वाईत जिवंत खवले मांजराची तस्करी; विक्री करण्याचा प्रयत्न झाला फोल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2021
Total Views |

pangolin_1  H x


खवले मांजर कृती आराखड्याचे काम पूर्णत्त्वाकडे

मुंबई (प्रतिनिधी) - वन विभागाने शुक्रवारी साताऱ्यामधून जिवंत खवले मांजराची तस्करी करणाऱ्यांना अटक केली. या प्रकरणातून पाच आरोपींनी अटक करण्यात आली आहे. आरोपींनी या खवले मांजराला विक्री करण्यासाठी पकडले होते. दरम्यान खवले मांजराच्या संवर्धनाकरिता राज्यात 'नियोजन कृती आराखड्या'चे(प्लॅन आॅफ अॅक्शन) काम त्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीकडून पूर्णत्त्वाच्या दिशेने सुरू आहे.
 
 

pangolin_1  H x 
 
 
साताऱ्यामधील वाई तालुक्यातील काही लोक खवले मांजर विक्रीचा प्रयत्न करत असल्याची माहिती साताऱ्याचे मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे यांनी मिळाली होती. भाटे यांनी ही माहिती वनअधिकारी सचिन डोंबाळे यांना देऊन आरोपींना मुद्देमालसह पकडण्याचे नियोजन केले. त्यासाठी प्रशासनातर्फे आपण ग्राहक असल्याचे भासवत आरोपींना फोन करुन खवले मांजर खरदेचा व्यवहार करण्यात आला. या आरोपींना सुरुर फाटा-वाई रस्त्यावरील एका हाॅटलेनजीक बोलवण्यात आले. अधिकाऱ्यांनी सापळा रचून गाडी आणि दुचाकीवरुन आलेल्या व्यक्तींना ताब्यात घेतले. गाडीची तपासणी केल्यावर पोत्यामध्ये भरलेले जिवंत खवले मांजर त्यांना आढळून आले.
 
 
 
या प्रकरणी वसंत सपकाळ, भिकाजी सुर्यवंशी आणि प्रशांत शिंदे या वाई तालुक्यातील स्थानिकांसह दिलीप मोहिते आणि अक्षय मोहिते या कोरागाव तालुक्यातील दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती सचिन डोंबाळे यांनी दिली. स्थानिकांनी आसपासच्या जंगलामधून या खवले मांजराला पकडल्याचे त्यांनी सांगितले. या कारवाईमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी वाई महेश झाझुर्णे ,वनपाल गजानन भोसले, वनरक्षक दीपक गायकवाड , वनरक्षक विजय भोसले, पोलीस कॉन्स्टेबल राजेश वीरकर,पोलीस कॉन्स्टेबल सुहास पवार,वाहन चालक दिनेश नेहरकर हे सहभागी होते. वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत खवले मांजराला संरक्षण लाभले आहे. त्यामुळे या प्राण्याची शिकारी किंवा तस्करी केल्यास कायद्यानुसार सात वर्ष सक्त कारावास व १० हजार रुपये दंडाची तरतूद आहे.
 
 
 
 
राज्यातील खवले मांजर तस्करीचे प्रमाण वाढल्याचे चित्र गेल्या काही वर्षातील तस्करीच्या प्रकरणांमधून समोर आले आहे. राज्यातील सर्व भागात खास करुन कोकण आणि विदर्भात खवले मांजरांचा अधिवास आहे. याच परिसरातून खवले मांजर तस्करीच्या बातम्या समोर येत असतात. आंतरराष्ट्रीय वन्यजीव बाजारपेठेत खवले मांजरांना मोठी मागणी असल्यामुळे राज्यातून छुप्यामार्गाने या प्राण्यांची तस्करी होते. या तस्करीला चाप लावण्याकरिता त्यामागील कारणे, उपाय आणि योजना अंमलात आणण्यासाठी 'कृती आराखडा' तयार करण्यात आला आहे. यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीच्या सदस्यांनी हा कृती आराखडा पूर्ण केला असून त्याच्या पुनरावलोकनाचे काम सुरू असल्याची माहिती समितीचे सदस्य आणि ज्येष्ठ संशोधक डाॅ. वरद गिरी यांनी दिली.
@@AUTHORINFO_V1@@