनेच्या काही कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. सदर पत्रक भेदभाव करणारे असल्याने ते काढून टाकण्याचा आग्रह त्यांनी बेकरीच्या चालकांकडे धरला. सदर पत्रक काढून टाकण्याच्या मागणीबरोबरच आपणास ‘हलाल’ नसलेले पदार्थ हवेत, अशी मागणी त्यांनी बेकरी चालकाकडे केली. पण, तसेच पदार्थ देण्यास बेकरी चालकाने असमर्थता दर्शविली. एकूण ‘हलाल’ पदार्थ मुस्लीम नसलेल्यांच्या कसे माथी मारले जातात, याची या उदाहरणावरून कल्पना यावी. या घटनेची समाजमाध्यमांवर चर्चा झाल्यानंतर पोलिसांनी ‘हलाल’ पत्रकास आक्षेप घेणाऱ्या चौघा तरुणांना अटक केली. नंतर त्या तरुणांची जामिनावर सुटका करण्यात आली. ‘हलाल’ विरुद्ध ही जी मोहीम सुरु करण्यात आली आहे, ती मुस्लीम समाजास लक्ष्य करण्याच्या हेतूने सुरु करण्यात आली असल्याचा आरोप भारतीय मुस्लीम लीगने केला आहे. पण, या ‘हलाल’चे विष कळत न कळत हिंदू धर्मीयांच्या गळी कसे उतरविले जात आहे, याची कल्पना अशा उदाहरणांवरून यावी. हिंदू समाज या मुद्द्यावरून जागा कधी होणार?